नोकरी व बायको दुसर्याचीच का चांगली वाटते.
दयानंद बी. जाधव, कोल्हापूर
कारण आपण त्यासाठी लायक आहोत का हे जोखायची गरज नसते म्हणून.
तुम्ही दर आठवड्याला वाचकांच्या विविध प्रश्नांची उत्तरे मार्मिकपणे देत आहात, तर तुमच्या मते तुमच्या क्षेत्रातील अजुन इतर कोण मान्यवर व्यक्तिमत्वे आहेत जी अशी उत्तरे मार्मिकपणे देऊ शकतील.
मंगेश शशिकला पांडुरंग निमकर (कळवा)
पंक्तीला माझ्यानंतर त्याच जागेवर कोण जेवायला बसलं हे बघायला मी जात नाही, त्यामुळे मी ते सांगायलाही जात नाही.
तुम्ही ‘कसा पण टाका’ म्हणता म्हणजे सगळे चेंडू काहीही करून खेळून काढता की काही अल्लाद सोडूनही देता?
सुधाकर सोलकर, पुणे
तुम्हाला अख्खी मॅच बघायला लागू नये म्हणून या हायलाईट्स आहेत; यावरून समजून घ्या काय ते.
पैशाने सुख विकत घेता येत नाही, असं काही लोक म्हणतात… हे पैसा नसलेल्यांचं तत्त्वज्ञान आहे, असं इतर काही लोक म्हणतात… तुमचं मत काय?
राजेश वढावकर, कल्याण
माझं म्हणणं आणि अनुभव असा आहे की, हल्लीची सुखं पैशाने विकत घेता येतात. पण आनंद आणि समाधान कुठेही, कधीही विकत मिळू शकत नाही.
मध्यंतरी एका अभिनेत्रीने बायकांना ब्रेसियरचं बंधन झुगारून देण्याचं आवाहन केलं. तुमचं मत काय आहे या विषयावर?
सुगंधा खामकर, अमरावती
भिन्न रुचिर्ही लोका:
रोमिओ-ज्युलिएट, सलीम-अनारकली, हीर-रांझा, लैला-मजनू यांच्या प्रेमावर सिनेमे निघतात, त्यांचं प्रेम महान, आमचं प्रेम मात्र लफडं- असं कसं?
अभिषेक सोनकांबळे, रावेर
या वरील प्रेमीयुगुलांपैकी कुणी ना कुणीतरी प्रेमात असताना मेलेलं आहे. त्यावरून ठरवा.
ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अमेरिका, रशिया, चीन यांच्या बरोबरीची कामगिरी आपण कधी करणार?
रंजना पेठे, बदलापूर
कधीतरी
बाई आणि बाटली यांचा नाद वाईट असं सर्रास म्हटलं जातं… बाईची बरोबरी दारूशी करणं हा बाईचा अपमान नाही का?
स्वाती टेंभे, अक्कलकोट
ही बरोबरी चूकच आहे. पण काही लोकांचा आक्षेप नेमका उलटा आहे.
रंगभूमीवर, कॅमेर्यासमोर अभिनय करता करता चुकून घरातही अभिनय होतो का हो तुमच्याकडून?
विनायक लिमये, सातारा
म्हणजे काय? तो तर अनेकवेळेला करावाच लागतो. पण फरक एवढाच आहे की, त्याचं पेमेंट कुणीही करत नाही.
कोरोनाच्या दोन लाटांच्या थपडा खाल्ल्यानंतर आपले लोक सुधारले असतील आणि तिसरी लाट यायला कारणीभूत ठरेल, असं बेजबाबदार वर्तन ते करणार नाहीत, याची खात्री वाटते का तुम्हाला?
माधुरी नेने, चाळीसगाव
आता कुणालाच कुणाची आणि इतकंच कशाला कोरोनालाही माणसांची खात्री उरलेली नाही.
बाळपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात. तो निव्वळ जबाबदार्या नसल्याने सुखाचा असतो की इतरही काही कारणं असतात त्यामागे?
नाना टेपाळे, औरंगाबाद
तेवढंच निरागस राहता आलं पुढे तर कदाचित नंतरचाही काळ सुखाचा जायला हरकत नाही.
अफगाणिस्तानातली परिस्थिती अशीच राहिली तर यंदा सुका मेव्याचे दर वाढतील की काय, अशी धास्ती वाटते. तुम्हाला काय वाटतं?
श्रीप्रसाद ननवरे, आळंदी
माझं त्यावाचून काहीही अडत नसल्याने मी त्याची चित्रंही पहायला जात नाही. सुका मेवा न घालता उरलेल्या पदार्थात माझं पोट उत्तम भरतं.
ज्यांचे लसीचे दोन डोस झालेले आहेत, त्यांना सगळीकडे मुभा मिळते आहे. खरंतर हे लोक सुरक्षित आहेत, पण इतर लस न घेतलेल्यांसाठी ते सुपरस्प्रेडर ठरू शकतातच. मग उपयोग काय?
विलास बनहट्टी, सोलापूर
त्यामुळे लस घेऊन आपणही त्यांच्यात सामील व्हावे; म्हणजे आपल्यावर तो आळ येणार नाही.