२२ जून ही तारीख आली की चापेकर बंधूंची आठवण होते. या तारखेला त्यांनी केलेला रँडचा खून ही त्यांच्या आयुष्यातली फक्त एक घटना. चापेकर म्हणजे रँडचा खून एवढंच नाहीये. चापेकर म्हणजे खूप काही आहे. चापेकर म्हणजे एक विचारसरणी होती तेव्हाची. चापेकरांनीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यावेळी काय काय भोगलंय ते अंकुर काकतकर दिग्दर्शित ‘गोंद्या आला रे’ या वेबसीरिजमधून दाखवण्यात आलं आहे.
चापेकर बंधूंचा इतिहास वाचला की आजही रक्त सळसळते… पुण्यात प्लेगचे थैमान आटोक्यात आणताना रँडसाहेबाने पुणेकरांवर अत्याचार केले, धर्म भ्रष्ट केला, म्हणून चापेकर बंधूंनी जिवाची बाजी लावून त्याचा काटा काढला. त्याच चापेकर बंधूंवर बेतलेली ‘गोंद्या आला रे’ ही वेबसीरिज २०१९ साली ओटीटीवर आली होती. रँडच्या खुनाला नुकतीच १२४ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर या वेबसीरिजचे दिग्दर्शक अंकुर काकतकर यांच्याशी चर्चा केली.
चापेकर बंधू म्हटलं की रँडचा खून ही एवढी एकच घटना पुस्तकात शिकवली जाते. त्यामुळेच सगळ्यांना त्यांच्याबद्दल केवळ तेवढेच ठाऊक आहे. मात्र चापेकर म्हणजे तेव्हाची एक विचारसरणी होती, असं अंकुर काकतकरांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, रँडचा खून ही चापेकर बंधूंच्या आयुष्यातली फक्त एक घटना. चापेकरांनीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यावेळी काय काय भोगलंय ते त्यांनी या वेबसिरीजमधून दाखवलं आहे. या वेबसिरीजमध्ये कोणीही कधीही न पाहिलेले टिळक मी दाखवलेत असं मी छातीठोकपणे म्हणू शकतो, असंही अंकुर म्हणाले.
टिळकांनी पहिला गणेशोत्सव १८९३ साली साजरा केला तेव्हापासून १८९७पर्यंतचा प्रवास या वेबमालिकेत दाखवण्यात आला आहे. चित्रपट असो, मालिका असो की एखादी वेबसीरिज, ती बनवताना कथानकाचा आधार घ्यावा लागतो. पण जेव्हा एखाद्या वास्तव घटनेवर, क्रांतिकारकांवर वेबसीरिज बनवायची असते तेव्हा त्यात यथातथ्यता असणं फार गरजेचं असतं. कारण लोकांना त्या क्रांतिकारकांबद्दल, त्यांच्या आयुष्यातल्या त्या घटनेबद्दल माहीत असतं. त्यामुळे दिग्दर्शकाला सिनेमॅटिक लिबर्टी घेता येत नाही. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. खूप रिसर्च करावा लागतो. याबाबत बोलताना अंकुर म्हणाले, हा रिसर्च करायलाच मला ७३० दिवस लागले. चापेकरांबद्दल सगळंच शोधणं मला भाग होतं. त्यांचे काहीच दस्तऐवज उपलब्ध नव्हते. ते सगळं शोधावं लागलं, त्याला खूप कष्ट लागले. खूप कष्ट, खूप पैसे… पण मी सामान्य घरातला असल्यामुळे माझ्याकडे केवळ रिसर्चसाठी तीनचार लाख रुपये खर्च करणे परवडणारे नव्हते. त्यामुळे मी डेली सोप दिग्दर्शित करायचो आणि त्यातून मिळालेल्या पैशातून काही रक्कम बाजूला ठेवायचो.
दामोदररावांच्या मुखातून सावरकरांनी सांगितलेला हा प्रवास आहे. हे चापेकर बंधू आपल्याच नव्हे तर चंद्रशेखर आझादांचेही आदर्श होते, असे अनेक अपरिचित पैलू अंकुर यांनी या वेबसीरिजमध्ये उलगडले आहेत. महाराष्ट्राचा इतिहास किमान महाराष्ट्रातल्या मुलांना तरी कळावा म्हणून ही वेबसीरिज आपण शाळांमध्ये जाऊन फुकट दाखवायला तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले. अंकुर म्हणाले, २००२पर्यंत महाराष्ट्राच्या एमपीएससीच्या पुस्तकात चापेकर होते. त्यानंतर ते गायब झाले. त्यामुळे त्यांच्याबद्दलची माहिती मिळवणं मोठ्या कष्टाचं होतं. चापेकरांच्या कुटुंबीयांबद्दल माहिती मिळवणं खूप अवघड गेलं. पण मी रिसर्च करताना सर्वकाही ऑथेंटिक मटेरियल मी वापरलं. मुंबई हायकोर्टातले त्यावेळच्या त्या केसचे ट्रान्सक्रिप्ट फक्त माझ्याकडे आहे. १८९७ आणि १८९८ साली सुरू असलेल्या केसचे ट्रान्सक्रिप्ट. हे सगळं कंपाईल करायला बरोब्बर दोन वर्षे लागली मला.
ऐतिहासिक काळावर बेतलेली वेबसीरिज बनवायची म्हणजे त्यातील कलाकारही त्याच तोडीचे घेणे गरजेचे असते. अंकुर यांनी याचे भान ठेवले होते. म्हणूनच बापूरावांच्या भूमिकेसाठी क्षितिज दाते, दामोदर म्हणून भूषण प्रधान आणि हरिभाऊंच्या व्यक्तिरेखेसाठी त्यांनी आनंद इंगळे या खणखणीत अभिनेत्यांची निवड केली. सुनील बर्वे यात लोकमान्य टिळक बनला आहे, तर वासुदेवची भूमिका शिवराज वायचळ याने साकारली आहे. कलाकारांच्या निवडीबाबत बोलताना अंकुर म्हणाले, मुळात मी विनय आपटेंचा शिष्य आहे. साडेतीन वर्षे त्यांच्याकडे काम केलंय. ते नेहमी म्हणायचे, ‘फिफ्टी परसेंट वॉर इज वन, व्हेन युवर अॅलक्टर्स लुक लाइक कॅरेक्टर्स’. हेच कलाकार घेतले, कारण तेच त्या त्या व्यक्तिरेखेसारखे दिसत होते… आणि ते अॅक्टर्स म्हणूनही खूप चांगले होते. ते अव्वल दर्जाचेच आहेत म्हणूनच त्यांना मी घेतलं आहे. भूषण प्रधान, शिवराज वायचळ आणि क्षितिज दाते या तिघांचा एक फोटो मी काढवून घेतलाय. वास्तवात चापेकर बंधूंचा जसा फोटो आहे तस्साच मी या तिघांना बसवून काढवून घेतला आहे.
– नितीन फणसे
(लेखक ‘मार्मिक’चे उपसंपादक आहेत)