बिकचुके सोसायटीमधील जॉगिंग ट्रॅकवर धावता धावता बुवा दमून अशोकाच्या झाडाखालच्या सिमेंटच्या बेंचवर टेकतात. खांद्यावरचा टॉवेल चेहर्यावरून फिरवत आलेला, न आलेला घाम टिपून घेतात. तोच टॉवेल पंख्यासारखा हलवून चेहर्यावर वारा घालतात. खिशातून कुठल्याशा गांजेकस महाराजाचं चरित्र काढून त्याचं वाचन करू लागतात. ‘…येणेप्रमाणे धन्य जाहले, सकळजन।। बोला श्री श्री खुरटे महाराज की जय!!’ बुवा एकटाच मोठ्याने बडबडतो. ती छोटी पुस्तिका कपाळाला लावून पुन: खिशात ठेवतो. नेहमी आलिशान कारच्या खिडकीतून दिसणारा कुंथा समोरून चालत चालत येतो.
‘जय श्रीराम!’ बुवा जरा त्वेषाने आवाज देतो.
‘अँ? जय जिनेंद्र!’ औपचारिकतेचं हसत कुंथा उत्तर देतो. नि बेंचवर बसतो. पण पुढे बोलण्याआधीच कुठल्याश्या गुजराती गाण्याच्या रिंगटोनने त्याचं लक्ष मोबाईलकडे जातं. तो कॉल उचलून मोबाईल कानाला लावतो. ‘जय जिनेंद्र बापू! …नथी नथी, हुं थयो? …आपो. …घाटी लोग ना? बहुत गंदा… सरकार मां आपडे लोग आवे छे. …कोई वांधा नथी. …हां हां!’ तो कॉल कट करतो.
‘जय जिनेंद्र!’ बुवा पुन्हा कुंथाचं लक्ष वेधतात.
‘जय जिनेंद्र बुवा! ए मोटाभाई बार बार फोन करी रह्या छे. उस वजा से ध्यान अड गया मेरा। बोलो ना! बुवा जी!’ जिभेवरली साखर कुंथाच्या मधाळ बोलण्यातून टपकते.
‘तो बाहेरला पाणीपुरीवाला लुल्ला तुम्ही महापालिकेला पत्र देऊन हाकलला, ते एक बरे झाले हो. नाहीतर यांची आधी पाणीपुरीची गाडी येणार मागाहून तिथेच त्याच्या भाईबंदापैकी कुणी अंडाभुर्जीची गाडी लावणार. त्या वासाचा आपल्याला त्रास हो,’ वाक्यात कितीही तिरस्कार असला तरी त्या वासाच्या केवळ कल्पनेने बुवाच्या जिभेला हलकेच पाणी सुटते.
‘मुझे तो उस बांस से ही घिन आती है। उसी वजा से हमने सोसायटी में एक भी नॉन वेज खानेवाला फॅमिली लिया नहीं। मेरा कुछ ऑफिस का कलीग था। उसे तुमने जो फ्लैट लिया है ना वो खरीदना था। लेकिन मुझे पता चला कि ये भी जमकर नॉन वेज खाता है। तो मैंने तुरंत ये फ्लैट तुम्हें देने के लिए बोला।’ कुंथा मखलाशी करतो.
‘बरोबर! बरोबर!! लोकं निष्पाप प्राणी मारून तोच कसा खात असतील, देव जाणे! मला तर बुवा केवळ रक्त बघितल्याने भोवळ येते हो!’ बुवा कळवळून बोलतात.
‘वही तो! वो लुल्ला भी उस दिन चिकन के बारे में बात कर रहा था। बेन ने ओ सुन लिया। और मुनि आये थे उसी दिन बताया। मुनी का तो मौन था। लेकिन उन्हें जो दु:ख लगा, वो पीडा क्या बताऊँ? मैंने तभी ओ
कॉर्नर पर बूथ में बैठे तुम्हारेवाले दो लडको को उसे हटाने बोला। ओ आये और लुल्ला को कूट गये। ऐसा सर से खून बह रहा था उसके। मैंने तब तक डीएमसी को लेटर दे रखा था। ओ आये और ठेला उठाके ले गए।’ कुंथा घटनाक्रम रंगवून सांगतो.
‘मला सांगायचे ना? आमची मध्यान्ह शाखेत जाणारी आणखी दहाबारा मुले पाठवून त्यास बेदम चोप देवविला असता की! माझे तर हात नुसते कल्पनेने शिवशिवतात. निष्पाप प्राण्यांस मारतो म्हणजे काय? तरी बरे कुंदेने गाईस माता म्हणून पुजले ते! नाहीतर यांनी… शिवशिव! विचार देखील करवत नाही हो! माझ्या वतीने तलवारीने हात छाटायचे होते की? पुन्हा असले अधम कृत्य करावयास कुणी धजायला नको. काय?’ बुवा त्वेषाने बोलतात.
‘हमारे मुनी और धर्म अहिंसा ही सिखाते है। और हिंसा मैं भी कभी करता नहीं। इसलिए मैंने तुम्हारे लड़के बुलाये। हम शांति से रहनेवाले लोग है। तो क्या हम किसीके हात काट सकते है क्या?’ कुंथा सात्त्विकपणे धार्मिक कारण देतो.
‘नाहीच मुळी! तुमच्यासारखा सत्शील, पापभिरू माणूस असे काही करूच शकत नाही,’ बुवा कुंथाला अनुमोदन देतो.
‘देखो, तुम्हें भी ये बात बराबर लागी। और बुवा जी आज ये जॉगिंग कैसे क्या…?’ कुंथा बुवाचे स्पोर्ट शूज आणि कपडे बघत विषय बदलतो.
‘त्याचे होय? कुदळगावच्या खुरटे महाराजांच्या मठात गेलो होतो ना मागे? तिथे आयुर्वेदावर तीन दिवसीय शिबीर होते. तिथे काही जाणकार वैद्यांनी सांगितलेले की रोज प्रात:समयी गोमूत्र प्राशन करावे नि थोडा धावण्याचा व्यायाम करावा. त्याने हृदय तंदुरुस्त राहते नि रक्तातील शर्करा देखील नियंत्रणात रहाते. सध्या तीच दिनचर्या अवलंबतो आहे मी. फरक जाणवतो हो! आयुर्वेदाच्या उपचाराने! फक्त तो दूधवाला भैय्या जे गोमूत्र आणतो ते मठातील गोमूत्राहून अधिक चवदार लागते. ते कसे…?’ बुवा आयुर्वेदावर पाल्हाळ लावतो. पण त्याकडे कुंथाचं अजिबातही लक्ष नाही.
‘बुवा आप वो कुदलगांव जाते हो…!’ कुंथाला काही वेगळंच बोलायचं आहे.
‘जातो की! महिन्यातून दोन वेळा! कधी कधी मुक्काम ही करतो आम्ही तिथे! नशिबात असतं तर वास्तव्यालाच गेलो असतो हो!’ बुवा हात जोडत बोलतो.
‘तो जाइए ना? वही रह लेने का।’ कुंथा आग्रही आवाजात बोलतो.
‘राहण्यास काय? मी स्वित्झर्लंडला देखीन राहीन. पण देवाजीचं सांगणं यायला नको? मठातले महाराज म्हणतात. आणखी काही काळ साधना केल्यावर खुरटे महाराज साक्षात्कार करवतील. त्याचसमयी… ‘ बुवा सोसायटी न सोडण्याचं पहिलं कारण सांगतो.
‘ओ कल कौन मेहमान आया था?’ कुंथा पुन्हा विषय बदलतो.
‘पुतण्या होता हो! गावी असतो. तिथे आमची आंब्याची बाग आहे. नारळी-पोफळीच्या बागा आहेत. पण त्याला शेतीत रस नाही. तो बँकेत मॅनेजर म्हणून जॉईन झाला गेल्या महिन्यात. आता जमीन विकायची म्हणतो. उतार्यावर माझेही नाव आहे. माझा होकार घ्यायचा होता. पण वाडवडिलांची जमीन ती! अशी मी विकू देतो होय?’ बुवा आवेगात बोलतो.
‘तो आप गांव जायेंगें?’ कुंथा अतीव उत्सुकतेने विचारतो.
‘हां! मी जातो होय? त्या बागा राखायच्या सोपे काम आहे का? त्यात मला ब्लडप्रेशर, शुगरचा त्रास! त्यात सांध्याचे एकदा ऑपरेशन झालेले. माझ्याने शेती होईल होय?’ बुवा नकारघंटा वाजवतात. त्याने कुंथाचा चेहरा पडतो. काहीवेळ अशीच शांततेत जातात. ‘आपल्या इथे फारशी थंडी जाणवत नाही ना? नाशकात म्हणे गुलाबी थंडी असते,’ जॉगिंग
ट्रॅकवर स्वेटर घालून पळणार्या एक इसमाकडे बघून बुवाला थंडी आठवते.
‘ठन्ड?’ कुंथा काहीच न उमजून विचारतो.
‘हो! आमच्या हिचा आतेभाऊ असतो नाशिकला. फार थंडी आहे म्हणून सांगत होता. एकदा अशा रम्य ठिकाणी जाऊन रहावं वाटतं. सुंदर गुलाबी थंडी, हिरवा नदी काठ…’ बुवा कल्पनेत रमतो.
‘उसमें क्या? तुम सिर्फ बोलो! मैं अभी तुम्हारा फ्लैट… ‘ तैवरलेला कुंथा काही बोलू जातो.
‘सहज हो! इतकी थंडी मला झेपणार आहे का? त्यात सांधेदुखी! मी आपलं सहज बोलून गेलो,’ कुंथाला मध्येच अडवत बुवा बोलतो. त्याच्या बोलण्याने कुंथाचा हिरमोड होतो. तो नाईलाजाने उठू लागतो. ‘कुंथाजी बसा! असे मध्येच…’ बुवा त्याला अडवू बघतो.
‘मैं आया था कुछ काम लेके…’ कुंथा काही बोलू जातो.
‘काम घेऊन आलाच होतात तर मोकळे बोलायचे की! मी कसा आडपडदा ठेवत नाही?’ बुवा थेट विचारतो.
‘ओ सोसायटी में सब हमारे लोग हैं। तुम्हें छोड़कर। और मुझे मेरे भतीजे के लिए एक फ्लैट खरीदना था। अगर तुम बेच देते तो तुम्हें अच्छा दाम भी मिल जाता। और हमारी सोसायटी में सब लोग हमारे ही होते।’ कुंथा चाचरत मनातलं सारं ओकतो.
‘ठाऊक आहे हो मला हे सारं! मी काय म्हणतो? तुम्हीच हे सारे फ्लॅट विकता का? एकरकमी मी आणि आमचे मराठी लोक घेतो! फार दिवस झालेत हो! अशी मोकळ्यात मच्छी शिजवली नाही ती! तो आमचा झावळे आला ना इथे तर दर सोमवती अमावास्येला झणझणीत मटण मिळेल. इथे जॉगिंग ट्रॅकवर शिजवेल तो! शिवाय जागरण गोंधळ वगैरे गोष्टीही असतात हो! गातो छान! गवळणी? काय गातो? शिवाय कानाला माझी माय मराठी पडेल. कान मराठी ऐकायला अतृप्त झालेत हो! तुम्हाला घ्यायची तर अमदाबाद वगैरे स्मार्ट शहरांत फ्लॅट घ्या हो! आम्ही मतं विकली असतील, पण अजून कणा विकला नाही! आणि तुम्हांस सांगतो. उद्या तो लुल्ला इथे गाडी लावेल, मच्छी फ्राय, अंडा भुर्जी असं सगळं असेल तिथे! तुम्हाला त्याने घिन येईल. तेव्हा नाकास रुमाल असू द्यात. एकवेळ आम्ही प्राणी खाऊ, पण खोट्या अहिंसेसाठी माणसाचं रक्त वाहविणार नाही. काय?’ बुवाच्या बोलण्याने कुंथा लालेलाल होतो.
‘तुम घाटी लोग…’ तो चिडून शिव्या हासडण्याआधी गालावर वळ उमटतात.
‘मी सोसायटीत एकटा असेन. पण मराठी माणूस एकेकटा पुरेल हो तुम्हांस. पुन्हा मराठी प्रांतात राहून आम्हांस शिव्या द्यायची हिंमत करू नका. काय?’ बुवाच्या रुद्रावताराने कुंथा पळ काढतो.
– ऋषिराज शेलार