नरेंद्र मोदी
सगळे देश फिरून झाले
नाही कुठला बाकी राहिला
पृथ्वीचा गोल घेऊन बसतो
बघतो कुठला शिल्लक राहिला
१४ पासून सुरुवात केली
सगळे जग पालथे घातले
माझे भाग्य थोर म्हणून
ट्रम्पसारखे मित्र भेटले
येत्या निवडणुकीपर्यंत
उरले सुरले पाहून घेईन
सगळी हौस फिटल्यावरती
मणिपूरला भेट देईन
————
देवेंद्र फडणवीस
आम्ही सत्तेत आल्यापासून
मुंग्यांसारखी माणसे मरतात
रोज अपघात नि आपत्ती
पाप आमच्या माथी मारतात
लोक म्हणतात अभद्र युती
नियतीला ती मान्यच नाही
ओढून ताणून निसर्गचक्र
उलट फिरवता संकट येई
पाच-पाच लाख वाटून दमलो
अजून संख्या घटत नाही
निसर्ग बघतो रागाने तरी
त्याला पाझर फुटत नाही
————
अजित पवार
पेट्रोल चोरून पंपावरती
अंबानी कोट्याधीश झाला
शिवाम्बू ओतून विहिरीमध्ये
माझा खिसा कोरडाच राहिला
धीरूपासून धडा घेतला
अब्जाधीश कसे व्हावे
सहकाराचा मंत्र जाणून
आपण हात कसे धुवावे
भाजपाने कृपा केली
घोटाळेही माफ केले
तिजोरीची चावी देऊन
सत्तेमध्ये ‘बाप’ केले
————
मराठी माणूस
बडे घर पोकळ वासा
महाराष्ट्राचा नाही ठसा
मुंबई सोडली वार्यावरती
भूमिपुत्रांनो गप्प बसा
एसी मेट्रो अंडरग्राऊंड
सुसाट सुटेल बुलेट ट्रेन
लटकून मरा फूटबोर्डावर
विखरून पडेल अख्खा ब्रेन
रोज प्रवास जीवघेणा
रेल्वेला तर नाही भान
सहन करा मुकाट्याने
मागा नेहमी जीवनदान
————
महायुती
मुंबई पालिका आमची दासी
ओरबाडण्याचा हक्क आम्हाला
करून टाकू पूर्ण नागवी
का? का? वाटते चिंता तुम्हाला
सारी तिजोरी केली रिकामी
होते-नव्हते घेतले खरडून
मुंबईचा आवळला गळा
बघता बघता फास लावून
आता डोळा निवडणुकीवर
मिळतील ना सोन्याची अंडी
लाथ मारतील का मुंबईकर
पाहून आमची काळाकांडी