गुलजार यांनी ‘मेरे अपने’ हा दिग्दर्शित केलेला पहिला हिंदी चित्रपट १९७१मध्ये आला होता. इंदर मित्रा यांच्या सहाय्याने त्याची कथा व पटकथा त्यांनी लिहिली होती. वास्तवात ती शुद्ध कॉपी होती. एखादा सिनेमा दुसर्या सिनेमावर बेतणे वेगळं आणि फ्रेम टू फ्रेम एखाद्या सिनेमाची कॉपी करणं वेगळं. थोडाफार गेटअप, पार्श्वभूमी आणि कथानक बदलून अमुक एक सिनेमा वा कादंबरी यावर अमका चित्रपट बेतलेला आहे असं करणं वेगळं आणि मूळ चित्रपटातील पात्रांच्या नावासह, सीन्ससह, कॅमेरा पोझिशनसह सिनेमा काढणे, ही उचलेगिरीच असते. तर १९६८मध्ये आलेल्या ‘आपनजन’ (आपली माणसं) या बंगाली सिनेमावरून एन. सी. सिप्पी यांनी ‘मेरे अपने’ निर्मिला होता. ‘आपनजन’चं वैशिष्ट्य असं होतं की या सिनेमाआडून बंगालमधील राजकीय स्थितीवर मार्मिक भाष्य केलं गेलं होतं.
केवळ आजच्याच काळात राजकारणात तरुणांचा ‘वापर’ होतोय असं नाही. राजकारणाच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे गुन्हेगारी आणि हिंसाचार! बेरोजगार तरुणांच्या गरम रक्ताचा वापर हिंसक कारवायासाठी करणं पूर्वी देखील सुलभ होतं, आजही आहे आणि कदाचित भविष्यात देखील राहील. भारतीय राज्यव्यवस्थेतील तरुणांचे शोषण हा विषय पहिल्यांदा पडद्यावर आणण्याचे श्रेय याच सिनेमाला जातं. या सिनेमाने कोलकात्याचा शहरी बकाल भाग जगासमोर आणताना राजकीय हिंसाचाराची गरज असणारं शहरीकरण खुबीने मांडलं होतं. या चित्रपटाचा प्रभाव इतका राहिला की दोन वर्षांनी दस्तूरखुद्द सत्यजित राय यांनी कोलकाता ट्रिलॉजी हा विषय समोर ठेवून ‘प्रतिद्वंद्वी’ काढला, तर त्यानंतर काही दिवसांत मृणाल सेन यांचा ‘इंटरव्ह्यू’ हा अशाच कथेवरचा निवेदन शैलीतला चित्रपट येऊन गेला.
याच काळात निर्माता एन. सी. सिप्पी यांचे चिरंजीव रोमू सिप्पी अभिनेत्री सुचित्रा सेनची फटाकडी मुलगी मूनमून सेन हिच्यापुढे दाणे टाकत होते, खरे तर ‘बडे बाप की रंगीली औलाद’ अशी त्यांची कुख्याती होती! मूनमून सेनला त्यांनी हिंदीत पदार्पणाचा शब्द दिला आणि त्यासाठी तिलाच चित्रपट निवडायला सांगितला, तिने निवडला बिजय बोस-हेमंत कुमार यांचा ‘बाघिनी’! दारू अड्ड्याची कथा असलेला हा नायिकाप्रधान सिनेमा तिकीटबारीवर साफ झोपेल हे एन.सी. सिप्पी यांनी अचूक ताडले आणि आपल्या मुलाला त्यांनी बागेतून गोल फिरवून आणलं! त्यांनी त्याच वर्षीचा दुसरा बंगाली चित्रपट आपल्या बॅनरसाठी निवडला, पोराला सांगितलं की तुझ्या प्रेयसीला साजेसा रोल आहे. पण प्रत्यक्षात स्थिती उलटी होती. कथेच्या गरजेनुसार जरठ वृद्धेची गरज होती, अर्थातच मूनमून सेनने नकार दिला आणि हिंदी सिनेमाने काही काळासाठी तरी सुटकेचा श्वास सोडला! रोमूने अंग काढून घेऊ नये म्हणून एन. सी. सिप्पींनी आपला दुसरा मुलगा राज सिप्पी यालाही सहनिर्माता केला आणि गुलजारजींच्या खांद्यावर सगळं ओझं टाकून ते मोकळे झाले. गुलजारजींनी पात्रांना आणि संवादांना मिडास टच दिला आणि चित्रपट सुपरहिट झाला.
एन. सी. सिप्पी हा भला माणूस होता. त्याचं जीवनावर विलक्षण प्रेम होतं. आयुष्याचा अर्थ शोधणार्या कथांच्या मागावर ते असायचे. ‘खूबसुरत’, ‘गोलमाल’, ‘आलाप’, ‘मिली’, ‘चुपके चुपके’, ‘आनंद’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘बावर्ची’, ‘गुड्डी’, ‘आशीर्वाद’, ‘साधू और शैतान’, ‘पडोसन’, ‘दिवाना’, ‘आस’ ही त्यांची समृद्ध निर्मिती होती. हा प्रत्येक सिनेमा रसिक प्रेक्षकाच्या जडणघडणीत हातभार लावणारा होता. याखेरीज ‘सदमा’ आणि ‘सत्ते पे सत्ता’सारख्या सिनेमांचे ते प्रस्तुतकर्ता होते. हृषिकेश मुखर्जी आणि गुलजार हे त्यांचे खास मित्र! एन. सी. सिप्पींनी ‘आपनजन’चा विषय समोर ठेवताच गुलजार कामाला लागले.
‘मेरे अपने’ ही एका वृद्धेची कथा. आनंदी देवी ही विधवा वृद्धा गावात एकटीच राहत असते. एके दिवशी तिचा दूरचा नातलग अरुण तिला भेटायला येतो. रक्ताचे आप्त असताना एकट्या वृद्ध बाईने इथं का राहावं, असं म्हणून तिचं मतपरिवर्तन करून तो तिला शहरात घेऊन जातो. त्याच्या घरी पत्नी लता आणि लहान मूल इतक्याच व्यक्ती असतात. काही दिवसातच आनंदीला लक्षात येतं की लता आणि अरुणला एका मोलकरणीची गरज होती, म्हणूनच आपल्याला इथं आणलं गेलंय. तिथे तिचे खटके उडू लागतात. त्याचं पर्यवसान घरातून तिच्या हकालपट्टीत होतं. बेघर आनंदीला फुटपाथवरला बिट्टू हा भिकारी पोर आपल्या फाटक्या, भकास घरात घेऊन जातो, तिला छप्पर देतो. ती त्याला माया देते, प्रेम देते आणि सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करते. त्याच वस्तीत शाम आणि छेनू हे बंडखोर विचारांचे तरुण राहत असतात, ज्यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत हाणामार्या होत असतात. अन्यायाविरुद्ध लढणारा तरणाबांड श्याम (विनोद खन्ना) हा त्यातल्या त्यात बरा तर छेनू (शत्रुघ्न सिन्हा) हा गुंडप्रवृत्तीचा खलनायकीकडे कल असणारा भरकटलेला तरुण. या दोघांचा संघर्ष मिटावा म्हणून आनंदी प्रयत्न करते, अखेरीस अशाच एका हाणामारीच्या घटनेत ती मृत्युमुखी पडते आणि दोघांना जगण्याचं वास्तव उमजतं, अशी याची कथा होती.
‘मेरे अपने’साठी गुलजारनी कास्टिंग अफलातून केलं होतं. आनंदी देवीसाठी मीनाकुमारी, श्यामसाठी विनोद खन्ना आणि शत्रुघ्न ाfसन्हा झाला होता छेनू! याच सिनेमापासून शत्रूला छेनूची उपाधी कायमची चिकटली. करूणरसाने ओतप्रोत भरलेल्या आनंदीदेवीच्या रोलसाठी मीनाकुमारीला विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. या काळात तिच्या आयुष्यातले सर्वात वाईट दिवस सुरू होते. ती सेटवर देखील आपला ‘कोटा’ पर्समध्ये बाळगून असे. ती दारू प्यायली, पण त्याचा प्रपोगंडा तिनं कधी केला नाही. दुःख रिचवण्याचा एकदम साधा मार्ग तिने निवडला होता. विशेष म्हणजे यानं तिची बदनामी झाली नाही. तिला सहानुभूती मिळाली, पण निर्मात्यांची खपामर्जी झाली. ‘मेरे अपने’मधल्या आनंदी देवीचं सगळं आयुष्य हलाखीच्या जीवनात आणि दुःखाच्या सागरात बुडालेलं आहे, ते मीनाने तंतोतंत साकारले. तगडा विनोद खन्ना श्यामच्या भूमिकेत खूप भाव खाऊन गेला. खरे तर या माणसाची इंडस्ट्रीने योग्य कदर कधीच केली नाही. विनोद खन्नाने संन्यास घेऊन ओशोंचे शिष्यत्व स्वीकारलं आणि काही वर्षांनी जेव्हा पुनरागमन केलं, तेव्हा एन. सी. सिप्पींचा मुलगा राज सिप्पीनेच त्याला ‘सत्यमेव जयते’तून नव्याने ब्रेक दिलेला.
याच ‘मेरे अपने’मध्ये ‘कोई होता अपना जिसको हम अपना कहते…’ हे किशोरकुमार यांनी गायलेलं अजरामर गाणं होतं, जे अजूनही ताजे टवटवीत वाटते. ‘आपनजन’मधील खलनायकाचे नाव झेनो होते, तेच ‘मेरे अपने’मध्ये किरकोळ बदल करून छेनू हे नाव कायम करण्यात आलं आणि शत्रूला फेमस करून गेलं. रमेश देव आणि सुमिता सन्याल यांनी अरुण आणि लताची भूमिका साकारली होती. देवेन वर्मा, डॅनी, योगिता बाली, असरानी, पेंटल, मेहमूद, असित सेन, केश्तो मुखर्जी, लीला मिश्रा, ए. के. हंगल अशी मोठी कास्ट चित्रपटात होती. अॅक्शन, ड्रामा, कॉमेडी सगळं काही ठासून भरलेलं होतं. खटकेबाज संवाद होते. शत्रूची संवादफेक इथं खूप प्रभावी ठरली, तर साध्या शेड्सच्या श्यामच्या भूमिकेतला विनोद खन्नाचा सहज वावर सुखावून गेला.
तब्बल पाच दशकांपूर्वीचा ‘मेरे अपने’ आजदेखील आपल्याला लागू पडतो. आजही समाजात अनेक वृद्धांना आपल्याच घरात कामवाल्याची भूमिका निभावावी लागते, आजही अनेक भरकटलेले तरुण राजकारण्यांच्या आहारी जाऊन आयुष्याचं वाटोळे करून घेताना दिसतात. ‘मेरे अपने’मध्ये दिसणारा मध्यमवर्गीय समाजाचा बधीरपणा आता अधिक टोकदार झालाय आणि त्यात दाखवलेली गरिबी आता अधिक बीभत्स आणि आक्रमकही झालीय. ही माणसं माझी माणसं म्हणून आपण जोवर खरोखर स्वीकारत नाही, तोवर ‘मेरे अपने’ऐवजी ‘अपने पराये’च होत राहणार.
मध्यंतरी ‘टिकटॉक’पासून इन्स्टाग्रामपर्यंत सर्वत्र ‘मेरे अपने’ची हवा होती. या अॅप्सवरती ‘श्याम कहां है…’ हा छेनू उर्फ शत्रुघ्नचा फेमस डायलॉग ट्रेंडमध्ये होता. शत्रूच्या प्रश्नाला मीनाकुमारीच्या आनंदी देवीनं दिलेलं उत्तर (वो तो बिट्टू को लेकर दवाखाने गया है…) मीनाकुमारीच्या दर्दभर्या अंडरटोन्ड अनुनासिक आवाजाची ओळख पटवून देतं. ‘मेरे अपने’च्या तारेतारकांपैकी मोजकेच लोक हयात आहेत, मात्र यात दाखवलेली समस्या हद्दपार झाली नसून या दशकात तर तिने पूर्ण ताकदीने फणा काढलाय! विशेष बाब म्हणजे जे द्वेषाचे, भेदाचे राजकारण करतात, त्यातले बहुसंख्य जण आपल्या मातापित्यांना उतरत्या वयात दूर लोटतात आणि समाजात मात्र आपला धर्म थोर असून मातापित्याचे रक्षण करण्याचे, पालनपोषण करण्याचे टुमणे लावतात. अशा अव्वल दुटप्पी लोकांना मागील आठ-नऊ वर्षात सोन्याचे मूल्य लाभलेय.
‘मेरे अपने’सारखीच तरुणांच्या विद्रोहाची कथा असणारे ‘अर्जुन’, ‘घायल’ आणि ‘अंकुश’ हे सिनेमे येऊन गेले. त्यांनी यशही जोरकस मिळवले होते. अलीकडच्या काळातील ‘गँग्ज ऑफ वासेपूर’मध्येही याच समस्येवर प्रहार होते, ‘राजनीती’मध्येही तरुणांचाच विद्रोह होता, मात्र त्याचा दृष्टिकोन अगदी भिन्न होता. नुकत्याच येऊन गेलेल्या ‘गरमी’ या वेबसीरिजमध्येही असाच विषय होता. आपण सिनेमे पाहतो. मात्र त्यापासून काहीच बोध घेत नाही हेही एक वास्तवच आहे.
या सर्व सिनेमांत ‘अंकुश’ उठून दिसला होता. या चित्रपटात मुंबईतील चार निम्न मध्यमवर्गीय बेरोजगार तरुणांची कथा होती, ज्यांना खरे तर आपण समाजापासून तुटल्यासारखेही वाटते आणि त्याच गिल्टपायी आपले आयुष्य ते अक्षरश: वाया घालवतात. एके दिवशी या चार तरुणांच्या शेजारी नवे कुटुंब वस्तीस येते. एक सुंदर तरुण मुलगी अनिता आणि तिची आजी, त्या चौघांचे विचार त्या बदलून टाकतात. १९८०च्या भारतातील सामान्य, प्रामाणिक आणि मेहनती समाजात मिसळण्याचा प्रयत्न करतात. परंतु अनिताचे अपहरण करून तिच्या मालकाच्या आणि त्याच्या मित्रांच्या हातून सामूहिक बलात्कार केला जातो. मात्र पुराव्याअभावी दोषींना सोडून दिले जाते आणि अनिता आत्महत्या करते. व्यवस्थेबरोबरच कायद्यावरील विश्वास गमावल्यामुळे ते चौघे आपला सन्मार्गाचा रस्ता बदलतात. अनितावर अत्याचार करणार्या प्रत्येक गुन्हेगाराचा बदला घेतात. त्यांना क्रूरपणे ठार मारतात. या चौघांवर नंतर खटला चालवला जातो. त्यांना जे योग्य वाटले ते केल्याबद्दल चौघांनाही मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली जाते. यावेळी त्यांनी केलेली विनंती महत्वाची होती. पुन्हा कधीही मोडता येणार नाही अशा मजबूत कायद्याची विनंती त्या चौघांमार्फत केली जाते! हा सिनेमा गुलजार यांचे दिग्दर्शन सहाय्यक एन. चंद्रा यांचा पदार्पणाचा सिनेमा होता, हा योगायोग नाही.
या सर्व सिनेमांत तरुणांच्या प्रश्नास बगल न देता सामान्य माणसांना समजेल अशा पद्धतीने त्यांची मांडणी केली गेलीय. कदाचित त्यामुळेच हरेक कालखंडाच्या पायरीवर विद्रोही तरुणांच्या कथा हिंदी सिनेमात नेटकेपणाने सादर होत राहिल्यात. परिणामी हे तरुण सर्वांसाठी नेहमीच ‘मेरे अपने’ राहिलेत!