□ उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब आदी विधानसभा निवडणुका होणार असलेल्या राज्यांमध्ये ७० दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
■ भाजपवाले किती प्रच्छन्नपणे निवडणूकजीवी बनले आहेत पाहा!
□ कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा विश्वास डळमळीत : रिझर्व्ह बँकेचे निरीक्षण
■ अहो, आयुष्यावरचा विश्वास उडण्याची वेळ आली, व्यापार्यांवर विश्वास कुठून टिकून राहील?
□ कोरोनाकाळात गरीब-श्रीमंत दरी रुंदावली- गरीब आणखी गरीब झाले, श्रीमंतांची संपत्ती दुप्पट झाली : अहवालातील निष्कर्ष
■ म्हणूनच हे जागतिक कारस्थान असल्याची चर्चा होते आणि त्यावर लोकांचा विश्वासही बसतो
□ आर्थिक वाढ राखून भारताचा कोरोना लढा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ देशाची आर्थिक वाढ म्हणजे नेमकी कोणाची वाढ हे समजण्यासाठी याआधीची टिचकी वाचा आणि स्वत:च्या डोक्यात टपली (किंवा थाळीही चालेल) मारून घ्या!
□ शरद पवारांवर टीका करताना हे विसरू नका की तुमच्याच पक्षाच्या केंद्र सरकारने पवार साहेबांना पद्म पुरस्कार दिला आहे- सुप्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
■ मी पुन्हा खाईन, मी पुन्हा खाईन, मी पुन्हा खाईन… माती.
□ लसीकरणाच्या बोगस प्रमाणपत्रांची विक्री, नालासोपारा येथे तरुणाला अटक
■ आपण धन्य लोक आहोत, फुकटातली, आरोग्यरक्षक लस घेण्याचे कष्ट नकोत, विकतची बनावट प्रमाणपत्रं हवीत! खरोखरच धन्य!
□ आंतरजातीय विवाह केल्यामुळे १५० दाम्पत्ये बहिष्कृत; सांगली जिल्ह्यात सहा जात पंचायतींच्या विरोधात गुन्हे दाखल
■ शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणवून घेण्याची योग्यता राहील का अशाने?
□ भाजपने योगींना गोरखपूरचे तिकीट देऊन आधीच घरी पाठवून दिले : अखिलेश यांची खोचक टीका
■ ‘वापरा आणि फेका’ हे त्यांच्या परिवाराचं अलिखित घोषवाक्य आहे.
□ रूग्णांच्या लुटीचे मोठे जाळे मानल्या जाणार्या बिनकामाच्या चाचण्या बंद करा : देशातील ३५ डॉक्टरांचे केंद्र सरकारला पत्र
■ उपचार नको, पण चाचण्या आवरा, अशी पाळी येते हो रूग्णावर.
□ स्वप्नांना लोकल नाही, ग्लोबल बनवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्योजकांना आवाहन
■ म्हणजे इथे लूट करून परदेशात जाऊन स्थायिक व्हा, असा अर्थ नाही, हेही स्पष्ट करा.
□ देशात महाराष्ट्र सर्वात हिरवागार; शहरांमध्ये हिरवाईत मुंबई दुसर्या क्रमांकावर
■ यात टपली काय मारायची? ही खरोखरच मराठीजनांनी स्वत:ची पाठ थोपटून घ्यावी अशीच कामगिरी!
□ मी कंगनाजींचा सिनेमा पाहणारच- योगी आदित्यनाथ
■ आगामी निवडणुकीनंतर तुमच्याकडे वेळच वेळ असेल योगीजी- तिलाही प्रेक्षक हवेच आहेत, किती दिवस बिचारी स्वत:चे सिनेमे एकटीच बघेल!
□ संघासाठी तुझ्या डोळ्यांतून झरणारे अश्रू मी पाहिले आहेत – अनुष्का शर्माची विराट कोहलीसाठी भावुक पोस्ट
■ आता दोघे मिळून अश्रू ढाळा.
□ प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातून बंगाल आणि केरळचे चित्ररथ वगळले
■ जिथे तिथे यांचं घाणेरडं राजकारण… आता या राज्यांनी आपापल्या राजधान्यांमध्ये फिरवावेत हे चित्ररथ आणि करावं त्यांचं थेट प्रक्षेपण!
□ मराठी पाट्यांमुळे मानसिकतेत बदल ही सकारात्मक गोष्ट : भारत सासणे
■ आता जास्तीत जास्त दुकानदारही मराठी असतील, असा प्रयत्न करायला हवा.