‘फेब्रुवारी १९८९च्या महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेना हा जातीय पक्ष आहे असे आम्ही मानीत नाही, उलट आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सत्तारूढ काँग्रेसला पराभूत करण्यासाठी शिवसेनेसह सर्व पक्षांनी एकत्र यावे’ असे आवाहन महाराष्ट्र भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष गोपीनाथ मुंडे यांनी केले. त्यानंतर भाजपाचे खासदार व नेते प्रमोद महाजन यांनी संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना केंद्रीय कार्यकारिणीला शिवसेना-भाजपा युती मान्य असल्याचे सांगितले. त्याचवेळी श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांनी मुंबईत सांगितले की, तुम्ही मुस्लीम लीगला घेता, मग आम्ही शिवसेनेला का वगळायचं? त्याचवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सोलापूर येथे जाहीरपणे सांगितले की, शिवसेना आणि भाजपाची युती ही केवळ सत्तेसाठी नसून हिंदुत्वाच्या रक्षणासाठीच आहे. लोकसभेनंतर १९९० सालची विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपाने प्रथमच एकत्रितपणे लढवली आणि घवघवीत यश संपादिले.
१९९० साली झालेली विधानसभा निवडणूक जिंकायचीच आणि महाराष्ट्राच्या विधानभवनावर भगवा झेंडा फडकावयाचा असा निर्धार शिवसेना-भाजप युतीने केला. शिवसेनाप्रमुखांच्या आणि खासदार प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली गेली. युतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज झाले. महाराष्ट्रभर प्रचाराची राळ उडवली. युतीच्या कार्यकर्त्यांच्या बैठका, पदाधिकार्यांसाठी मार्गदर्शन मेळावा, छोट्या-छोट्या कॉर्नर सभा, प्रचंड जाहीर सभा यांनी महाराष्ट्राचे वातावरण ‘भगवामय’ झाले होते. शिवसेना नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार साहित्य समिती, प्रचार दौरे समिती, माहिती व जनसंपर्क समिती अशा वेगवेगळ्या समित्या नेमून निवडणूक प्रचारकार्य सुरू केले. शिवसेनेने शिस्तबद्ध प्रचार केला.
१९९०च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनाप्रमुखांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्याबरोबर सर्वश्री मनोहर जोशी, दत्ताजी साळवी आणि शिवसेनेची सर्व नेतेमंडळी सहभागी झाली होती. त्यांची पहिली सभा फेब्रुवारीमध्ये कोल्हापूर येथे सकाळी १०.३० वाजता झाली. त्यांनी भवानी मातेचे दर्शन घेतले. मातेच्या चरणी कुंकुमतिलक लावून विजयासाठी प्रार्थना केली. त्यावेळी सारी करवीरनगरी भगवी करण्यात आली होती. संध्याकाळच्या सभेत शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांना आव्हान दिले. ते म्हणाले, ‘शरद पवार यांची हिंमत असल्यास त्यांनी माझ्याशी कोणत्याही व्यासपीठावर जाहीरपणे चर्चा करून दाखवावी. यामध्ये मी पराभूत झाल्यास त्यांचे पाय धरीन.’
शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिक कसा असावा याची व्याख्या एका सभेत केली. ‘शिवसैनिकाने शिवरायांसारखं देशभक्त असावं, संभाजीराजांप्रमाणे धर्माभिमानी असावं, बहिर्जी नाईकांसारखे चौकस आणि जागरूक असावं. विरोधी क्षुद्र जंतूंचा नाश करताना त्याने सूर्यासारखं प्रखर असावं, आपल्या मराठी बांधवांची सेवा करताना त्याने चंद्रासारखं शीतल असावं, नेत्याच्या शब्दाखातर प्राणाची आहुती देणार्या तानाजीसारखं निष्ठावान असावं आणि मराठी माणसाचं हित हे त्याच्या नजरेसमोर ध्रुवतार्यासारखं चमकत असावं!’
मराठवाड्यात त्यांनी परळी, लातूर, नांदेड येथे सभा घेतल्या आणि शिवसेना-भाजप युती भक्कम सरकार देईल अशी ग्वाही दिली. तुळजापूर येथे बोलताना ते म्हणाले, ‘मतांसाठी आणि सत्तेसाठी पदोपदी थापा मारणार्यांना, भ्रष्ट पुढार्यांना आता त्यांच्या खुर्च्यांसकट फेकून देण्याची वेळ आली आहे.’ त्यांनी मराठवाड्याच्या जनतेला मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर कधीही होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. पत्रकारांचा गैरसमज दूर करण्यासाठी ते मुंबईत पत्रकार परिषद घेऊन म्हणाले, ‘रणरणत्या उन्हात अतिविराट सभा होऊनही त्या सभेचं वर्णन फज्जा उडाला असं ज्या पत्रकारांनी केलं, त्या पत्रकाराला आपण घुबड असं म्हणतो. अन्य पत्रकार मित्र आमचे बांधवच आहेत.’
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा झाल्यावर शिवसेनाप्रमुख कोकणात गेले. रत्नागिरी येथे सभा घेताना त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन पर्व सुरू झाल्याचे घोषित केले. रायगड जिल्ह्यातही त्यांचे अभूतपूर्व स्वागत झाले. त्यांच्या झंझावाताने काँग्रेस आणि शेकाप दोघांचेही बुरूज ढासळून गेले. फेब्रुवारीच्या शेवटी शेवटी त्यांनी विदर्भाचा दौरा केला. या दौर्यात देशातून काँग्रेसला कायमचे गाडून टाकण्याचे आवाहन त्यांनी केले. मग शिवसेनाप्रमुख गेले खानदेशात. जळगाव, सिन्नर, नांदगाव या ठिकाणी तुफान सभा केल्या. त्यांनी कोपरगाव आणि शिर्डी येथेही भेटी दिल्या आणि वातावरण शिवसेनेला अनुकूल झाले.
निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत ‘सामना’ने दोन अग्रलेख लिहिले. त्यांचा एक अग्रलेख होता, ‘येता मंगळवार हा मंगलवार…’ तर दुसरा अग्रलेख होता, ‘पराकाष्ठा आमची, सत्वपरीक्षा तुमची!’ अशा प्रकारचे विविध अग्रलेख लिहून ‘सामना’ने प्रचाराचे रान उठवले. एका बाजूने बाळासाहेबांच्या प्रचंड सभा तर दुसर्या बाजूने ‘सामना’तून प्रचार. निवडणूक प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी अपार मेहनत घेऊन जयंत जाधव यांच्या सहकार्याने ‘आव्हान आणि आवाहन’ ही चित्रफीत बनविली. बाळ कुडतरकर यांच्या आवाजात्ाील निवेदन आणि प्रभावी चित्रीकरणामुळे ही फिल्म प्रचारात ‘हिट’ ठरली. यासाठी ‘व्हिडिओ रथ’ वापरून शिवसेनेने गावोगावी प्रचार रणधुमाळी पोहोचविली. शिवसेनाप्रमुख स्वतः निवडणुकीच्या दिवशी मुंबईत फेरफटका घेऊन शिवसैनिक प्रोत्साहन देत होते.
निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा संपला. महाराष्ट्रात सर्वत्र ६० टक्के मतदान झाले. शिवसेना-भाजप युती महाराष्ट्र जिंकणार असे वाटू लागले, परंतु प्रत्यक्षात निवडणुकीचे निकाल मात्र वेगळे आले आणि सेना-भाजप युतीचे महाराष्ट्राच्या विधान भवनावर भगवा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण होता होता राहिले. काँग्रेस १४२, शिवसेना ५२, भाजप ४१, जनता दल २५ उर्वरित ४८ इतर पक्ष व अपक्ष आमदार निवडून आले. शिवसेनेचे एकूण ५२ आमदार निवडून आले आणि प्रबळ विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेचा प्रथमच महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश झाला. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेता म्हणून मनोहर जोशी यांची निवड झाली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाला शिवसेना-भाजप युतीच्या ९३ आमदारांनी भगवे फेटे परिधान करीत प्रवेश केला. त्यामुळे विधानभवन परिसर भगवामय झाला होता. याच वर्षी शिवसेनाप्रमुख आणि मीनाताई ठाकरे या दोघांनी अनाथ वृद्धांची सोय व्हावी म्हणून खोपोली (रायगड) येथे रमाधाम वृद्धाश्रम बांधला. ऑगस्ट १९९०मध्ये तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी दोन्ही सभागृहात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात येतील असे सांगितले. मंडल आयोगाच्या शिफारशींचे देशातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत केले. परंतु जातपात न पाळणार्या शिवसेनेने विरोध दर्शविला. त्यावेळी छगन भुजबळ यांनीही विरोध केला होता. परंतु त्याच छगन भुजबळांनी मंडल आयोगाच्या प्रश्नावरून शिवसेना सोडली. दरम्यान, अयोध्येतील रामजन्मभूमीवर शिलान्यास करण्याचा संकल्प हिंदुत्ववादी संघटनांनी सोडला. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ‘सोमनाथ ते अयोध्या’ यात्रेचे सर्वत्र स्वागत होत होते. परंतु ही यात्रा बिहारमधून जात असताना अडवाणी यांना समस्तीपूर येथे अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ शिवसेना-भाजपसह इतर हिंदुत्ववादी संघटनांनी भारत बंद पुकारला आणि तो शंभर टक्के यशस्वी ठरला. या बंदमध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा होता.