आजघडीला प्रत्येक घरात टीव्ही आणि मोबाईलपुढे लोक बसलेले असतात. यामुळे कुटुंबात एकमेकांशी संवाद जवळपास संपलेलाच आहे. आपल्याही कुटुंबात संवादासोबत हळूहळू प्रेम, आनंद आणि एकमेकांप्रती समर्पणाची भावना नष्ट तर होणार नाही ना… तरुण मुलांचे आणि विद्यार्थ्यांचे पालक याच चिंतेत आहेत. प्रख्यात व्यंगचित्रकार गुरु खिल्लारे यांच्या मनातही हाच विचार आला. ते स्वत: व्यंगचित्रकार असल्यामुळे व्यंगचित्रांच्या माध्यमातून कुटुंबामध्ये आनंद, संवाद आणि प्रेम घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. याचाच एक भाग म्हणून येत्या २८, २९ आणि ३० या तीन दिवशी त्यांनी एका व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. बेळगावमधील कलामहर्षी के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी ५.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामू्ल्य असल्याचे त्यांनी सांगितले.
खिल्लारे म्हणाले, आयुष्यातील गमतीजमती कधीही संपू नयेत असे मलाही वाटते. यासाठी आपली व्यंगचित्रकला बरेच काही करू शकते हे मला माझ्या पूर्वसुरींच्या कार्यातून सतत जाणवते. त्यामुळेच मी रोजच्या जीवनातील साध्या साध्या गोष्टींवर व्यंगचित्र करत गेलो. त्याचा खूप मोठा साठा झाला. अनेक वर्तमानपत्रांमध्येही यातील काही व्यंगचित्रे छापून आली आहेत. याच व्यंगचित्रांचे प्रदर्शन मी भरवले आहे. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनीही ‘रोज सकाळी प्रयत्नपूर्वक समाजात आनंद निर्माण करा’ असे आवाहन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून मी हे प्रदर्शन भरवून लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करतोय, असेही खिल्लारे यांनी स्पष्ट केले.