सायबरविश्वात वावरताना बर्याचदा सायबर ठग आपल्या कार्डची माहिती नकळतपणे चोरतात. पण आपल्याला त्याची कानोकानी खबर लागत नाही. काही दिवसांनी आर्थिक फसवणुकीचा प्रकार घडला की अरेच्या हे कसे झाले, याचा विचार आपण करत बसतो. पण आपण केलेल्या चुकीमुळेच हा प्रकार घडलेला असतो. कार्ड वापरामुळे व्यवहार करणे सोपे झाले असले तरी आपली कार्डवरील माहिती कशी सुरक्षित राहील, याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
बँकेमधून येणार्या फोनवर आपला फार विश्वास असतो. आपल्याला आलेल्या फोनवर समोरून बोलणारी व्यक्ती, आपण बँकेतून बोलत आहोत असे सांगून आपले नाव सांगते तेव्हा तेवढ्या माहितीच्या आधारे देखील आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांना माहिती सांगून आपली फसगत करून घेतो. क्रेडिट कार्ड भामटे तर फारच पोहोचलेले असतात. ते ही माहिती चोरतातच, पण शिवाय फसवणुकीचे मोठे व्यवहार करण्यापूर्वी काही बहाणे करून आपल्याकडून क्रेडिट कार्डची मिळालेली माहिती खरी आहे याचीही पडताळणी आपल्याकडूनच करून घेतात. आपण या तथाकथित केवायसीच्या बनावाला सहजपणे बळी पडतो. नेमका हा कार्डिंगचा प्रâॉड होतो तरी कसा, हे प्रसन्नच्या गोष्टीतून समजून घेऊ या.
काही दिवसांपूर्वी प्रसन्नने बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले होते. आपल्याकडे पैसे नसले तरी त्याच्या आधारे खर्च करता येईल आणि दर महिन्याला त्याचा हप्ता भरता येईल, हाच त्यामागचा त्याचा उद्देश होता. नागपूरमधल्या एका कंपनीत तो मार्वेâटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होता. सोमवारची दुपार होती. प्रसन्न ऑफिसात काम करत बसला होता, त्याच्या मोबाईलवर फोन आला. समोरून एक महिला मराठीत बोलत होती, सर, मी तुमच्या बँकेतून बोलत आहे, तुमचे क्रेडिट कार्ड आहे, त्याचे केवायसी करायचे आहे, आज जर ते केले नाही तर ते कार्ड बंद होईल. त्याचा आर्थिक भुर्दंड तुम्हाला पडेल. ते टाळायचे असेल तर मला हवी असणारी माहिती तुम्ही मला सांगा, लगेच. तुम्ही माहिती दिलीत की मी लगेच ती अपडेट करते, त्यामुळे तुमचा त्रास कमी होईल आणि दुसरे म्हणजे तुमचे कार्ड ब्लॉक होणार नाही. काय मग सांगा तुमची माहिती मला, अशा मिठ्ठास शब्दात ती महिला प्रसन्नबरोबर बोलत होती. प्रसन्ननेही आपल्याला पुढे काही त्रास व्हायला नको, म्हणून कोणतीही शहानिशा न करता क्रेडिट कार्डचा क्रमांक, त्याच्या एक्सपायरीची तारीख, नाव, पाठीमागे असणारा सीव्हीव्ही क्रमांक त्या महिलेला फोनवरच सांगून टाकला. गोड बोलणार्या त्या महिलेने ही माहिती घेतल्यानंतर एका क्षणात फोन बंद करून टाकला.
प्रसन्न ऑफिसमध्ये काम करत बसला असताना अचानक त्याचा मोबाइल वाजला, कुणाचा मेसेज आहे, म्हणून त्याने मोबाइल हातात घेतला, पाहतो तर काय, आपल्या क्रेडिट कार्डवरून मोबाईल फोनची खरेदी, बंगळुरूमधल्या एका मॉलमधून किंमती सेंट, कपडे अशी ४० हजार रुपयांची खरेदी करण्यात आली असल्याचा मेसेज त्याला आला होता. विशेष म्हणजे हा मोबाईल ५५ हजार रुपये किमतीचा होता आणि त्याची खरेदी उत्तर प्रदेशमधल्या नोयडामधल्या एका दुकानातून करण्यात आली होती. आपले कार्ड आपल्याकडेच आहे, त्यावर ९५ हजार रुपयांची खरेदी कशी झाली, या सगळ्या प्रकाराने तो चक्रावून गेला होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्याचे हृदयाचे ठोके वाढले होते, त्याला दरदरून घाम फुटला होता.
तशा स्थितीत या सगळ्या प्रकाराचा छडा लावण्यासाठी प्रसन्न बँकेत जाऊन पोहचला. तिथे त्याने घडलेल्या प्रकारची माहिती दिली, तेव्हा बँकेच्या अधिकार्याने त्याला सांगितले, ही खरेदी तुमच्याच कार्डवरून झालेली आहे, तुम्ही एकदा तपासणी करा.
त्यावर प्रसन्न संतापला, बँक अधिकार्यांबरोबर त्याचा वाद झाला. प्रसन्न म्हणाला, दोन दिवसांपूर्वी तुमच्या बँकेतून केवायसी अपडेट करण्यासाठी फोन आला होता, तेव्हा त्यांनी माझ्याकडून सगळी माहिती घेतली होती. त्यानंतर मी ते कार्ड आजतागायत वापरलेले नाही, तुम्ही काय सांगता? तुमच्या कार्डवरून खरेदी झाली आहे?
त्यावर बँकेच्या अधिकार्याने त्याला सांगितले, सर, बँक फोनवर केवायसी करत नाही, तुमची काहीतरी फसगत झाली आहे. हे ऐकल्यावर प्रसन्नाने त्याला आलेल्या नंबरवर फोन केला, पण तो बंद होता. तेव्हा, त्याची खात्री पटली आणि त्याने ते कार्ड लगेच बंद करून टाकले.
हा सगळा प्रकार प्रसन्नच्या अज्ञानामुळे झाला होता. त्याने आलेला फोन बँकेतून आला आहे, असे समजून आपली सगळी माहिती त्या महिलेला दिली होती. त्याचा वापर करून प्रसन्नला फसवण्याचा प्रकार सुरू झाला होता. याबाबत त्याने पोलिसात तक्रार केली. त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. प्रसन्नप्रमाणेच काहीजणांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आधीच आल्या होत्या, त्याच्या आधारे पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत त्या गुन्हेगारांना सुरतमधून जेरबंद केले.
आपल्याला बँकेची माहिती विचारणारा फोन आला तर त्यावर कोणत्याही प्रकारची माहिती देणे टाळावे. कारण असे फोन हे फसवणूक करणारे असतात. बँकेच्या बाबत कोणतेही काम असेल तर ते बँकेच्या शाखेत जाऊन करावे, कोणालाही आपल्या बँक खात्याची माहिती देऊ नये, तसे केले तर आपण अशा प्रकारच्या फसवणुकीपासून स्वत:चा बचाव करू शकतो.
अशी काळजी घ्या
– बँकेच्या केवायसीची कामे ही कधीही फोनवर होत नाहीत, हे कायम लक्षात ठेवा.
– फोनवर कोणतीही माहिती देण्याचे टाळा. आपले डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याची कोणतीही माहिती देऊ नका.
– समोरून बोलत असणार्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, त्यामुळे फसवणुकीच्या प्रकारापासून तुम्हाला दूर राहणे शक्य होऊ शकते.
– ज्या ठिकाणी आपल्याला शंका असते, अशा ठिकाणी कार्डचा वापर करणे टाळा.