चमचमणारी ‘द डॅझलिंग गोल्ड’ची पाटी पार लांबून देखील डोळ्यांना खुणावत होती. सुलतान अफजलच्या मालकीचा मुंबईतला सर्वात खतरनाक असा बार होता तो. सर्वसामान्य लोक त्याला बार म्हणून ओळखत असले, तरी ‘गोल्ड’च्या गुप्त तळघरात जुगारापासून ड्रग्जपर्यंत सगळे काही मिळू शकत होते. फक्त काही मोजक्या व्यक्तींना याची कल्पना होती. अर्थात ह्या मोजक्या व्यक्ती कोट्यधीश आणि एका रात्रीत लाखो रुपये सहज उधळू शकणार्या होत्या हे वेगळे सांगायची गरज नाही आणि ह्याच मोजक्या व्यक्तींचे अभय असल्याने गोल्डचा धंदा रोजच्या रोज वाढतच चाललेला होता.
सुलतानच्या नावाचा दबदबा देखील असा होता की पोलिस देखील बारसमोरून जाताना बारकडे बघायचे धाडस करत नसत… आणि ह्या अशा खतरनाक ठिकाणी निवांत पाय पसरून सारंग दर्यावर्दी बसला होता. आजूबाजूला उभ्या असलेल्या गुंडांपैकी काहींचे डोळे सारंगवरून हलायला देखील तयार नव्हते. त्यांचे हात सारंगचा खिमा करायला नुसते शिवशिवत होते. त्यातल्या प्रत्येकाने कधी ना कधी सारंगच्या हातून सपाटून मार खाल्लेला होता. पण आज मनात असून देखील ते काही करू शकत नव्हते. कारण सारंग आज चक्क सुलतानचा पाहुणा म्हणून गोल्डमध्ये आरामात व्होडक्याची चव चाखत बसलेला होता.
‘हॅलो मिस्टर दर्यावर्दी…’ त्या छोट्या हॉलच्या दारात एक पहाडी आवाज घुमला आणि आवाजाच्या मागून तशाच भव्य आकाराचा सुलतान आतमध्ये शिरला. सारंगने हात मिळवण्यासाठी हात पुढे केला, मात्र, सुलतानने तो हात तसाच खेचत सारंगला चक्क मिठीत घेतले. सारंगसारखा तगडा गडी देखील त्या राक्षसाच्या मिठीत काहीसा गुदमरला गेला.
‘आज तुमच्यासारख्या माणसाने माझी आठवण काढण्यासारखे काय आक्रित घडले आहे सुलतान शेठ?’ सारंगने त्याच्या माणसांकडे नजर फिरवत विचारले. आजूबाजूला मुंबईतल्या नामचीन गुंडांचा वेढा असताना देखील एखाद्या सिंहाच्या रुबाबात बसलेल्या सारंगकडे एकदा कौतुकाने पाहत सुलतानने आपल्या माणसांना खूण केली आणि सर्व माणसे एकेक करत बाहेर पडली. हॉलमध्ये आता ते दोघेच उरले होते.
‘सारंग, ह्यापूर्वी आपली कधी भेट झालेली नाही, पण ज्या सर्कलमध्ये आपण वावरतो तिथे तुझ्यामाझ्यासारखी लोकं एकमेकांची माहिती बाळगून असतात. माझे एक अत्यंत महत्त्वाचे काम आहे आणि ते तू करावेस असे मला वाटते. दाम तू म्हणशील ते आणि काम मी म्हणेन ते. अर्थात मी तुला कोणाचा खून करायला सांगणार नाहीये की कोणाला इजा पोहोचवायची नाहीये. त्यासाठी माझ्याकडे शेकडो गुंड आहेत.’
‘मग ह्या शेकडो गुंडांना करता येणार नाही असे कोणते काम मला करायचे आहे,’ सारंगने उत्सुकतेने विचारले.
‘माझ्याकडे माणसे खूप आहेत सारंग, पण ती फक्त शरीराने वाढलेली आहेत. जे काम मला करून हवे आहे, त्यासाठी बुद्धी आणि शक्ती दोन्हीचा योग्य वापर करू शकेल, अशी व्यक्ती मला हवी आहे.’
‘कामाबद्दल काही सांगाल?’
‘सारंग, माझा व्यवसाय तर तुला माहिती आहेच. गोल्डमध्ये बरेच श्रीमंत आपले खिसे रिकामे करायला येत असतात. लखन पाल हा त्यातलाच एक आसामी होता. हिर्याचा व्यापारी.’
‘होता?’
‘मी तुला सविस्तर सगळे सांगतो. हा लखन कायम माझ्याकडे क्रिकेटवर सट्टेबाजी करायचा. ह्या व्यसनाच्या नादात तो जवळपास दीड कोटी रुपये हरला. त्यातले काही त्याच्या धंद्यातले देखील पैसे होते. त्याच्या पार्टनरला म्हणजे अमन रस्तोगीला हे कळू नये यासाठी तो अक्षरश: माझ्या हाता पाया पडला. मी त्याला हरलेल्या पैशातले पन्नास लाख परत देखील केले. मात्र जुगारावर हरलेले दीड कोटी आणि मी मदत म्हणून परत केलेले पन्नास लाख ह्याच्या मोबदल्यात त्याने मला ‘ब्लॅक विडो’ देण्याचे कबूल केले होते.’
‘ब्लॅक विडो?’
‘आफ्रिकेच्या सुदानमध्ये खाणीत एका काहीशी काळी झालर असलेला एक हिरा नुकताच मिळाला आहे. सुदैवाने एका मध्यस्थाच्या माध्यमातून लखनच्या हाताला तो हिरा लागला. त्याचाच सौदा करण्यासाठी लखन सुदानला गेला होता. येताना तो हिरा तो सोबत घेऊन येणार होता. त्याने निघताना मला त्या हिर्याचा व्हिडिओ देखील पाठवला होता,’ सुलतानने मोबाइल बाहेर काढत तो व्हिडिओ सारंगला दाखवला. अक्षरश: नजर हटत नव्हती त्या हिर्यावरून.
‘हा तो ब्लॅक विडो आहे?’
‘हो हाच तो हिरा. सारंग, माझ्याकडे ह्या हिर्यासाठी पाच कोटीचे गिर्हाईक देखील आहे.’
‘मग घोडे अडले कुठे?’
‘लखन परत आला, त्याच दिवशी दुपारी त्याचा खून झाला आणि तो हिरा गायब आहे,’ खिन्न आवाजात सुलतान म्हणाला.
‘पोलीस तपासात..’
‘पोलिसांना अजून खुनी सापडला नाहीये आणि लखनजवळ किंवा त्याच्या घरात कुठेही कोणताही हिरा देखील मिळाला नाही.’
‘कदाचित त्याने बँकेत..’
‘लखन रविवारी मुंबईला परतला होता सारंग.’
‘त्याच्या घरात एखादी गुप्त तिजोरी..’
‘माझ्या माणसांनी त्याच्या भिंती देखील फोडून पाहिल्यात. हाताला काही लागले नाही.’
‘म्हणजे ज्याने लखनचा खून केला, त्याच माणसाकडे तो हिरा असणार हे नक्की.’
‘बरोबर! आणि त्याचसाठी मला तुझी मदत हवी आहे.’
‘पोलिसांना खुनी सापडला तर हिरा देखील मिळेल, पण मग मला त्यावर मालकी हक्क दाखवता येणार नाही; कारण माझ्यात आणि लखनमध्ये कुठलाही लेखी करार नव्हता. मुळात तो हिरा अवैध मार्गाने हिंदुस्तानात आणण्यात आलेला आहे. मी चांगलाच अडकलो आहे सारंग. लखनकडे आधीच माझे दोन कोटी अडकून पडले होते आणि त्या हिर्याच्या भरवशावर मी समोरच्या पार्टीकडून दोन कोटी अॅडव्हान्स घेऊन धंद्यात गुंतवून देखील मोकळा झालो आहे. मला कुठल्याही परिस्थितीत तो हिरा हवा आहे सारंग… आणि त्या हिर्यापर्यंत मला एकच माणूस पोहोचवू शकतो आणि तो म्हणजे तू…’ सारंगने काही क्षण विचार केला आणि सुलतानला डनची खूण करत त्याने समोरचा ग्लास एका दमात रिकामा केला.
– – –
सकाळी दहाला आळस देत सारंग उठला आणि त्याने ब्रश हातात घेतला. ब्रश करत असताना अचानक त्याला रात्रीची सुलतानची भेट आठवली आणि त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला. पटापट आवरत त्याने आपली ओपन हूड जिप्सी बाहेर काढली आणि लखनच्या दुकानाकडे धाव घेतली.
‘द डायमंड हाऊस’च्या पाटीखालून तो आत शिरला आणि एसीच्या थंडगार झुळकेने सुखावला. फर्म तशी चांगली मोठी आणि दुमजली होती. सारंग सरळ एका काउंटरवर गेला आणि त्याने अमन रस्तोगीची चौकशी केली.
‘सर केबिनमध्ये आहेत, पण ते कोणाला भेटणार नाहीत ह्यावेळी,’ समोरच्या तरुणाने माहिती दिली.
‘तुझ्या सरांना सांग, सुदानचा पोस्टमन आलाय,’ डोळे मिचकावत सारंग म्हणाला. सारंगकडे विचित्र नजरेने बघत तो तरुण एका केबिनमध्ये शिरला आणि अक्षरश: दुसर्या मिनिटाला धावत बाहेर आला.
‘सरांनी तुम्हाला आत बोलावलंय…’
हेच घडणार होतं अशा आविर्भावात सारंग केबिनमध्ये शिरला. समोरच्या आलिशान खुर्चीत एक चाळिशीचा रुबाबदार माणूस बसलेला होता. केबिन त्याच्या श्रीमंतीची झलक जागोजागी दर्शवत होते. एक आलिशान कोच, संपूर्ण केबिनमध्ये फरचा पसरलेला गालिचा, संगमरवरी मूर्ती आणि बरेच काही.
‘तुम्ही?’ समोरच्या माणसाने संशयाने विचारले.
‘मी सारंग. लखनचा मित्र.’
‘पण लखनने कधी उल्लेख केला नाही तुमचा. मी त्याच्या सगळ्या मित्रांना ओळखतो. अगदी तो जिथे जुगार खेळायचा ती जागा देखील मला माहिती आहे.’
‘करेक्ट. मी त्याचा त्याच ठिकाणचा मित्र आहे. पण मी अशा काही विचित्र व्यवसायात आहे की त्यामुळे कदाचित लखनने माझा उल्लेख कधी तुमच्यापाशी केला नसेल.’
‘कोणता व्यवसाय आहे तुमचा?’
‘मी अनेक बेकायदा वस्तू बाहेरच्या देशातून आपल्या देशात आणत असतो,’ सारंग शांतपणे म्हणाला आणि अमनचा चेहरा चमकला. त्याने पटकन जाऊन केबिनचा दरवाजा बंद केला आणि तो सारंगच्या शेजारच्या खुर्चीत येऊन बसला.
‘तुम्ही मघाशी सुदानचा उल्लेख केलात. म्हणजे ब्लॅक विडो…’
‘मला ब्लॅक विडोबद्दल माहिती आहे, पण तो हिरा मात्र माझ्याकडे नाही,’ सारंग म्हणाला आणि क्षणात अमनचा चेहरा पडला.
‘तुम्ही एकदम निराश झालेले दिसता..’ सारंगने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारले.
‘लखनच्या भरवशावर मी सात कोटीला ‘द ब्लॅक विडो’चा सौदा करून बसलोय,’ हताश स्वरात अमन म्हणाला आणि सारंग दचकला. ह्या लखनने नक्की किती लोकांना टोपी घातली होती काय कळेना.
‘तुम्हाला हिर्याबद्दल कसे माहिती,’ अमनने विचारले.
‘लखनला तो हिरा हिंदुस्तानात आणण्यासाठी माझी मदत हवी होती. माझ्या माणसाने त्याला कस्टम क्लिअर करून देखील दिले,’ सारंगने मस्त लोणकढी थाप सोडून दिली.
‘येस! मला विमानतळावरून येत असताना लखनने व्हिडिओ पाठवला होता हिर्याचा. म्हणजे तो सुखरूप हिरा घेऊन बाहेर पडला होता हे नक्की.’
‘मी त्याला एक कोटी अॅडव्हान्स दिले होते हिर्यासाठी,’ सारंग आज नुसता पुड्यावर पुड्या सोडत होता. त्याचे वाक्य ऐकले आणि अमन दचकला.
‘पण त्या व्यवहाराशी..’
‘घाबरू नका. मी तुमच्याकडे पैसे मागायला आलेलो नाही. ज्याने लखनचा खून केलाय त्या माणसाकडे तो हिरा आहे हे नक्की. मी त्या माणसाला शोधतोय आणि त्यात मला तुमची मदत हवी आहे.’
‘मला स्वतःला देखील तो लवकरात लवकर पकडला जायला हवा आहे. अर्थात हिरा पोलिसांच्या हाताला लागायला नको हे देखील तेवढेच खरे आहे. तो सुलतान नावाचा गुंड देखील त्या हिर्याच्या मागे आहे,’ कपाळावरचा घाम पुसत अमन म्हणाला.
‘सुलतान?’
‘तू तर ओळखत असणार त्याला. त्याच्याच क्लबमध्ये जाता ना तुम्ही?’
‘हो ओळखतो. पण हिर्याबद्दल काही बोलला नाही तो.’
‘बोलणार पण नाही. सगळा चोरीचा मामला आहे.’
‘मला सांगा मिस्टर अमन, तुमचा कोणावर संशय आहे का? लखनला कोण दगाफटका करू शकते?’
‘तसा तो बराच लफडेबाज माणूस होता. पण त्याच्या हिरे पारखण्याच्या कसबाला तोड नव्हती, हे देखील खरे. त्यामुळे आमची भागीदारी टिकून होती.’
‘म्हणजे तुमचा संशय कोणावरच नाही तर.’
‘नाही. लखनचा खून होईल येवढे त्याचे कोणाशी काही वाद नक्कीच नव्हते. त्यातून इतक्या भीषणपणे आधी वायरने गळा आवळून आणि नंतर पुन्हा गोळ्या घालून खून करावा इतका त्रास त्याने नक्कीच कोणाला दिला नसणार,’ सारंगने पटल्यासारखी मान डोलवली आणि त्याने अमनचा निरोप घेतला.
– – –
भर दुपारी सारंगला चौकीत आलेला पाहून इन्स्पेक्टर वाघमारे जाम खूश झाले. सारंग त्यांचा एकदम आवडता माणूस. तसेही सारंगसारख्या तडफदार डिटेक्टिव्हचे अनेक फॅन्स पोलीस खात्यात होतेच.
‘ओहो… सारंगकुमार आज इकडे कुठे वाट चुकलात?’
‘लखन मर्डर केस..’
‘तो जौहरी?’
‘येस! त्याची फाइल बघायला मिळेल?’ सारंगने विचारायचा अवकाश की वाघमारेंनी लगेच फाइल मागवून घेतली. वाघमारेंनी मागवलेले थंड कोकम सरबत ढोसत तब्बल अर्धा तास सारंग ती फाइल शांतपणे वाचत होता.
‘मर्डर वेपन मिळाले नाही?’
‘अजून तरी नाही. पण ते ०.३८ कॅलिबरचे जस्टिन अँड मार्क कंपनीचे पिस्तुल आहे हे तपासात उघड झाले आहे. ज्या दोरीने गळा आवळला गेला आहे, ती देखील मिळालेली नाही. मात्र घटनास्थळावर प्रेताच्या नखात आम्हाला काही धागे मिळालेत. दिसायला ते प्राण्याच्या केसांसारखे आहेत. त्यांचा तपास सुरू आहे,’ हे ऐकून सारंग जरा विचारात पडला होता. सारंगने मग जरा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा हाणल्या आणि तो बाहेर पडला.
– – –
‘हॅलो सुलतान..’
‘बोल सारंग..’
‘लखनकडे पिस्तुल होते?’
‘येस! बहुदा जस्टिन अँड मार्कचे पिस्तुल असावे,’ सुलतानचे उत्तर ऐकून सारंगच्या तोंडून शीळ बाहेर पडता पडता राहिली.
रात्रीच्या अंधारात सारंग त्या घरात शिरला आणि त्याने हलकेच पेन टॉर्चच्या उजेडात शोध मोहिमेला सुरुवात केली. घराची अवस्था भूकंप झाल्यासारखी होती. काही भिंती फुटल्या होत्या, कपाटातले सामान विखुरलेले होते, बेड तुटलेला, गाद्या, उशा फाडून त्यांचा कापूस पूर्ण बाहेर काढलेला.. एकूणात सुलतानच्या माणसांनी घराची तपासणी करण्यात फारशी कसूर ठेवलेली नव्हती. लखनचे घर होते ते. वाटेत विखुरलेल्या वस्तूंमधून मार्ग काढत तो लखनच्या दुसर्या बेडरूममध्ये शिरला. तिथली अवस्था देखील फारशी बरी नव्हतीच. तो शांतपणे एकेक कानाकोपरा न्याहाळत होता आणि त्याला हवी ती वस्तू दिसली. एका कोपर्यात फरचा गालिचा भिरकावलेला होता. सेम अमनच्या केबिनमध्ये होता तसाच. बहुदा दोघांची आवड एकच असावी. सारंगने सावकाशपणे तो गालिचा तपासायला सुरुवात केली आणि अचानक त्याचे डोळे लकाकले. गालिच्याच्या खालच्या बाजूला असलेल्या शिवणीत त्याला काहीतरी कडक वस्तू लागली आणि त्याने हलकेच शीळ वाजवली. लखनच्या नखामध्ये सापडलेले धागे कसले होते ते आता त्याला उमगले होते. त्याने घाईघाईने ती शिवण उसवली आणि आतमध्ये मखमलाच्या कापडात गुंडाळलेली छोटी पुडी खाली पडली. ती उघडली आणि सारंगला धक्का बसला. आतमध्ये दोन ब्लॅक विडो चमचमत होते… एक असली आणि एक नकली.
सारंग सावकाशपणे तिथून बाहेर पडला आणि आता त्याने दुसर्या घराचा रस्ता पकडला. ह्या घरात त्याला हवी ती वस्तू सापडली, तर त्याची मोहीम आजच फत्ते होणार होती.
सारंगला अपेक्षा होती तशी कुत्री काही त्याच्या स्वागताला हजर झाली नाहीत आणि देवाचे आभार मानत तो बंगल्यात शिरण्याचा मार्ग शोधायला लागला. शेवटी एक खिडकी उघडण्यात त्याला यश आले आणि तो सावकाश आत शिरला.
मानेला थंडगार स्पर्श जाणवला आणि बेडवर झोपलेल्या व्यक्तीने थोडी चुळबूळ केली. तोच स्पर्श पुन्हा एकदा जाणवला आणि त्या व्यक्तीने डोळे उघडले. बेडरूमच्या फिकट प्रकाशात समोर सारंग उभा होता आणि त्याच्या उजव्या हातात ०.३८चे जस्टिन अँड मार्कचे पिस्तुल तर डाव्या हातात एक वायर लोंबकळत होती. सारंग शांतपणे समोर ठेवलेल्या नोटांच्या गड्ड्या मोजत होता.
– – –
‘काळजी करू नकोस. बरोबर पन्नास लाख आहेत ते,’ हातातला हिरा कुरवाळत सुलतान म्हणाला आणि सारंग गोड हसला.
‘पण तुला खुन्याचा संशय आला कसा?’
‘पोलिसांकडे जाण्याआधी मी अमनला भेटायला गेलो होतो. त्यावेळी बोलताना त्याने लखनचा गळा वायरने आवळल्याचा उल्लेख केला, पण पोलीस तपासात मात्र वायरचा कुठेच उल्लेख नव्हता. गळा एखाद्या नाडीने आवळल्याचा त्यांना संशय होता. तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली. त्याचवेळी मला लखनच्या नखांमध्ये प्राण्याच्या केसांसारखे धागे सापडल्याचे समजले आणि माझ्या डोळ्यांसमोर अमनच्या केबिनमधला गालिचा आला. तसाच सेम गालिचा मला लखनच्या घरात दिसला आणि माझी ट्यूब पेटली. लखनने घाईघाईने गालिचा उसवला असणार आणि ते धागे त्याच्या नखात गुंतले असणार हे मी ओळखले.’
‘आता तुला कळले, मी माझी शेकडो माणसे सोडून तुला का निवडले?’ कौतुकाने सुलतान बोलला.
‘येस!’
‘लखन डबलक्रॉस करत होता तर..’ खेदाने सुलतानने विचारले.
‘होय. त्याने अमनला देखील
ब्लॅक विडो देण्याचे वचन दिले होते. पण ऐनवेळी घाबरून तो ब्लॅक विडो तुला देतोय हे अमनला समजले आणि त्याचा पारा चढला. त्याला कोणत्याही परिस्थितीत तो हिरा हवाच होता. त्याचे भविष्य टांगणीला लागले होते. शेवटी त्याने टोकाचा निर्णय घेतला आणि… असो.. तुमचा हिरा तुम्हाला मिळाला, माझी बिदागी मला. सो टाटा गुडबाय..’ सुलतानशी हस्तांदोलन करत सारंगने त्याचा निरोप घेतला. शीळ वाजवत तो गोल्डमधून बाहेर पडला, पण डोक्यात मात्र ओरिजनल ब्लॅक विडोला आता कुठे गिर्हाईक मिळेल हा विचार पिंगा घालत होता…