आज माझ्याकडे सनसनाटी बातमी होती म्हणून मी सक्काळीच माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याला बोलवून घेतलं आणि पोक्याही त्याच्या सायकलवरून आला. पोक्या मोटारसायकल वा स्कूटर वापरत नाही. त्याची चाळीस वर्षांपूर्वीची सायकल हीच त्याची जिवाहूनही प्रिय सखी आहे. तिला तो खूप जपतो. फक्त त्याने तिच्यात आधुनिक युगाला शोभतील असे बदल केले आहेत. मुळातच ती सायकल त्याने त्यावेळी खास बनवून घेतली होती. तिचे टायर्स इतर सर्वसामान्य सायकलींपेक्षा दुपटीने जाड आहेत. तिला घंटी नाही तर हँडलच्या मधोमध पुश बटण आहे. ते दाबले की त्यातून रिंगटोनसारखा मंजुळ पण मोठा आवाज येतो. त्या दिवशी तो आवाज ऐकल्यावर मी दार उघडलं. पोक्या म्हणाला, काय रे इतक्या लवकर बोलावलंस. कुणाचा गेम वाजवायचाय की…
मी म्हटलं, अरे गेम बिम काही नाही. काल आपल्या नेत्यांच्या एका गुप्त मीटिंगला मी उपस्थित होतो. तिला चित्राताईंसकट महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. अलीकडे नवी दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत पंतप्रधान मोदी साहेबांनी सर्वांना सज्जड दम देऊन सांगितलं की लोकसभा निवडणुकीला आता फक्त चारशे दिवस बाकी आहेत. उद्यापासून एकेक दिवस कमी होत जाईल आणि माझ्या छप्पन्न इंच छातीची धडधड वाढली जाईल. तेव्हा काहीही करा. खोटी आश्वासनं द्या, नाटकं करा. पण सगळ्या धर्माच्या वरपासून तळागाळापर्यंत लोकांच्या संपर्कात राहून त्यांना ते मागतील ते द्या. आपल्याला पुन्हा दोन-तृतीयांश बहुमत मिळालंच पाहिजे. चला, आत्तापासून कामाला लागा. त्याबरोबर आपले महाराष्ट्रातील पदाधिकारी लगबग करीत पळाले आणि त्यांनी विमानाने मुंबई गाठली.
फडणवीस ताबडतोब दाढीवाल्यांना फोन करून म्हणाले, तुमच्या फुटीर गटाच्या आमदारांना आणि पदाधिकार्यांना घेऊन संयुक्त बैठकीसाठी गौहातीला उद्या नेहमीच्या हॉटेलमध्ये पोहोचा. विषय फार महत्त्वाचा आहे. लोकसभा निवडणुकीचे भावी उमेदवार नक्की करायचे आहेत. दुसर्या दिवशी बंडखोर आमदार, खासदार व पदाधिकार्यांसह गौहाती गाठली. सकाळी दहा वाजता नाश्तापाणी केल्यावर हॉटेलच्या व्हीआयपी रूममध्ये बैठकीला सुरुवात झाली. बैठकीचा काही भाग मी गुपचूप टेप केला. पोक्या, तो तुला ऐकविण्यासाठी इथे पाचारण केलंय. ऐक-
– अहो, फडणवीस साहेब, मी नाही प्रास्ताविक करणार. तो तुमचा मान आहे. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात.
– असं कसं म्हणता बावनकुळे साहेब. एरव्ही पत्रकारांसमोर प्रतिक्रिया देताना किती उत्साह दाखवता.
– पण इथे नकोच. दिल्लीत मोदी साहेबांनी असा दम भरलाय की तेव्हापासून माझी बोलतीच बंद झालीय.
– ठीक आहे. बसा खाली. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही माझ्या बाजूला या. तुम्हाला लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा रोल बजावायचाय.
– मी मुख्यमंत्री असलो तरी भाजपचा आणि तुमचा विनम्र सेवक आहे. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुमचं चालू द्या.
– धन्यवाद. दिल्लीत मोदीजींनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात सक्त इशारा दिला आहे. कारण, भाजप येणार्या सर्व निवडणुकांत सपाटून मार खाणार आहे, याची पूर्वकल्पना त्यांना आहे. म्हणूनच मोठा तडाखा बसण्यापूर्वी आपण काय उपाययोजना करणार आहोत हे आपल्याला आताच निश्चित केलं पाहिजे. मुनगंटीवार. बोला.
– फडणवीस साहेब, हा मुनघंटीवार सॉरी मुनगंटीवार तुम्ही सांगाल ते काम पक्षासाठी जीव ओतून करील याची खात्री बाळगा. नको त्या माणसांना लोकसभेत पाठवण्यापेक्षा मलाच पाठवा. मला आणखी हुरूप येईल आणि नेहमी पडणारी आमच्या जिल्ह्यातील पक्षाची जागा मी नक्की जिंकेन. तुमचं मत काय फडणवीसजी?
– पक्ष तुमच्यासाठी नाही. तुम्ही पक्षासाठी आहात. बावनकुळे सांगतील त्याप्रमाणे कामाला लागावे. तेही नि:स्वार्थीपणे. आपल्याला शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व जागांवर शिंदे गटाचे उमेदवार निवडून आणायचे आहे. तिथे मात्र पाडापाडीचे राजकारण करू नका. नाहीतर पक्षाचेच दात पडतील. किरीटजी बोला.
– आता माझ्याकडून बोलण्यासारखे काहीच राहिले नाही. मी आणि माझ्या ईडीने विरोधी नेत्यांना जो धडा शिकवला, त्यामुळे आपले काम सोपे झाले. आता चारशे दिवस पूर्ण होण्याआधी मी विरोधी पक्षातील आणखी अनेक नेत्यांना ईडीच्या पिंजर्यात अडकवतो, म्हणजे दोन तृतीयांश काय दोन चतुर्थांश बहुमतही आपल्याला मिळेल. आतापासून महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब जनतेला दर दिवशी फाफडा, बुंदी, खाकरा यांच्या पाकिटांचे वाटप पद्धतशीरपणे करणार आहे. ते कमळाचेच बटण दाबतील. आता नारायणराव राणे बोलतील.
– मी तुम्हाला खात्री आणि वचन देतो की सिंधुदुर्गाविषयी बिनधास्त राहा. तिथून लोकसभेला मीच निवडून येणार आणि माझी दोन्ही मुले विधानसभा निवडणुकीत निवडून येणारच. रत्नागिरीच काय, रायगडची लोकसभा सीट भाजपच जिंकेल. चित्राताई बोला.
– या महाराष्ट्राला आणि देशाला हिंदू संस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी मला लोकसभेत निवडून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्या नाठाळ उर्फीला धडा शिकवण्यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी राहा. मला दिल्लीत पाठवा. मग मी त्या उर्फीचं काय करते ते बघा. हो की नाही अमृताताई?
– नाही हो. तुम्ही फक्त आपला स्वार्थ बघू नका. फक्त त्या उर्फीच्या मागे लागू नका. खाली बसा तुम्ही. बोला, दीपक केसरकर.
– येणार्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रातून सर्व जागांवर सत्ता कशी जिंकून देता येईल याचा मी पंचवीस दिवसांत सखोल अभ्यास करून अंतिम निष्कर्ष काढेस्तोवर थांबा. आपल्या मुख्यमंत्र्यांनी दावोस येथे जाऊन अठ्ठ्याऐंशी हजार चारशे वीस कोटींचे करार महाराष्ट्राच्या भल्यासाठी केले आहेत, हे जनतेला पटवून द्या. फक्त शेवटचा चारसो बीस आकडा लक्षात ठेवू नका…
फडणवीस – पक्षात चारसो बीस कोण आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. कोणी दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर गाठ मोदी साहेबांशी आहे एवढं लक्षात ठेवून कामाला लागा. आता गिळायला आपण सर्व मोकळे! चला!!