• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

- ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर (सोपी पायवाट)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
June 30, 2021
in सोपी पायवाट
0
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

पंढरीची वारी हा संपूर्ण मराठी मनाचा सांस्कृतिक सोहळा झाला आहे. जात, धर्म, वंश, वर्ण विसरून लाखो लोक एका सावळ्या पाडुरंगाच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने चालतात. गेली दोन वर्षे कोरोनामुळे सामूहिक वारी होऊ शकत नाही. आज कोरोनाचे संकट नसते तर विविध संतांच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या असत्या. पण दिंडीत प्रत्यक्ष पायी चालता आलं नाही म्हणून काय झालं… चला, मनोमन संतविचारांची उजळणी करून, त्यांचा जागर करून संतांनी सोपी केलेली ही पायवाट पुढचे तीन आठवडे या कीर्तनांच्या माध्यमातून चालू या! बोला, पुंडलिक वरदे, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय!
—-

गात जा गा गात जा गा ।
प्रेम मागा विठ्ठला ।।

अशी प्रेमाची साद घालीत शेकडो दिंड्यातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघतात. कुणाचेही निमंत्रण नाही आणि कुणाचेही नियंत्रण नाही. तरीही लाखोंचा हा समूह दररोज आपला मुक्काम बदलत पायी वाटचाल करतो. या प्रवासात कुणी कुणाला जात विचारीत नाही. कुणी कुणाला धर्म विचारीत नाही, कुणी कुणाला कोणत्या भागातून आलास म्हणून विचारीत नाही, कुणी कुणाला स्त्री अथवा पुरुष आहे म्हणून वेगळी वागणूक देत नाही. वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे प्रदेश यातून आलेली मंडळी पण एकमेकांशी एकजीव होऊन जातात. २२ दिवसांच्या प्रवासात कुणाचीच कुणाविरोधात कोणतीच तक्रार नसते. कुणीच कोणती शिस्त मोडत नाही. या सर्वांना एका सूत्रात बांधणारे कोणते बळ आहे? तर ते बळ आहे प्रेमाचे! बंधुत्वाचे!

प्रेम प्रीतीचे बांधले ।
ते न सुटे काही केले ।

पंढरीच्या वारीमध्ये जसा भक्तांच्यामध्ये परस्पर प्रेमभाव आहे, तसाच तो देव आणि भक्तामध्येही आहे. इतर तीर्थक्षेत्राला गेलेले भाविक नवस करतात, इच्छा पूर्ण झाल्या तर ते नवस फेडतातही! इच्छा पूर्ण झाली नाही की, तिकडे पुन्हा फिरकत नाहीत. पण पंढरपूरच्या पाडुरंगाकडे कोणीही भौतिक सुखासाठी कोणताही नवस करीत नाहीत. इथे अपेक्षा नसल्यामुळे अपेक्षाभंग होत नाही. इथे एकच अपेक्षा असते ती म्हणजे प्रेमाची. इथे ज्ञान, ब्राह्मज्ञानसुद्धा गौण ठरते. तुकाराम महाराज सरळ देवाला सांगतात-

भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा ।
अभिमान नित्य नवा तया माजी ।।

भक्तीच्या वाटेवरून चालणार्‍या माणसाला ब्रह्मज्ञानाची ओढ असते. ते ब्रह्मज्ञान मिळविण्यासाठी मग कुणा तरी मध्यस्थाची मदत घेतली जाते. पंढरीच्या वारकर्‍यांना मात्र ब्रह्मज्ञानाचीही अपेक्षा नसते. ते भगवंताला सरळ सांगतात-

नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव ।
मी भक्त तू देव ऐसे करी ।।

हा सर्व व्यवहार प्रेमाचा आणि बंधुभावाचा असल्यानेच २२ दिवसांच्या प्रवासात सर्वजण अनेक गैरसोयी असतानाही कोणतीही तक्रार करीत नाहीत. पोलीस हस्तक्षेपाची गरज उरत नाही.

बंधुत्वाची ही ताकद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओळखलेली होती आणि म्हणूनच त्यांनी संविधानामध्ये समता आणि स्वातंत्र्याबरोबर बंधुत्वाचा समावेश केला. संविधानसभेतील त्यांच्या शेवटच्या भाषणात त्यांनी बंधुत्वाला विशेष महत्व दिल्याचे दिसते. त्यात बाबासाहेब म्हणतात, ‘समता, स्वतंत्र आणि बंधुत्व यापैकी एकाची दुसर्‍यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वाभाविकरीत्या अस्तित्वात राहणार नाहीत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांची गरज भासेल.’
पंढरीच्या वाटेवर लाखोंचा जनसमुदाय पोलिसी हस्तक्षेपाशिवाय स्वयंशिस्तीने चालतो तेव्हा डॉ. आंबेडकरांचे शब्द वारीपुरते तरी तंतोतंत लागू पडताना दिसतात. वारीत दिसणारा हा एकोपा जेव्हा प्रत्यक्ष समाजातही दिसेल त्या दिवशी संतांचे स्वप्न साकार झाले, असे म्हणता येईल.

 जात, धर्म, वर्ण, वंश याच्या पलीकडे जाऊन एक प्रगल्भ मानवी समाज निर्मितीच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणून संतपरंपरेकडे पहावे लागेल. ही परंपरा अचानक आणि सहज निर्माण झाली असे म्हणता येणार नाही. ती तत्कालीन समाजाची गरज होती. धार्मिक कर्मकांड आणि वर्णव्यवस्थेने केलेली कोंडी फोडण्याच्या दिशेने टाकलेले ते पाऊल होते, असे म्हणावे लागेल. संतांच्या प्रबोधन चळवळीपूर्वी धार्मिक सत्ता विशिष्ट वर्गाच्या हातात होती आणि या धार्मिक सत्तेचे अप्रत्यक्ष नियंत्रण राजसत्तेवर होते. धर्माचरणाचे जे ग्रंथ होते ते सर्व संस्कृतमध्ये होते. संस्कृत भाषाही विशिष्ट वर्गालाच अवगत होती. त्यामुळे त्या ग्रंथाचा अर्थ आपल्या सोयीने लावून समाजाला ताब्यात ठेवले जात होते. किचकट कर्मकांडाच्या माध्यमातून समाजाचे शोषण केले जात होते. संतांच्या प्रबोधन चळवळीने पहिल्यांदा आध्यात्मिक साहित्य लोकभाषेत आणले आणि त्यानंतर किचकट कर्मकांडांना सोपे पर्याय दिले.

ज्ञान हे संस्कृतच्या बंधनातून मुक्त करून जनभाषेत आणण्याची सुरुवात दक्षिणेतील संतपरंपरेपासून झाली. इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून ते नवव्या शतकापर्यंत तामिळनाडूमध्ये वैष्णव अळवार संतपरंपरा रुजली आणि विकसित झाली. या अळवार संतांनी भक्तीपरंपरेला संस्कृतच्या जोखडातून मुक्त करीत जनभाषेचा भक्कम आधार दिला. इतकेच नव्हे, तर आमची जनभाषा आम्ही ज्ञानभाषा करू, असा निर्धार अळवार संतांनी केला. तमिळ भक्तीपरंपरेत चार अळवारांना विशेष मान आहे. त्यातील भूत्तम अळवार मातृभाषा तमिळला ज्ञानभाषा बनविण्याची प्रतिज्ञा करतात. त्यांनी तमिळमध्ये लिहिलेल्या काव्याचा मराठी अनुवाद असा आहे,

प्रेम असते जळणार्‍या दिव्यासमान
त्यातील तेल असते मनातील इच्छा
शाश्वत सुरात विरघळून जाणारे मन
असते त्याची वात
मी पेटविली आहे
प्रकाशमान ज्ञानज्योत तामीळ भाषेत
तिला लावले आहे कामी नारायणासाठी!

तामिळनाडूमधील अळवार संतांनी जनभाषेत साहित्यनिर्मितीला प्रारंभ केल्यानंतर त्याचा प्रभाव बाजूच्या कर्नाटकातील संतपरंपरेवर पडला. अगोदर संस्कृतमध्ये असणारी विविध पुराणे पंपा आणि रान्ना या दोघांनी कानडीमध्ये आणली. पुढे बसवण्णा, अक्कामहादेवी आणि अलम प्रभू या वीरशैव संतांनी त्यांची वचने तेथील लोकभाषेत म्हणजे कानडीत लिहिली. त्याच प्रभावातून चक्रधर स्वामींच्या शिष्यांनी मराठीत रचना करायला सुरुवात केली. अर्थात ज्यांना ज्ञान संस्कृतच्या कडीकुलूपात बंद ठेवायचे होते, त्यांनी मराठी साहित्यनिर्मितीला विरोध केला. तेव्हा चक्रधरस्वामींच्या शिष्यांनी खणखणीत मराठीमध्ये सुनावले की,

तुमचा अस्मात कस्मात मी नेणे गा :
मज चक्रधरे निरुपिली मर्‍हाटी :
तियासिचि पुसा :

तुमचं संस्कृतमधील अस्मात कस्मात आम्हाला काही माहिती नाही. आम्हाला चक्रधरस्वामींनी मराठी शिकवली आहे. तुम्हाला काही विचारायचे असेल तर त्यांना विचारा.

त्यापुढे वारकरी संप्रदायाचा पाया असणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी तर अमृताशी पैज लावली तर माझी मराठीचं जिंकेल असा दृढ विश्वास व्यक्त करीत साहित्यनिर्मिती केली. ज्ञानेश्वर महाराज लिहितात-

माझा मर्‍हाटाचि बोलू कवतूके ।
अमृतातेही पैजा जिंके ।
ऐसी अक्षरे रसिके ।
मेळवीन ।।

मराठीचा गौरव करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-

हां हो नवल नोहे देशी ।
म-हाटी बोलिजे तरी ऐसी ।
वाणे उमटत आहे मा आकाशी ।
साहित्य रंगाचे ।।

म्हणजे संस्कृतध्येच लिहिण्याचे, बोलण्याचे जे बंधन होते ते ढिले करून मराठीत ज्ञान प्रवाहित करण्याचे महान कार्य संत चळवळीने केले. ज्ञानेश्वर महाराज यांनी संस्कृतच्या बंधनांत अडकलेली गीता मुक्त केल्याबद्दल संत मंडळानेही ज्ञानेश्वर महाराज यांचा गौरव केला आहे. संस्कृतमधील गीतेवर भाष्य करताना मराठीतील ५६ बोली भाषांचा गौरव केला असल्याचा निर्वाळा देताना नामदेव महाराज म्हणतात-

गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ।
ब्रह्मानंद लहरी प्रकट केली ।।
अध्यात्म विद्येचे लाविलेसे रोप ।
चैतन्याचा दीप उजळीला ।।
छप्पन्न भाषेचा केलासे गौरव ।
भवार्णवी नाव उभारीली ।।

दुसर्‍या एका अभंगात संस्कृताची गाठ सोडून गीता देवी मराठीत आणल्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांचा गौरव करताना नामदेव महाराज म्हणतात,

संस्कृताचि गाठी ।
उघडोनी ज्ञान दृष्टी ।
केलीसे मराठी ।
गीता देवी ।।

आधुनिक कवी मुरलीधर नारायण गुप्ते ऊर्फ कवी बी यांना तर संस्कृतमध्ये बांधून ठेवलेले ज्ञान मराठीमध्ये लिहिणे ही बंडखोरी आहे, असे वाटते. इथल्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणांवर भाष्य करणारी कवी बी यांची डंका नावाची कविता आहे. तीत कवी बी म्हणतात-

त्या बड्या बंडवाल्यात
ज्ञानेश्वर माने पहिला;
मोठ्यांच्या सिद्धांतांचा
घेतला पुरा पडताळा

संस्कृत भाषेत ज्ञान अडकल्यामुळे ते मूठभर लोकांपुरतेच मर्यादित होते. सर्वसामान्यांना ते कळत नव्हते. त्यामुळे संस्कृत न कळणारांमध्ये आपसूकच न्यूनगंड निर्माण होत होता आणि ही भाषा येणार्‍यांत अहंगंड निर्माण होत होता. मग संस्कृत येणारे उच्च समजले जात, तर न येणारे आपोआपच कनिष्ठ ठरत होते. लोकभाषेत साहित्यनिर्मिती झाल्याने ते ज्ञान सर्वांसाठी खुले झाले.

एकीकडे संत ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृतमधील ज्ञान मराठीत आणून बंडखोरी केली, तर तिकडे पंढरपुरात संत नामदेव महाराजांनी ‘अभंग’ हा सोपा काव्यप्रकार मराठीत प्रचलित करून धार्मिक साहित्याला मराठी भाषेच्या अंगणात आणखी मुक्तपणे बागडण्याचा मार्ग मोकळा केला. पुढे कीर्तनातून अभंगांचे निरूपण करून भक्तीपंथ अधिक सोपा केला. या कीर्तनाचा उद्देश सांगताना नामदेव महाराज म्हणतात, आम्ही जे कीर्तनात नाचणार आहोत ते मोक्ष मिळविण्यासाठी नाही, वैकुंठाला जाण्यासाठी नाही, मुक्ती मिळण्यासाठी नाही; तर आम्ही ज्ञानाची ज्योत पेटविण्यासाठी कीर्तनात नाचणार आहोत.

नाचू कीर्तनाचे रंगी ।
ज्ञानदीप लावू जगी ।।

असे सांगत कीर्तनातून ज्ञानाची ज्योत पाजळून प्रकाशबीजे रुजविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असा विश्वासही त्यांनी दिला. नामदेव महाराजांनी अभंग हा काव्यप्रकार लिहिला. इतरांनाही तो लिहिता यावा म्हणून अभंग कसे लिहावेत याचे मार्गदर्शन करणारे काही अभंग नामदेव महाराजांनी लिहिले. भक्तीमार्ग सांगणारे, मनातील भावभावनांना वाट करून देणारे अभंग हे माध्यम अत्यंत अल्पावधीत लोकप्रिय झाले. अनेकजणांचा युगानुयुगे दबलेला आवाज मोकळा झाला आणि सर्व जाती-धर्मातील लोक लिहू लागले. त्यांना नामदेव महाराज प्रोत्साहन देऊ लागले. त्यामुळेच नामदेव महाराजांच्या काळात २४ स्त्री-पुरुष संतकवी निर्माण झाले. त्यांनी अभंगरचना केली. यातील बहुतेक चातुर्वर्ण्य व्यवस्थेने शुद्र, अतिशूद्र ठरविलेल्या विविध जातीतील होते.

ज्यात आमुचि माळीयाचि जात ।
शेत लावू बागायत ।।
म्हणणारे सावता महाराज होते.
वारीक वारीक ।
हजामत करू आम्ही बरीक ।
म्हणारे सेना महाराज होते.
मन बुद्धीची कातरी ।
राम नामे सोने चोरी ।
म्हणारे नरहरी महाराज होते.
जोहार मायबाप जोहार ।
तुमच्या म्हाराचा मी म्हार ।।

म्हणणारे चोखोबा आणि त्यांचे कुटुंबीय होते.

चोखामेळा आणि नामदेव महाराज यांचा तर एकमेकांशी खूप जिव्हाळा होता. म्हणूनच नामदेव महाराजांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना जशी अभंग लिहिण्यासाठी प्रेरणा दिली, तशीच चोखोबा महाराजांच्या कुटुंबातील सर्वांनाही लिहिते केले. ज्यात चोखोबांची पत्नी सोयराबाई, मुलगा कर्ममेळा, बहिण निर्मळा, मेहुणा बंका यांच्या नावे अभंग आहेत.

ज्यांना व्यक्त होण्याचे कोणतेही माध्यम नव्हते, ज्यांच्या भावभावना हजारो वर्षे मुक्या झाल्या होत्या, त्यांना आवाज मिळाला, मते मांडता येऊ लागली, ही केवढी मोठी क्रांती होती.

शूद्रातिशूद्रांना अभंगातून अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य वारकरी परंपरेतून मिळू लागले तेव्हा वर्चस्ववादी व्यवस्थेला हे सहन होणे शक्य नव्हते. गावकुसाबाहेर राहणारे चोखोबा, दासीचं काम करणारी जनाबाई अभंग लिहितात, या अभंगातून देवाशी सलगी करतात, व्यथा वेदना मांडतात, हे वर्चस्ववादी व्यवस्थेला पचणे अवघड होते. म्हणूनच मग कधी जनाबाईवर भगवंताचा शेला चोरल्याचा तर कधी चोखोबांवर पाडुरंगाचा हार चोरल्याचा आळ घेऊन मारहाण करण्यात आली. चोखोबांना मारहाण होत होती तेव्हा त्यांनी विठ्ठलाचा धावा केला.

धाव घाली विठू आता चालू नको मंद ।
बडवे मज मारिती काय ऐसा अपराध ।।
विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला ।
शिव्या देती म्हणती म्हारा देव बाटविला ।।

चोखोबांना झालेल्या मारहाणीमुळे सर्व कुटुंबियांना खूप दु:ख झाले होते. पण त्याचा खोलवर परिणाम त्यांचा मुलगा कर्ममेळा यांच्यावर झाला. अस्पृश्य म्हणून समाजात मिळणारी हीन वागणूक, अपमान हे कर्ममेळा अनुभवत होते. त्या वेदना त्यांना अस्वस्थ करीत होत्या. कर्ममेळा यांनी या अस्वस्थतेला अभंगातून वाट करून दिली. चोखोबांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या अभंगात अस्पृश्य जातीत जन्मल्याची खंत आहे. पण कर्ममेळा यांच्या अभंगात विद्रोह आहे. हीन जातीत जन्माला घालून आपल्यावर देवाने अन्याय केले आहे, या भावनेतून कर्ममेळा संतप्त होतात. आपल्याला हीन जातीत जन्माला घातल्याबद्दल ते देवाला जाब विचारतात.

देवा, तू या संपूर्ण जगाचा निर्माता आहेस, असे म्हणतात. निर्माता म्हणजे बाप. तू जर सर्वांचा बाप आहेस तर मग असा पक्षपाती कसा वागतोस. तुझी काही लेकरे तुझ्या जवळ येऊन तुझी पूजा करू शकतात, आम्हाला मात्र मंदिरात प्रवेश नाही. तुझी काही लेकरं गावात महालात राहतात, आम्हाला गावकुसाबाहेर झोपडीत का रहावे लागते? तुझी काही लेकरं चांगले अन्न खातात आणि आम्हाला मात्र उष्ट्यावर जगावे लागते, असे का? असे प्रश्न कर्ममेळा देवाला विचारतात. एवढे करून ते थांबत नाहीत तर देवाची लाज काढतात. कर्ममेळा लिहितात-

आमुचि केली हीन याती ।
तुज ना कळे श्रीपती ।।
जन्म गेला उष्टे खाता ।
लाज न ये तुझ्या चित्ता ।।

मत मांडण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळेच सातशे वर्षांपूर्वी कर्ममेळा देवालाही थेट सवाल करू शकले.
वारकरी भक्तीपरंपरा विकसित होत गेली तशी एकट्याने केली जाणारी वारी सामूहिकरीत्या केली जाऊ लागली. कालानुरूप त्यात बदल होत गेले. ते आजच्या वारीच्या रूपात दिसत आहेत. वारीत आज आपल्याला सामाजिक समतेचे देखणे रूप पाहायला मिळते आहे. ते समाजातही पाहायला मिळो.

– ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि वारकरी परंपरेतील नामांकित कीर्तनकार आहेत.)

Previous Post

गाणं ऐकवत गावोगाव

Next Post

भाजपविरोधी जुळवाजुळवीची नांदी!

Next Post
भाजपविरोधी जुळवाजुळवीची नांदी!

भाजपविरोधी जुळवाजुळवीची नांदी!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.