आजकाल सोशल मीडियावर रडवट विलाप (वास्तविक याला मराठीत आणि हिंदीतही अतिशय ग्राम्य प्रतिमा वापरली जाते, पण ती इथे सभ्य नाही, उचित नाही, अर्थात समझने वाले को…!!) खूप वाढलेला दिसतो. आता सकाळीच एक बघितला. उगाचच उदास चेहरा घेऊन, साधारण सैगल ते भारत भूषण ते प्रदीपकुमार यांच्या चेहर्यावर जो जुनाट, बद्धकोष्ट असल्याचा कुंठित भाव असायचा, तसा आणण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत एक चस्मीस तरुण उभा आहे आणि बॅकग्राऊंडवर निवेदन… हिंदीत, ‘ये मुंबई शहेर मुझे कभी अपना लगा ही नहीं…’ सकाळच्या उत्तम चहाची चव फटकन गेली.
इथे मी आधी लिहिले होते तसे पावसाळा आला की असले विलाप लई व्हायरल होतात. इथल्या विलापात काय होते? तर मुंबई माणसांना कशी जुंपून घेते, कशी इथे नुसती गर्दी आहे, कशी जगण्याची धावपळ असते, मुंबई स्पिरिट म्हणजे मिथ आहे, असला बकवास… आणि डोक्याला शॉट झाला.
कारण मी हाडाची मुंबईकर आहे. मुंबईचे अगणित दोष आणि मुंबईत राहण्याचे अगणित तोटे माहीत असूनही तिच्यावर जिवापाड प्रेम असणारी मुंबईकर आहे मी. कुठून तरी बाहेर गावाहून इथे येऊन, स्थायिक होऊन, इथेच रोजीरोटी कमावून, घरी बचत पाठवून, वर याच अन्नदात्या मुंबईला नावे ठेवणार्या असल्या लोकांचा मला प्रचंड खुन्नस येतो.
कारण आम्ही तुम्हाला आवतान देऊन बोलावले नाही. तुम्ही स्वेच्छेने आलात. पोटापाण्यासाठी. आणि तुमच्या आज्यापासून सुरू झालेली ही परंपरा आजही अखंडित सुरू आहे. मामा का लडका, बुआ का लडका, मौसी की लडकी असे सगळे येतच असतात एकामागोमाग एक. मग आता अचानक हे गळा काढणे का?
हे कसे झाले ना की आपल्या जाज्वल्य देशभक्त अनिवासी इंडियन माणसासारखे. तिथे राहून इथल्या प्रेमाचे उमाळे काढायचे. ते ‘चिठ्ठी आयी है’ गाण्यामध्ये होते ना, तसेच!!! मला अशा लोकांची नेमकी मनोवृत्तीच कळत नाही. तुमचा इतका राग आहे या मुंबईवर तर का राहता बाबांनो इथे? निकल, पैली फुरसत में निकल!!!
अशा लोकांचे काय असते की त्यांना गाव किंवा त्यांचे मूळ गाव, तिथले घर, माणसे, हे सगळे फार फार फार आदर्श वाटते, अगदी खेड्यामधले घर कौलारूसारखे.. भर पावसात जेव्हा चार चार दिवस वीज जाते आणि पाणी नसते तेव्हा कळते!!
आपण भारतीय आजही भाबडे आहोत, कारण शहर, शहरी माणसे सगळे यांत्रिक, दुष्ट आणि गावाकडे प्रेमाचे झरे, सुखाचे उमाळे!! हा समज पर्मनंट असतो.
आयुष्य इतके स्वच्छ सफेद काळे नसते, मध्ये मध्ये करड्या रंगाच्या हजारो छटा असतात. पण नाही. इथे राहायचे, कमावायचे आणि असले रडवट व्हिडिओ टाकायचे. बाकी तुम्ही काही करा, मला काही फरक पडत नाही, पण आमच्या या मुंबईला वाईट वंगाळ बोलायचे काम नाही. आमची मुंबई यांत्रिक आहे, माणसे घाईत असतात, कुणाला वेळ नसतो, सतत पळत असतात, मरणाची गर्दी, गोंधळ, वाहतूक कोंडी, सर्व मान्य; पण या परते पण मुंबई आहे…
पावसाच्या पुरात अडकलेल्या लोकांसाठी जीव धोक्यात घालून उभी राहणारी, कोणत्याही मदतकार्यासाठी धाऊन येणारी, भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर एका रात्रीत रक्तदानासाठी रांग लावणारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उर्वरित भारतातल्या मागासलेल्या राज्यातून इथे येणार्यांना रोजगार आणि देशाला कचकचीत महसूल देणारी. तिला कोणी अशा टिनपाट क्लिपकाराने नावे ठेवली किंवा कोणीही टीका केली तर माझ्या अस्सल मुंबईकर डोक्याला शॉट होतो. मुळात ही भावना का? मूळ मातीशी इमान ठेवणे समजू शकते, पण जन्मदात्री नसली तरी पोषण करणारी आई बनलेल्या मुंबईशी तुमचा दुजाभाव का?
मुंबईत परप्रांतीय, स्थलांतरित आहेतच, पण महाराष्ट्रामधील अनेक ठिकाणाहून आलेले मराठी पण आहेत. आणि मुंबईने कोणताही दुजाभाव न करता सर्वांना सामावून घेतले आहे. लेको इथे राहता, खाता, कमावता आणि खाल्ल्या शहराचे वासे मोजता??
या लोकांची नक्की मानसिकता कळत नाही.इथे खूप एकटे वाटते, जणू याच्या गावी हा पूर्ण वस्तीचा लाडोबा होता, सगळे दिवसरात्र याच्याच सरबराईमध्ये मग्न असायचे. काय राव, खिशात नाय आणा आणि मला बाजीराव म्हणा!
तुमचे पणजोबा पण जन्माला आले नव्हते तेव्हापासून किंवा त्याच्याही आधीपासून मुंबई आहे, ती देशभरातील शेकडो करोडो लोकांना आसरा देते आहे. इथे आजही रात्री-बेरात्री एकटी बाई सुरक्षित फिरू शकते, तुमची जात काय हा प्रश्न लोकलमध्ये विचारला जात नाही, की ‘इथे बसून जेवलास कसा, उठ आधी’ असली मस्तवाल जातीयवादी भाषा केली जात नाही. इथे कोणी कोणाला तळवे चाटायला लावू शकत नाही किंवा आदिवासीच्या डोक्यावर मुतण्याची हिंमत करू शकत नाही.
मुंबई आजही पूर्ण भारताची आहे आणि आजही इथे संपूर्ण भारताचा प्रातिनिधिक चेहेरा दिसतो. इथे आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकत्र साजरी होते, गणपतीत मुसलमान मोहल्ल्यातून पुष्पवृष्टी केली जाते आणि माहीम दर्ग्यावर सर्वधर्मीयांकडून चादर पण चढवली जाते. मोतमाऊलीला म्हणजे माऊंट मेरीला नवस बोलणारे काही फक्त ख्रिस्ती नसतात. अर्थात या समभावालाही दलिंदर अपवाद आहेत, नाही असे नाही पण त्यापरते मुंबई अशीच आहे.
त्यामुळे असले भिकार, टिनपाट व्हिडीओ टाकून तुम्हाला जर ट्रॅजेडी किंग व्हायचे असेल तर जरूर व्हा, राजे हो… पण मुंबईला नावं ठेवायचे काम नाही. कारण ही फक्त आमची मुंबई नाहीये, तर ये अपनी मुंबई है… सबकी मुंबई है…
तुमचे भाकड रडणे जरूर करा पण मुंबईला वगळा… अपुन के डोके को शॉट नहीं देने का बांटाय!! नहीं जमता है तो मुंबई से फुटने का, वटने का, पतली गली से कल्टी मारके अपनी जिधर किधर जन्नत है उधर खिसकने का!