कवी सौमित्र यांच्या गीतांना मिलिंद इंगळे यांचा स्वर आणि संगीतसाज लाभलेला ‘गारवा’ हा मराठीतला एव्हरग्रीन आल्बम. पावसाळ्याच्या पहिल्या दिवशी चहा आणि भजीबरोबर गारवाची गाणी ऐकली नाहीत, तर अजूनही तो दिवस साजराच होत नाही त्या पिढीचा. हा आल्बम चक्क २५ वर्षांचा झालाय नुकताच… त्यानिमित्ताने आजचे आघाडीचे कवी-गीतकार समीर सामंत यांनी ‘गारवा’च्या रोमँटिक आठवणींना दिलेला रसीला उजळा.
– – –
बहुतेक कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं ते… मिठीबाई कॉलेजात असताना माझी मित्रमंडळी बहुभाषिक होती… मराठी मोजकीच… त्यातही साहित्य संगीत वगैरेची आवड असणारे फारच कमी… खरं तर संगीत आणि नाट्य या विषयांत स्वारस्य असणारे दोनच मित्र… एक सुप्रसिद्ध अभिनेते विहंग नायक यांचा मुलगा गुंजारव आणि दुसरा आजचा आघाडीचा गायक, संगीतकार अवधूत गुप्ते.
खरं तर त्या काळात तरूणांना अपील करणारं मराठी कलाक्षेत्रात फारसं काहीच घडत नव्हतं (अपवाद नाट्यक्षेत्राचा… तिथे अनेक नवनवीन प्रयोग होत होते आणि रसिकांचा उदंड प्रतिसादही मिळत होता). मला आठवतं… त्या काळात दोन अशा गोष्टी आमच्या आयुष्यात आल्या की तरूणाई नव्याने मराठीकडे वळली. एक म्हणजे चंद्रशेखर गोखलेंचा ‘मी माझा’ हा चारोळी संग्रह आणि दुसरं मिलिंद इंगळे आणि सौमित्र ह्या जोडीचा ‘गारवा’ हा अल्बम.
पावसाळ्यात भिजलेल्या कवितांचं घाऊक उत्पादन करणार्या सोशल मीडियाचा तो काळ नव्हता. पाऊस सुरू झाला की जो तो आपापल्या स्वभावधर्मानुसार ‘रिमझिम गिरे सावन’ ते ‘टिपटिप बरसा पानी’ या रेंजमधील एखादं गाणं ऐकत किंवा गुणगुणत असे. म्युजिक अल्बम ही त्या काळची क्रेझ होती… घरदार विकून पॉपस्टार बनण्यासाठी मुंबईत आलेले पंजाबी कलाकार हे आमच्या कौतुकाचा किंवा थट्टेचा विषय असत… पण मराठीत कुणी अल्बम काढेल आणि तो इतका लोकप्रिय होईल असा विचारही कधी कुणी केला नव्हता…
आणि अचानक एके वर्षी… पावसाळ्याच्या तोंडावर, पावसाची वाट पाहणार्या मनाला एक खास खर्जातला आवाज ऐकू आला…
‘ऊन जरा जास्तच आहे… दरवर्षी वाटतं… भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं…’
हो यार… खरंच… अगदी मनातलं बोलतोय हा… एक एक शब्द आम्ही लक्षपूर्वक ऐकू लागलो.. ‘वारा उनाड मुलासारखा सैरावैरा पळत राहतो..
झाडा-पाना-फुलांवरती, छपरावरती चढून पाहतो….’
उनाड मुलं म्हणून आम्ही लहानपणी कधीकधी ‘वार्यावर सोडल्याचा’ टोमणा ऐकला होता.. पण वार्याला दिलेली उनाड मुलाची उपमा मनात घर करून राहिली… त्यापुढे कधीही जोरदार वार्याने झालेला झाडाच्या पानांचा सळसळाट ऐकला की, वारा उनाड मुलाच्या रूपाने त्या झाडाच्या पानांत लपून ते झाड गदगदा हलवतोय, असंच चित्र डोळ्यासमोर येत असे… उन्हाळ्याच्या तापातून आराम देत ‘डोळ्यासमोर कूस बदलणार्या’ ऋतूची चाहूल देतो तो हा गारवा…
सौमित्रचे शब्द संपतात न संपतात तोच… मिलिंद इंगळेच्या गोड आवाजातला.. गा..र..वा… हा शब्द मनाचा ठाव घेतो…
त्याचं ते ‘प्रिये…’ म्हणजे थेट आरपार तीरच…
…मिलिंद इंगळेचं ‘छुईमुईसी तुम लगती हो’ हे गाणं आधीच हिट झालं होतं. त्यामुळे हिंदीतील म्युझिक अल्बम आर्टिस्ट्सच्या यादीत एक मराठी नाव आल्याचा अभिमान होताच. पण या गायकाने हिंदीतील यशस्वी पदार्पणानंतर राजश्रीसारख्या अमराठी म्युझिक कंपनीकडून एक मराठी अल्बम रिलीज करून घेतला याचा आनंद जास्त होता… कारण मघाशी म्हटल्याप्रमाणे, तो काळ मराठी चित्रपटगीतांसाठी फार काही चांगला नव्हता. मराठी तरुणांच्या ओठांवर हिंदी गीतं किंवा पंजाबी पॉप किंवा अगम्य भाषेतलं दी दी दी दी असं काहीही असे… पण आशयघन शब्दांना मधुर संगीताचा साज देऊन इतका सुंदर मराठी अल्बम बनू शकतो, असा विचार आम्ही कल्पनेतही केला नव्हता..
‘गारवा’ रिलीज झाला… आणि प्रत्येक मराठी तरूण-तरूणीच्या वॉकमनमधून एकच कॅसेट सतत वाजू लागली… गारवा…
‘गवतात गाणे झुलते कधीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
पाण्यावर सरसरसर
काजवा नवा नवा…’
पावसाचा कॅनव्हास आणि त्यावर प्रेमाच्या विविध रंगांचे स्ट्रोक्स… अजून काय पाहिजे?
‘त्याला पाऊस आवडत नाही
तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो
तिच्या तावडीत सापडतो’
या कवितेवर काही खास मैत्रिणींचे मिश्किल कटाक्ष आमच्या पिढीला अजून नक्की आठवत असतील.
‘धुंद मनी आज पुन्हा… आठवुनी मेघ जुना… कोणी हसलेले’ हे गाणं मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात गाताना… ह्या ओळी पुढची रिदमची जागा ‘तर र त् त् त् ता..’ अशी गाऊन पुलंच्या मधु मलुष्टेसारखं समेवर येत आपापल्या सुबक ठेंगणीकडे तुम्हीही पाहिलंच असेल…
त्या काळी हेडफोन ही फक्त प्रवासातल्या वॉकमनची जोड होती… त्यामुळे घरी असताना आपापल्या ‘डेक’वर गाणी लावली जात… आणि ती इतक्या डेसिबलमध्ये की जिच्या आठवणीत ही गाणी ऐकायचा मूड झाला, तिला तिच्या फ्लॅटमध्येही ती ऐकू यावीत… साहजिकच घरच्यांचा या पॉप संस्कृतीला विरोध असे. ‘कसली ती आजकालची गाणी’ हे वाक्य तोंडी आलं की समजावं आपलं वय झालं.
पण यालाही अपवाद ठरला ‘गारवा’…
मुलाने/मुलीने गारवा लावला की नकळत आईबाबाही त्यात गुंतून जात…
‘हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलंसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?’
ह्या वाक्यावर… बेसिनच्या आरशात बघत शेव्हिंग करणार्या एखाद्या बाबाने.. ‘स्स्… काही नाही गं जरा ब्लेड लागलं…’ म्हणून गालावर तुरटी फिरवलीच असेल…
आणि
‘पुन्हा त्याच खिडकीत ये…
आता नवर्याची वाट बघ…’
यानंतरच्या दोन सेकंदाच्या पॉझवर एखाद्या किचनमध्ये ‘किती मेला धूर तो’ म्हणून डोळे पुसले गेलेच असतील…
आणि दोघांनीही आपापल्या मनात म्हटलंच असेल…
‘तुझी आसवे पाझरू लागता…
खर्या पावसाने कुठे जायचे…’
कॉलेजचे फेस्टिव्हल असोत… स्पर्धा असोत… की पिकनिक असो… गारवाशिवाय ते सुफळ संपूर्ण होतच नसे… ग्रूप जमला की एखादी अमराठी मैत्रीण फर्माईश करे… ‘ए वो ‘गाडवा’वाला गाना गा ना यार’ .. मग आधी जोरजोरात हसून.. ‘अगं ए गाढवा नाही गं… गारवा .. गारवा’ असं म्हणून आम्ही आपापले गळे साफ करून घेत असू…
एकूणच गारवा या अल्बमने आम्हा तरुणांमध्ये जी काही क्रांती घडवली ती अशी
– मराठी संगीताचा नशा अमराठी तरूणाईतही भिनला… कॉस्मोग्रूप्समध्ये गारवा गाणार्या मराठी मुलांचा भाव वधारला.
– आपापल्या रुसलेल्या गर्लप्रâेंड्सना ‘मनवण्याचा अक्शीर इलाज’ आम्हाला सापडला.
– तरुणाईच्या मनातलं तरुणाईच्या भाषेत लिहिणारा, बोलणारा सौमित्र नावाचा कवी आमच्या गळ्यातला ताईत झाला.
– प्रत्येकाला आपलं नरडं साफ करण्यासाठी स्व. किशोरकुमार यांच्या आत्म्याला त्रास देण्याची गरज भासेनाशी झाली.
– म्युझिक कंपन्यांना मराठी कोळीगीतांच्या व्यतिरिक्त अजून एक मार्वेâट सापडलं.
आणि महत्त्वाचं…
– अनेक तरूण तरूणी म्युझिक स्टोअर्समध्ये जाऊन ‘पंकज उधास’ न मागता ‘किशोरीचं सहेला रे’ मागू लागले…
‘कवी सौमित्र’ या नावाने माझ्या मनात एक खास जागा निर्माण केली… तेव्हा गुगल वगैरे नसल्याने कोण हा सौमित्र हे प्रचंड कुतूहल होतं.. नंतर एकदा माझ्या भावाने सांगितलं… ‘अरे तो ‘इस रात की सुबह नहीं’मध्ये हातात ‘निवडक पुलं’ घेऊन फिरणारा गँगस्टर कोण म्हणून विचारत होतास ना… तोच सौमित्र… किशोर कदम…’
आईशप्पथ… मी ती फिल्म पुन्हा पाहिली. सौमित्रसाठी… नंतर अनेक नाटकांत किशोर कदमचा जबरदस्त अभिनय पाहिला. पुढे त्याचा कवितासंग्रहही वाचला. आणि कधीतरी या माणसाला भेटायचंय हे मनाशी ठरवलं…
प्रेम ही ठरवून करण्याची नाही, नकळत घडण्याची गोष्ट आहे… पुढे मीही ‘फायनल प्रेमात’ पडलो… अगदी लग्नापर्यंतचा विचार केला… तोपर्यंत मी बर्यापैकी कविता लिहू लागलो होतो… आणि वाचन हे तर माझं व्यसन आहे… त्यामुळे माझ्यासोबत संसार करायचा तर मराठी साहित्यावर प्रेम करणं (किंवा त्यात रस असणं) हे महत्वाचं होतं… आणि सगळ्यात मोठं आव्हान हेच होतं… कारण ती गुजराती होती… माझं लिखाण बरंचसं हिंदीत असल्याने ते तिला समजत असे… आवडत असे (खरं तर आपल्याला एखादी व्यक्ती आवडू लागली की त्या व्यक्तीचं सारं काही आवडू लागतं). पण मराठी काव्याची गोडी तिला कशी लागावी? मग मी तिच्या वाढदिवसाला तिला ‘गारवा’ची कॅसेट गिफ्ट केली आणि हा उपाय रामबाण (किंवा मदनबाण) ठरला. आता आमच्या लग्नाला सतरा वर्षे झाली… आणि मिलिंद-सौमित्रच्या ‘गारवा’ अल्बमला पंचवीस वर्षे झाली… ‘गारवा’ अजूनही तरुणाईला भुरळ पाडतोय आणि आम्हाला अजूनही तरूण ठेवतोय… जेव्हा पहिल्यांदाच एका कार्यक्रमात किशोरदादासोबत एकाच मंचावर काव्यवाचनाचा योग आला तेव्हा माझ्या पत्नीने त्याला थँक्यू म्हटलं… म्हणाली, ‘आमचं लग्न लागण्यात तुमचा फार मोठा वाटा आहे.’
आज चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून थोडंफार नाव झाल्याने किशोरदादा, मिलिंददादा यांच्याशी व्यक्तिगत ओळख झाली आहे. पण जेव्हा जेव्हा गारवा ऐकतो तेव्हा मी फक्त आणि फक्त रसिक असतो… तोच कॉलेजकुमार… तोच गारवाचा फॅन… वयाच्या उत्तरार्धातही सौमित्रचे तेच शब्द साथ देत असतात..
‘पाऊस पडून गेल्यावर,
मी चंद्र चिंब भिजलेला
विझवून चांदण्या सार्या,
विझलेला शांत निजलेला
पाऊस पडून गेल्यावर,
मन भिरभिरता पारवा
पाऊस पडून गेल्यावर,
मन गारठता गारवा’