यूट्यूबवर आणि फेसबुक रील्समध्ये अॅलोपथी ही उपचारपद्धतीच नाही, अशा बाता मारणारे आयुर्वेद समर्थक आजारी पडल्यावर आधुनिक उपचारपद्धतीच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये का दाखल होतात? काढे पिऊन आणि लंघन करून का बरे होत नाहीत?
– सुलभा तापकीर, सोलापूर
कर्मा रिटर्न्स असंच म्हणावं लागेल… जे प्रत्येक बायोलॉजिकल माणसाला अटळ आहे. त्यामुळे ते कितीही मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले तरी तुम्ही त्यांना बघायला उगाच फळं घेऊन जाऊ नका… त्यांच्याबरोबर त्यांच्या कर्माची फळं असतात.. म्हणूनच ते तिथे दाखल झालेले असतात (हा विनोद क्रूर वाटला तरी वास्तव आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांनाच लागू आहे).
महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला महाराष्ट्राच्या राजधानीत मारवाडीत बोला, असं सांगण्याची किंवा आता आमच्या नगरपालिकेत गुजराती/मारवाडी महापौर बनवणार, हे सांगण्याची हिंमत परप्रांतीयांमध्ये कशी येते?
– किरण नाईक, कणकवली
कणकवलीत राहून सुद्धा असा प्रश्न विचारण्याची हिंमत तुमच्यात कुठून येते?? (आमच्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे… कळलं असेल तरी आमचा प्रश्न ‘त्या महाभागांना’ विचारण्याची हिंमत करू नका.. तुम्ही मारवाडी नाही, मराठी आहात हे विसरू नका… त्यामुळे वाचा आणि थंड बसा.. (थंड बसा म्हटल्यावरच मराठी माणूस गरम होतो हा इतिहास आहे म्हणून म्हटलं.. बघू इतिहासाची पुनरावृत्ती होते का?)
काय संतोषराव, सगळी हाडंबिडं जागच्या जागी आहेत ना? मराठी आहात, मुंबईत राहता, शेजारी कोणी शुक्लाबिक्ला राहात
असणारच, म्हणून काळजीपोटी विचारलं हो!
– रमाकांत पाटणकर, सांगली
का? मलम लावायला येताय?… काळजी करू नका… आमची हाडं आणि बिडं दोन्ही व्यवस्थित आहेत… तुम्हाला कोणी हाड हाड करत नाही ना? एकदम मराठी माणसाची चौकशी करताय म्हणून विचारतोय? आणि नक्की काळजीपूर्वक विचारताय की आम्ही विरोधी पार्टीचे आहोत असं समजून मजा घेताय? मराठी आहात म्हणून विचारतोय. की तुमच्याही मागे एखादा ‘शुक्ला काष्ट’ लागलाय. यदाकदाचित मार खाल्लात तर मदतीसाठी विरोधी पक्षातल्या मराठी माणसाकडे जा. तो सत्तेच्या आशेने मदतीला येईल. पण सत्तेतल्या मराठी माणसाकडे जाऊ नका… पोट भरलेला माणूस लगेच परत जेवायला येतो का?
बीड जिल्ह्यातल्या वासेपूर टाइप घटना वाचून प्रश्न पडला की बीड अजून महाराष्ट्रात आहे की यूपी-बिहारला जोडलं परस्पर! आता महाराष्ट्राने उत्तर भारतासारखे बाहुबलीही पोसायला घेतलेत की काय?
– श्रीकांत गणपुले, कल्याण
तुम्ही कल्याणमध्ये राहून ‘कराड’बद्दल बोलल्यासारखं बोलताय… बाहुबली एका रात्रीत पोसला जात नाही. वर्षानुवर्ष पोसला जातो. त्याची फळं आता चाखायला मिळतायत तर लगेच नावं ठेवू नका… आणि बाहुबली पोसणार्यांचं नाव तर घेऊचं नका. तुमच्यासारखे लोक कालपर्यंत म्हणायचे महाराष्ट्राचा गुजरात होतोय. आता म्हणताय बीडचा यूपी-बिहार होतोय. यूपी, बिहार आणि गुजरात हे आपल्या देशातच आहेत ना? मग उगाच देशद्रोह्यासारखे बोलू नका. एवढा त्रास होत असेल तर पाकिस्तान चले जाओ… (बघा आम्हाला जमायला लागलं. तुम्हीही जमवून घ्या. म्हणजे कसलाच त्रास होणार नाही.)
नव्या वर्षासाठी काय संकल्प करावा तेच कळत नाही. तुम्ही काही आयडिया देऊ शकता का?
– रोहिणी कदम, महाड
नवीन वर्षात काय संकल्प करायचा याची आयडिया कोणाला द्यायची नाही… असा संकल्प आम्ही केलाय… आता काय करू? तुम्हाला उत्तर देऊ का आमचा संकल्प मोडू?
काही कीर्तनकारांचे कार्यक्रम पाहिल्यावर आपण कीर्तन पाहतोय की एखाद्या सोंगाड्याचा मनोरंजनाचा कार्यक्रम असा प्रश्न पडतो. उत्तर भारतातून, गुजरातमधून येणारे तिकडचे बोगस बाबा आणि बुवा तर धर्माच्या आणि संसाराच्या नावाखाली काहीही फेकत असतात… संतांची जागृत परंपरा असलेल्या महाराष्ट्रात हे चाललंय काय?
– निवृत्तीबुवा ढमढेरे, आकुर्डी
गुजरातच्या बोगस बाबाबद्दल आम्ही नाही बोलणार बाबा. आपल्या कीर्तनकारांबद्दल बोलायचं, तर ते उत्तरेकडच्या बाबा आणि बुवांच्या बरोबरीने कमवतायत याचा अभिमान बाळगा ना. ते बाबा बुवा आणि कीर्तनकार स्वतःचं कित्ती मार्केटिंग करतात, त्याला पैसा लागतोच ना.. म्हणून ते पैसे घेऊन लोकांना शहाणं करतात (असं लोकांना वाटतं). आपल्या संतांचं काय घेऊन बसलात, ते फुकटात लोकांना शहाण करायचे. तेव्हा लोकांकडे पैसे नव्हते म्हणून लोक फुकटात शहाणे व्हायचे. आता लोकांकडे अमाप पैसा आहे. त्यामुळे लोकांना फुकटात शहाणपण नकोय. बाकी सगळं फुकटात मिळालेलं चालतं.