मुलांच्या स्फोटक वृत्तीला आळा घालताना प्रथम त्यांच्या समस्यांचा, विचारसरणीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. नुसता उपदेश करून किंवा मारझोड करून कोणत्याच सल्ल्याचे पालन होणार नाही. त्यांच्या अंतर्मनातील त्यांचे विचार त्यांच्याशी बोलून, वेगवेगळ्या तर्हेने संवाद साधून सुप्त गोष्टींना बाहेर काढून त्याची कारणमीमांसा जाणली पाहिजेत आणि मगच त्यावर उपाय केले पाहिजेत. डॉ. सुनिता चव्हाण यांच्या ‘भयातून निर्भयाकडे’ या डिंपल पब्लिकेशन प्रकाशित पुस्तकातील हा लेख…
– – –
‘अगं वैशाली, किती लागलंय. खोक पडलीय, थोडक्यात डोळा चुकला ना गं. भुवईवरची जखम पाहता पाहता मी बोलले, टाके घालावे लागतील.’
मिस्टरांची मान्यता मिळाल्यावर मी टाके घालण्यास सुरुवात केली. वैशाली अगदी शांत होती. तशी ती आल्यापासूनच गप्प गप्पच होती. घरात पाय घसरून पडली हे कारण मिस्टरांकडून समजले होते. पण बायकांचा चेहरा वाचायची सवय झालेल्या मला तिच्या चेहर्यावरील वेदना, डोळ्यातील ती दु:खाची लपवलेली आसवे पाहता क्षणी ‘काहीतरी प्रकरण वेगळे आहे’ हा संदेश माझ्या मनापर्यंत बुद्धीने पोहोचवला होता. स्त्रीवेदनेशी जणू माझी नाळ जोडली गेली होती.
टाके, ड्रेसिंग वगैरे काम झाल्यावर वैशाली माझ्यासमोर बसली होती… शांतपणे, स्वत:मध्ये हरवल्यासारखी.
‘वैशाली, काय झाले? खरं कारण सांगशील का?’ माझा सिक्स सेन्स मला शांत बसू देत नव्हता.
‘केशवनी रिमोट फेकून मारला.’ फटाका फुटावा तशी तडतडली ती. ‘काय?’ मी किंचाळायचीच बाकी होते.
‘वैशालीचे दु:ख तसे मला माहीत होते. तिच्या दु:खाचे मुख्य कारण होता तिचा मोठा मुलगा केशव. वय वर्षे ११, सडपातळ, चेहर्यावर कधीच हास्य नसायचे, डोळे मात्र नेहमी खुनशी, स्वत:वरच चीडचीड करणारा. आईला उद्धट बोलणे, छोट्या छोट्या गोष्टीत तिचा अपमान करणे, आई म्हणजे सर्व भावनांना सोसणारा दगडच होता. त्याच्यासाठी काही झाले, कोणी बोलले की सारा राग तिच्यावर निघायचा. रागाने कधी कधी तिचे केस धरून ओढायचा. अशा बर्याच तक्रारी ती मला सांगायची. तो फक्त वडिलांना घाबरायचा.
मी नेहमीच वैशालीला सल्ला द्यायची की ‘या सर्व गोष्टी, सवयी, त्याचा जिद्दीपणा वडिलांच्या कानावर घाल.’ परंतु वडील त्याला मारतील म्हणून त्याचे सारे अपराध पोटात घेणारी सहनशील आई होती ती. पण ही सहनशीलता भयंकर रूप घेईल असे मी तिला वारंवार बोलून दाखवायची.
केशव खूप लाडावलेला होता असेही नव्हते. पण तो लहानपणापासूनच अग्रेसिव्ह होता. कुणाचेच ऐकायचा नाही. अरेला कारे अशा शब्दांत बोलायचा. कोणतीच गोष्ट त्याला पटत नव्हती.
‘वैशाली, मी त्याला लहान मुलांच्या मानसरोगतज्ज्ञांना दाखवून घ्या, असे गेली दोन वर्षे सांगत आहे तुम्हाला. त्याची वृत्ती स्फोटक होती. तो आता हिंसक झाला आहे. आज रिमोट फेकून मारला, उद्या सुरा घेऊन अंगावर धावून यायचा. वेळ सांगून येत नाही वैशाली.’ काळजीने मी पुन्हा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. बोलत असताना केशवचे पप्पा केबिनमध्ये येऊन बसले होते.
‘हे पाहा कारेकर, मी वैशालीकडून त्याच्या अग्रेसिव्ह होण्याच्या बर्याचशा गोष्टी ऐकल्या आहेत. तुम्ही त्याला सायकियॅट्रीस्टला दाखवा असे सांगूनही दाखवले नाही. या वर्षात तो इतका स्फोटक झाला आहे. अजून वेळ आहे त्याला दाखवून घ्या.’
‘मॅडम तो वेडा नाही. (मानसोपचार घेणे म्हणजे वेडे लोकच हा उपचार घेतात असा मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये.) हुशार आहे हो. अभ्यासातही चांगला आहे. पण राग सहन होत नाही. समज येईल तसे सुधारेल असे वाटत होते. पण आजच्या आणि कालच्या प्रसंगाने मलाही तुम्ही सांगितलेल्या या गोष्टीचा विचार करावासा वाटतो आहे. काहीसे चिंतातुर होऊन कारेकर बोलले.
‘काल काय केले त्याने?’ मनातून थोडी घाबरलेच मी. काल हिच्याशी थोडी मचमच झाली तर ब्लेड घेऊन स्वत:च्या हातावर मारून घेत होता; काल कधी नव्हे ते मी लवकर घरी आलो होतो नि नेमका हा अशा पवित्र्यात दिसला. तसे मी त्याला आवरते घेतले आणि त्याच्या कानाखाली दोन वाजवल्या.’
‘अहो कारेकर, अशा मुलांना मारून समजावले तर ते अधिक स्फोटक होतात. कालचा तुमचा राग आज आईच्या भुवयीला सोसावा लागला, त्याचे काय? तो नेहमी असा नसतो ओ मॅडम.’
वैशालीतील आई पुन्हा त्याला पदराआड घेऊ लागली.
‘नको वैशाली, आता त्याचे अपराध लपवू. आपल्या मुलाला चांगल्या स्थितीत, सर्वांसारखा, सर्वांमध्ये मिळून-मिसळून वागणारा केशव तुला नको आहे का?’
‘मानसोपचारतज्ज्ञांचे उपचार आणि त्यांची समजावण्याची पद्धत यामुळे खूप फरक पडतो. तुम्ही त्याला दाखवून घ्या.’ असे सांगून मी त्यांना सायकिअॅट्रीस्ट अॅण्ड काऊन्सिलरचा पत्ता लिहून दिला.
‘आपला मुलगा जिद्दी आहे, संतापी आहे. थोरा-मोठ्यांना उद्धट बोलतो. जबाबदारीची जाणीव नाही. कोणाशी पटत नाही. घरच्यांनी लाडावून ठेवलेय.’ अशा अनेक खोचक प्रतिक्रियांना वैशालीला तिच्या सोसायटीमध्ये सामोरे जावे लागत होते. त्यामुळे तीही सहसा कोणाकडे जात नव्हती. कुणामध्ये मिसळत नव्हती. या सर्व गोष्टींना आपण जबाबदार आहोत, अशी तिची भावना झाली होती. त्यामुळे तीही मनाने झुरत चालली होती.
वैशालीचे वडील अतिशय रागिष्ट होते, शीघ्रकोपी होते. म्हणून तो आजोबांच्या वळणावर गेला आहे, असे ताशेरे नवर्याकडून सतत मिळत होते. सासरकडून माहेरचा होत असलेला उद्धार पाहून तिचा आत्मविश्वास तिचे खच्चीकरण करत होता. म्हणूनच ती केशवच्या सर्व अपराधांवर पांघरूण घालत होती… म्हणूनच त्याच्या या वागण्याला आनुवंशिकतेनुसार मीच सर्वस्वी जबाबदार आहे, असा मोठा गैरसमज तिने स्वत:बद्दल करून घेतला होता.
काही मुले अगदी लहानपणापासूनच जिद्दी असतात. त्यांना जी गोष्ट हवी असते ती मिळालीच पाहिजे असा त्यांचा रवैया असतो. त्यासाठी ते रडून रडून आकाशपाताळ एक करतात. भर रस्त्यावर फतकल मारून टाचा घासत मोठमोठ्याने किंचाळतात. कधी जेवणार नाहीत तर कधी अबोला धरून बसतील… अशा अनेक तर्हेने ती व्यक्त होतात. मुले रडू नयेत म्हणून आई-वडील त्यांचा हट्ट पुरवतात. खरी चूक इथेच होते. आपल्या मुलाची जिद्द अट्टहासात रूपांतरित होत जातेय, ही गोष्ट समजून घेण्यात आई-वडील चूक करतात. लहान मुलांचा असा समज होतो की आपण रडलो, जेवलो नाही तर आपल्याला हवी असलेली गोष्ट लगेचच मिळते. मग तो पुढच्या वेळेस आणखी तीव्र स्वरूपात व्यक्त होतो आणि मग पुढे पुढे स्फोटक, हिंसक होत जातो.
अशा वेळीच आई-वडिलांनी आपल्या मुलाच्या स्वभावाची खोचकता लक्षात घेऊन सावध झाले पाहिजे. त्याचे हट्ट नाही पुरवले पाहिजे. तो रडतो आहे तर त्याला रडू दे. असा किती वेळ तो रडणार आहे. उपाशी राहिला तर एक दिवस-दोन दिवस राहील. इथे आपल्या मुलाच्या हितासाठी भावना मागे ठेवून कठोर आचरण केलेच पाहिजे. ‘काहीही प्रकार आपण केले तरी हवी असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळणार नाही,’ ही समज त्यांच्या (मुलांच्या) मनावर बिंबवली गेली पाहिजे. मग तो आई-वडिलांना ‘प्रत्येक गोष्ट मिळेलच’ असे गृहीत धरणार नाही.
काही मुले रागारागाने उद्धट बोलतात, मनाला दुखेल असा शाब्दिक अपमानसुद्धा करतात. अशा वेळी त्यांना मारून किंवा उलट बोलून काहीच उपयोग नसतो. तेव्हा आई-वडिलांनी शांत राहून ती वेळ, तो वाद दुर्लक्षित केला पाहिजे आणि ज्यावेळी तो नॉर्मल असेल, त्याचा मूड चांगला असेल तेव्हा त्याला त्याचे रागावणे किती क्षुल्लक गोष्टीसाठी होते, विनाकारण होते, त्याचे अपशब्द, बोलणे हे आई-वडिलांच्या जिव्हारी लागणारे होते, ते किती चुकीचे आहे, हे त्याला समजवावे. तेव्हा तो शांतपणे तुम्ही समजुतीने सांगितलेल्या गोष्टींचा विचार तरी करेल आणि त्याला त्याच्या चुकीची जाणीव होईल.
परंतु तापलेल्या अग्नीवर पुन्हा तेल ओतत गेला तर भडकाच उडेल आणि तुमच्या समजूतदारीच्या शब्दांना तो ग्रहणच करू शकणार नाही, कारण त्याच्या बुद्धीवर रागाचा पडदा पडलेला असेल. आई-वडिलांना आपली कोणतीच गोष्ट पटत नाही, हे त्याच्या मनात कुठेतरी चिकटून बसलेले असते आणि अशावेळी तुम्ही त्याचे ऐकले नाही तर त्याला आणखी विश्वास बसतो की हे लोक फक्त स्वत:चे खरे करतात. म्हणूनच रागाच्या वेळी शांत बसून त्याच्या अविवेकी विचारांना शांत होऊ द्यावे आणि नंतरच त्याच्या चांगल्या मूडला हेरून त्याला समजावून विवेकी विचारांना त्याच्या मनात स्थापित करावे.
काही मुलांमध्ये कितीही समजावले तरी रागीट वृत्ती तशीच राहते. अशा मुलांच्या कुटुंबातील वातावरणाचा, त्यांच्या लहानपणातील काही अप्रिय घटनांचा, मनातील न्यूनगंडाचा विचार करावा लागतो. घरात वादविवाद होणे, वडिलांचे आईवर नेहमीच गुरगुरणे, तिला दुय्यम दर्जा देणे, घालून-पाडून बोलणे… हे जर मुले पाहत असतील तर तेसुद्धा वडिलांचे अनुकरण करीत राहतात. आईला त्याच दृष्टिकोनातून बघतात आणि तिला नको तसे उद्धटपण बोलत राहतात. आई आपल्यासाठी काय-काय करते हे समजण्याची त्यांची तेवढी विचारक्षमता नसते. फक्त अवलोकनातून अनुकरण करण्याची सवय बुद्धीला लागते. मग ती सवय वयात येताना हार्मोनल बदलामुळे आणखी तीव्र होते. चीडचीड वाढते. स्वत:चेच खरे करण्याची जिद्द निर्माण होते. ही मुले कोणाचेही ऐकत नाहीत. म्हणूनच घरातील वातावरणात नेहमी आनंद असावा. मुलांसमोर वादविवाद घडू नयेत याची आई-वडिलांनी नेहमीच दखल घ्यावी. आई-वडील मुलांसाठी काय-काय करीत असतात हे आईने वडिलांप्रती आणि वडिलांनी आईप्रती मुलांना जाणीव करून द्यावी. दैनंदिन व्यवहारामध्ये घडत असलेल्या छोट्या छोट्या गोष्टीतून ते प्रेम, आनंद दाखविण्याचा प्रयत्न करावा. एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर याची भावना रुजवावी, मग ते कधीच आई-वडिलांचा अनादर करणार नाहीत.
कधीकधी या भांडणाच्या विकोपाने मुले वैफल्यग्रस्त होतात. आपल्याकडे कोणाचे लक्ष नाही, आपली कोणाला काळजी नाही अशा नकारात्मक गोष्टींचे वर्चस्व त्यांच्या मनात घर करून जाते आणि ती एकटी-एकटीच राहू लागतात. आत्मकेंद्रित होतात. सहसा कोणात मिसळत नाहीत. व्यवहारज्ञानात मागे पडतात. चिडचिडे होतात. म्हणूनच मुलांच्या घरची परिस्थिती माहिती असणे आवश्यक होते.
काही वेळा आई-वडिलांचे जे आपल्याबद्दल मत असते तसेच आपण आहोत असे लहान मुलांना वाटत राहते. ‘आमच्या मुलाला लगेच राग येतो. त्याला हे सहन होत नाही, तो शीघ्रकोपी आहे.’ अशी वाक्ये वारंवार बोलून मुलांच्या मनात बिंबवण्यास काही वेळा आई-वडीलच कारणीभूत असतात आणि आपण असेच आहोत अशी फुशारकी मुले अभिमानाने मारतात. ‘ए मला चिडवू नको, मला राग सहन होत नाही.’ अशा शब्दांत बोलून एक-दोन हात करण्याची पण मनात तयारी झालेली असते. म्हणूनच अशा मुलांच्या उणिवा त्यांच्यासमोर कधीच निदर्शनास आणून देऊ नयेत. उलट आमच्या बाळाला राग आला तर तो लगेच निघून जातो, अशी सकारात्मकता त्यांच्या मनात भरून जाईल असे बोलले पाहिजे.
आजच्या काळात गुड टच आणि बॅड टच हे फक्त मुलींपर्यंत मर्यादित नको, तो लहान मुलांनाही (बॉईज) सांगितला पाहिजे. या विकृत मनोवृत्तीच्या पुरुषांना हे घाणेरडे चाळे करण्यासाठी मुलगीच पाहिजे असे नाही; ते मुलांनाही आपली शिकार बनवतात. अशा काही केसेस मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये पाहिल्या आहेत. अशी मुले खूप बुजरी असतात. भीती असते मनात. शाळेतसुद्धा जायला घाबरतात. अशा वेळी त्यांना प्रेमाने बोलून विश्वासात घेऊन असे काही घडले तर नाही ना? याची शहानिशा करावी. यासाठी आई-वडिलांनी जागरूक असणे गरजेचे आहे. एकतर त्यांच्या मनाविरुद्ध घडत असते. जबरदस्ती होते आणि लाजेखातिर कोणाशी बोलू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा मानसिक कोंडमारा होतो. बुद्धीला काय करावे उमजत नाही. त्यामुळे ती व्यथा ते रागातून व्यक्त करतात. त्यांच्या भावनांचा उद्रेक होऊन ती स्फोटक होत जातात.
आजकालची मुले हिंसक होण्यास कारणीभूत आहेत डब्लूडब्लूएफचे फाईट वॉर्स म्हणा, पीएस४चे चॅलेंजिंग वॉर्स वगैरे गेम्स यामध्ये लढत असताना जोपर्यंत शत्रूला रक्ताच्या थारोळ्यात बघत नाहीत तोवर त्यांचे समाधान होत नाही. खूप खूप मारतात. कधी बंदुकीने तर कधी तलवारीने… सपासप… तुकडे तुकडे करतात. हा खेळ असतो पण त्याचा विपरीत परिणाम बुद्धीवर, मनावर होतो. काही मुलांना हा खेळ, ती मारामारी रोजच्या रोज केल्याशिवाय चैन पडत नाही. अशी मुले शीघ्रकोपी होतातच आणि हिंसक वृत्तीही त्यांच्या वागण्यातून दिसून येते.
पूर्वी शिवाजी महाराजांचे पराक्रम, पोवाडे ऐकताना, वाचताना शत्रूने आपली राज्ये, गड कसे बळकावले? ते पुन्हा जिंकतानाचा पराक्रम तसेच शत्रूने स्त्रियांवर केलेले अत्याचार इ.चा इतिहास सांगताना त्यांच्या लढाईचे वर्णन शौर्यात्मक असायचे. यामुळे अंगात स्फुरण यायचे, वाईट प्रवृत्तीविरुद्ध लढण्याची खुमखुमी वाटायची आणि आताचे हे गेम पाहिले तर समोरच्या शत्रूला मारून त्याचे राज्य कसे आपलेसे करायचे, ते कसे वाढवायचे? हा स्वार्थी भाव दिसतो. स्वार्थामुळे आंधळी होऊन आजची पिढी हिंसक होत असल्याची कित्येक उदाहरणे आपण रोज पाहतो, वाचतो आहोत.
मुलांच्या स्फोटक वृत्तीला आळा घालताना प्रथम त्यांच्या समस्यांचा, विचारसरणीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. नुसता उपदेश करून किंवा मारझोड करून कोणत्याच सल्ल्याचे पालन होणार नाही. त्यांच्या अंतर्मनातील त्यांचे विचार त्यांच्याशी बोलून, वेगवेगळ्या तर्हेने संवाद साधून सुप्त गोष्टींना बाहेर काढून त्याची कारणमीमांसा जाणली पाहिजेत आणि मगच त्यावर उपाय केले पाहिजेत. मुलांच्या मनात भय, वाद, न्यूनगंड, एकटेपणा, नकारात्मक गोष्टी इ. अनेक समस्या असतात. त्यातील कोणत्या गोष्टीमुळे आपले मूल सैरभैर झाले आहे, हे शोधून काढणे आई-वडिलांचे काम आहे. त्यांना हळुवारपणे हाताळणे आवश्यक आहे. त्यांचा त्या त्या समस्यांना विचारात घेऊन कदाचित आई-वडिलांना स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक होते. सार्या गोष्टी मुलांच्यावर लादून आपण पळवाट काढणे चुकीचे ठरते.
अशा वेळी आई-वडिलांनी संयमाने वागले पाहिजे. मुलांच्या उद्धट बोलण्याला, प्रतिकारात्मक उत्तरांना थोडे झेलले पाहिजे आणि मग शांततेने नंतर त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. ‘प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क गाजवणे’ हा अट्टहास आहे हे पटवून दिले पाहिजे. आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट मिळालीच पाहिजे ही जिद्द ‘काही मुले अशी आहेत त्यांना काहीच मिळत नाही’ अशी अनेक उदाहरणे त्यांना दाखवून द्यावीत आणि त्या मानाने आपण किती सुखी आहोत याची जाणीव करून द्यावी. एखादी वस्तू नाही मिळाली तरी त्यावाचून काही अडणार नाही हे दाखवून द्यावे. अशा मुलांना सर्व गोष्टी उदाहरणे दाखवूनच पटवून द्याव्या लागतात. मुलांच्या हिंसक वृत्तीला कमी करण्यासाठी आई-वडिलांनाच त्यांना प्रेमाने, सोशिकतेने, हळुवारपणे नवा आकार द्यावा लागेल. त्यांचे मनोधैर्य वाढवावे लागेल. प्रेम, क्षमा, शांती यांचे पाठ शिकवावे लागतील. लहान मुले आहेत. मायेने मनातील नकारात्मकता काढून टाकली तर ती नक्कीच सकारात्मकतेकडे झुकतील आणि त्यांच्या मनी विवेकी विचारांची स्थापना होईल. त्यांच्याकडे तुसड्या नजरेने न पाहता प्रेमाने पाहा… आपलीच मुले आहेत ती, नक्कीच सुधारतील नि प्रेममय बनतील. होय ना!