□ दहा वर्षांत घरातील जेवण तिप्पट महागले.
■ भले तर उपाशी राहू पण मोदींनाच मत देऊ, असा जनतेने पण केलेला असेल, तर दुसरे काय होणार?
□ गंगा नदीत सापडल्या दारूच्या बाटल्या
■ दारूच्या बाटल्या फारच बर्या, तिथे प्रेतंही वाहतात अर्धवट जळलेली आणि इतर काय काय वाहात असतं… पवित्र पवित्र म्हणून गटार करून टाकलंय तिचं.
□ ओठांचे चुंबन म्हणजे अनैसर्गिक लैंगिक गुन्हा ठरत नाही- मुंबई उच्च न्यायालयाचा `पोक्सो’च्या आरोपीला जामीन
■ न्यायालय काही म्हणो- पण, कोणा परक्याने किंवा जवळच्या नातेवाईकानेही आपल्या लहान मुलामुलीच्या ओठांचे चुंबन घेतले, तर ते शिसारीच आणणारे वाटते ना!
□ गहू निर्यातबंदीमुळे हिंदुस्थानवर सात देश भडकले
■ त्याला मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदल्या आठवड्यात ‘भारत जगाचा अन्नदाता आहे,’ ही निरर्थक बढाई कारणीभूत ठरली.
□ भारत-अमेरिका वादात चीन भारताच्या बाजूने; जयशंकर यांच्या तोंडाला अमेरिकेकडून कुलूप, कम्युनिस्ट पार्टीचा अजेंटा राबवत असल्याचा आरोप.
■ चीन तरतर्हेचे सापळे रचत जातो आहे, त्यांच्यात न अडकणं हे फार कौशल्याचं काम आहे.
□ फिल्म्स डिव्हिजन आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इस्टिट्यूट (एफटीआय) अशा संस्थांना केंद्रीकृत करून दबावात ठेवले जात आहे. `गोली मारो सालों को’ असे म्हणणारे आपले माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत : चित्रपट दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांचा उद्वेग
■ गोबेल्सनीती म्हणतात ती हीच.
□ एसी लोकलमध्ये फुकट्यांची गर्दी, चार महिन्यात ४८०० जणांवर कारवाई
■ थंडगार होण्याची हौस गरम पडली म्हणायची त्यांना.
□ देशातील ४० कोटी महिला, १० कोटी मुलांना अॅनिमिया होण्याची धोका. हवामान बदलाचा आरोग्यावर वाईट परिणाम – डॉ. श्रीनाथ रेड्डी
■ आधीच जीवनमान महागले आहे, महिला, मुले कुपोषित आणि अॅनिमिक आहेतच, त्यात ही भर.
□ दोन वर्षांत राजभवनाच्या खर्चात १८ कोटींची वाढ
■ लोकाभिमुख की काय म्हणतात, तसे राज्यपाल आहेत, हा खर्च किरकोळच म्हणायचा!
□ काश्मीरमध्ये दहशतवाद कायम ठेवण्यासाठीच हिंदू पंडितांच्या हत्या : भारतीय लष्कराच्या कमांडरची माहिती.
■ म्हणून मोदी सरकार फक्त सिनेमांची कौतुकं करतं, पंडितांना काश्मिरात नेऊन वसवत नाही आणि वर आपण म्हणतो की या सरकारने पंडितांचा राजकीय वापर करून वार्यावर सोडून दिलं… बहुत नाइन्साफी हय.
□ सुशिक्षित तरुणांशिवाय राजकारणात परिवर्तन नाही- केंद्रीय उद्योगमंत्री पीयूष गोयल
■ तुमचे सगळे सर्वोच्च नेते पाहिले आणि त्यांनी देशाचे, आपापल्या राज्याचे जे काही करून ठेवले आहे ते पाहिले की हे विधान प्रकर्षाने पटून जाते गोयलजी.
□ लोकायुक्त कायदा करा, अन्यथा सत्ता सोडा- अण्णा हजारे यांचा मविआ सरकारला इशारा
■ असा इशारा मोदी सरकारला देऊन पाहा आणि जंतर मंतरवर उपोषणाला बसा, अण्णा. सगळा देश तुमच्यामागे एकवटेल.
□ राज्यातील गुटखा तस्करीला कर्नाटकातून रसद. वर्षाला दोन हजार कोटींची उलाढाल.
■ म्हणजे इथले थुंके रस्तोरस्ती जो रोज पचापचा थुंकून काढतात, तो कर्नाटकी कशिदा आहे तर!
□ बड्यांना सोडता, शेतकर्यांना पिडता! मध्य प्रदेशातील शेतकर्याच्या कर्जप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून बँक ऑफ महाराष्ट्रची खरडपट्टी
■ सगळ्याच बँकांची ही गत आहे हो, या एकाच बँकेची खरडपट्टी कशाला?
□ अमेरिकेने बनवले पाकिस्तानला गुलाम : इम्रान खान याचा आरोप.
■ तुम्ही भारतद्वेषापोटी स्वेच्छेने पट्टा गळ्यात घालून घेतलात, आता मालकावर काय भुंकता?
□ नेपाळशी मैत्री हिमालयासारखी अभेद्य -पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ हिमालय हा जगातला सगळ्यात तरूण पर्वत असल्याने सर्वात ठिसूळ आहे, हे त्यांना माहिती असण्याची शक्यताच नाही.
□ मराठी मालिकांना व्याकरणाचा विसर- जयंत सावरकर
■ मराठी माणसांना मराठीचा विसर पडत चाललाय, मालिकांचे काय घेऊन बसलात!
□ मातृदिनासारखा पत्नीदिनही असावा – रामदास आठवले
■ घरोघरी वर्षाचे ३६५ दिवस तोच असतो की!
□ मुख्यमंत्री माझ्या कामांची बरोबरी करू शकत नाहीत! राणे
■ कशी करू शकतील? त्यांना किती झुकावे लागेल…
□ बॉलिवुड स्टार किड्स उकडलेल्या अंड्यासारखे : अभिनेत्री कंगनाचे वादग्रस्त वक्तव्य
■ उकडलेल्या अंड्यांचा काहीतरी उपयोग होतो बाई, तू चांगली अभिनेत्री असूनही सडक्या मेंदूची आहेस, त्याचा तुलाही काही उपयोग नाही, त्याची चिंता कर.