महाराष्ट्रात कोणालाही अपेक्षा नसताना भारतीय जनता पक्षप्रणीत महायुती सरकारची पुन्हा प्रतिष्ठापना झाली आणि मराठी माणसांच्या अवमानाच्या, मराठी माणसांवर हल्ला केल्याच्या बातम्या येऊ लागल्या, हा योगायोग नव्हे. गुजरातमधून एका नमुन्याने, मराठी माणसे आमचे नोकरच आहेत, आम्ही मुंबईचे मालक आहोत, अशी गरळ ओकली. मिरा भाईंदरमध्ये आता आम्ही गुजराती-मारवाडी महापौर करूच, असं उघड आव्हान एकाने दिले. या उपनगरात गीता जैन या माजी अमराठी आमदार एकदा महापौर होत्याच आणि जैनांच्या पर्युषण पर्वात आठ दिवस अन्य जातिधर्मीयांच्या, मराठी माणसांच्या मांसाहारावर बंदी आणण्याचे त्यांचे प्रयत्न दर वर्षी सुरू असतात, ही त्यांची एकमेव कर्तबगारी आहे.
आज मुंबईचा मराठी माणूस जात्यात आहे, पण जिथे जिथे परप्रांतीयांचा शिरकाव झालेला आहे, त्या पुणे, नाशिकसह कोकणातूनही उद्या अशाच प्रकारच्या बातम्या आल्यास त्यात आश्चर्य वाटायला नको. मुळात, मराठी माणसाने युती सरकार निवडून दिले आहे का, हाच प्रश्न आहे. ईव्हीएम यंत्रात काही घोळ असो नसो, निवडणूक आयोग या यंत्रणेत मात्र शंभर टक्के घोळ आहे आणि म्हणूनच या आयोगाकडून माहिती घेण्याच्या जनतेच्या अधिकारावर टाच आणणारे कायदे केंद्र सरकार विद्युतवेगाने करते आहे. विद्यमान राज्य सरकार चुकून राज्यभरातल्या मराठी माणसांनी खरोखरच निवडून दिले असेलच तर मराठीजनांनी स्वहस्ते स्वपायावर कुर्हाड मारून घेतलेली आहे, यात काही शंका नाही.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी देशाची आर्थिक राजधानीही आहे. आज तिच्या खच्चीकरणाचे असंख्य प्रयत्न सुरू आहेत. तिचं ते स्थान हिरावून घेण्याची कारस्थानं रचली जात आहेत. पण निव्वळ शेजारी समुद्र आहे, बंदर आहे, म्हणून कोणत्याही शहराची मुंबई बनत नाही, त्यासाठी मराठी माणसांसारखे प्रगतीशील, स्वीकारशील, सर्वसमावेशक वृत्तीचे, दूरदृष्टीचे नेते लागतात. संकुचित धार्मिक विचारांनी जिथे सामाजिक चलनवलनच गोठवून टाकलेले आहे, अशा प्रांतांनी कितीही आदळआपट केली तरी त्यांना दुसरी मुंबई घडवता येणार नाही. महाराष्ट्राच्या स्वभावातून मुंबई घडली आहे, याची जाण इथे येणार्या अन्यप्रांतीयांनी ठेवली पाहिजे. मुंबईवर महाराष्ट्राचा पगडा आणि मराठीजनांचा वचक राहिला पाहिजे, यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्ष केला, शिवसेनेने मराठी माणूस एकवटला आणि अन्यप्रांतीयांनी देखील इतकी वर्षे मराठी माणसाची बूज राखली. मात्र, भारतीय जनता पक्ष नावाची वाळवी शिवसेनेचं बोट धरूनच महाराष्ट्रात शिरली आणि देशाच्या सर्वोच्च सत्तापदांवर मोदी-शाह ही जोडगोळी बसल्यावर सुरतेचा सूड या नाट्याचा प्रारंभ झाला. एकीकडे महाराष्ट्रातले प्रकल्प, मुंबईतली महत्त्वाची कार्यालयं गुजरातला न्यायची आणि दुसरीकडे मुंबईतल्या सगळ्या प्रकल्पांची मालकी दिल्लीश्वरांच्या मालकांकडे सोपवून तिची परभारे मालकी मिळवायची, अशा दोन पात्यांच्या कात्रीत मुंबई आणि महाराष्ट्र या दोहोंना अडकवण्यात आलं आहे.
ज्या क्षणी भाजप आणि त्यांच्यापुढे हात बांधून उभ्या असलेल्या स्वाभिमानशून्य मराठी मनसबदारांच्या टोळ्यांची सत्ता स्थापन झाली, त्या क्षणी महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राचे खाऊन मराठी माणसाविषयी घृणा बाळगणार्या मुजोर परप्रांतीयांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. आता मुंबईवर आम्हीच राज्य करणार, आता मुंबई केंद्रशासित करणार, मराठी माणसांना विचारतो कोण, आता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार, अशी स्वप्नं या महाराष्ट्रद्रोह्यांना पडू लागली, ती का? कारण बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है या भाकड भूलथापांना बळी पडलेला मराठी माणूस भाजपच्या बनावट हिंदुत्वाच्या कच्छपि लागला आहे, हे त्यांना दिसत होतं. सत्वच हरवलेल्या मराठी माणसांना चेपणं आता सहजशक्य आहे, कारण सरकार ‘आपलं’ आहे, अशी खात्री झाली आहे त्यांची. मराठी माणसांनी हा बनावट हिंदुत्वाचा दांडा आपल्याच हातांनी महाराष्ट्राचे तुकडे पाडायला उत्सुक असलेल्या कुर्हाडीला बसवला आहे.
कल्याणमध्ये मराठी माणसांची डोकी फोडणार्या नराधम शुक्लाची सगळी माहिती वाचा, त्याने मराठी माणसांच्या बाबतीत काढलेले गैर उद्गार वाचा, त्याने किती मराठी माणसांचं रक्त सळसळलं? पांडेच्या पुंडाव्याने कितीजणांच्या डोक्यात ठिणगी पेटली? अशा प्रकारचे उद्गार शुक्लाने दक्षिण भारतात काढले असते का? तशी हिंमत केली तर तिकडे शुक्लाची काय अवस्था होईल? शरीराच्या भलत्याच भागात जेमतेम वाटाण्याएवढा मेंदू असलेल्या भाजपच्या भक्तांनी तर यातही मराठी माणसांचीच काहीतरी चूक असेल, अशी शंकाही काढली. या सगळ्यांना सुरत, अहमदाबाद, लखनऊ, भोपाळ, पाटण्याला रवाना का करू नये? हे सगळे प्रांत पण भारतातच येतात ना? असले नेभळट, पुचाट आणि फितुरीला आतूर मराठी बांधव असतील, तर आपल्याला शत्रूंची गरज काय?
देशाच्या आधुनिक इतिहासात महाराष्ट्राने कायमच राष्ट्रीय बाणा दाखवला आहे. सत्ता कोणाचीही असली तरी ‘कारकुनी प्रथम’ करणार्या चिरकुटांनी त्याला ‘राष्ट्र प्रथम’ हे शिकवण्याची गरज नाही. पण अन्य राज्ये आणि केंद्रातले सरकार आयडिया ऑफ इंडिया अर्थात सर्वसमावेशक भारताची कल्पना सर्वोपरि मानणार नसतील, धर्माधर्मांत, जातीपातींत द्वेष पसरवून त्यावर पोळ्या भाजणार असतील, महाराष्ट्राच्या तोंडचे घास इतरत्र पळवणार असतील, महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाला डिवचणार असतील, तर महाराष्ट्राला आधी मराठी बाणा जागवावा लागेल.
मराठी माणसाला, महाराष्ट्रहिताला सेफ ठेवण्यात मुख्यमंत्री फडणवीस अपुरे पडणार असतील, तर सर्वांनाच मराठी बाण्याच्या कडू मात्रेचे वळसे द्यायला अस्सल शिवसेनेचे वीस वाघ पुरेसे आहेत! गाठ शिवसेनेशी आहे, हे विसरू नका.