• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

वाईच्या नागरिकांनी घडवला रस्ता आराखड्यात बदल!

- नीरज हातेकर (विशेष लेख)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 26, 2025
in भाष्य
0
वाईच्या नागरिकांनी घडवला रस्ता आराखड्यात बदल!

– नीरज हातेकर

वाई सुरूर रस्त्याच्या आराखड्यात बदल. आता एकाही झाडाला हात न लावता रस्ता रुंदी होणार. वाई तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी अत्यंत संयतपणे, शांततापूर्व पद्धतीने चालविलेल्या चळवळीचे हे फलित.
हा अंदाजे १२ कि.मी.चा रस्ता. पूर्वी दुतर्फा जुनी वडाची, आंब्याची, करंजेची झाडे. शेंडे एकमेकांना जवळजवळ चिकटलेले. त्यामुळे रस्त्यावर गर्द, थंड सावली. कालौघात झाडे कमी झाली. तरी सुद्धा ५०च्या आसापास मोठे वड. ५०० माणसे सहज उभी राहू शकतील इतकी सावली. धनेश, तांबट, इतरही अनेक पक्षी, सरपटणारे प्राणी, खारी, ह्या सगळ्यांचे गोकुळ. सुरूर ते पोलादपूर रस्ता रुंदीकरणाची टूम निघाली. सुरुर वाई काम सुरू झाले. कारण दिले गेले, वाहनांची वाढती वर्दळ. सुरुवातीला या रस्त्यावरची ५०० च्या आसपास सगळीच झाडे जाणार होती. पण नंतरच्या सर्वेक्षणात ५४ मोठी झाडे तिथून हलवून पुनर्रोपित करायचे ठरले. पण जागा वगैरे ठरली नाही. तिथून दूर, कित्येक कि.मी. दूर झाडे हलवायची असे ठरले.
झाडांसाठी माणसे, लहान मुले, तरुण, स्त्रिया, वयस्क, सगळे रस्त्यावर उतरले. फलक रंगवले, रील्स केल्या, माहिती गोळा केली, अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या, शक्य तसा वेळ दिला. पदयात्रा निघाल्या. तरुण मुले मुली सुरूर ते वाई भर उन्हात धावली. सायकल रॅली निघाली. गावागावातून मीटिंगा झाल्या. लोकांचे संघटन उभे राहिले. संपूर्ण अराजकीय. लोक वर्गणीतून. कोणतेही खास नेतृत्व नसलेले हजारो लोक. हरित लवादाकडेही लोक गेले. स्थानिक वकिलांनी विना मोबदला काम केले.
प्रश्न फक्त झाडांचा नव्हता. प्रश्न रस्ता वापरणार्‍या सामान्य नागरिकांच्या गरजांचा होता. वाई सुरूर रस्त्याचे रुंदीकरण महाबळेश्वरला जाणार्‍या खाजगी गाड्यांची सोय केंद्रस्थानी ठेवून करण्यात येत होते. वास्तविक पुणे बंगळूर मार्गाने महाबळेश्वरला जाण्यास चार पर्यायी रस्ते आहेत. सुरूरवरून, जोशी विहिरमार्गे, पाचवडवरून, जे वाईतून जातात हे तीन मार्ग, शिवाय मेढामार्गे केळघर घाटातून थेट महाबळेश्वरला जाणार मार्ग. मेढामार्गे जाणार्‍या रस्त्याचे रुंदीकरण काही वर्षांपूर्वी झाले आहे. या रस्त्याचा म्हणावा तेवढा वापर होत नाहीये. जोशी विहीरमार्गे वाईतून महाबळेश्वरला जाणारा रस्ता हा राज्य महामार्ग आहे, ज्याचे रुंदीकरणसुद्धा काही वर्षांपूर्वी झाले आहे.
महाबळेश्वरकडे जायला चार पर्यायी मार्ग आहेत. पण वाई-सुरूर, जोशी विहिर-वाई आणि पाचवड-वाई या रस्त्यांचा वापर फक्त महाबळेश्वरला जाणारे चारचाकीवाले करतात असे नाही. या रस्त्याचा वापर करणारे बहुसंख्य लोक स्थानिक असतात. कामासाठी किंवा इतर कारणासाठी एका गावातून दुसर्‍या गावात दुचाकीवरून, पायी जाणारे लोक आहेत. एसटीतून प्रवास करणारे लोक आहेत. आता एसटीची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे खाजगी प्रवासी वाहनांतून जाणारे लोक आहेत. रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे, घोंगडी विकणारे, उसाचा रस विकणारे, हे सगळे या रस्त्याचे वापरकर्ते आहेत. शिवाय शेळ्या मेंढ्या घेऊन चालणारे पशुपालक आहेत.
दुर्दैवाची गोष्ट अशी की आपले रस्ता नियोजनाचे मॉडेल नको तितके पाश्चात्य मॉडेलवर आधारित आहे. तिथे रस्त्याचा वापर फक्त खाजगी गाडीवाले करतात. सार्वजनिक वाहतूक मर्यादित. पादचारी, उभे आडवे जाणारे दुचाकीस्वार, रस्त्याच्या बाजूला अगदी छोटे धंदे लावणारे व्यावसायिक हे तिथे नसतात. पादचारी, पशुपालक हे तिथल्या रस्त्याचे वापरकर्ते नसतात.
आपल्याकडे तसे नाही. रस्ता शेअर करणारे अनेक स्टेकहोल्डर आपल्याकडे असतात. पण पाश्चिमात्य मॉडेलचा विचार करून रस्त्याचे नियोजन केले तर मग या सगळ्या इतर वापरकर्त्यांकडे दुर्लक्ष होते. अशी मॉडेल सहसा फसतात.
मध्यंतरी शहरामध्ये सायकल ट्रॅक काढायची टूम सुरू झाली होती. ही पण अशीच इंपोर्टेड कल्पना. रस्त्यावरील सायकलस्वारांची सुरक्षा महत्वाची. परदेशात ह्यासाठी रस्त्याच्या कडेला राखीव लेन असते. बाकी रस्ता गाड्यांसाठी असतो. वाहतूक एकसाची असते. गाड्या आणि मग राखीव लेनमध्ये सायकली. आपल्याकडे पादचारी, दुचाकीस्वार, धंदेवाले, सगळेच रस्त्याचा, विशेषत: रस्त्याच्या कडेचा उपयोग करतात. शहरात झोपायला, रात्री रिक्षा पार्किंगसाठी वगैरे करतात. भाजी, कपडे वगैरे व्यवसाय करायला करतात. हे वेगळे संदर्भ लक्षात न घेता सायकलिंग ट्रॅक बनली की ती वाया जाते. पैसे बुडतात. आपल्याकडे रस्त्यावरची वाहतूक मोजताना रस्त्यावर सेन्सर लावतात. चाक पास झाले की गाडी मोजली जाते. मग त्या गाडीत एक माणूस असो की पन्नास प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी असो. नगास नग. पादचारी कोणी मोजतच नाही. पशुपालक, शेळ्या मेंढ्या सोडून द्या. त्यामुळे आपल्याकडे रस्ता नक्की वापरतो कोण याची आकडेवारीच नाही. मग नियोजन कसले करणार?
सुरूर-वाई रस्त्याची नेमकी ही परिस्थिती आहे. रस्ता सुधारू नये असे कोणीच म्हणत नाहीये. पण जी सुधारणा होईल ती सगळ्यांच्या सोयीची अशी व्हावी. हे तापमानवाढीचे युग आहे. गेल्या वर्षीचा उन्हाळा कडक होता, या वर्षीचा त्यापेक्षा अधिक आहे. रस्त्यावरील तापमान वेधशाळेने जाहीर केलेल्या तापमानापेक्षा ५ ते १० अंश जास्त असते. कारण रस्ता तापतो. वाहने उष्णता सोडतात. १५ एप्रिलला आम्ही तापमापक घेऊन रस्त्यावरचे तापमान मोजले. सकाळी ११.३० व्ााजता रस्त्यावर तापमान ४८ अंश भरले! ऊन वाढले की ५० अंशसुद्धा जाऊ शकते. त्यामुळे सामान्य वापरकर्ता, जसे दुचाकीस्वार, पादचारी, सार्वजनिक वाहनातून प्रवास करणारे लोक यांना रस्त्याच्या रुंदीइतकीच रस्त्यावर सावली महत्वाची आहे. उष्णता हा आता खूप मोठा प्रश्न आहे. शहरे, रस्ते हे उष्णतेची बेटे होत आहेत. उष्णतेने लोक मरतात, आजारी पडतात. पण यावर आकडेवारी नाही. मृत्यूची नोंद करताना हृदयविकाराचा झटका, श्वास घ्यायला अडचण वगैरे कारणे नोंदली जातात. पण मूळ कारण उष्मा हेच असते.
उष्णतेची लाट असताना झालेले मृत्यू आणि लाट नसताना त्याच महिन्यात साधारणपणे होणारे मृत्यू यातील फरक हा उष्णतेने झालेले मृत्यू असे मानले तर भारतात उष्णतेने वर्षाला १ लाख ५० हजार लोक मरण पावतात असे दिसते. आजारी पडणारे पण त्यातून वाचणारे तर अगणित. यातील बहुतेक सगळे गरीब. उन्हात काम केल्याशिवाय पोट भरू न शकणारे. किंवा पत्र्याच्या कोंदट झोपडपट्टीतील राहणारे. यांच्या मृत्यूचे रेकॉर्ड नसते. फार आकडेवारी गोळा होत नाही. पण आकडेवारीत नाही म्हणून खरे नाही असे नाही.
म्हणून सुरूर-वाई रस्ता रुंदीकरणविरुद्ध स्थानिक आंदोलन हे फक्त झाडे वाचविण्यासाठी नव्हते. म्हणून झाडे काढून दुसरीकडे लावणे मान्य नव्हते. हे आंदोलन रस्त्याचे नियोजन लोकाभिमुख असावे यासाठी होते. या मागणीसाठी लोक एकत्र आले आणि त्यांच्या लढ्याला यश आले हे आश्वासक आहे.

Previous Post

माय मरो, माँसाहिबा जगो!

Next Post

करंडकाच्या नामांतराचा तिढा!

Next Post

करंडकाच्या नामांतराचा तिढा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.