गुजराती नेत्यांचे आजच्या घडीला सर्वाधिक शुभचिंतक आणि समर्थक हे मराठी तरूण आहेत. गुजरातच मूळ असलेले नरेंद्र मोदी, अमित शहा, पीयूष गोयल हे जणू आमचा भविष्यकाळच बदलणार आहेत याच आविर्भावात मराठी तरूण समाजमाध्यमांवर फुलटाइम ऑनलाइन असतात.
परंतु हेच गुजराती नेते महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी तरुणाच्या पोटापाण्याचा व्यवस्था कायमचा हिरावून घेण्याची योजना सध्या गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये आखत आहेत. महाराष्ट्राच्या बाजूची इतर राज्ये म्हणजे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश देखील विकसित झाली. परंतु त्यामागे महाराष्ट्रघातकी योजना नव्हत्या, जे गुजरातमध्ये सध्या सुरू आहे.
मराठी तरुणांचं वाचनच संपल्याने ते संभ्रम निर्माण करणार्या पेड माध्यमांच्या हेडलाइन्समधून फसवले जात आहेत. त्याचा समाज माध्यमांच्या विकृतीतून इतका ब्रेनवॉश केला जात आहे की कुणीही समजून किंवा ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही, हे त्यांच्याशी संवाद साधल्यावर स्पष्ट होते. दुर्दैवाने त्यात सुशिक्षित मूर्खांचा अधिक भरणा आहे हे धक्कादायक आहे हे मुद्दाम म्हणावं लागेल. देशाची नवी आर्थिक राजधानी उभारणीचं अर्थात फायनान्शियल कॅपिटल सिटीची योजना गुजरातमध्ये आखली गेली आहे. २०१८पासून त्यावर प्रत्यक्ष जोरदार काम सुरू आहे. स्वत: मोदी त्यावर विशेष लक्ष ठेवून आहेत.
सिंगापूर आणि हाँगकाँगच्या धर्तीवर अहमदाबाद-गांधीनगरच्या दरम्यान निर्माण करण्यात येत असलेलं हे नवं शहर ‘गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी’ अर्थात ‘गिफ्ट’ या नावाने उभारण्यात येत आहे. या योजनेचा आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास केल्यास, ही योजना मुंबईचं आर्थिक अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठीच आखली जात आहे याचा प्रत्यय येईल. मुंबईचे आर्थिक महत्व प्रथम संपुष्टात आणून मुंबईतील महत्वाची केंद्रं, सरकारची कार्यालये, मोठमोठे उद्योग समूह आणि निर्यातीसाठी वापरल्या जाणार्या बंदरांचे महत्व कमी करून तिथले दळणवळण गुजरातमधील अदानी बंदराकडे वळवण्याची योजना अमलात आणली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट विकासाच्या नावाखाली बंद करून तेथले सर्व व्यवहार हे गुजरातमधील विविध बंदराकडे वळविण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईची रयाच गेली आहे. दक्षिण मुंबईतील पंचरत्न बिल्डिंगमधील डायमंड मार्केट, भिवंडीचे कपडा मार्केट, यार्न आणि साडी मार्केट गुजराती व्यापार्यांना हाताशी धरून सुरतला घेऊन गेले. बेलापूरचे रासायनिक कारखाने गुजरातमधील भरूचनजीकच्या दहेजमध्ये घेऊन गेले. मुंबईतील अनेक आयटी हब्स अहमदाबादमध्ये वळवले आहेत, तर टाइल्सचा उद्योग वापीला पळवला आहे.
महाराष्ट्र आणि गुजरातच्या भूगोलाचा अभ्यास केल्यास पालघर आणि आसपासचा भूभाग गुजरात सीमेला लागून असल्याने सध्या गुजराती समाज इथले शेकडो एकरचे प्लॉट पैसे फेकून विकत घेत आहे. बुलेट ट्रेन सत्यात उतरल्यास हा पट्टा नावालाच महाराष्ट्राचा भूभाग असेल, पण इथली भाषा आणि संस्कृती केवळ गुजराती असेल यात काहीच शंका नाही. याच पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी आणि आगरी समाज असल्याने त्यांच्या अज्ञानाचा फायदा जमिनी हडप करणारे गुजराती व्यापारी घेतांना दिसत आहेत. आजही या सीमेवरील परिसराचा फेरफटका मारल्यास इथे नावांच्या पाट्यादेखील मोठ्या प्रमाणावर गुजराती भाषेत दिसतात. मोदी पंतप्रधान असल्याने स्वत:च्या कार्यकाळात ते देशाला स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवत वास्तविक गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’वर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. देशातील इतर नियोजित स्मार्ट सिटी केवळ कागदावर असतील आणि इंटरनेट दिलं म्हणजे शहर स्मार्ट झालं हा बिनडोक विचार तरुणांच्या माथी थोपला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांनी हा विषय गांभीर्याने आणि अभ्यासपूर्ण समजून घेऊन राज्याच्या आर्थिक विकासाचा हा मुद्दा उचलून धरला पाहिजे.
– श्रीकांत मयेकर
महाराष्ट्र संरक्षण संघटना