आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणार्या लोकांच्या घरात एक वेळ टीव्ही नसेल, कपाट नसेल, शो च्या वस्तू नसतील परंतु भारताचे संविधान आणि बाबासाहेबांच्या विचारांची चार पुस्तके मात्र नक्की पाहायला मिळतात.
– – –
मी मांडलेत
मला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेरणा देत भेटलेले बाबासाहेब..
मी मांडलेत
कुडाच्या छपरात आजीने थाटलेले बाबासाहेब..
मी मांडलेत
जागतिक पदव्यांच्या आभूषणांनी नटलेले बाबासाहेब..
मी मांडलेत
सबंध जगाला ज्ञानवंत म्हणून पटलेले बाबासाहेब..
मी मांडलेत
कित्येकाच्या लेखनीतून सुटलेले बाबासाहेब..
मी मांडलेत
न्यायाच्या लढाईत कधीच मागे न हटलेले बाबासाहेब..
मी मांडलेत
समतेच्या पाण्यासाठी वनवा होऊन पेटलेले बाबासाहेब..
मी मांडलेत
पिढ्यांपिढ्याच्या अन्याया विरोधात पेटून उठलेले बाबासाहेब..
– – –
कोणतीही अपेक्षा न ठेवता, काहीही नव्याने न मागायला, तर आज आमचं जे आहे ते सगळं तुम्हीच दिलं आहे, म्हणून तुम्हासमोर नतमस्तक व्हायला ऊन, वारा, पाऊस कोणतीच पर्वा न करता दरवर्षी लाखो लोक येतात चैत्यभूमी, दीक्षाभूमी अन् शौर्यभूमीवर! या ठिकाणांवर उरूस भरलेला असतो ज्ञानाच्या खजिन्याचा म्हणजे पुस्तकांचा! आबालवृद्ध येथून घरी घेऊन जातात ज्ञानाची शिदोरी. जगाच्या इतिहासातील हे अद्वितीय उदाहरण आहे.
बामणाघरी लिहिणं, कुणब्याघरी दानं अन महारा घरी गाणं! ही परंपरा मला मान्य नाही, म्हणणार्या बाबासाहेबांनी ते सगळं मोडीत काढून आज आपल्या लेकरांघरी लिहिणं, वाचणं अन बोलणं पेरून ठेवलं आहे. थँक यू बाबासाहेब!
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सबंध आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम कशावर केलं? कोणावर केलं? तर डॉ. आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात ‘सगळ्यात जास्त प्रेम केलं ते पुस्तकांवर!’ बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी राजगृह बांधल्यानंतर रमाई म्हणतात, ‘आमच्या सायबांचा आमच्यापेक्षा जास्त जीव त्यांचा पुस्तकावर हाय, त्यामुळं त्यांनी पुस्तकासाठी हा राजवाडा बांधलाय!’ एका पत्नीने या शब्दांमध्ये आपल्या पतीच्या प्रेमाची दखल घ्यावी, यात बाबासाहेब पुस्तकांवर किती जीव लावतात याचे उत्तर आहे. साधी गोष्ट नाही, ज्या माणसाचं अर्ध आयुष्य साध्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये गेलं. एवढ्याशा खोलीत कसाबसा संसार चालला. आयुष्यात जेव्हा शक्य झालं तेव्हा मुंबईमध्ये मोठा बंगला बांधला, परंतु त्या बंगल्यातली, राजागृहातली सर्वात जास्त जागा, सबंध एक मजला कोणासाठी राखीव ठेवला? स्वतःच्या परिवारासाठी नाही, तो संबंध एक मजला राखीव ठेवला, आपल्या प्रिय पुस्तकांसाठी! जगाच्या इतिहासात पुस्तकांवर इतकं प्रेम कोणीच केलं नाही.
एक वेळ जेवायला नसलं तरी चालेल, उपाशी राहावं लागलं तरी चालेल, परंतु पुस्तकं मात्र विकत घेतली पाहिजेत. पुस्तक वाचली पाहिजेत, ‘तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक. कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचं? ते शिकवेल,’ हा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर देतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी सुभेदार यांचं जेव्हा आपल्या पगारात भागत नव्हतं, घरामध्ये पैशावरून अडचणी निर्माण व्हायच्या, त्या काळात भिवाचं वाचन थांबू नये म्हणून, आपल्या मुलींकडे जाऊन पैसे उसने आणायचे आणि त्या पैशातून भिवाला पुस्तक विकत आणायचे, भिवा वाचत राहावा, पुस्तकाशी त्याचं नातं जोडलं जावो, भिवाला पुस्तकांची गोडी लागावी, यासाठी रामजीबाबा अशी काळजी घ्यायचे. असा बाप असणे ही खरी काळाची गरज आहे. आपल्या पित्याने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी अशा प्रकारे पेरणी केली पाहिजे, तर मुलं भिवा ते बाबासाहेब होतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकप्रेम जगाला माहीत आहे, लंडन ते मुंबई अशा सलग ६४ तासाच्या बोटप्रवासात बाबासाहेबांनी ८ हजार पाने वाचून काढली होती, असे देवी दयाल यांनी आपल्या ‘डेली रूटीन ऑफ डॉ. आंबेडकर’ या पुस्तकात लिहिले आहे.
संबंध आयुष्यभर पुस्तकाशी हे नातं जोडून राहिलेले डॉ. आंबेडकर समाजालाही अशाच प्रकारचा ‘पुस्तक वाचा’ हा संदेश देतात. ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, तशीच पुस्तक हीसुद्धा मानवाची मूलभूत गरज आहे, हे बाबासाहेबांच्या आयुष्यातून दिसून येतं. एकदा परदेशातून त्यांनी पुस्तके मागवली होती, एका बोटीतून ती अनेक पुस्तके पाठवली होती. पण ती बोट दुर्दैवाने बुडाली. जेव्हा बाबासाहेबांना ही गोष्ट समजली तेव्हा ते पुस्तकांच्या विरहात दोन दिवस रडत होते. बाबासाहेब अनेकदा म्हणत, समाजातील अनेक लोकांनी माझी अवहेलना केली, मला अपमानित केलं, पण या पुस्तकांनी मला ज्ञान दिलं आणि जगात सन्मान मिळवून दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारा समाजही त्यांचा हा विचार मानतो.
आज डॉ. बाबासाहेबांच्या विचारांना मानणार्या लोकांच्या घरात एक वेळ टीव्ही नसेल, कपाट नसेल, शोच्या वस्तू नसतील, परंतु भारताचे संविधान आणि बाबासाहेबांच्या विचारांची चार पुस्तके मात्र नक्की पाहायला मिळतात. हा विचारांचा विजय आहे. हा मार्गदात्याने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आहे.
हल्ली कोणत्याही कार्यक्रम्ााला नेत्याला किंवा कोणालाही पैसे देऊन माणसं जमवावी लागतात. त्यांची येण्या-जाण्यापासून ते जेवणापर्यंत सगळी सोय करावी लागते. त्यामुळे माणसं एकत्र आणणे किंवा एखाद्या कार्यक्रमाला माणसं जमविणे हे सध्या खूपच अवघड झालेलं आहे. परंतु या देशाच्या इतिहासात चैत्यभूमी मुंबई, दीक्षाभूमी नागपूर, शौर्यभूमी कोरेगाव भीमा, मुक्तीभूमी येवला, महाड चवदार तळे, बुद्धमूर्ती स्थापना वर्धापन दिन देहूरोड यासह आणखी बर्याच ठिकाणी डॉ. बाबासाहेबांना मानणारा प्रचंड मोठा जनसमुदाय लाखोंच्या संख्येने दरवर्षी हजेरी लावताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर सहा डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर लाखोंचा जनसमुदाय लोटतो, हा लाखोंचा जनसमुदाय दोन-दोन, तीन-तीन दिवसांसाठी संबंध देशातून आपल्या परिवारासह आलेला असतो. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमान न बाळगता, आपल्या चिल्यापिल्यांसह हे परिवार बाबासाहेबांच्या प्रेमापोटी, आपल्या मुक्तदात्याला अभिवादन करण्यासाठी येथे हजेरी लावतात. अशाच प्रकारची गर्दी अशोका विजयादशमी दिनी नागपूरच्या दीक्षाभूमीवरही असते. येथेही सबंध देशातून व मागील काही वर्षापासून जगातील अनेक देशातून बुद्ध व आंबेडकर अनुयायी उपस्थित राहतात.
हे लोक उपस्थित राहतात म्हणजे ते दर्शनाला येतात असं नव्हे, तर सबंध जगाला या गोष्टीचं विशेष कौतुक वाटत आहे की लाखोंच्या संख्येने येणार हा जनसमुदाय आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन तर करतोच, परंतु या सर्व ठिकाणी ग्रंथांचे, प्रबोधनात्मक पुस्तकांचे मोठमोठे स्टॉल असतात. या ठिकाणी पुस्तकाच्या खरेदीविक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. पुस्तकांच्या खरेदीविक्रीच्या माध्यमातून कमीत कमी काळात विक्रमी आर्थिक उलाढाल होणारी ही ऐतिहासिक ठिकाणे आहेत. इथून लोक अंगारा, खेळणी, कपडेलत्ता, सोननाणंच नव्हे, तर ज्ञानाचा खजिना म्हणजे पुस्तके घरी घेऊन जातात, हे जगाच्या पाठीवर अद्वितीय आहे, यात शंकाच नाही.
ही जी लाखो लोकं तहान, भूक, निवारा, नैसर्गिक संकट अशा कोणत्याच गोष्टीची पर्वा न करता शेकडो, हजार किमी प्रवास करून सहपरिवार सलग दोन दिवस मुक्कामी येतात. ही लाखो माणसं भ्रुईचं अंथरून आणि आकाशाचे पांघरून घेऊन भीमरावाच्या कुशीत निर्धास्त निद्रिस्त होतात. हे भीमरावावरचं प्रेम पैशांच्या पलीकडचं काळजातलं प्रेम आहे. याची जगात कुठेच बरोबरी होऊ शकत नाही!
जग बदलणार्या बापासाठी लेकरं कशाचीच पर्वा करत नसतात. त्यांची बांधिलकी, त्यांचं प्रेम असतं फक्त एका नावाशी, या एका नावासाठी ते आपला जीव ओवाळून टाकायला ही तयार असतात, ते नाव म्हणजे… ‘विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर’.
तिथं येऊन दर्शन वगैरेसाठी नसतंच कोणी धडपडत..
तर तिथं आल्यावर अंगी येतं दहा हत्तींचं बळ..
अन् मनातला स्वाभिमान होतो प्रबळ!