आपण शहाणे आहोत, असं प्रत्येक वेड्याला वाटतं. मग तुम्ही-मी आपण पण वेडे असण्याची शक्यता आहेच की… नाही का?
– गौतम पुरकर, इंदूर
तुमचं तुम्ही बघा… मी तर बाबा अतिशहाणा आहे (असं मला ओळखणारे लोक म्हणतात).
आदर्श बायकोची तुमची कल्पना काय?
– रत्ना विडेकर, गडहिंग्लज
आता विचारून काय फायदा… आडवा येणार द्विभार्या प्रतिबंधक कायदा!!
ज्योतिष्याने तुमचा हात पाहून कधी भविष्य सांगितलेलं आहे की नाही? काय सांगितलं त्याने? खरं झालं का त्यातलं काही?
– रामदास बारणे, श्रीरामपूर
एकच भविष्य खरं झालं ‘कधी कधी अनावश्यक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल.’ खरंच… तुमच्यामुळे हे तरी भविष्य खरे झालं, धन्यवाद!
जगी ज्यास कोणी नाही, त्यास कोण आहे? सांगा, सांगा…
– बळिराम बाळकुद्रे, बेळगाव
मी आहे… स्वत:मधला मी सुद्धा आणि मी स्वत:सुद्धा. ज्यांना कोणी विचारतही नाही अशांनाही मी उत्तर देतो (कारण कितीतरी लोक मला विचारतात असं अर्धसत्य सांगता येतं).
तुम्हाला कोणी फडतूस आणि कलंक म्हणालं, तर तुम्हाला कशाचा राग सगळ्यात जास्त येईल?
– शंकर उपाध्ये, कोल्हापूर
कोणी मला अण्णाजी पंत, महाराष्ट्रद्रोही म्हणत नाही याचा भयंकर राग येईल. मी ९२ कुळी आहे, पण माझ्या कुळातला एकही जण, मला फडतूस किंवा कलंक म्हणणार्याला फालतू म्हणण्यासाठी पुढे येणार नाही, याचा तर महाभयंकर राग येईल.
नवरा बायकोला इतका घाबरतो का?
– राहुल पंडित, डोंबिवली
कोणीही नवरा बायकोला घाबरत नाही. फक्त भीती वाटते. ‘हिने’ विचारलं नाही तर कोणी कुत्रं विचारणार नाही याची.
लग्नाआधी पुरुष जास्त आनंदी दिसतात आणि लग्नानंतर बायका जास्त आनंदी दिसतात, असं का होत असावं?
– सोनिया पवार, नरसिंगपूर
लग्नाआधी आपण कोणाचे ऐकून घेत नाही म्हणून पुरुष आनंदी असतात. लग्नानंतर आपल्यासमोर कोणी बोलत नाही म्हणून बायका आनंदी असतात. (असं माझं वैयक्तिक मत आहे. मला माहिती आहे सोनिया वहिनी, तुमचंही तेच मत असणार, पण तुम्ही सांगणार नाही.)
आपण पहाटेचा शपथविधी पाहिला, दुपारचा पण पाहिला, संध्याकाळचा आणि रात्रीचा केव्हा बघायला मिळेल??
– संदीप गायकवाड, वारजे माळवाडी, पुणे.
संध्याकाळचा आणि रात्रीचा शपथविधी होणार असेल तर नक्की बघायला मिळेल. फक्त हुडी आणि दाढीवाल्या माणसांवर लक्ष ठेवा. म्हातार्या काकांच्या तरूण पुतण्यांवर तर विशेष लक्ष ठेवा.
पाऊस जास्त पडावा म्हणून गाढवांचं लग्न लावतात, मग नदीला पूर येऊ नये म्हणून काय करावं?
– अभय होंबळकर, येडूर, जि. बेळगाव
गाढवाचं लग्न लावणार्या गाढवांचं लग्न लावून द्यावं.
मी सुंदर आहे, असं मला आरशात पाहिल्यावर वाटतं. पण, लोकांना माझ्याकडे पाहून तसं वाटत नाही. लोकांच्या डोळ्यांत काही प्रॉब्लेम असेल का?
– राजन वेळेकर, बेल्हे
तुमच्याच डोळ्याचा प्रॉब्लेम असेल. त्यात तुमचा दोष नाही. माणसाला लोकांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ ‘आरशातही’ दिसत नाही.
‘फिरते रुपयाभवती दुनिया’ असंही कवी सांगतात आणि ‘प्यार पर दुनिया कायम है’, असंही कवी लोकच सांगतात, तुमचा अनुभव काय?
– प्रियेश सावंत, कणकवली
पैसा है तो प्यार है… प्यार है तो दुनिया है (लोकसंख्या वाढली तर दुनिया कायम राहणार आहे), क्रोनोलॉजी समजून घ्या. नाहीतर या कधीतरी, बसून बोलू या.
कोण होतास तू, काय झालास तू, असं तुम्हाला पाहून कोणी म्हणालं आहे का?
– रिया पेंडसे, पनवेल
माझी बायको मला म्हणते… आमच्या लग्नाचा आल्बम बघताना… आणि मी लग्नानंतर खूप मॅच्युअर झालोय, असं मी स्वतःला सांगून खूष होतो.