पौष संपला की माझा मानलेला परमप्रिय पोक्या याच्या लग्नाचा बार धुमधडाक्यात उडवून द्यायचा बेत मी ठरविला आहे. तोपर्यंत कोरोनाची तिसरी लाटही ओसरेल याची मला खात्री नव्हे तर विश्वास आहे. नंतर विसरायला नको म्हणून मी पोक्याच्या लग्नाचा सारा प्लॅन एका नववर्षाच्या कोर्या करकरीत डायरीत लिहून काढला आहे. त्याशिवाय दररोज त्या डायरीत आठवतील तशा नोंदी करतच असतो. मात्र त्याचा पत्ता पोक्याला लागू देत नाही. कारण पैशाच्या बाबतीत तो खूप हळवा आहे आणि स्वत:च्या लग्नासाठी वायफळ खर्च करणे त्याला आवडणार नाही. मला खोदून खोदून विचारल्यावर मी त्याला मागेच स्पष्ट शब्दात सांगितले होते की लग्नात तुझा एकही पैसा खर्च होणार नाही याची जबाबदारी माझी. जरी दीड-दोन कोटी खर्च आला तरी तू अजिबात लक्ष द्यायचे नाही की टेन्शन घ्यायचे नाही. कारण पैसा थोडाच आपल्या बापाचा आहे! आपण कितीही पैसा खर्च करू शकतो. कारण आजपर्यंत आपण दोघांनी मिळून इतक्या खंडण्या वसूल केल्या आहेत की दाऊदच्या फंटरनाही तेवढ्या वसूल करता आल्या नसतील आणि तिरकिट भूमय्या यांचा ईडी वरदहस्त असल्यावर तर चिंताच नको. ईडीची नाडी दिल्लीवरून त्यांच्याच हाती दिली आहे.
आजपर्यंत कोणीही काढली नसेल अशी सोन्याचा मुलामा दिलेली प्लॅटिनमची आकर्षक लग्नपत्रिका मी बनवण्यास देणार आहे. ती मिनी ब्रीफकेससारखी असेल. आत आकर्षक कप्पे असतील. मोठ्या पहिल्या कप्प्यात अर्थात लग्नपत्रिका दुसर्या कप्प्यात सेंटची बाटली, तिसर्या कप्प्यात दोन उंची मद्याच्या विदेशी क्वार्टर, चौथ्या कप्प्यात सुगंधी सुपारीची डबी, पाचव्या कप्प्यात पाव किलो चकणा, सहाव्या कप्प्यात काचेचा अनब्रेकेबल ग्लास, सातव्या कप्प्यात सोन्याचा वर्ख दिलेला अक्षतांचा बॉक्स, रिटर्न गिफ्ट म्हणून आकर्षक भेटवस्तू असणारच आहे. सगळ्या वस्तू माझे मित्र `स्पॉन्सर’ म्हणून पुरवणार आहेत. कोरोनाचे निर्बंध तेव्हा उठलेले असतील आणि कोरोनाने देशातून पळही काढला असेल. त्यामुळे या लग्नाची तशी काळजी मला मुळीच नाही. तसे आमच्या गँगचे मेंबर्स माझ्याबरोबर मदतीला असतीलच.
लग्नासाठी मी मुंबईतील कोणतेही मैदान केव्हाही बुक करू शकतो, कॅटररला देशाच्या प्रत्येक राज्यातील खाण्याच्या पदार्थाचे स्टॉल मैदानाच्या आतील बाजूच्या कडेला लावायचे आहेत. स्टेजच्या डाव्या बाजूला ऑर्वेâस्ट्रा सुरू असेल आणि उजव्या बाजूला सुरेल बँड. त्याशिवाय मैदानभर कडेकडेने भारतीय आणि पाश्चात्य नृत्याची धूमधाम असेल. मैदानभर पार्टीसारखी गोल टेबले आणि सभोवताली चार खुर्च्या असा थाट असेल. बाकी खाण्यापिण्याची रेलचेल असेल. महाराष्ट्राचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, दुबईतील आमचे काही खास मित्र यांना निमंत्रण असेल. पोक्यासाठी मोदींसारखा लांबलचक सोन्याचा वर्ख असलेला कोट, सुरुवार, रत्नजडीत बूट म्यानमारला बनवायला दिले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातील एक मंत्री आणि त्याची दोन मुले वगळता बाकी नेत्यांना आमंत्रण देणार आहे. माझ्यातर्पेâ पोक्याला मोदींनी अलिकडे घेतली तशी नवीन मर्सिडीज मेबॅक एस ६५० गार्ड ही बारा करोडची पॉश बुलेटप्रुफ गाडी भेट म्हणून देण्यात येईल. आता आलेल्या नव्या मॉडेलमध्ये त्या गाडीला वर
हेलिकॉप्टरसारखा पंखाही आहे. म्हणजे गरज भासल्यास तिचे हेलिकॉप्टरमध्येसुद्धा रूपांतर करून आकाशात विमानासारखे उडता येईल. सगळ्या सोयी त्यात असतील.
आता मी फक्त लग्न लावणार्या उत्तम गुरुजींच्या शोधात आहे. त्यासाठी जाहिरातही दिली आहे, त्यांचे इंटरव्ह्यू मीच घेणार आहे. एकच भटजी न निवडता चौघांची निवड करणार आहे. प्रत्येकाला कामे वाटून दिलेली असतील. त्याशिवाय पोक्याच्या लग्नाच्या निमित्ताने वधु-वरांची नावे गुंफलेली मंगलाष्टकांची स्पर्धाही पेपरात जाहीर करणार आहे. उत्तम पाच विजेत्यांना प्रत्येकी लाखाचे बक्षीस तसेच तिरकिट भूमय्या यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पोक्या-पाकळी शुभविवाह ट्रॉफी देण्यात येणार आहे. पोक्याला मात्र यातले काहीही सांगणार नाही. कारण त्याला श्रीमंती थाट अजिबात आवडत नाही. मलाही तो खरं तर आवडत नाही. पण पोक्यासाठी मी काहीही करेन. कारण पैसा काही माझ्या खिशातला नाही. आणि कसलीच धाड पडण्याची अजिबात भीती नाही. नाहीतरी पत्र्याच्या चाळीत राहणार्या आमच्यासारख्यांच्या जीवनात असे थाटामाटाचे प्रसंग कधी येणार?
पोक्यासारखा लग्नाचा विचार मी आयुष्यात कधीच करणार नाही. पोक्याच्या नशिबातच विवाहाचा योग होता म्हणून त्यातून त्याची सुटका होणार नाही. त्यामुळेच त्याला अचानक लग्न करण्याचा साक्षात्कार झाला. माझ्या बाबतीत तसे काही कधीच होणार नाही. कारण पोक्या दिसायला माझ्यापेक्षा देखणा आहे. त्याशिवाय डेअरिंगबाज आहे. त्याशिवाय त्याला त्याच्या मनासारखी पत्नी लाभणार आहे.
पोक्याची नियोजित पत्नी पाकळी हिला तर लग्नात मर्हाटमोळ्या पेहरावांनी आणि दागिन्यांनी मी नखशिखांत मढवून टाकणार आहे. मराठमोळी सोन्याचा मुलामा दिलेली पैठणी खास बनवायला दिली आहे. त्याशिवाय सोन्याचा कमरपट्टा, सोन्याचे बाजूबंद, सोन्याचे पैंजण, सोन्याच्या पाटल्या, सोन्याचे तोडे, सोन्याचा चंद्रहार आणि वीस तोळ्याचे मंगळसूत्र बनवायला टाकले आहे. त्याशिवाय सोन्याची फुलांच्या पाकळ्यांसारखी कर्णफुले, सोन्याची नक्षीदार बिंदी, हातात कोपरापर्यंत सोन्याच्या बांगड्या असं काय काय हैद्राबादच्या सोनपाकळी ज्वेलर्सकडे बनवायला दिलं आहे. दीर म्हणून माझे ते कर्तव्यच आहे.
वरात हत्तीवरून काढायची की घोड्यावरून एवढाच सवाल उरला आहे. तो सुटेलच. त्याशिवाय या पती-पत्नीना हनिमूनसाठी स्वित्झर्लंडला पाठवायचे की ऑस्ट्रेलियाला हाही प्रश्न सोडवायचा आहे. शेवटी थंडगार हवेत दोघं गारठून जायला नको. नाहीतर बोलणी मला खायला लागायची. सध्या बाकीचे सगळे धंदे बंद ठेवले आहेत. एकदा तिरकिट भूमय्याशी बोलून घेतो आणि सारे फायनल करतो. शेवटी प्रश्न पोक्या आणि पाकळीच्या समाधानाचा आहे. त्यामुळे आता जोरात तयारीला लागायला हवे!