(अतिसामान्य परीक्षार्थीचं घर. व्यॉकनाथ गणगणेंचे सुपुत्र भिकवंत गणगणे आणि घरातील इतर मंडळी परीक्षापूर्व तयारी करतायत वा इतर बाबींचा आढावा घेतायत.)
आज्जी : (कापर्या आवाजात भिकवंतला साद घालत) बाळ, तुझ्या आजोबांनी विरचिलेले सरस्वती कवण गायलास की नाही?
आई : (लाडिक तक्रारीच्या सुरात) छे, हो! कुठे? त्याला त्या बाबींचे महत्त्व तरी आहे का? नास्तिक कुठला! (प्रेमाने भिकवंतचा गालगुच्चा घेते.)
आज्जी : (उदात्त विश्वकल्याणाच्या हेतूने) बाळ, ईशस्तवन आणि वैद्यांकडील औषधें वेळेंत घेतलीत तरच आपणांस दीर्घकालीन लाभ मिळतो हो! दोहोंची वेळ टाळता उपयोगी नाही!
आई : (भिकवंताचा कान पकडत) कळाले? मी तुला नेहमी सकाळी वेळेत का प्रार्थना करावयास लावते ते? आज्जींनी किती सोप्या भाषेत तुला हा पाठ शिकविला बघितलेस? आणि त्याचसोबत रोज सकाळी शुचिर्भूत होऊन ईशस्तवनाआधी आज्जी-आजोबा यांचे देखील नित्यदर्शन घेतल्याने स्वर्गप्राप्ती मिळतेच मिळते बरे का?
आजोबा : (थरथरत्या पावलांनी भिकवंतजवळच्या आसनावर बसत) बाळ, नुसते ईशस्तवन अथवा थोरामोठ्यांचे दर्शन यानेच लाभ होतो असे काही नाही हं? आई-वडिलांची भक्ती ही सर्व भक्तींपेक्षा श्रेष्ठ भक्ती आहे.
व्यॉकनाथ : (एक पंचधातूची मूर्ती हातात उचलून घेत) नाही हो, बाबा! सर्व भक्तींपेक्षा विश्वदुर्दैव छीः छीः म्हादबादास नळे यांची भक्ती ही नरकमुक्तीचे खरे द्वार! हे बघा, त्यांची मूर्ती घेऊनच आलोय मी! येत्या नरक सप्तमीला आपण ही मूर्ती शौचकूप कक्षात स्थापित करूया!
आजोबा : (थरथरते हात जोडत) म्हादो! म्हादो!! किती ते अपवित्र विचार!! व्वा, आज तू माझा पुत्र शोभलास!! (भिकवंताकडे बघत) बाळ, पाय जोड! म्हादबादास नळेंना दर्शन दे! त्यांनी ज्या प्रकारे देशाची वाट लावली आहे…
व्यॉकनाथ : बाबा, तुम्हाला देशाला वाट दावली आहे असे म्हणावयाचे असेल नाही?
आजोबा : बाळा, म्हादबादासांच्या कृतीत असल्या क्षुल्लक गोष्टींमुळे काहीही गुणात्मक फरक पडत नाही. ते त्यांचं राष्ट्रउध्वस्ततेचं कार्य प्राणपणाने करतच असतात. (पुन्हा हात जोडत) म्हादो! म्हादो!!
भिकवंत : (अतिशय उद्विग्नतेने) तुम्हां सर्वांचं दिव्यचिंतन झाले का? मी माझी परीक्षेस जाण्याची तयारी करावी का?
आज्जी : बाळा, आवश्यक त्या सर्व चीजवस्तू घेतल्यात का?
आई : हो, हो! सर्व तयारी केली आहे मी! पेन, दौत, कर्कटक, आणि…
व्यॉकनाथ : त्याहीपेक्षा स्केल आणि पेन्सिल घेतलीस का बाळा? मोठ्या रेषा ओढण्यासाठी त्याची गरज भासेल.
आजोबा : नाहीच, बाळा! या सर्वांत अगदी महत्त्वाची कुठली वस्तू असेल तर ती खोडरबर आहे. त्याने इतरांनी ओढलेल्या मोठ्या रेषा पुसण्यास मदत होते. आणि यश फक्त आपण टॉप करण्याने मिळत नाही तर उर्वरित स्पर्धकांच्या अपयशानेही मिळते हो!
भिकवंत : (परीक्षेस अत्यावश्यक वस्तू बॅगेत भरत) थँक्स आजोबा! पण माझ्या परीक्षेस आवश्यक वस्तू घेतल्यात मी! आणि तुमच्या सूचना ध्यानी ठेवेन मी!
व्यॉकनाथ : त्याची काळजी घेतली आहे बाबा मी! छीः छीः म्हादबादास यांच्या मठातून हगवणीचे औषध आणवून भिकवंताच्या स्पर्धकांस प्रसादातून ते देवविले आहे. या समयी ते निश्चित शौचकुपावर बसून म्हादबादासांच्या नावाचा धावा करत असतील.
आज्जी : (बटव्यातून अंगारा काढत भिकवंताच्या कपाळास लावत) नुसते इतरांचे अपयश चिंतण्यापेक्षा बाळा, म्हादबादासांचा धावा करत प्रश्नपत्रिका चारवेळेस पर्यवेक्षकांवरून ओवाळली तर न सुटणारे प्रश्न चटकन सुटतात बरे.
आजोबा : (कोपरीच्या खिशातून कसलीशी हस्तपुस्तिका काढत) बाळ, त्यापेक्षा परीक्षा केंद्रात हे म्हादबादासांचे दशावतार स्तोत्र घेऊन जा. आणि परिक्षेपूर्वी हस्तपदप्रक्षालन करून त्याचे उच्चरवाने पठण केल्यास ईप्सित साध्य होईल हो…
व्यॉकनाथ : त्याची काहीही गरज पडणार नाही, मी सर्व तयारी…
आज्जी : तुझ्या तयारीबद्दल सांगूच नको, तुझ्या वेळेंस तू पंधरापैकी फक्त सात विषय उत्तीर्ण झालेलास!
आजोबा : (आठवांसह भूतकाळात जात) त्यावेळी काय भयानक गरिबी होती? केवळ एक विषयास दहा लाखप्रमाणे दीडशे लक्ष रुपयेच मजजवळ होते.
आज्जी : (भावुक होत) तुमच्याजवळ? मुळीच नाही! मीच पै-पै घरखर्चातून वाचवून प्रâीजमध्ये, ओव्हनमध्ये वा बदाम-पिस्त्याच्या डब्यांत कधी तर अगदी बेडरूमच्या बेसिनमध्ये वा बाथरूममधील कृत्रिम भिंतीत दडवून ठेवले होते!!
आजोबा : तेच तेच! माझ्याकडे निव्वळ ३५ लाख होते, उर्वरित तू दिलेलेस. त्यात सुकान्ने सर केवळ भूतदयेखातर पर्यवेक्षक झालेले. इतरांची मात्र मागणी वीसेक लाखांची होती. (व्यॉकनाथाकडे बघत) तरीही तू आठ विषय अनुत्तीर्ण झालेला…
व्यॉकनाथ : ( तातडीने प्रतिवाद करत) पण बाबा, तुम्ही माझा स्ट्राईक रेट बघा ना!
आजोबा : त्यात त्या वेळी परिस्थिती इतकी हलाखीची होती की गोड उपम्यात केवळ अर्धा किलो बदाम-पिस्ता नि अर्धा लिटर साजूक तूपच टाकू शकायचो. अन्यथा पुन्हा सुकान्ने सरांना आणखी रक्कम देववून ते विषय उत्तीर्ण करवून घेता आले असते ना? पण हाय ती गरिबी!!!
व्यॉकनाथ : पण इतरांपेक्षा…!
आजोबा : होय इतरांपेक्षा तुला मी केवळ काहिक गाईडस् थोड्याच नोट्स आणि अगदी मोजक्याच ट्युशन्सचा सपोर्ट देऊ शकलेलो, पण तरीही…
व्यॉकनाथ : (गर्वाने कॉलर उडवत) नव्हे! आणि तरीही मी सर्वांपेक्षा उत्तम स्ट्राईक रेटने सात विषय उत्तीर्ण झालो.
आज्जी : (काहीशा अंमळ संतापाने) नाथा, तुझ्या परीक्षा पर्यवेक्षक सुकान्नेंच्या घरी घेतल्या गेलेल्या. त्याही ओपन बुक टेस्ट स्वरुपातच की! त्यात तुझे गाईड्स, नोट्स आणि मित्र-मैत्रिणी सर्वच मदतीस होते की!
व्यॉकनाथ : पण आई, एक गोष्ट तू विसरते आहेस! माझी स्पर्धक मंडळी भयानक रात्री कधी कंदीलात तर कधी मशालीच्या उजेडात अभ्यास करण्यास जमायची. त्यांच्याकडे पुस्तके-वही वा इतर साहित्य देखील नसायचे. पण केवळ माझ्या द्वेषातून त्यांनी बक्कळ अभ्यास केलेला. तरीही मी त्यांना पछाडून चांगला स्ट्राईक रेट मिळवू शकलो. हे कमी आहे का?
भिकवंत : (बॅग भरून तयार पण दुर्लक्षामुळे दुर्मुखलेल्या चेहर्याने) आई, मी जाऊ का?
आज्जी : (भिकवंतकडे नजर वळवत) पण बाळा अभ्यास झाला का तुझा?
आजोबा : आता या समयी अभ्यास करून असा कितीसा फायदा होणार आहे? पण वर्षभर केलाच असेल की अभ्यास आपल्या बाळाने? काय भिकवंत?
भिकवंत : (गडबडून) हा म्हणजे केला आहे जरा…
व्यॉकनाथ : जरा म्हणजे? वर्षभर काय केलेस तू शाळेत जाऊन? तू नियमित तर जाववायचा ना?
भिकवंत : हो, पण म्हादबादासांनी सांगितलेलं ना?
आई : काय?
भिकवंत : आपला इतिहास इतक्या दिवस लपवून ठेवला गेला आहे. वगैरे! अगदी तोच समजून घेणेसाठी मी व्हॉट्सअॅपवर खरा इतिहास शिकत होतो. त्यांनी सांगितलेले सर्व विज्ञान आधी भारतीय पौराणिक ग्रंथांतच लिहिले गेले आहे. ते शोधण्यात वर्ष संपले. इतर विषय समजून घेण्यापेक्षा गोवंश आणि त्यांपासून मिळणारे पंचगव्य विक्रीतून मठासाठी अधिकचा निधी जमवण्यासाठी आम्ही वेळ दिला होता, त्यातून मठाचे उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न केले गेले. आणि त्याचे फळ म्हणून छीः छीः म्हादबादास यांनी खुश होऊन आम्हास ‘गोरक्षक’ ही पदवी बहाल केली.
आजोबा : बाळ, तू योग्य तेच केलेस! तुझा गणगणे परिवारास कायम अभिमान राहील.
आज्जी : पण बाळ आता परीक्षेत उत्तरपत्रिका सोडवता येतील काय?
व्यॉकनाथ : आई त्याची चिंता नसावी! मी म्हादबादासांच्या कृपेने त्यावर देखील उपाय शोधला आहे.
आज्जी : काय उपाय शोधलास तू? ह्या वयात तुला जमणार आहे का परीक्षा देणे? तू केवळ स्ट्राईक रेट राखण्याचा प्रयत्न करू शकतोस. त्याला उत्तीर्ण करू…
व्यॉकनाथ : आई आहे त्यावर उपाय! आणि तोही जालीम उपाय आहे मजकडे! विनाअभ्यास भिकवंत उत्तीर्ण होतील असा!
आई : (शंकेने) तुम्ही म्हादबादासांसारखे प्रमाणपत्र तर छापून घेतले नाहीत ना? लोकांस कुठलेही सद्कृत्य बघवत नाही हो! त्यासही पुढे ती नावे ठेवायची!
व्यॉकनाथ : (समजावणीच्या सुरात) अगं असले कुठलेही उपाय दिले नाहीत म्हादबादासांनी. माझी गाठ त्या मठातील गुज्जूभाईसोबत पडलेली. त्यांनीच त्यावर रामबाण उपाय सुचवला आहे. अर्थात त्यांच्या मदतीविना ते अशक्यच!
आजोबा : (हात जोडत) म्हादो! म्हादो!! काय उपाय दिला आहे त्यांनी?
व्यॉकनाथ : बडोदा संस्थानच्या लोकोत्तर कार्यांसाठी निधी म्हणवून काही दान मागितले आहे…!
आजोबा : आपण घर नूतनीकरणासाठी जमवलेली तुटपुंजी रक्कम आहेच, ती देऊयात. पण तू उपाय सांगणार होतास, त्याचे काय झाले?
व्यॉकनाथ : तोच सांगायचा प्रयत्न करत आहे मी! काही मोजक्या दानाच्या बदल्यात गुज्जूभाई आपल्याला पूर्ण सोडवलेली उत्तरपत्रिका देणेस तयार झालेत. आता त्या बघून भिकवंत लवकर परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतील.
आजोबा : म्हादो! म्हादो!! काय ती दयाबुद्धी? गुज्जूभाईंच्या ह्याच प्रयत्नाने अनेकानेक लाभार्थी परीक्षार्थी बनून आपले खडतर भवितव्य सुधारवत आहेत. फक्त भिकवंता, तू उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न कर. बाकी समांतर भरतीने देशाची सचिव पदे मिळवून देशसेवा करण्याचे स्वप्नं देखील बघावयाचे आहे रे!!!
(भिकवंत मान डोलावतो. घरात म्हादो! म्हादो!! चा गजर घुमतो. मागोमाग टीव्हीवर आणखी एक परीक्षेतील पेपर लीक झाल्याची बातमी दाखवली जाते.)