सूक्ष्मातिसूक्ष्म उद्योग मंत्री नारायणराव राणे यांना जेव्हा भाजपने शिवाजी पार्कच्या रणमैदानात मोजक्या सरदारांसह त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नेतृत्व करायला पाठवले, तेव्हा त्यांच्यासह उपस्थित सरदारांच्या पोटातही गोळा आला होता. आमचा मानलेला परममित्र पोक्या याच्या नजरेतून ते सुटले नाही. शुचिर्भूत होऊन यात्रेला निघाल्याप्रमाणे भाजपवाले त्यांच्याबरोबर झेंड्यांसह विदाऊट मास्क निघाले खरे, पण थेंब थेंब पडत असलेल्या पावसाने सगळे वातावरण अंधारमय, कोंदट आणि गढूळ केले होते. तो कुंथत कुंथत पडत होता. त्यामुळे नेता आणि सरदार धड भिजतही नव्हते आणि सुकतही नव्हते. यात्रेत नेत्याला चालत नेणे उचित नसल्यामुळे कुरूक्षेत्रावरील दुर्योधनाचा रथ जेवढ्या उंचीचा होता तेवढाच ट्रक आणि त्यात पुढे लोखंडी शिगेच्या ओपन चौकटीत रस्त्यावर नसलेल्या लोकांना फॅशन म्हणून हात दाखवत, हात हलवत जायचे अशा सूचना आधीच त्या चौकटीतील नेत्याला देण्यात आल्या होत्या.
राणे साहेब एकाला सांगत होते, शिवाजी पार्कला जाताना मला परमपूज्य असलेल्या बाळासाहेबांच्या तिथल्या स्मृतिस्मारकाला अभिवादन करूनच मी नंतर ट्रकरथावरून जाणार आणि बरेच दिवस पोटात साचून राहिलेली मळमळ भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांसमोर व्यक्त केल्याशिवाय माझे खवळलेले पित्त शांत होणार नाही, असे मी दिल्लीतच मोटाभाईंच्या घरी बोललो होतो. तेव्हा त्यांनीही गो अहेड म्हणून जाता जाता दरवाजा लावून घेतला होता असे ते म्हणाले. शिवाजी पार्कच्या रणमैदानात आल्यावर बाकी सरदारांची पाचावर धारण बसली होती. मैदानात कोणीच दिसत नव्हते. तरीही गनिमी काव्यात काही गोष्टी घडल्या आणि राडा झाला तर कुठल्या गल्लीत पटकन घुसता येईल याचाच विचार भकास परेकर करत होते, तर आतुर भातडाळकर पोटात सकाळपासून सुरू झालेली खळखळ अजून कशी कमी होत नाही याच विचारात होते. त्यांनी यात्रा सुरू होण्यापूर्वीच नेत्यांची परवानगी घेऊन काढता पाय घेतला. धरून बांधून आणल्यासारखे पंधरा-वीस तथाकथित कार्यकर्ते जीव मुठीत धरून उभे होते. शेवटी शेवटी औटघटकेचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते फडफडणवीस धर्मेंद्रच्या स्टाइलमध्ये आले आणि नारायणरावांना म्हणाले, काय ते थोडक्यात उरका आणि इथून एकदाचे निघू या. आपण सभ्य माणसे, राडेबाजीची आम्हाला सवय नाही. काय झाले तर एवढ्या मोठ्या मैदानातून पाठीला पाय लावून कुठे पळणार? शेवटी राणेसाहेब बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाजवळ एकटेच राहिले. त्यांनी फुले वाहिली आणि हात जोडून डोळे मिटून ते मनातल्या मनात काय बोलत होते ते कुणालाच कळले नाही. त्यांनी कोटाच्या खिशात हात घालून एक कागद काढला, त्याच्याकडे पाहिले आणि पुन्हा खिशात ठेवला पण तो खिशात गेलाच नाही. तो खाली पडला आणि बाजूलाच मजा बघण्यासाठी आलेल्या पोक्याच्या हातात सापडला. त्या कागदावरील मजकूर पोक्याने मला मोबाईलवरून वाचून दाखवला तो पुढीलप्रमाणे होता-
आदरणीय बाळासाहेब,
आज तुमच्याच कृपेमुळे या दगडाला देवपण मिळाले. मी काय होतो आणि काय झालो हे माझे मलाच समजत नाय पण इथे मजा नाय. जोश नाय. रूबाब नाय. माणसे नायत. कोण काडीचीही किंमत देत नाय. तिथे शिवसेनेत असताना काय वट होती आपली. नुसते डोळे वटारले तरी मंत्री सुतासारखे सरळ येत. कामे करत. आज कोणी विचारायला मागत नाय. आता मनात नसताना ते मोदी, शहा, फडणवीस यांची स्तुती करावी लागते. वाघ-सिंहाच्या छावणीतून शेळ्या-मेंढ्यांच्या कळपात आल्यासारखे वाटते. बाळासाहेब, तुम्ही मला पाच महिने सत्तावीस दिवस, तेरा तास का होईना राज्याचे मुख्यमंत्रीपद दिले. पण नंतर पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी शिवसेनेचा त्याग केला तरीही आश्वासन देऊनही मला झुलवण्याचा खेळच काँग्रेसने केला. नको ती खाती दिली. माझा फुटबॉल केला. मला वाटेल तसे हिणवायचे. मग काँग्रेस सोडली. स्वाभिमान पक्ष स्थापन केला, पण तोही बुडीतच निघाला. भाजपवाल्यांनी त्यांचे स्वतःचे महाराष्ट्रात तसे फारसे काही नसल्यामुळे इकडून तिकडून मिळेल तिथून विकाऊ आणि शिकावू मेंबरांची भरती सुरू केली. तेव्हा तिथे घुसून पदरात काही पडेल असे वाटल्यामुळे अखेर भाजपवासी झालो. शिवसेना सोडल्यानंतर मला आणि माझ्या पुत्राला निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागली. शिवसैनिकांचे तळतळाट भोवले होते. तरीही काहीच करण्यासारखे राहिले नव्हते. पैसा, संपत्ती, वैभव सारे काही होते, पण सत्तेचा दरारा संपला होता.
बाळासाहेब, तुम्ही मला कुठल्या घाणीतून बाहेर काढून वाल्याचा वाल्मिकी बनवलेत, पण शेवटी गद्दार हाच शिक्का माझ्या पाठीवर बसला. तेव्हा मी माझा स्वतःचा राजा होतो. सगळीकडे वट होती. मी माझ्या कर्माने ती घालवली आणि आता दिल्लीत, केंद्रात मंत्रीपद देऊन माझा महाराष्ट्रातील पत्ता कापण्यात आला. मला यांचे राजकारण कळत नाही असे नाही. त्यांनी माझा खुळखुळा केलाय. कळसूत्री बाहुल्याप्रमाणे ते जसे नाचवतील तसे मला नाचावे लागेल. ते सांगतील ते करावे लागेल. उठ म्हटल्यावर उठ आणि बस म्हटल्यावर बसा. वापर करून घेणे आणि फेकून देणे ही यांची नीती आहे. शिवसेनेच्या बाबतीतही त्यांनी तेच केले. मला सगळे राजकारण कळते पण अळीमिळी गूपचिळी. यांचे एकेक नेते बघितले की हसायला येते बाळासाहेब. ते परेकर काय, खळखळकर काय, शिरा ताणून बोलणारे फडफडणवीस काय, हे तुमच्या कार्टूनचे विषय आहेत.
आता तुमच्याजवळ मन मोकळं केल्यावर कसं हलकं वाटतं. आता पुन्हा त्या जन आशीर्वाद की काय म्हणतात त्या ट्रकरथाच्या वर जाऊन हात हलवित उभा राहीन. सगळ्या देशाची पार वाट लावणार्या भाजपला आशीर्वाद कसले लोक शिव्याशापच देतात, हे मला माहीत आहे. पण करणार काय! आलिया भोगासी असावे सादर!