वसंत.
तो आमच्या बागायतीत कामाक येत होतो. आमच्या घराजवळच एक महादेवाचा पुरातन मंदीर आसा. त्या मंदीरात आमचो काका पुजा करता. आमची बागायत जिथे संपता तिथेच वरच्या बाजूक एका डोंगराळ भागात काट्याकुट्यांनी भरलेला रान आसा. वाटंय बी तशीच काट्यांची. पायवाटेच्या दोन्ही बाजूक काटेरी कुंपणा आसंत. ती सुध्दा एकमेकांत गुंतलेली आणि अस्ताव्यस्त, जणू आपल्यामधेच मग्न, जगाक तोंड वर करून बघणार पण नाय. वसंत सोडून बाकी कोणाकंच तेंच्या व्यस्थतेत खंड आणूक मज्जाव होतो. आणि जर वसंत सोडून इतर कुणी अतिशहाण्यान तेंच्या व्यस्थतेत खंड आणलोच तर दहा बारा काट्यांचो महाप्रसाद तो माणुस आपल्या अंगावर घेऊन इल्याशिवाय रवचो नाय.
याच काट्यांच्या साम्राज्यात वसंत बिनदिख्कत जाई होतो आणि त्या काट्यांमधून हात घालून त्या काट्यांमध्ये असलेल्या त्या गुलाबाच्या झाडावरून पांढरे शुभ्र टवटवीत गुलाब अलगद काढून देवळात पुजेसाठी आणी होतो. वसंताच्या तरूणपणात कदाचित त्या काट्यांनी तेका फार त्रास दिलो आसात. ज्याची ग्वाही तेच्या अंगावरचे विरळ झालेले लांबलचक व्रण देतंत. पण आता वसंताची त्या काट्यांका एवढी सवय झाली होती की वसंताचो हात दिसताच ते काटे म्हणजे तेच्या हाताक गुलाबापर्यंत अलगद वाट करून देऊक लागले. कितीतरी लोक तेका गावात याबद्दल विचारीत, ‘आरे वसंता ते काटे बी लागत नाय रे तुका? तुका कायच करीत नाय मरे तें!’ यावर वसंत सगळ्यांका एकंच उत्तर द्यायचो, ‘आरे म्हाजे मित्र आसंत ते’.
गावचे सगळे लोक त्या डोंगराक ‘वसंताचो डोंगर’ असाच म्हणत. अगदी लहान पोरांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत. काका सकाळी पूजा करूक येण्याच्या आत वसंत रोज उजाडल्या उजाडल्याच डोंगरावर जाई होतो आणि गुलाब घेऊन येई होतो.
काकांनी वसंताक किती वेळा सांगितलानित, ‘आरे कित्या रे त्या काट्यानी वचून ते गुलाब हाडतंस? फुकटचो जीवाक त्रास. त्यापेक्षा गुलाबाचा रोप आणून तुझ्या आंगणात लाव!’ वसंतान खरा म्हणजे या गुलाबाचा रोपटा अंगणात लावला होता. पण त्या रोपट्यान फुलांका जन्मंच दिलो नाय. कदाचित त्या महादेवाकंच ते मान्य नसात. वसंताकडून तेका डोंगरावर जाऊनंच गुलाब आणुची तपस्या करून घेऊची आसात. पण वसंतसुध्दा त्याबाबतीत केवढो हट्टी! पाऊस आसू, वारो असू, थंडी आसू किंवा गरमी आसू- वसंत डोंगरावर जातोलो, तिकडे काट्यांमधे हात घालतोलो आणि पांढरो गुलाब महादेवाच्या पूजेक घेऊन येतोलो. दोन गुलाब देवाच्या पिंडीवर आणि दोन गुलाब देवाच्या मुखावर म्हणजेच कवचावर. ते गुलाब जेव्हा देवाक घातले जात तेव्हा वसंताच्या चेहर्यावरचे भाव अगदी बघण्यासारखे होत. एखादा लहान मूल खूप खूष झाल्यावर तेचो चेहरो जसो होईल तसोच चेहरो वसंताचो व्हायचो. ‘काका देवसुधा म्हाका बघून हासता बघ.’ तेका साक्षात महादेवसुध्दा हसताना दिसायचो. आणि तो तसोच देवाकडे एकटक बघत बसायचो.
एकदा तेका कसल्यातरी महत्वाच्या कामासाठी गोव्याक जाऊचा लागणार होता. म्हणून तो आदल्या दिवसापासून चिंतेतंच होतो. दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत तो तीन वेळा आमच्या घराकडे इलो आणि तेना आपली समस्या आमका सहा वेळा संगितल्यानित. दरवेळी काका तेका समजावत होतो, ‘एक दिवस गुलाब आणूचे चुकले म्हणून काय नाय रे. तू सावकाश जाऊन ये बघूया. देवाकसुध्दा ठाऊक आसता रे!’ तरीही तेचो चेहरो दरवेळी पडलेलोच. ‘हॅ ओगीच मनाक कसातरी दिसता!’ मी तेका मस्करीतंच, ‘काय जाऊचा नाय रे वसंत काका, कित्या तें गुलाब बी हाडूच्या भानगडींत पडतंस तूं?’ असा म्हटल्यान तर ‘हॅ! हतसा कायतरी बोलू नको आं! देवाचा आसता तां! हतसा म्हणू नको आं परत.’ लगेच तेची प्रतिक्रिया इली. शेवटी वसंताची ती हालत बघून काकान तेका पाहाटे डोंगरावर जाऊन गुलाबाच्यो कळ्यो आणून त्यो घरी पाण्यात भिजवत ठेवून गोव्याक जाऊचो सल्लो दिलो. त्याप्रमाणे वसंत पहाटे पाच वाजताच डोंगरावर गेलो आणि गुलाबाच्यो कळ्यो घरी घेऊन इलो. तेच्या बायकोन तेका पाणी भरून एक भांडा दिला. ‘हँ! कसला गो भांडा दिलंस? जेवान करतो आपण हेच्यात!’ असा म्हणत तो माजघराच्या आतल्या बाजूक गेलो आणि कपाटातून नवी कोरी मोठी वाटी घेतली, ती व्यवस्थितपणे घासुनपुसून लख्ख करून तेच्यात पाणी भरून गुलाबाच्यो कळ्यो वरचेवर ठेवून दिल्यो. त्यावेळी काम करून करून राकट झालेल्या वसंताच्या हाताच्या स्पर्शामधे त्या कळ्यांका खरखरीतपणा न जाणवता कोमलताच जाणवली आसात. जाता जाता आपल्या झिलाक ‘काका पूजे येवूच्या आत देवळात गुलाब नेऊन ठेव!’ असो निरोप देऊन तो निघालो.
तो वैशाख महिन्याचो चौथो किंवा पाचवो दिवस आसात. त्या दिसा सोमवार असल्याकारणान देवळात जरा एरवीपेक्षा घाईच होती. त्यादिसा काकाबरोबर मीही देवळांत गेलो होतो. पूजा अभिषेक वैगेरे आटोपून घरी जात होतो एवढ्यात अँब्युलंसचो आवाज इलो. सगळीकडे गडबड गडबड सुरू झाली. त्या गडबडीत कोणाक काय झाला हेचो पत्तोसुध्दा लागत नव्हतो. त्यावेळी अँब्युलंसमधून आलेल्या त्या कर्मचारी आणि डॉक्टरापेक्षा सगळे आपणंच डॉक्टर झाले होते. सगळेजण आपापला म्हणून कायतरी बोलत होते आणि सल्लोवजा उपदेश देइ होते.
‘आरे असो झोपवा रें तेकां! उलटो कसो झोपवतंस?’
‘आरे असो झोपवलो तर रगात बरोब्बर पावत तेका’
‘बरोबर हा! साखर पायातून डोकीपर्यंत चडूक नको ती?’
‘आरे अकलेच्या दुस्माना साकर उतरली हा तेची! असो झोपवलो तर काय साकर वाढत की काय ती?’
‘आरे डाक्टरान सांगितलानित तेका असो झोपवा म्हणून’
‘तू मी सांगता तसा कर रे, डाक्टराक काय कळता?’
या सगळ्या गडबडीत कोणाक काय झाला तेच नेमका कळेना. तेवढ्यात कसोतरी त्या माणसाक अँब्युलंसमधे चढवल्यान आणि अँब्युलंस एकदाची तिथून निघून गेली. इतक्यात गावातलीच काही माणसां माघारी फिरताना दिसली. ‘कोणाक काय झाला रे सदा?’ काकान त्यातल्या एकाक विचारलंन. ‘तुका माहितनाय? वसंत रे! साखर उतरली हा तेची आनी थरथरूंक लागलो. वयनी मोठमोठ्यान बोबो मारूक लागली. तालुक्याच्या हॉस्पिटलमधे नेलो हा. बरां येतंय.’ आमका कहीच समजेना. आमच्या दोघांच्या मनात एकंच प्रश्न होतो, ‘असा कसा झाला?’ कारण आज सकाळीसुध्दा काका पूजेक येवुच्या आधी वसंत नेहमीप्रमाणे पांढरे गुलाब ठेवून गेलो होतो.
आम्ही लगेच घरी गेलो आणि कपडे बदलून तालुक्याक जाऊक निघालो. हॉस्पिटलमधे पोचल्या क्षणीच तिथल्या औषधाच्या उग्र वासान आमचा स्वागत केल्यानित. काऊंटरवर चौकशी करून आम्ही वसंत ज्या वार्डात होतो त्या वार्डजवळ गेलो. वार्डाच्या बाहेर वसंताची बायल आणि आमच्या गावातलेच काही पुरूष आणि बायलो होत्यो. वसंताची बायल आमका बघून रडूक लागली. ‘भाऊ बघ रे काय झाला तां!’ काका तिका धीर देत म्हणालो, ‘जातोलो जातोलो तो बरो. भिवु नको.’ आम्ही नंतर आत वार्डात गेलो. वसंताक सलाईनवर ठेवलो होतो. तेका श्वास घेऊक त्रास होत होतो म्हणान ऑक्सिजन पण लावला होता. ‘वसंत कसो आसंय रे?’ वसंतानं हात दाखवत आपण बरा असल्याचा सांगितला. तो काकाक खुणेनेच गुलाब आणून ठेवलेले घातले का विचारू लागलो, आणि उद्या गुलाब कसो काय आणून देऊ असाही खुणेनेच विचारूक लागलो. काकाच्या डोळ्यामधे पाणी तरारला होता. म्हाकापण माझे अश्रू अनावर होऊक लागले होते. आम्ही थयसर आणखीन थांबुकंच नाय. काकान वसंताच्या बायलेकडे काही पैशे दिले आणि आम्ही थयसून निघून इलो. घरी पोहोचेस्तोवर मी आणि काका एकमेकांशी काहीच बोलूंक नाय. माज्या डोळ्यांसमोर सारखो वसंताचोच चेहरो येत होतो.
दुसर्या दिवशी सकाळी उठल्या उठल्याच वसंत गेल्याची बातमी कळली. वसंत गेलो. महादेवाचो सगळ्यात प्रिय भक्त पंचतत्वात विलीन झालो होतो. स्मशानात जाऊन वसंताक निरोप देऊन आल्यावर काकान आंघोळ करून देवळात जाऊन पूजा केली. आज ना ही देवळात मंत्रोच्चार होत होतो आणि ना ही माहादेवाच्या त्या प्रिय भक्तान आणलेले गुलाब तेच्या पिंडीवर आज वाहिले गेले होते. महादेवाच्या मुखावरचे भाव आज खूप गंभीर होते. जणू तेना तेच्या प्रिय भक्ताचा सुतकंच पाळला होता.
त्या दिवसापासून महादेवाच्या पिंडीवर पांढरो गुलाब काय पडलो नाय. पण वसंताचो तो पांढरो गुलाब अजूनही फुलता त्याच वसंताच्या डोंगरावर. सकाळी फुलता, वाट बघता आणि मग दुपारच्या रखरखत्या उन्हात तेच्यो पाकळ्यो झडून जातंत. काट्यांसारख्योच अस्ताव्यस्त पडतंत. खराच त्या काट्यांमधून गुलाबापर्यंत निष्कंटक हात पोचवूक वसंतासारखाच नशिब हवा. कितीतरी लोकांनी नंतर ‘वसंताचो डोंगर’ साफ करून थंयसर लोकवस्ती तयार करूंक महादेवाजवळ कौल प्रसाद घेतले. पण आजूनपर्यंत काय माहादेवाची कळी पडली नाय.
– शिवप्रणव आळवणी
(लेखक प्रशिक्षित अभिनेते आहेत)