गाव सुक्काळवाडी. देदे वाड्यात नरुतात्या झोपाळ्यावर पालथे पडून मुंग्यांची रांग बघतोय. ढुंगणात शेपूट घालून निपचित पडलेलं कुत्रं झोपाळ्याच्या करकरीमुळं जागं आहे. पण त्या मुक्या बिचार्याला बोलता सोय नाही. प्रत्येक नव्या झोक्यावर ते खोबणीत घातलेले लाल डोळे काढून पडल्या जागेवरून बघतंय. पण तात्याची झोपाळ्याची सैर काही थांबंना आणि कुत्र्याला बिनघोर काही झोपता येईना. तोच नरुतात्या मुंग्यांच्या नादात झोपाळ्याचे आडवेतिडवे झोके घेऊ लागतो. त्याने कुत्रं भेदरतं आणि उठून दूर जाऊन बसतं. मुंग्यांकडे बघत नरुतात्या एकटाच मोठ्याने हसतो. तोच शखर्या धावतपळत तिथं येतो.
‘तात्या, बातमी कळली का?’ धापा टाकत शखर्या विचारतो.
‘टप्पू येड्यागत बरळतोय तेच ना? खुर्ची भेटल्यावर माझ्यासारखाच बहकला जरा तो. मलाही लाल डोळे दाखवतो म्हणजे काय?’ तात्या मुंग्या मोजतच बोलतो.
‘ती नाही हो!’ शेखर्या वेगळ्याच टोनमध्ये.
‘मग सोरटकर आपल्या गावात शिरला काय? आला असंल तर त्याला पदरात घ्या. पंतांनी मोकळं सोडलं म्हणजे काहीतरी प्लॅनच असंल. काय?’ नरुतात्या एक काडीवर एकदोन मुंग्या घेऊन न्याहाळू लागतो.
‘अहो ते पण नाही हो!’ अगदी पाय आपटत शखर्या ताण मारतो. एक माणूस एव्हढं साधं ओळखंना म्हणजे काय?
‘तूच बोल की गाढवा! सगळं मलाच कळतं, तर तुला पेट्रोलपाण्याचे पैशे देऊन उंडारायला ठेवलं असतं का?’ नरुतात्या खेकसतो.
‘तात्या भुस गुलमोहर माहित्ये ना?’ शखर्या तात्याला विचारतो.
‘कोण रे?’ नरुतात्याला काही आठवत नाही.
‘तो नाही का? खालच्या आळीतला फटाक्यांचं दुकान असलेला? रॉकेट भारी मिळतात, त्याच्याकडे तो?’ शखर्या खुणा सांगत नरुतात्याला आठवण करून देतो.
‘हा, पण त्याचं काय?’ नरुतात्याला पुढली खुदबुद.
‘अहो त्याचा चुलत मावशीच्या नणंदेच्या पुतण्याच्या मेव्हणीच्या फुईभावाच्या नातसुनाच्या सख्ख्या सावत्र आज्याच्या मित्राचा पोर म्हणजे तो अमेरिकेचा बुच विल्मोर…’ शखर्या अख्खी वंशावळ काढतो.
‘अरे कळलं रे! ते… गुलमोहरपासून विल्मोरपर्यंत! पण ते मला काय सांगतोय?’ नरुतात्या कावतो.
‘म्हणजे तुम्ही जगाच्या बेंबीपासून गावच्या झोंबीपर्यंतच्या शीः ताजाच्या बातम्या बघत नाही होय?’ शखर्या नवलानं विचारतो.
‘नाही, एवढ्यात मी मेलडीत गुंतलोय. ‘आज की रात मजा उसणं का…’ काय डॅन्से बाबाओ!’ नरुतात्याला झोपाळाभर शहारा उठतो.
‘उधार-उसन्यातून बाहेर पडा जरा. त्या टप्पूचा जोडीदार म्हस्के मंगळापर्यंत रॉकेटी न्यायचे प्लॅनिंग करतोय, तुम्ही गावच्या दगडी ‘खदानी’च धुंडाळताय अजून…’ तणतणत शखर्या काही बरळतो.
‘शखर्या तुला कामावर मी ठेवलाय. तुझी टाकी पेट्रोलनं फुल्ल मी करून देतो. कुणी गप्पू-टप्पू नाही. तवा आवाज… अँ? खाली!!’ नरुतात्या सुका दम भरतो. तसा तात्याचा आवाज वाड्याच्या आतच घुमतो. बाहेर त्याची बिल्ली-मांजर होते. हा भाग वेगळा!
‘तात्या पण…’ शखर्या लायकीवर आल्यावर ‘प’चा पाढा वाचू लागतो.
‘ते विल्मोरचं काय म्हणत होता…’ तात्या विषयावर येतो.
‘ते टप्पूच्या टूर-ट्रॅव्हल कंपनीनं ढगात रॉकेटी सोडून तीन-चार ड्रायव्हर पाठवले होते. आकाशातला हालहवाला घ्यायला. त्याच्यातला एक हा विल्मोर!’ शखर्या तात्याला खडानखडा माहिती देऊ लागतो.
‘म्हणजे असं भुर्रर्र जाऊन लगेच रिटर्न हाणायचं होतं का?’ तात्या ष्टोरीत गुंतू लागतो.
‘नाही, तसंच! पण तसं नाही,’ शखर्याला कसं सांगावा कळत नाही.
‘अय तसंच पण तसं नाही म्हणजे? डब्यात काढतो काय?’ तात्या फुरफुरतो.
‘म्हणजे त्यांनी लोखंड-बिखंड आणि पत्रे लावून एक टपरी टाकलीय तिथं. वर. तिथं असं उभर उभर जाऊन येणं थोडंच परवडतं का? तर त्या टपरीला चारदोन खिळे ठोकायचे होते आणि आकडा टाकून जी लायटिंग केली होती त्याच्या वायरी पण बदलायच्या होत्या, तर सात-आठ दिवस थांबून काम करून लगेच येणार होते. पण…’ शखर्या पण घालतो.
‘पण? पण काय?’ नरुतात्या शखर्याचा पण धरतो.
‘पण त्यांच्या रॉकेटीचा प्रॉब्लेम झाला आणि ते सगळे नऊ महिने तिथं अडकून पडले,’ शखर्या विल्मोरची आपबिती सांगू लागतो.
‘मग आपल्या टेकडावर कागदी फुग्यातून उड्या हाणत्या तश्या त्यांनी वरनं उड्या हाणायच्या ना? तवाच बोरासारखे खाली टपटपले असते ना?’ तात्याला भारी काहीतरी सॉल्लिड सुचल्यानं छाती फुगते.
‘तात्या, राती कोंबडीची कलेजी खायच्या ऐवजी तुर्यातला भेजा खायचा की जरा!’ शखर्या भसकन बोलून बसतो.
‘का रे?’ नरुतात्याला आधी काहीच टोटल लागत नाही, ‘मांजरीच्या!! मला भेजा नाही म्हणतो काय?’ तात्या चेवात उठायला जातो, पण झुलत्या झोपाळ्यावरून तोल जाऊन तात्या डायरेक खाली मुंग्यांवर पडतो, उताणाचित!
‘तात्या! जपा!’ म्हणत शखर्या पळत जात आधी झोपाळा अडवतो. पण तात्याला उठवायच्या ऐवजी झोपाळ्यावर पालथा पडून तात्याच्या नाकपुड्या बघू लागतो. ‘आहे! तात्या आहे!!’ शखर्या आनंदाने चित्कारतो.
‘मग मी एवढ्यात जाईन वाटलो का तुला?’ पडल्या पडल्या तात्याला कंठ फुटतो.
‘नाही, तात्या! पण हे असंच असतं ना? तुम्ही झोपाळ्यावरून खाली पडला तरी मुका मार पडला. आता तेच तुम्ही विल्मोरला आकाशातून उड्या हाणायला लावायच्या बाता करत होता. जमलं असतं का सांगा! ‘ शखर्या ताबडतोब वकिली पॉईंट काढतो.
‘हा नसतं जमलं म्हणा! वरून काय कळायचं? समुद्रात जात्या का काट्याकुट्यात जात्या का मुंग्यांत..? अय, मुंग्या झोंबल्या रे!’ तात्या उठायला जातो तो डोक्याला झोपाळा लागतो न् तात्या पुन्हा आडवा होतो.
‘तात्या..!’ शखर्या ओरडत उठतो. झोपाळा दोन्ही हातांनी गुंडाळून वर आढयाला बांधून देतो आणि घाईनं नरुतात्याला धरून उठवतो आणि खुर्चीत नेऊन बसवतो. ‘तात्या पाणी पित्या का?’ शखर्या काळजीनं विचारतो.
‘मोकार मुंग्या डसल्या रे! पहाय, लाल गांध्या कश्या उठल्या अंगावर? नुसत्या पाण्यानं होईल का? रातच्याला एक जास्तच घ्यावा लागंल,’ नरुतात्या मुंग्या झटकत बोलतो.
‘तात्या तुम्ही फक्त तुमच्या अंगणात पडला तरी एवढे जॅम झाला. पण विचार करा, तो विल्मोर आणि त्याच्याबरोबरचे तिकडं वर अडकून पडले. त्यांचं काय झालं असंल?’ शखर्या नरुतात्याला सुट्टी काही देत नाही.
‘हां, तिथं आपल्यासारख्या भाकर्या पण मोडून खाता येत नाही म्हणतात? काही वेगळंच खाणं लागतं म्हणे तिथं? मी ऐकलंय असं! पण मग आता आला म्हणतो ना तो माघारी?’ तात्या ठह्यरून त्यालाच विचारतो.
‘मग इतक्या वेळचं काय करतोय मी?’ शखर्या कपाळाला हात लावीत विचारतो.
‘बरं, बाबा! आता त्यांना म्हणावं असं कुठं जायच्या भानगडीत पडू नका. काळजी घ्या. निघ.’ नरुतात्या डायरेक विषयच क्लोज करत्या.
‘हा, निघतो. संध्याकाळी एखाद्या बोकडाचा भेजा शिजवून आणतो, त्याच्याशिवाय नाही…’ शखर्या चिडून पुटपुटत निघतो.
‘थांब! एवढा काय तणफणत चालला? मी काय चुकीचं बोलो काय?’ तात्याला कधी कधी सवाल पडत्या तर…
‘आवो, लोकं त्यांचं आणि त्यांनी नऊ महिने तिथं केलेल्या कामाचं कौतुक करत्याय. त्यांनी तिथं बसून ह्या अश्या मुंगीएवढ्या ग्रहांचा किती अभ्यास केला, किती खिळे ठोकले, किती…’ शखर्या नॉनस्टॉप चालू होतो, एफएमसारखा.
‘कळलं! आपण बी त्या विल्मोरला गावात बोलवून घेऊ, ट्रकीत उभं करून मिरवणूक काढू. गुलमोहरच्या दारी त्याच्या पाहुणचाराला बोकड कापू. मग तर झालं?’ तात्या शखर्याच्या मनापलीकडलं बोलतो, तसा शखर्या मोरासारखा खुलतो.
‘काय नक्की म्हणत्या काय?’ शखर्या थुईथुई नाचरं काळीज आवरीत विचारतो.
‘हे कागद घे, तिथून! लगेच लेटर लिहू आपण!’ नरुतात्या मुंग्या झटकीत प्लॅन डिक्लेअर करतो.
तसा शखर्या पळत जाऊन चारेक कागदं घेऊन येतो. खिश्यातला जेल पेन झटकीत तात्याकडं देतो. तात्या कागदं घेऊन पॅडला अडकवतो आणि पळणार्या कुत्र्यागत अक्षरं पळवीत लिहू लागतो.
‘रे गड्या विल्मोरा!
मला आमच्या शखर्यानं आजरोजी असं कळविलं का बाबा तू त्या ढगाआडून जिमिनीवर सुखरूप आलाय म्हणून! तवा तुझं, तुझ्या संगच्या लोकांचं एवढ्या दिवस अंधाराबिंधारात लांब दूर राह्यल्याबद्दल विशेष विशेष आपलं हे… ते!
मला आमच्या शखर्या कडून कळलं का तू आमच्या गावच्या गुलमोहरचा पाव्हणा आहे म्हणून. तर म्हंटलं आमच्या त्याच्या पदरी उधार्या र्हात्याच. तशी उधार तुझी भेट तू पण एक दे! निदान एवढ्या उचावर उडलेला माणूस पहायची, आम्हाला एक संधी मिळंल. काय?
मी ऐकलंय का तू तिथं बसून मुंग्यांवानी बारक्या बारक्या गोष्टी दुर्बिणीतून पहात रहातो, हुडकीत रहातो. तसं तू आमच्या गावातलं रंग्याचं थडगं पाह्यलं असंलच. तू जमिनी बाहेरले ढेकळं फोडून पाहतो. आम्ही ते थडगं खोदून पाहणार आहे. का बाबा, गावच्या विकासाचा एखादा मुद्दा त्याच्यात गावतो का काय ते! तू येशील तवा त्या थडग्यातल्या हाडांना एक पिशीत भरून देऊ. ते तू पुन्हा आकाशात जाशील तवा तिकडं फेकून ये. कचरा अंगणाच्या पलीकडं फेकावा म्हणत्या ना? काय? तुम्ही तिथं एक उकिरडा केलाच आहे म्हणत्या, त्याच्यात ही भर!
पण नको! त्या रंग्याला एवढा मान नकोच! आमच्या दारातच त्याचं थडगं बरंय! सांगायला बरं र्हातं, आमचा शत्रू आमच्या पायाखालच्या मातीत गाडला म्हणून. तिकडं थडगं खोदून दुसरीकडं नेलं तर पुढल्या पिढ्या मलाच भित्र्या म्हणतील. एक थडग्याला भिला म्हणून. मी काय भितो काय? ते र्हाऊ दे! तू इथं येऊन चंद्राएवढ्या खड्डेरी रस्त्यांचा अभ्यास कर. दर आठव्या महिन्यात कोरड्या पडलेल्या नळात पाणी भरायची जादू शिकव. बिन भाकरीची भूक मिटवायचा उपाय सुचव. काय?
तुला एवढं लांबचं दिसतं तर जवळचे प्रश्न कळत असतीलच काय?
तुझा आपला नरुतात्या!’