तुरुंग या शब्दातील जरब ‘जेल’ या शब्दाने जरा मुळमुळीत झाल्यासारखी वाटते. पारतंत्र्यात जेलमध्ये जाणे अत्यंत छळाचे व असह्यसे असे; तरीही ते अत्यंत अभिमानाचे व प्रतिष्ठेचे होते. कितीतरी स्वातंत्र्यसैनिक- अगदी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लोकमान्य टिळक आणि सावरकरकरांसारखे स्वातंत्र्यवीर या स्वातंत्र्यसैनिकांनी हसत तुरुंगवास भोगला. यांच्याशिवाय अनेक सामान्यजन कुर्बान झाले, तुरुंगात खितपत पडले, त्यांच्या नावाने ‘नाही चिरा नाही पणती’! यांच्यातला प्रत्येक जण जुलमी इंग्रजांशी लढत होता.
देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि देशद्रोही, काळाबाजार करणारे भ्रष्ट राजकारणी, शासकीय यंत्रणेतील अधिकारी त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ लागले; इतका की एक बुद्धिमान अभ्यासक म्हणाला होता भारतातले निम्मे लोक भ्रष्टाचारी आहेत. त्यावर एक सामान्य माणसाने विचारले, याचा अर्थ निदान त्यातले निम्मे तरी चांगले आहेत तर?’
त्यावर त्याचे उत्तर होते, ‘तसे नाही, त्यांना संधी मिळालेली नाही.’!
विनोदाचा भाग सोडला तरी ‘पळा पळा कोण पुढे तो’ या वृत्तीने भ्रष्टाचार करण्यासाठी सगळे धावत आहेत आणि राजकारण्यांनी तर हैदोस घातला आहे. उद्या म्हटले की देश विकायचा आहे, तर ते म्हणतील, पहिल्यांदा टक्केवारी निश्चित करा, मग बघू. ही अदृश्यपणे वावरणारी वास्तवता आहे, हे लक्षात घ्यायला हवे. आणि वर हे सगळे अधिकारी, पुढारी, मंत्री अत्यंत शिस्तीची कळकळ, देशप्रेम, जनहित दक्षतेचा चेहरा करून समाजात वावरत आहेत. यासंदर्भात मी एक चित्र काढले होते. एक शासकीय अधिकारी निवृत्त झाले, त्यानिमित्त त्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता. सत्कार करताना निवेदक म्हणाला की हे अत्यंत प्रामाणिक अधिकारी होते. केवळ नोकरीत मिळणार्या पगारात दोन मुले परदेशात शिकायला पाठवली, ५० एकर जमीन, मुंबईत पाच आलिशान फ्लॅट्स, पाच सहा महागड्या चार चाकी गाड्या त्यांनी विकत घेतल्यात. चित्रातला भोळसट निवेदक व बेरड चेहर्याचा अधिकारी अचूक रेखाटता यायला हवा असतो.
पूर्वी माफक चिरीमिरी देऊन कामे होत. आजकाल सरकारी ऑफिसेस, मंत्र्यांचे कक्ष हे जबरीचे टोलनाके झालेत. हे ज्यावेळी बंद होतील तोच देशाच्या दृष्टीने सण आणि सुदिन (तो अर्थातच उगवण्याची शक्यता दिसत नाही)! ‘जगाच्या पाठीवर’ या सिनेमासाठी ६०-६५ वर्षांपूर्वी ‘जग हे बंदीशाला’ गाण्यात गदिमा (महाकवी ग. दि. माडगूळकर) लिहितात, कुणी न येथे भला-चांगला, जो तो पथ चुकलेला… हे कडवे वाचा…
ज्याची त्याला प्यार कोठडी
कोठडीतले सखे सौंगडी
हातकडी की अवजड बेडी
प्रिय हो ज्याची त्याला
देशाचं जाऊ द्या, निदान आपल्या देशापुरती तरी ही तंतोतंत लागू पडते आहे. गुन्हेगारांना मागे टाकून आपले पुढारीच सगळे जेल अडवत आहेत. अर्थात तेही फक्त विरोधी पक्षांचे. सत्ताधारी पक्षात सगळे साजुक आहेत. विरोधात भ्रष्टाचारसम्राट असलेला नेता सत्ताधार्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये जाताच बाहेर पडताना वाल्याचा वाल्मिकी होतो. त्यामुळे, जे तुरुंगात जातात ते नेते जाताना समर्थकांच्या जयघोषात ते आत जातात, जामीन मिळाला की पुन्हा जयघोषात प्रचंड मोठ्या मिरवणुका काढून वाजत गाजत घरी येतात. हळूहळू कुटुंबीय सुद्धा कंटाळलेत. कारण पैसे खाताना मंत्री त्यांच्यासाठीही जेलचे दरवाजे उघडून ठेवत आहेत. विशेषत: बिल्डर्स, कारखानदार, बिल्डर, ठेकेदार मंडळी यात आघाडीवर आहेत. यांना जेल झालीच तर हृदयरोग, मधुमेहासारखे हुकमी आजार त्यांच्या मदतीला येतात. जेलऐवजी स्टार हॉस्पिटलमध्ये गादीवर लोळत पडतात. टिळक, सावरकर, साने गुरुजी यांनी तुरुंगात ग्रंथ, मोठमोठी महाकाव्ये लिहिली. ही फाइव्ह स्टार मंडळी मात्र बेहिशेबी मालमत्तेचा लेखाजोखा करण्यात मग्न होतात… देवदयेने माझ्यावर जेलमध्ये जायची वा तुरुंग आतून पाहायची वेळ आली नाही. परिणामी हिंदी सिनेमातील बेगडी जेल व गुन्हे पाहण्यातच हयात गेली.
दि ग्रेट एस्केप, शिंडलर्स लिस्ट, टेन कमांडमेंट्स व बेनहरसारख्या सिनेमांतून जेलची भीषणता पाहायला मिळाली. मनोरंजन करणार्या व्यंगचित्रांत ही भीषणता अपेक्षितच नसते. म्हणून आनंददायी चित्रे काढता काढता चिमटे घेता येतात. राजकारण्यांवर चित्रे काढण्याचा खुळेपणा करण्याचे हे दिवस नाहीत हे नक्की.