टायर कंपनी सुरू करणे सर्वसामान्य तरुणांच्या हातात नाही, परंतु चहा, मिसळ, वडापाव असे कमी गुंतवणुकीचे स्वयंरोजगार शोधणार्या तरुणाईला पंक्चर काढण्याच्या उद्योगात मोठी संधी आहे. हा कमी गुंतवणुकीचा, पण सतत गरजेचा व्यवसाय आहे. म्हणूनच हा व्यवसाय छोट्या शहरांमध्ये, गावांमध्ये, महामार्गांवर आणि वस्ती भागात नेहमीच फायदेशीर ठरतो.
– – –
जीवनाचे चक्र, समय का पहिया अथवा व्हील ऑफ लाइफ अशी सगळ्या भाषांत गती दर्शवण्यासाठी चाकाची उपमा दिली जाते. जीवनाचा प्रवास असो अथवा जीवन जगण्यासाठी केला जाणारा प्रवास असो, त्याला गती मिळाली ती चाकाच्या शोधाने. हा मानवाच्या इतिहासातील महत्त्वाच्या शोधांपैकी एक मानला जातो. सुरुवातीला वाहतुकीसाठी चक्क गोल दगडांचा वापर करण्यात आला होता, मग वजनाने हलक्या लाकडी चाकांचा शोध लागला, पण तीही भरीव असत; मग त्यात आरे येऊन ती अधिक हलकी आणि वेगवान झाली. जसजशी वाहतुकीची गरज वाढून वेगाला महत्त्व प्राप्त झाले, तसतसे चाकांच्या मजबुतीकरणासाठी विविध प्रयोग सुरू झाले. लाकडी चाकांपासून ते आजच्या ट्यूबलेस स्मार्ट टायरचा हा प्रवास तंत्रज्ञान, गरज आणि नवनवीन शोधांनी भरलेला आहे.
सुमारे ३५०० इ.स.पूर्वी मेसोपोटेमियात (आधुनिक इराक) पहिल्या चाकाचा शोध लागला. त्या काळात चाके एकसंध लाकडाची बनवली जात होती. मोठ्या झाडांचे ओंडके चिरून त्यांना गोल आकार दिला जायचा. सुरुवातीच्या काळात चाके जड होती. नंतर मजबूत चाकांसाठी तीन किंवा अधिक लाकडी फळ्या एकत्र जोडून गोल आकार दिला जाऊ लागला. सुमेरियन आणि इजिप्शियन संस्कृतीत प्रथम घोडागाड्यांमध्ये लाकडी चाके दिसून येतात. भारत आणि चीनमध्ये बैलगाड्यांसाठीही लाकडी चाके प्रचलित होती. हळूहळू ग्रीस आणि रोममध्ये युद्धगाड्यांमध्ये लाकडी चाके वापरण्यात आली. चाक केवळ वाहतुकीचे साधन न राहता सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक अर्थ घेऊन आले. भारतात रथयात्रा, रथसप्तमी यांसारख्या धार्मिक परंपरांमध्ये चाकाला एक पवित्र प्रतीक मानले गेले.
लाकडी चाकांमधली उणीव म्हणजे त्यांचे झिजणे, तुटणे आणि धक्का लागल्यावर सहजपणे मोडणे. हीच अडचण लक्षात घेऊन ग्रीक आणि रोमन संस्कृतींमध्ये चाकांच्या कडेवर लोखंडी पट्टी बसवण्याची प्रथा सुरू झाली. यामुळे चाके अधिक टिकाऊ आणि मजबूत झाली, गाड्यांचा वेग वाढला आणि जमिनीशी घर्षण कमी झाल्यामुळे त्यांचे आयुष्य वाढले. ही सुधारणा वाहतुकीच्या एकंदर विकासात निर्णायक ठरली.
औद्योगिक क्रांतीच्या काळात लोखंडी पट्टीधारी चाकांचे रूपांतर आधुनिक चाकांमध्ये झाले. या काळात रस्तेवाहतुकीसाठी वापरल्या जाणार्या गाड्यांच्या लोखंडी चाकांवर रबरचा थर लावण्याची संकल्पना पुढे आली, ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायक झाला. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात वेगवान वाहतुकीची गरज वाढत चालली होती. परंतु त्या काळातील उंच सखल रस्ते आणि गाड्यांच्या लाकडी आणि लोखंडी चाकांमुळे प्रवास खडतर आणि अस्थिर होत असे. या समस्येवर उपाय म्हणून १८८८मध्ये जॉन बॉयड डनलॉप यांनी पहिला हवा भरलेला रबरी टायर विकसित केला. स्कॉटलंडवासीय डनलॉप हे पेशाने पशुवैद्यक. त्यांचा व्यवसाय डोंगराळ भागात होता. लाकडी किंवा टणक रबरच्या चाकांमुळे रोजचा प्रवास त्रासदायक होता. पण जेव्हा त्यांच्या दहा वर्षाच्या मुलाला टणक रबराची टायर सायकल चालवताना त्रास होऊ लागला तेव्हा डनलॉप यांनी विचार करायला सुरुवात केली आणि एक सोपी पण क्रांतिकारी कल्पना त्यांच्या डोक्यात आली, चाकाभोवती मऊ आणि लवचिक आवरण तयार करून त्यात हवा भरणे. डनलॉप यांनी एका लवचिक रबरी नळीत फुटबॉल पंपच्या साह्याने हवा भरली आणि ती नळी सायकलच्या लाकडी चाकाभोवती घट्ट बांधली. हवेच्या दाबामुळे रबरचे आवरण लवचिक राहिले आणि धक्के शोषून घेण्यास मदत झाली. त्यांच्या मुलाने नवीन टायर असलेली सायकल चालवली, तेव्हा तो सहजतेने, वेगाने आणि त्रास न होता सायकल चालवू शकला. १८८८मध्येच डनलॉप यांनी नवीन टायरसाठी पेटंट अर्ज दाखल केला. १८८९मध्ये डब्लिनमधील एका सायकल शर्यतीत डनलॉपचे टायर्स असलेल्या सायकलींनी विजय मिळवला, त्यामुळे डनलॉप टायर्सना प्रसिद्धी मिळाली. डनलॉप यांच्या शोधाने केवळ सायकलींचे जगच नव्हे, तर संपूर्ण वाहतूक क्षेत्र बदलून टाकले. पुढे हेच तंत्रज्ञान मोटारगाड्या आणि मोटरसायकलींमध्ये वापरण्यात आले. टायर कंपन्यांनी या तंत्रज्ञानावर प्रयोग करत अधिक टिकाऊ आणि वेगवान टायर तयार करायला सुरुवात केली.
१९०० ते १९४०च्या दरम्यान, टायर्समध्ये अनेक लहान-मोठे सुधार केले गेले. ठिसूळ रबराच्या टायरच्या तुलनेत हवेचे टायर्स अधिक आरामदायक असले तरी टिकाऊपणाचा अभाव होता. त्यामुळे त्या काळात टायर उत्पादकांनी टायरच्या संरचनेत बायस प्लाय वापरण्याचा प्रयोग सुरू केला. म्हणजे रबराच्या आत नायलॉन, पॉलिस्टर किंवा रेयॉनच्या धाग्यांचे थर एकमेकांवर आडव्या-उभ्या (क्रॉस) पद्धतीने ठेवले जात. या आडव्या-उभ्या थरांमुळे टायर अधिक मजबूत बनले आणि गाड्यांना अधिक स्थिरता मिळाली. परंतु या टायर्सची झीज लवकर होत असे.
१९४८ मध्ये फ्रान्समधील मिशेलिन कंपनीने रेडियल टायर विकसित केला. या टायरच्या आत स्टील पट्ट्या (बेल्ट) लावण्यात आल्या. यामुळे टायर अधिक टिकाऊ, स्थिर आणि इंधन कार्यक्षम झाला. पारंपरिक आडव्या थरांच्या टायर्सच्या तुलनेत रेडियल टायर्स वेगवान गाड्यांसाठी अधिक उपयुक्त ठरले. विकसित देशात या टायर्सना लोकप्रियता मिळाली. अर्थात रेडियल टायर्सही परिपूर्ण नव्हतेच. कारण त्या टायरमध्ये हवा साठवण्यासाठी स्वतंत्र ट्यूब असायची. या प्रणालीमुळे अनेक अडचणी निर्माण होत. ट्यूबच्या संपर्कात कोणतीही अणकुचीदार वस्तु आली की ट्यूबला छिद्र पडून टायर कधीही पंक्चर होत असे. पंक्चर झाले की गाडी ताबडतोब थांबायची आणि टायर काढून त्यातील ट्यूब बदलणे ही एक वेळखाऊ व त्रासदायक प्रक्रिया होती. विशेषतः वेगाने चालणार्या वाहनांमध्ये ट्यूब फुटल्यास अपघाताचा धोका वाढत असे. ही मर्यादा ओळखूनच काही तंत्रज्ञ आणि कंपन्यांनी नव्या शक्यतांचा शोध सुरू केला आणि ट्यूबलेस टायरचा जन्म झाला.
१९४७ साली बीएफ गुडरिच या अमेरिकन कंपनीने ट्यूबलेस टायर बाजारात आणला. या टायरची तांत्रिक संकल्पना अगदी साधी, पण प्रभावी होती. यात ट्यूबऐवजी हवेचा दाब थेट टायर आणि रिम यांच्यात ठेवला जातो, जेणेकरून अतिरिक्त ट्यूबची गरज राहणार नाही. व्यावहारिक फायद्यांमुळे हे टायर अल्पावधीतच जगभर लोकप्रिय झाले. ट्यूबलेस टायर पंक्चर झाल्यास हवा अचानक न निघता हळूहळू कमी होते, त्यामुळे चालकाला रस्त्यात न थांबता टायर बदलण्यासाठी वेळ मिळतो. ट्यूब नसल्याने उष्णता निघून जाण्यास मदत होते, टायर फुटण्याचे प्रमाण कमी होते. याशिवाय पंक्चर काढताना टायर उघडण्याची गरज राहत नाही… या सर्व गोष्टींमुळे ट्यूबलेस टायर वाहन क्षेत्रात स्वीकारले गेले.
भारतात पहिला स्वदेशी टायर बाजारात येण्यासाठी १९६१ उजाडावे लागले. इतका उशीर होण्यामागे टायर निर्मिती तंत्रज्ञान, भारतातील रस्त्यांची बिकट अवस्था आणि गाड्यांची कमी संख्या ही कारणे होती. ब्रिटिश भारतात बोटीतून आले पण खंडप्राय भारताचा कारभार पाहायला त्यांना रस्ते वाहतुकीशिवाय पर्याय नव्हता. १८९७ साली कोलकात्यातील फोस्टर फ्रेझर कंपनीने पहिल्यांदा टायर आयात करून मोटरगाड्यांचा वापर सुरू केला. सुरुवातीला फक्त ब्रिटिश अधिकारी आणि काही श्रीमंत भारतीयच गाड्या वापरत असत. १९२६मध्ये डनलॉप
कंपनीने कोलकात्याजवळ शाहगंज येथे भारतातील पहिला टायर कारखाना सुरू केला. त्यामुळे खर्या अर्थाने भारतीय टायर उद्योगाचा पाया रचणारा माणूस म्हणून के. एम. मम्मन मापिलई यांचं नाव घेतलं जातं. त्यांच्या एमआरएफ कंपनीची सुरुवात लहान मुलांसाठी फुगे बनवण्यापासून झाली. सुरुवातीच्या काळात तांत्रिक ज्ञान, उत्पादन यंत्रणा, प्रशिक्षित कामगार आणि भांडवल या सर्व गोष्टींचा प्रचंड अभाव होता. एमआरएफने रिट्रेड रबरपासून सुरुवात केली. रिट्रेड म्हणजे वापरलेल्या टायरचा घासलेला भाग काढून टाकून त्यावर नवीन रबर थर (ट्रेड) बसवला जातो. ही प्रक्रिया विशेषतः ट्रक, बस, ट्रेलर, ट्रॅक्टर आणि औद्योगिक वाहनांसारख्या मोठ्या वाहनांच्या टायरसाठी वापरली जाते. नवीन टायर खूप महाग असतात आणि रिट्रेडिंगमुळे ग्राहकांच्या खर्चात मोठी बचत होते. हे करत असताना त्यांच्या लक्षात आलं की भारतात दर्जेदार टायर्सची गरज आहे, पण तंत्रज्ञान मात्र परकीयांकडेच आहे. मग त्यांनी अमेरिकेच्या मॅन्सफिल्ड रबर कंपनीसोबत तांत्रिक भागीदारी केली आणि १९६१मध्ये पहिला स्वदेशी टायर बाजारात आणला.
एमआरएफने उत्पादन प्रक्रियेत सतत सुधारणा केल्या. त्यांनी कारखान्यांत प्रगत मिश्रण प्रक्रिया, ट्रेड डिझाईन आणि टायर टेस्टिंग यंत्रणा आणल्या. प्रशिक्षित कामगार घडवण्यासाठी इनहाऊस प्रशिक्षण सुरू केलं. सुरुवातीला व्यवसाय वाढ मर्यादित होती, परंतु गुणवत्ता आणि विश्वासार्हतेमुळे नवीन टायरची ऑर्डर मिळवणे सोपे गेलं. एमआरएफने खेळणी, रबर होजेस, पेंट, कन्वेयर बेल्ट्स यांसारख्या क्षेत्रांतही प्रवेश केला, पण त्यांच्या व्यवसायाच्या केंद्रस्थानी कायम टायर उत्पादनच राहिले. आज ही कंपनी प्रवासी वाहन, दुचाकी, ट्रक, ट्रॅक्टर, बस, औद्योगिक वाहने आणि अगदी लढाऊ विमानांसाठीही टायर्स तयार करते. १९७०नंतर एमआरएफने नायलॉन टायर्सच्या उत्पादनास प्रारंभ केला आणि बीएफ गुडरिच कंपनीसोबत रेडियल टायर्ससाठी तांत्रिक करार केला. त्यांनी विमानांसाठी टायर्स बनवण्याची तयारी केली आणि लढाऊ विमानांसाठी विशेष बायस आणि रेडियल टायर्सचे उत्पादनही यशस्वीरीत्या सुरू केले.
मोटर उत्पादक कंपन्यांना टायर विकताना दोन हेतू साध्य होतात, एक, खात्रीशीर ऑर्डर मिळून मोठ्या प्रमाणात टायर विकले जाणे. दुसरा फायदा म्हणजे ग्राहक गाडीचा टायर बदलताना कार उत्पादक कंपनीने लावलेल्या टायरच्या कंपनीचाच टायर लावणं पसंत करतो. याचा फायदा मोटर उत्पादक कंपन्या उचलतात आणि जो कमी दर देईल त्याचे टायर आपल्या गाड्यांना लावतात. मारुती, किया, टोयोटा, हुंडाई, टाटा अशा कंपन्यांना आपलंसं करून टायर विकण्याच्या खेळात अपोलो टायरने जास्त प्रावीण्य मिळवलेलं आहे. कार उत्पादक कंपन्या टायरच्या सर्वात मोठे ग्राहक असतील, असं वरकरणी वाटतं, कारण फॅक्टरीत बनणार्या प्रत्येक कारला स्टेपनी धरून पाच टायर लागतात. परंतु टायरच्या व्यवसायात कार उत्पादक कंपन्यांचा वाटा फक्त ३० टक्के असून सर्वात मोठा म्हणजेच ६० टक्के वाटा हा सर्वसामान्य ग्राहकांचा आहे. म्हणूनच टायर कंपन्यांना मार्केटिंगचा आधार घ्यावा लागतो.
सर्वसामान्य भारतीयांना पहिल्यांदा एमआरएफ ब्रँड दिसला तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बॅटवर. १९९०च्या दशकाच्या मध्याला एमआरएफने सचिन तेंडुलकरसोबत ब्रँड एंडोर्समेंटसाठी करार केला. सचिनच्या बॅटवर एमआरएफचा स्टिकर लावलेला असायचा. हा करार एमआरएफसाठी एक मैलाचा दगड ठरला. कारण सचिनच्या फलंदाजीप्रमाणेच एमआरएफ ब्रँडची प्रतिमा देखील ‘टिकाऊपणा, ताकद आणि दर्जा’ यांची ओळख बनली. पेस फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी भारतीय क्रिकेटला व्यावसायिक गोलंदाज देण्याचं काम केलं. सचिननंतर विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांसारख्या जागतिक क्रिकेटपटूंच्या बॅटवर एमआरएफचा स्टिकर झळकला. क्रिकेट विश्वचषक, मोटर रॅली स्पर्धा, टेनिस टूर्नामेंट्स यामध्ये प्रायोजकत्व देत कंपनीने आपला ब्रँड जागतिक स्तरावर पोहोचवला. वितरण आणि विक्री व्यवस्थेमध्येही एमआरएफने भारतात सर्वात मजबूत आणि विस्तृत नेटवर्क उभारले आहे. ते केवळ मोठ्या शहरांपुरते मर्यादित नाही, तर ग्रामीण आणि दुर्गम भागांतही पोहोचलेले आहे. यामुळेच एमआरएफ हा भारतातील सर्वाधिक खपाचा, सर्वात प्रतिष्ठित टायर ब्रँड आहे.
भारतात अपोलो, जेके टायर्स, सिएट, बिर्ला टायर्स यासारख्या कंपन्यांनी देखील ओळख निर्माण केली आहे. १९७२मध्ये स्थापन झालेली अपोलो टायर्स आज भारतातील सर्वात मोठ्या टायर कंपन्यांपैकी एक आहे. त्यांनी निर्यातीत देखील महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. जेके टायर्सने ट्रक आणि बस टायरच्या क्षेत्रात वर्चस्व निर्माण केले असून सिएट टायर्सने देशभरात विक्रीचे मोठे वितरण जाळे उभे केले आहे. ९०० दुकाने, साडेपाच हजार डीलर्स आणि ६०,००० सब-डीलर्स यामुळे ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहेत.
टायर व्यवसायात प्रचंड गुंतवणूक लागते आणि हा व्यवसाय तांत्रिकदृष्ट्या किचकट असल्यामुळे प्रत्येक नवीन उद्योजकासाठी इथे स्थान नाही. एमआरएफ, जेके टायर्स, सिएट अशा प्रस्थापित कंपन्यांना टक्कर देण्यासाठी काही वेगळा विचार करणं भाग होतं. बाळकृष्ण इंडस्ट्रीज या टायर कंपनीने ‘ऑफ हायवे’ टायर्स विभागात जोरदार मुसंडी मारली. ऑफ हायवे म्हणजे औद्योगिक कामकाजात, बांधकामात आणि शेतीत वापरली जाणारी वाहने, ज्यांचा सामना खडबडीत पृष्ठभागांशी होतो. या कंपनीची स्थापना १९८७मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे झाली. सुरुवातीला त्यांनी दुचाकी टायर्सची निर्मिती केली, परंतु नंतर त्यांनी भारतीय बाजारातील एक मोठा गॅप ओळखला–भारतातील बहुतांश टायर कंपन्या प्रवासी वाहने, ट्रक व बस यांच्या मुख्य प्रवाहात काम करत होत्या. शेती, खाणकाम आणि बांधकाम क्षेत्रासाठी दर्जेदार आणि किफायतशीर टायर्स सहज उपलब्ध नव्हते. ही गरज ओळखून कंपनीने संपूर्ण व्यवसाय ऑफ हायवे टायर्सच्या दिशेने वळवला. हाच निर्णय त्यांच्या यशाचा प्रमुख पाया ठरला. बाळकृष्ण इंडस्ट्रीजने जागतिक बाजारपेठेत देखील आपला ठसा उमटवला आहे. २००६मध्ये सुमारे ₹६०० कोटीची उलाढाल असणार्या या कंपनीने २०२३-२४मध्ये ₹९३०० कोटी महसूल आणि ₹१३०० कोटी निव्वळ नफा कमावला. तो पाहून इतर टायर कंपन्यांनी देखील या विभागाकडे लक्ष देणं सुरू केलं. सिएटने मिशलीन कंपनीचा ऑफ हायवे टायर्स बनवणारा कॅम्सो हा ब्रँड १९०० कोटी रुपयांना विकत घेतला.
टायर तयार करण्यासाठी ३८ टक्के नैसर्गिक रबर, १२टक्के सिंथेटिक रबर, १४ टक्के कार्बन ब्लॅक, १४ टक्के फॅब्रिक, ९ टक्के केमिकल्स आणि १३ टक्के इतर घटक वापरले जातात. टायर उत्पादनासाठी लागणारे सुमारे ७० टक्के रबर हा नैसर्गिक असते आणि त्याचा बहुतांश हिस्सा थायलंड, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया या आशियाई देशांतून येतो. भारतात केरळ हे प्रमुख रबर उत्पादन केंद्र आहे, जेथून ७०टक्के रबर मिळते, तर उर्वरित १५ टक्के रबर ईशान्य भारतात तयार होते. तरीही आपण ४० टक्के रबर आयात करतो. सध्या भारताची रबर गरज १४ लाख टन इतकी आहे आणि २०३०पर्यंत ही मागणी २० लाख टनांपर्यंत पोहोचू शकते.
पर्यावरणीय बदल, हवामानातील अनियमितता आणि पीक पद्धतीतील बदल यामुळे रबर उत्पादनावर परिणाम होतो आणि त्याचा थेट परिणाम टायरच्या किमतीवर होतो. ‘पॅरा रबर ट्री’ किंवा ‘ब्राझिलियन रबर ट्री’च्या लागवडीपासून उत्पन्न येण्यासाठी सात वर्ष लागतात. शिवाय गेल्या अनेक वर्षांत रबर शेतकर्यांना चांगला भाव मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी रबराऐवजी अन्य पीक घेताना दिसतात. या संकटावर उपाय म्हणून भारतीय टायर कंपन्यांनी ईशान्य भारतात ११००० कोटी रुपये गुंतवून दोन लाख हेक्टरवर पॅरा रबर लागवड सुरू केली आहे. पॅसेंजर कार टायर्समध्ये ६० टक्के सिंथेटिक आणि ४० टक्के नॅचरल रबर वापरला जातो, तर ट्रक टायरमध्ये ही रचना उलटी असते.
टायर्सना त्यांचा काळसर रंग कार्बन ब्लॅकमुळे मिळतो. कार्बन ब्लॅक टायर्सना अधिक टिकाऊ बनवतो. सुरुवातीला एखादा टायर ८००० किलोमीटर चालायचा, पण कार्बन ब्लॅक वापरल्यामुळे त्याचे आयुष्य ५०,००० किलोमीटरपर्यंत वाढते. क्रूड ऑइल आणि कार्बन ब्लॅकच्या किमतीत वाढ झाली की टायर कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होतो.
प्रत्येक गाडीच्या प्रकारानुसार टायरचा आकार आणि त्याची निर्मिती प्रक्रिया बदलते. नेहमीची प्रवासी वाहनं आणि ऑफ हायवे वाहनं यांपैकी प्रत्येक प्रकाराचे टायर वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. उदाहरणार्थ, दुचाकी टायर्समध्ये बॅलन्स आणि लाइट वेट याला महत्त्व दिलं जातं, तर ट्रक-बस टायर्समध्ये लोड बेअरिंग (वजन वहन) क्षमता आणि टिकाऊपणाला अधिक महत्त्व असते. बस आणि ट्रक्सना लागणार्या टायरची सर्वाधिक विक्री होते. मागील काही वर्षांत भारतातील पायाभूत सुविधांत वाढ होऊन चांगल्या रस्त्यांची निर्मिती होतेय. २०१० साली वस्तू दळणवळणात रेल्वेचा वाटा ४३टक्के होता तो आता चांगले रस्ते झाल्यामुळे कमी होऊन ३३ टक्के वर आला आहे आणि रोड ट्रान्सपोर्टचा वाटा ५७ टक्के वरून ६७ टक्क्यांवर पोहोचलाय. म्हणजे मालवाहतूक करणार्या गाड्यांची वाहतूक सातत्याने वाढतेय, याचाच अर्थ टायर्सची मागणी वाढते आहे. संभाव्य मागणीचा अंदाज घेऊन टायर कंपन्यांना धोरण आखावे लागते. उदा. खेड्यांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजावरा उडाल्याने तिथे टू व्हीलरची संख्या वाढते आहे. पण ही खरेदी दसरा दिवाळी या सणांना जास्त दिसते. याचप्रमाणे काही वर्षांपूर्वी झेन, वॅगनार अशा कमी किमतीच्या चार चाकी गाड्यांना जास्त मागणी होती, परंतु गेल्या काही वर्षांत आरामदायी एसयूव्ही गाडीची क्रेझ वाढताना दिसतेय.
सध्या भारतात एकूण २८ टायर उत्पादक कंपन्या आहेत, पण त्यातील सहा कंपन्यांकडे संपूर्ण उद्योगातील ८७ टक्के बाजार हिस्सा आहे. त्यामुळे हे क्षेत्र थोडं एकाधिकारशाहीकडे झुकलेलं आहे. हेच लक्षात घेऊन सरकारने परदेशी गुंतवणूकदारांना भारतात टायर उद्योगात गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे. उद्योगात कालानुरूप बदल केले नाहीत तर कंपनी मागे फेकली जाते. बायस प्लाय टायरमधून सर्व टायर कंपन्यांनी रेडियंट टायर बनवायला सुरुवात केली, परंतु बिर्ला टायरसारख्या काही कंपन्यांनी हा बदल स्वीकारला नाही आणि बघता बघता त्या मागे पडल्या. आता कार सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक कारचं मोठं वादळ येऊ घातलं आहे. २०३०पर्यंत भारतातील ३० टक्के गाड्या इलेक्ट्रिक कार असतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. नेहमीच्या गाड्यांपेक्षा इलेक्ट्रिक गाड्या बॅटरीच्या वजनामुळे २० ते ३० टक्के जास्त वजनाच्या असतात, म्हणून या सेगमेंटमध्ये इनोव्हेशन्स करून जास्त मार्जिन कमावण्याची टायर कंपन्यांना संधी आहे.
२०००पासून टायर्समध्ये स्मार्ट टेक्नॉलॉजी वापरली जात आहे. टायर हवेचा दबाव मोजणारी प्रणाली टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, टायर फुटल्यावरही काही काळ चालणारे रन फ्लॅट टायर्स, टायरला छिद्र पडल्यास स्वतः छिद्र भरून घेणारे सेल्फ-सीलिंग टायर्स, इको-फ्रेंडली टायर्स, ईव्ही अनुरूप टायर्स आणि इंटरनेटद्वारे जोडलेले टायर्स यांसारख्या नवकल्पना येऊ लागल्या. काही टायर्समध्ये आता सेन्सर्स बसवले जातात जे वाहन नियंत्रक प्रणालीला टायरचे तापमान, हवेचा दाब, ग्रिप याबद्दल माहिती देतात.
टायर कंपनी सुरू करणे सर्वसामान्य तरुणांच्या हातात नाही, परंतु चहा, मिसळ, वडापाव असे कमी गुंतवणुकीचे स्वयंरोजगार शोधणार्या तरुणाईला पंक्चर काढण्याच्या उद्योगात मोठी संधी आहे. हा कमी गुंतवणुकीचा, पण सतत गरजेचा व्यवसाय आहे. गाडी चालवणार्या प्रत्येकाला पंक्चर काढण्यासाठी दुकान गाठावे लागतेच. म्हणूनच हा व्यवसाय छोट्या शहरांमध्ये, गावांमध्ये, महामार्गांवर आणि वस्ती भागात नेहमीच फायदेशीर ठरतो. शिवाय टायरचे तंत्रज्ञान जसजसं प्रगत होतेय तशी या कामातील अंगमेहनत कमी झाली आहे. हाताशी काही नसताना हवेत स्वप्ने पाहण्यापेक्षा पंक्चर काढून गाडीत हवा भरून देण्याचा हा उद्योग कधीही चांगलाच.
पंक्चर काढण्याचं दुकान सुरू करायचं असेल, तर सुरुवातीला आवश्यक साधनसामग्री आणि थोडी जागा असावी लागते. पंक्चर काढण्याचं दुकान उघडण्यासाठी लागणार्या काही प्रमुख वस्तू– पंक्चर रिपेअर किट्स, एअर कंप्रेसर, हँड पंप, टायर ओपनिंग लीव्हर्स, रिमूव्हर टूल्स, पाण्याची टाकी, स्टूल, रबर पॅचेस, रफिंग टूल्स, प्रेस मशीन, स्प्रे बॉटल्स, टायर प्रेशर गेज, इलेक्ट्रिक बल्ब/लाइटिंग, टायर स्टँड इत्यादींची आवश्यकता असते. ट्यूब प्रकाराचे पंक्चर काढायचे असेल, तर गरम पॅच मशीन, इलेक्ट्रिक हिटर, सोल्यूशन, हँड रोलर याची आवश्यकता असते. ट्यूबलेस टायरसाठी ट्यूबलेस किट आणि एअर कंप्रेसर हा अनिवार्य घटक असतो.
एकवेळ रस्त्यावरील सर्व गाड्या खनिज तेलाच्या इंधनाशिवाय चालतील, पण चाकाशिवाय गाडी ही मजल गाठायला अजून बरीच स्थित्यंतरं बाकी आहेत. अश्मयुगापासून माणसाच्या प्रगतीला गती देणार चाक ते टायर असा प्रदीर्घ प्रवास करूनही हे टायर टायर्ड झालेले नाहीत, आणि रिटायरही होणार नाहीत.
– संदेश कामेरकर