पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा दिल्लीत उभारण्याची घोषणा करताना ‘स्वातंत्र्यानंतर झालेल्या चुका दुरुस्त करतो आहोत,’ असे उद्गार काढले आहेत… या उद्गारांच्या वेळी त्यांच्याकडून कसलीही गफलत झाली नाही, म्हणजे तेव्हा टेलिप्रॉम्प्टर व्यवस्थित काम करत असणार हे स्पष्टच आहे… मोदी आणि त्यांचा विद्यमान अवतारातला पक्ष अजिबातच विनम्रतेसाठी ओळखले जात नाहीत, पण हे उद्गार म्हणजे आढ्यतेची परिसीमा आहे. ते अजून तरी १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळालं हे मान्य करतात हेच खूप. त्यात तेव्हापासून हे सत्तेत येईपर्यंत चुकांपलीकडे काहीच झालं नाही आणि यांचा अवतारच इतरांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी झालेला आहे, असं मानणं ही आत्मप्रौढीची परिसीमा आहे… खासकरून पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, आपल्याच पक्षाचे अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्यासारख्या काळाच्या एकेका टप्प्यावर आपली मोहोर उमटवणार्या पूर्वसुरींच्या कार्यकर्तृत्त्वाची इतक्या सवंगपणे बोळवण करणं हा औद्धत्याचाही कळस आहे… उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतात ते खोटे नाही.
ज्यांना आंतरराष्ट्रीय मंचावर टेलिप्रॉम्प्टर बंद पडला की स्वयंप्रज्ञेने दोन वाक्येही बोलता येत नाही, त्यांच्याकडून वेगळी अपेक्षाही करता येत नाही म्हणा!
नियतीचा न्याय कसा अजब असतो पाहा.
२०१४ साली मोदी यांच्या प्रचारयंत्रणेने मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर प्रचाराचा असा झंझावात तयार केला की आपली संसदीय लोकशाही झाकोळली जाऊन तिला अध्यक्षीय लोकशाहीचे स्वरूप दिले गेले. मोदी विरुद्ध कोण, असा प्रश्न उभा करायचा, विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधीच असणार, हे ठरवायचे आणि मग राहुल गांधी यांना पप्पू म्हणून सादर करायचे, त्यांची टिंगलटवाळी करून ते मोदींना पर्याय ठरू शकत नाहीत, असे चित्र तयार करायचे, अशी ही रणनीती होती. त्यासाठी राहुल गांधी यांच्या भाषणांमधल्या किरकोळ गफलती आयटी सेलने खोडसाळ मोडतोड करून मोठ्या करून दाखवल्या. पण इथे केलं की इथेच त्याची फळंही भोगावी लागतात आणि इतरांसाठी खणलेल्या खड्ड्यांमध्ये खड्डा खणणाराच पडतो अनेकदा. तेच झाले, आज भाषणातल्या गफलतींमुळेच पंतप्रधानांनी सगळीकडे हसे ओढवून घेतले आहे. शिवाय, राहुल गांधी यांच्या भाषणांमध्ये बालिश म्हणता येतील अशा गफलती अनेकदा झाल्या, पण ते उत्स्फूर्तपणे बोलू शकतात, इतरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देतात, कुणीतरी कधीतरी केलेल्या चुका दुरुस्त करायला जन्माला आलेले आपण महापुरुष आहोत, असा भ्रम त्यांना झालेला नाही, या फारच मोठ्या जमेच्या बाजू मानायला हव्यात. त्यांनी राफेलच्या गैरव्यवहारापासून कोरोनाच्या हाताळणीपर्यंत, अगदी शेतकरी आंदोलनाच्या फलितापर्यंत जे जे सांगितलं ते ते खरंही ठरलं आणि त्यांनी सांगितलेल्या उपायांचा अवलंब केंद्र सरकारला वेळोवेळी (अर्थातच त्यांना श्रेय न देता) करावा लागला. तरीही पप्पू तेच असतील, तर तसे मानणार्यांनी आपला मेंदू तपासून घेणं अगत्याचं ठरतं.
मोदींना पर्याय कोण, असा प्रश्न विचारणार्याला आता त्यांचं असं काय कर्तृत्त्व आहे, ज्याला पर्याय शोधायला हवा, असा प्रतिप्रश्न केला तर काय हाताशी येईल? त्यांनी अतिरेकी साहसवादी एककल्लीपणातून घेतलेला नोटबंदीसारखा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेच्या अंगाशी आला आणि गरिबांना धुपवून गेला. त्यांची खासगी उद्योगपतींना धार्जिणी असलेली आर्थिक धोरणं शेतकरी, कामगार, असंघटितांना नागवून श्रीमंतांना अधिक श्रीमंत बनवणारी आहेत, हे आता स्पष्टच झालेलं आहे. आपत्कालीन परिस्थितीची हाताळणी कशी करू नये, याचा वस्तुपाठ त्यांनी आणि भाजपशासित राज्यांनी घालून दिला. म्हणून देशातल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपचे मुख्यमंत्री तळाला आहेत. ३७० कलम रद्द केल्यामुळे काश्मीरचा प्रश्न सुटलेला नाही आणि शेतकरी कायदे तर मागेच घेण्याची नामुष्की ओढवली. सीएए आणि एनआरसी यांचं भवितव्य काही वेगळं असणार नाही. मोदी सरकार भ्रष्टाचार निपटवणार, स्वस्ताई आणणार, देशाला विकासाच्या वाटेवर नेणार या कल्पनेने ज्यांनी भरभरून मते दिली आणि दुसर्यांदा संधी दिली त्यांचा भ्रमनिरास करण्यापलीकडे मोदींनी काय साधले? त्यांनी केलेल्या नव्या चुकांचे काय करायचे?
राहता राहिलं होतं त्यांचं अमोघ वक्तृत्त्व. मोदी असे बोलतात की समोरच्याच्या हृदयाला हात घालतात, तो आपोआप त्यांच्याकडे पाहून भाजपला मत देतो, हे बंगालमध्ये खोटं ठरलं, पंजाबात चमत्कार होणार नाही, उत्तर प्रदेशातही हे वक्तृत्त्व चालणार नाही. बरं हे वक्तृत्त्व तरी खरं आहे का, असा प्रश्न टेलिप्रॉम्प्टर फियास्कोनंतर उपस्थित होऊ लागला आहे. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे अमोघ वक्ते होते. कुंचला आणि वाणी यांच्या फटकार्यांनी त्यांनी मुर्दाड मराठी मन जागवण्याचा चमत्कार घडवून आणला. त्यांना कधी टेलिप्रॉम्प्टरची गरज पडली नाही. तो समजा त्यांनी वापरला असता आणि तो एखाद्या ठिकाणी बंद पडला असता तर त्यांनी काय केले असते? त्या टेलिप्रॉम्प्टरवर एक उत्स्फूर्त विनोद करून त्यांनी श्रोत्यांशी मागील पानावरून पुढे संवाद साधला असता… खरा वक्तृत्त्वपटू नेता असा असतो! मोदींचं वक्तृत्त्वही असं बनावटच असेल, तर मग त्यांच्यापाशी असं काय उरतं, ज्याचा पर्याय शोधायचा आहे?