□ चर्चेविना संमत होणार्या कायद्यांमध्ये स्पष्टता आणि गुणवत्तेचा अभाव- सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा
■ ‘हम करे सो कायदा’ म्हणतात ते उगाच?
□ जोवर आपण चीनवर अवलंबून राहणे कमी करणार नाही, तोवर आपल्याला चीनसमोर झुकावेच लागेल- सरसंघचालक मोहन भागवत
■ ताबडतोब मोदींना आदेश द्या चीनबरोबरचे सगळे आर्थिक व्यवहार संपुष्टात आणण्याचे… न रहेगा बाँस, न बजेगी बाँसुरी. लोकांना सांगून काय फायदा? फटाके आणि चिनी दीपमाळांवर बहिष्कार म्हणजे अस्वलाच्या नाकातले तीन केस उपटण्यासारखं आहे.
□ मी शेकडो अनावश्यक कायदे रद्द केले- पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ हळुहळू संविधानच अनावश्यक ठरवण्याकडे वाटचाल चालू आहे तुमची. मांजरीने डोळे मिटल्याने काय फरक पडतो?
□ सरकारने १२ सदस्यांच्या नियुक्तीचा आग्रहच नाही धरला- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
■ यांच्यासाठी चांगले मेंदूविकारतज्ज्ञ शोधायला हवेत राज्य सरकारने- या वयात इतके विस्मरण वाढत जाणे वाईट.
□ दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये ‘देशभक्ती’चा अभ्यासक्रम : मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा
■ शाळेत शिकवून देशभक्ती आली असती, तर सगळ्यात हुशार विद्यार्थी संधी मिळताच देश सोडून पळाले नसते.
□ नव्या आयटी कायद्यामुळे प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा- केंद्र सरकारला दणका देऊन उच्च न्यायालयाने नवा कायदा उपनियमांसह स्थगित केला
■ उच्च न्यायालयाला आहे तेवढी प्रसारमाध्यमांना तरी त्यांच्या अधिकारांची चाड आहे की नाही, हा मात्र संशोधनाचा विषय आहे.
□ पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार नाही- अर्थमंत्री निर्मला सीतारामन
■ अजूनही मनमोहन सिंगांच्या सरकारवरच खापर फोडताय की गेलात मागे नेहरूंपर्यंत… हळुहळू अब्दालीपर्यंत पोहोचाल, हे निश्चित.
□ राज्याच्या व्यापारी मार्गांवरही अदानींचा कब्जा; मालवाहतूक सेवाशुल्क संकलनाचे अधिकार
■ ‘सेवक’ उत्तम सेवा करतायत… मालकांची!
□ राज्यातील तुरुंगांमध्ये सगळ्यात जास्त कैदी खुनाचे गुन्हेगार; क्षुल्लक कारणांवरून जीव घेण्याचे प्रमाण वाढले, तरुणांचे प्रमाण चिंताजनक
■ समाजात द्वेषाचीच पेरणी केली की फळं प्रेमाची कशी लागतील?
□ उत्तर प्रदेशात भाजपच्या आमदाराने आयोजिलेल्या मोफत पेट्रोल उपक्रमात फुकट पेट्रोलसाठी भाजप कार्यकर्त्यांमध्येच तुंबळ हाणामारी
■ भाजपचे कार्यकर्ते म्हणून कशाचंही समर्थन करावं लागत असलं तरी तीही सामान्य माणसंच आहेत; पेट्रोलच्या अन्याय्य दरवाढीचे चटके त्यांनाही बसतातच. त्यांना ओरडण्याचीही सोय नाही. समजून घ्या.
□ महिला अत्याचारात दोषी ठरणारे राजस्थानात सगळ्यात जास्त
■ कशाला शौर्याचा वारसा डागाळतात हे लोक असं वागून.
□ तालिबानशी मैत्रीला चीन तयार
■ नंतर तालिबानला मोजायला लागेल या ड्रॅगनमैत्रीची किंमत!
□ तालिबानने गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान
■ एका लष्करी सत्तेच्या हातातल्या बाहुल्याने हे म्हणावे!
□ अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव- ट्रम्प यांचे बायडेन यांच्यावर टीकास्त्र
■ जणू यांचं धोरण काही वेगळंच होतं!
□ देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा एकही नाही; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पहिल्या पाचांत.
■ फुकटच्या तोंडाची बडबड आणि मैदानात उतरून काम यांत काही फरक असणारच ना!
□ पेगॅसस प्रकरण काय आहे ते स्पष्ट करा, सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारकडे विचारणा
■ अहो गुपित आहे ते. असं सगळ्यांना सांगता नाही येत. देशाची सुरक्षाच धोक्यात येईल ना! ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ…
□ गेल्या वर्षीच्या तुलनेत मोदींच्या लोकप्रियतेत घट
■ गेल्या वर्षी लोकप्रिय होते? कशाच्या बळावर? कोरोनाच्या नेत्रदीपक हाताळणीच्या बळावर?
□ देशातील परिस्थितीवर अण्णा हजारे यांनी भूमिका घ्यावी- देश बचाव समितीची मागणी
■ आणि काय उपोषणाला बसायचं का? आता काय काँग्रेसचं सरकार आहे का? कोण जिवावर उदार होईल उगाच?