महागड्या खेळाडूंकडून कामगिरीत निराशा आणि कमी किंमतीत संघात आलेल्या खेळाडूंची मौल्यवान कामगिरी, हे तसे ‘आयपीएल’साठी नवे नाही. पण यंदाच्या हंगामात ही तफावत प्रकर्षाने दिसून आल्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर आधारित मूल्यमापन पद्धती हवी, ही मागणी जोर धरू लागली आहे.
– – –
आर्थिक वर्षसमाप्तीचा दिवस म्हणजे ३१ मार्च. त्यानंतर जसे सर्वच आर्थिक ताळेबंद मांडले जातात. त्यानंतर येणारा एप्रिल महिना हा अपेक्षांचा असतो. कर्मचार्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक प्रतीक्षेचा क्षण म्हणजे ‘अप्रेझल’. त्याच्या मागील वर्षीच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करून त्याला पगारवाढ आणि बढती देण्याची एक कॉर्पोरेट प्रक्रिया. ही पत्रे बहुतांश कंपन्यांमध्ये एप्रिलमध्ये मिळतात. इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये उलटा प्रकार आहे. आधी अप्रेझल आणि नंतर काम… आधी दाम, नंतर काम! ‘आयपीएल’चा १६वा हंगाम आता अंतिम टप्प्याकडे मार्गक्रमण करीत आहे. विविध संघांमधले खेळाडू आणि त्यांची कामगिरी यांचे शल्यविच्छेदन आता होऊ लागले आहे. खेळाडूंवर फ्रँचायझीने केलेली गुंतवणूक आणि त्याची हंगामातील प्रत्यक्षातील कामगिरी यातील तफावत कोणाही क्रिकेटप्रेमींच्या नजरेतून अजिबात सुटलेली नाही.
सॅम करन हा ‘आयपीएल’च्या इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटपटू. यंदाच्या लिलावात त्याच्यासाठी पंजाब किंग्जने १८.५ कोटी रुपयांची बोली लावली. पण विझण्यापूर्वी ज्योत तेजाने जळते, याप्रमाणे करनची कामगिरी अखेरच्या सामन्यात दिसली. तोवर त्याच्या संघाने स्पर्धेतून गाशा गुंडाळलेला होता. करनने १४ सामन्यांत २७६ धावा केल्या आणि १० विकेट्स घेतल्या. सगळ्यात महागडा खेळाडू आपल्या संघाला पुढच्या फेरीत घेऊनही जाऊ शकला नाही. लिलावात दुसर्या क्रमांकाची १७.५ कोटी कमाई करणार्या मुंबई इंडियन्सच्या कॅमरन ग्रीनने आतापर्यंत १३ सामन्यांत २८१ धावा केल्या आणि ६ विकेट्स घेतल्या. म्हणजे यथातथा कामगिरी. इंग्लंडच्या बेन स्टोक्सची स्थितीही काही वेगळी नव्हती. त्याच्यावर चेन्नई सुपर किंग्जने १६.२५ कोटी रुपये खर्च केले. पण दोन सामन्यांत १५ धावा आणि एकही बळी नाही, अशी त्याची सुमार कामगिरी. सनरायजर्स हैदराबादचा इंग्लिश क्रिकेटपटू हॅरी ब्रुकसाठी प्रâँचायझीने १३.२५ कोटी खर्च केले. पण यंदाच्या ‘आयपीएल’मधील पहिले शतक झळकावणार्या ब्रूकने १० सामन्यांत मिळून फक्त १९० धावा काढल्या आहेत. संघांनी केलेल्या गुंतवणुकीला न्याय देणारी कामगिरी लिलावात टॉपची किंमत घेणार्या एकाही खेळाडूकडून झालेली नाही, ही धक्कादायक वस्तुस्थिती आहे.
यात आणखी भर पडते ती मुंबई इंडियन्सच्याच जोफ्रा आर्चरची. जगातील सर्वात वेगवान गोलंदाज ही त्याची खासियत. परंतु दुखापतीची पूर्ण माहिती त्याने आपल्या फ्रँचायझीला दिली नाही. तो पाच सामने खेळला. पण लय हरवलेला जोफ्रा फक्त दोन बळी मिळवू शकला. त्यामुळेच भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी त्याच्यावर तोफ डागताना जोफ्राला एकही रुपया देऊ नये, असे म्हटले आहे. जोफ्रा हंगाम अर्धवट टाकून उपचारासाठी मायदेशी परतला आहे. पण मुळात पूर्णपणे तंदुरुस्त नसताना तो मूळात भारतात आलाच का, हा प्रश्न चर्चेत आहे. गुजरात टायटन्सच्या केन विल्यम्सनलाही (दोन कोटी) दुखापतीमुळे माघारी परतावे लागले. सव्वा आठ कोटी रुपये कमावणार्या हैदराबादच्या मयांक अगरवालनेही (९ सामन्यांत १८७ धावा) घोर निराशा केली.
त्या तुलनेत कमी मानधन घेणार्या अनेक खेळाडूंनी अधिक लक्षवेधी कामगिरी केली. यात सर्वात पहिले नाव घेतले जाते ते कोलकाता नाइट रायडर्सने रिंकू सिंगचे. रिंकूला लिलावात फक्त ५५ लाख रुपये मानधनाची रक्कम ठरली आहे. पण त्याने १४ सामन्यांतल्या चार सामन्यांत ४७४ धावा काढल्या. गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्ध विजयासाठी ५ चेंडूंत २८ धावांची आवश्यकता असताना रिंकूने खेचलेल्या पाच षटकारांचे कवित्व ‘आयपीएल’च्या इतिहासात अजरामर राहील. याशिवाय आणखी काही विजयांत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यातही त्याने विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण विजय थोडक्यात निसटला. प्रारंभीच्या सामन्यात सूर्यकुमार यादवसह मुंबई इंडियन्सचे दिग्गज फलंदाज धावांच्या दुष्काळाला सामोरे जात असताना १ कोटी, ७० लाख रुपये किंमतीचा तिलक वर्मा (९ सामन्यांत २७४ धावा) संघाला आत्मविश्वासाने तारत होता. लखनौच्या यश ठाकूरने (४५ लाख) आठ सामन्यांत १० बळी मिळवले. चेन्नईचा अजिंक्य रहाणे (दोन वेगवान अर्धशतकांसह २८२ धावा), दिल्लीचा इशांत शर्मा (१० बळी), लखनौचा अमित मिश्रा (७ बळी), मुंबईचा पियूष चावला (२० बळी) या क्रिकेटपटूंवर लिलावात प्रत्येकी ५० लाख रुपयांची बोली लागली. पण त्यांची कामगिरी त्याहून कित्येक पटीने उत्तम झाली. कोलकाताच्या सुयश शर्माने जादूई फिरकीच्या बळावर १० बळी मिळवले. पण त्याचे मानधनही फक्त २० लाख रुपये आहे.
महागड्या खेळाडूंकडून कामगिरीत निराशा आणि कमी किंमतीत संघात आलेल्या खेळाडूंची मौल्यवान कामगिरी, हे तसे ‘आयपीएल’साठी नवे नाही. पण यंदाच्या हंगामात ही तफावत प्रकर्षाने दिसून आल्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर आधारित मूल्यमापन पद्धती हवी, ही मागणी जोर धरू लागली आहे. आता आयपीएलच्या धुरीणांनी यावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
खेळाडू मूल्यमापन मानधनपत्र
खेळाडूचे नाव : जोफ्रा आर्चर
संघ : मुंबई इंडियन्स
शेरा : Below Expectation (BE) अपेक्षेपेक्षा खराब
जोफ्रा तंदुरुस्तीअभावी अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याचे त्याच्या मूल्यमापनातून सिद्ध होते. जोफ्राने मुंबई इंडियन्सच्या वेगवान मार्याची धुरा सांभाळावी आणि संपूर्ण हंगामात किमान २० बळी मिळवणे अपेक्षित होते. परंतु तंदुरुस्ती नसल्याने जेमतेम ५ सामने खेळू शकलेला जोफ्रा फक्त २ बळी मिळवू शकला. त्यामुळे त्याला अपेक्षेपेक्षा खराब कामगिरी असा शेरा देण्यात येत आहे. त्यामुळे लिलावात ठरलेल्या ८ कोटी रुपये मानधनापैकी त्याला २,२४,९९,९९९ रुपये देण्याचे मूल्यमापन आराखड्यानुसार निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय पुढील वर्षी त्याला संघात स्थान देण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, असे निर्देश प्रशिक्षक मंडळाला देण्यात आले आहे.
– – –
मूल्यमापन मानधन आराखडा
लिलावाद्वारे निश्चित झालेले एकूण उत्पन्न : ८,००,००,००० रुपये
(१४ संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचल्यास १७ सामने खेळणे बंधनकारक राहील.)
प्रत्येक सामन्याचे मानधन : ५७,१४,२८६ रुपये
५ सामने खेळल्याबद्दल मानधन : २,८५,७१,४२८ रुपये
(खेळाडूचे तंदुरुस्तीअभावी सामना खेळू न शकल्यास तेवढ्या सामन्याचे सरासरी उत्पन्न वजा होईल.)
निश्चित मानधन : १,४२,८५,७१४ रुपये
कामगिरीवर आधारित कमाल मानधन : १,४२,८५,७१४ रुपये
(खेळलेल्या सामन्यांनुसार मानधनापैकी निम्मी रक्कम कामगिरीवर आधारित राहील.)
मूल्यमापनानुसार कामगिरीवर आधारित मानधन : १४,२८,५७१ रुपये
एकूण मानधन : २,९९,९९,९९९ रुपये
तंदुरुस्तीची बाब न कळवल्याबद्दल दंड : ७४,९९,९९९ रुपये
(एकूण रकमेच्या २५ टक्के)
अंतिम एकूण मानधन : २,२४,९९,९९९ रुपये