ज्योतिषशास्त्राचा समावेश आता अभ्यासक्रमात करण्यात येणार असल्याचे वृत्त वाचले. विज्ञानाच्या पलीकडे जाण्यासाठी भारताने घेतलेली ही उत्तुंग झेप आहे असे एक ज्योतिर्विद मला काल म्हणाले. त्यांनी पुढे असेही सांगितले की हा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणारा प्रत्येक स्नातक म्हणजे आपल्या पवित्र भरतभूमीने भविष्यकाळाकडे रोखलेली तेजस्वी दुर्बीण असेल. यामुळे हिंदुस्थान हा काळाच्या पडद्यापलीकडे पाहणारा जगातील पहिला देश ठरेल. उपग्रह, अवकाशयाने वगैरे निरुपयोगी गोष्टींवर होणारा प्रचंड फालतू खर्च यामुळे वाचवता येईल. त्यांचे तर असेही म्हणणे पडले की इतर देशांना त्यांचे भविष्य विकून भारताला अब्जो डॉलर्स कमावता येतील, ज्यामुळे आपल्याकडे आधीच तुफान वेगाने वाहत असलेली विकासगंगा आणखी दुथडी भरून वाहू लागेल. या त्यांच्या प्रतिपादनावरून माझ्या लक्षात आले की आनंदवन भुवनी ही रामदास स्वामींची कल्पना प्रत्यक्षात येण्यास आता फारच थोडा अवधी उरलेला आहे. त्यांचे असे त्यांच्या विश्वात आनंदपर्यटन सुरू असताना एक प्रश्न विचारण्याचा मोह मला आवरला नाही.
‘काका, तुम्ही म्हणता ते तंतोतंत पटलंय मला पण तुम्हाला काय वाटतं अमेरिका, रशिया, चीन वगैरे महासत्ता गप्प बसतील? अफाट पगार देऊन आपल्याकडचे स्नातक उचलण्यासाठी त्यांची अहमहमिका लागेल’.
काकांनी ‘खुळा रे तू’ वाला भाव चेहेर्यावर आणला आणि माफक स्मितहास्य करत म्हणाले, ‘प्रश्न चांगला आहे पण एक गोष्ट तुझ्या लक्षात आली नाही ती म्हणजे या अभ्यासक्रमाला प्रवेश देताना विद्यार्थ्याची पत्रिका बघूनच प्रवेश देण्यात येणार आहे. अरे तो भविष्यात काय करणाराय, कोण होणाराय हे प्रिन्सिपॉलास आधीच कळलेले असणाराय. काय उपटायचे ते उपटून घेऊ दे तुझ्या त्या महासत्तांना’.
हे मात्र माझ्या लक्षातच आले नव्हते.
– उदय जोशी