मार्मिकच्या मुखपृष्ठावर स्थानिक राजकीय विषय आणि राष्ट्रीय विषय अधिक असत. आंतरराष्ट्रीय विषयांवर बाळासाहेबांनी कारकीर्दीच्या सुरुवातीलाच फ्री प्रेस जर्नलमध्ये अनेक व्यंगचित्रे काढली होती आणि ती आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजली होती. इथे तुलनेने दुर्मीळ असणारा आंतरराष्ट्रीय विषय बाळासाहेबांनी चित्रित केला आहे. हे आहे जून १९८१च्या एका अंकातील मुखपृष्ठ. पूर्व पाकिस्तानला पश्चिम पाकिस्तानपासून (ज्याला आज आपण पाकिस्तान म्हणून ओळखतो) तोडून स्वतंत्र बांगलादेशाची स्थापना करणारे वंगबंधू शेख मुजीबुर रहमान त्यात दिसत आहेत. ते आपल्या कबरीबाहेर येऊन बसले आहेत आणि शेजारच्या रिकाम्या कबरीकडे बोट दाखवून दुरून येणार्या अभ्यागताला सांगत आहेत की मी आलो तेव्हाच तुमच्यासाठी ही खणली गेली होती. हे आहेत लेफ्टनंट जनरल झिया ऊर रहमान. १९७५ साली लष्कराच्या काही अधिकार्यांनी बंड करून मुजीबुर रहमान यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची हत्या केली होती. त्यानंतर काही काळाने झिया ऊर रहमान हे बांगलादेशाचे अध्यक्ष बनले. मुजीबुर रहमान यांच्या अवामी लीग पक्षाने वंगबंधूंच्या हत्येच्या कटाचे एक सूत्रधार झियाऊर होते, असा आरोप कायम केला होता. झियाऊर रहमान यांचीही हत्याच झाली. त्या हत्येनंतरचा हा अंक आहे… आपण दुसर्यासाठी कबर खणतो तेव्हा आपलीही कबर खणली जात असते, हा फार मोलाचा धडा या व्यंगचित्राने दिला आहे… आपल्याकडच्या आजच्या मस्तवाल सत्ताधीशांनी आवर्जून गिरवावा असा… अन्यथा त्यांचीही कबर आताच तयार झालेली आहे.