या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रात एकच लगबग आहे, श्री गणरायाच्या स्वागताला महाराष्ट्र आतुरला आहे. मागची दोन वर्षे गणेशोत्सवावरच नव्हे तर सर्व सण-उत्सवांवर कोरोनाचे सावट होते. मुंबईचे गणपती ही महाराष्ट्राची शान, पुण्याचे गणपती हा महाराष्ट्राचा मान आणि कोकणातले गणपती हा महाराष्ट्राचा अभिमान. यांची खुमारीच न्यारी. पण, कोविडच्या प्रकोपाने दोन वर्षे हे सगळेच उत्सव मलूल झाले होते. महाविकास आघाडी सरकारने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली कोरोनाचा अतिशय यशस्वी आणि अनुकरणीय मुकाबला केला. सरकारने कोणत्याही धर्माच्या सणावारांमध्ये भेदभाव न करता कठोर निर्बंध लादले, हे निर्बंध आपल्या हिताचे आहेत, आज जिवंत राहणे महत्त्वाचे, आजार पसरू न देणे महत्त्वाचे; आज वाचलो की पुढच्या वर्षी उत्सव दणक्यात करू हे उद्धवजींनी घरातल्या वडीलधार्या व्यक्तीच्या भूमिकेतून समजावून सांगितले. कोरोनाकाळातला त्यांचा संवाद हा एकतर्फी, नाटकी मन की बात कधीच वाटला नाही. अरे देवा, आज हे टीव्हीवरून देशाला संबोधित करणार, अशी धास्ती उद्धवजींच्या संवादाच्या संदर्भात कधीही वाटली नव्हती. म्हणूनच राज्यातील सर्व जनतेनेही अतिशय समजुतीने सरकारला साथ दिली आणि उत्सवांच्या उत्साहाला तात्पुरता ब्रेक लावला. श्री गणरायानेही भक्तांना संकटात टाकले नाही, त्याच्या आशीर्वादाने महाराष्ट्र त्या भयंकर काळातून सुखरूप तरून गेला. त्याने महाराष्ट्रावरच्या विघ्नाचे हरण केले.
कोरोनाचे संकट आज इतिहासजमा झालेले नसले तरी आता तेवढे गंभीर राहिलेले नाही. सगळे निर्बंध हटलेले आहेत. सगळे जीवनव्यवहार सुरू झालेले आहेत. त्यामुळे यंदा सर्वच उत्सवांमध्ये उत्साहाची भरती दिसून येते आहे. मुंबई, पुण्यात आणि कोकणात आपापल्या पारंपरिक जोशात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. दोन वर्षे गणरायांची मनासारखी सेवा करता न आलेला प्रत्येक मराठी गणेशभक्त यावेळी श्री गणेशाकडे एक प्रार्थना निश्चित करणार आहे… महाराष्ट्रावरचे विघ्न दूर कर. महाराष्ट्र दिल्लीच्या दावणीला नेऊन बांधणार्या, दुसर्याच्या वडिलांची महती सांगून आपली राजकीय पोळी भाजणार्या, आईचे दूध बाजारात विकणार्या खोकेबाज गद्दारांना जन्माची अद्दल घडव. राज्याचे, देशाचे भाग्यविधाते फक्त आपणच असले पाहिजे, बाकीचे सगळे पक्ष नष्ट झाले पाहिजेत या आसुरी महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या, देशातल्या सगळ्या लोकशाही व्यवस्था खिळखिळ्या करून देशाला हुकूमशाहीकडे खेचत नेणार्या भारतीय जनता पक्षाला थोडी सद्बुद्धी दे, अशीही प्रार्थना गणरायाकडे अनेक जण करतील… पण या पक्षाच्या सोम्यागोम्यांपासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत अनेकांची वक्तव्ये वाचल्यानंतर यांना सद्बुद्धी देणे हे खुद्द बाप्पांसाठीही अवघड ठरेल असे काम आहे, हे लक्षात येते.
बाप्पा महाराष्ट्रात येत आहेत तेव्हा त्यांच्या स्वागताला सर्वसामान्य माणूस सज्ज असला तरी त्याच्या चेहर्यावर उत्सवाचे खरे तेज आहे का? तो आधीच कोंड्याचा मांडा करून संसार करतो आहे, त्यातूनच सणही साजरा करणारच. एकीकडे जीवनावश्यक गोष्टींवरही केंद्र सरकारने जीएसटी लावला आहे आणि दुसरीकडे सार्वजनिक उत्सवातल्या अनेक घटकांवर, मंडपांवरही जीएसटी लावलेला आहे. अजून गणेशमूर्तींवर जीएसटी लावलेला नाही, हे बाप्पांचे नशीब.
सर्वसामान्य माणसांचे जगणे सुसह्य करणार्या फुटकळ अनुदानांना, स्वस्त धान्य, स्वस्त अन्न योजनांना रेवडी कल्चर म्हणून हिणवणारे पंतप्रधान आणि त्यांचा पक्ष निवडणुकीच्या तोंडावर स्वत:ही तशाच घोषणा करतात, तेव्हा मात्र ते जनतेची मते ‘विकत’ घेत नसतात. सर्वसामान्य माणसेच आपल्याला निवडून देतात. आठ वर्षे राज्य करूनही त्यांची क्रयशक्ती वाढवण्यात, त्यांची भरभराट करण्यात, देशाला खर्या विकासाच्या मार्गावर नेण्यात आपण अपयशी ठरलो, म्हणून गरिबांना आधार द्यावा लागतो, याची काही जाणीव ‘गरिबीतून वर आल्याचे’ दावे करणार्या सर्वोच्च नेत्यांना राहिलेली नाही. म्हणूनच इकडे रेवडीची टिंगल करताना आपल्या कॉर्पोरेट ‘मालकां’ना करांमध्ये, व्याजदरांमध्ये सवलतींची काजूकतली भरवण्यातही त्यांना काही गैर वाटत नाही.
महाराष्ट्रात तर आनंदीआनंद आहे. बाकी काही नाही तरी १०० टक्के मनोरंजनाची हमी देणारे एकदम ओक्के सरकार सत्तेत आलेले आहे. हे सरकार म्हणजे भाजपच्या हातातली गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. त्यामुळे, एकाहून एक विनोदी घोषणा सुरू आहेत. गोविंदांना नोकर्यांमध्ये आरक्षण देण्याच्या घोषणेचे स्वागत होण्याऐवजी ‘आता गोट्या खेळणार्यां’नाही आरक्षण द्या, अशी रेवडी उडवली गेली. आरक्षण कसे दिले जाते, का दिले जाते, मूळ आरक्षणात किती क्रीडाप्रकार आहेत, याचा विचार न करता मिळेल त्या मंचावरून दिवस साजरा करणे सुरू आहे. कारण कोणता दिवस शेवटचा ठरेल ते सांगता येत नाही. युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या झंझावाती दौर्यांना महाराष्ट्रभरात, खासकरून गद्दारांच्या मतदारसंघांमध्ये जो जबरदस्त आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे, त्याने गद्दारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पन्नास खोक्यात सगळे काही ओक्के होत नाही, हे त्यांना हळुहळू कळू लागले आहे. गणेशोत्सवानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जन प्रबोधन यात्रा सुरू होईल, तेव्हा तर यांना पळता भुई थोडी होणार आहे. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रहिताचे काम करीत होते, एक चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला होता, क्षणिक स्वार्थ आणि ईडीचे भय यांना बळी पडून काही सडक्या आंब्यांनी शिवसेनेची आढी नासवण्याचा प्रयत्न केला आहे, तो सच्च्या शिवसैनिकांना तर बिल्कुलच आवडलेला नाही, पण शिवसेनेचे परंपरागत मतदार नसलेल्याही अनेकांना हे आवडलेले नाही. निवडणुका होतील तेव्हा यांना धडा शिकवण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे. फंदफितुरीचा शाप महाराष्ट्राला नवा नाही, पण फितुरांना गाडल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थही बसत नाही.
या अस्वस्थ वातावरणात गणरायांचे आगमन होते आहे. हे दिवस भक्तीत रंगण्याचे आणि उत्सवात रमण्याचे आहेत. मात्र, हा उत्सव साजरा करत असताना गणरायांना मराठी जनता हेच साकडे घालत असेल की या खोकेबाज विनोदवीरांना त्यांच्यायोग्य कॉमेडी सर्कसमध्ये जागा द्या आणि महाराष्ट्राचा कारभार पुन्हा गंभीरपणे जनतेच्या भल्यासाठी राज्य चालवणार्यांच्या हाती द्या.