इंदूरमध्ये राहून मराठी भाषेची सेवा करण्याचा वसा घेतलेले बहुआयामी कलावंत, लेखक, कवी श्रीकृष्ण बेडेकर यांचे ‘शब्ददर्वळ’ दिवाळी अंकातील संपादकीय चुरचुरीत, खुसखुशीत दंभस्फोटासाठी प्रसिद्ध आहे. यंदाच्या या ‘संतापकीया’त त्यांनी शी जिनपिंग यांच्याबरोबरच्या काल्पनिक भेटीचा फर्मास वृत्तांत रंगवला आहे.
—-
या उतारवयात आम्ही दररोज पहाटफेरी करून आल्यावर आम्हाला सपाटून भूक तर लागतेच; परंतु त्याव्यतिरिक्त शांतपणे झोपपण लागते आणि यामुळेच मंगेश पाडगांवकर व स्वरलतेवर –
`नीऽऽज माझ्या नंदऽऽलाऽऽलाऽऽ, नंदलाऽऽला रेऽऽ’
गुणगुणत आम्हाला थोपटून झोपवायची पाळी येत नाही. उलट आम्हाला अफलातूनशी स्वप्नं पडतात. नुसती स्वप्नं पडतात असं नव्हे; तर ती मोबाईल या कर्णपिशाच्याच्या साक्षीने पडतात. त्यामुळे आम्ही स्वप्नातही कुणाशी बोलत तरी असतो िंकवा कुणाचं बोलणं ऐकत तरी असतो. अशात अनावधानाने एकदा आमच्याकडून एक आंतर्राष्ट्रीय कॉल लागला आणि `हिन्दी चिनी भाई भाई’ ही रिंगटोन थांबताच पलीकडून शब्द आले –
`नमस्कार बेडेकरसाहेब, बोला, माझ्याकडे तुमचा नंबर सेव्ह आहे.’
त्यावर भांबावून आम्ही विचारलं, `आपण कोण बोलताहात ते कळेल का?’
`मी तुमचा शेजारी, चीनचा महाप्रतापी राष्ट्रपती शी जिनिंपग’ इतकं बोलून होताच तो कॉल मध्येच कट झाला. बीएसएनएलकडून याहून अधिक काय अपेक्षा धरणार! तेव्हा आम्ही आमच्या त्या स्वप्नालाच चिमटा घेत, पुन्हा तोच नंबर लावला, फिरून तेच शब्द कानी आले. मग किंचित धाडस करत तोंड उघडलं –
`हा तर मोठाच भाग्ययोग! आपली भेट झाली; पण आपण चक्क आमच्या मराठी भाषेत बोलताहात हे कसं? अलीकडे ९० टक्के मराठी माणसं घरात अन् संपूर्ण महाराष्ट्रातही इतकी अस्खलित मराठी बोलत नाहीत. हे काय गौडबंगाल आहे? मला आपली एक्स्ल्युझिव मुलाखत घ्यायला आवडेल.’
प्रेसिडेंट शी : `हो नक्कीच देईन; पण बंगाल अद्यापही भारतात आहे याची खंत वाटते. एव्हाना तो चीनचाच एक प्रांत व्हायला पाहिजे होता!’
आम्ही : नाही, नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं शी, गौडबंगाल या शब्दाचा मराठी शब्दकोशातला अर्थ आहे `रहस्य.’ सस्पेंस.
शी : अस्सं होय? मला वाटलं की, तुम्ही बंगालबद्दलच बोलताहात!
: मात्र एका बाबीचं विलक्षण आश्चर्च वाटतंय की; आपल्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तिमत्त्वाला इतकं अघळपघळ बोलायची सवड कशी?
शी : त्याचं काये बेडेकर, आम्हाला अवघ्या विश्वाला आमच्या कवेत घ्यायचं आहे, म्हणजे अधिपत्याखाली आणायचं आहे; तर मग तेथील विविध राष्ट्रभाषा, पोटभाषा, चाली-रीती, संस्कार यांचा खोलवर स्टडी करायला नको का? तुमचे ते कोण? समर्थ रामदास ठोसरच ना? त्यांनीच सांगून ठेवलंय –
।। राखावी बहुतांची अंतरे ।।
तात्पर्य, तूर्तास मी भारतातील काही निवडक, समृद्ध भाषांना नीट समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यातही मराठीचाच आग्रह का? असा तुमचा पुढील प्रश्न असणार?
अर्थातच!
शी : मग ऐका तर, दुसरे ज्ञानपीठ विजेते वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेली “गर्जा जय जयकार क्रांतीचा, गर्जा जय जयकार” ही तेज:पुंज कविता नुकतीच वाचली आणि वाटलं की हेच चीनचं राष्ट्रगीत का असू नये? कारण आमच्या संस्कृतीत क्रांतीला फार मान. दुसरं तुम्ही म्हणालात की मी इतका फुरसतीत कसा? तर त्याचं उत्तर असंय की; वुहान व्हायरसची उत्पत्ती नि फलश्रुती यात आमची मागील ७ ते ८ वर्षतरी खर्ची पडली. त्याचे भयकारी परिणाम व पडसाद उभ्या जगात उमटतच आहेत. ते महत्त्वाचं काम सन २०१९मध्येच सुरळीतपणे पार पाडलं; त्यामुळे मी सध्या तसा मोकळाच! सबब सहजच वाटलं की; नाशकात आदरणीय कुसुमाग्रजांना भेटून, त्यांना `गर्जा जय जयकार’ची मागतील ती रॉयल्टी देवून ते वापरण्याचे अधिकार मिळवावे!
: पण तात्यांनी १९९९ सालीच नाशिक कायमचं सोडलं.
शी : काही हरकत नाही; ते आता जिथे कुठे राहात असतील तिथे पोचून मी त्यांना वंदन करेन.
: मग तुम्ही असं करा की; या अवकाशात `कुसुमाग्रज’ नावाचा एक तारा आहे. त्यावर जाऊन त्यांना भेटा.
शी : हो हो, आम्हाला या ब्रह्मांडात कुठेही जाणं शक्य आहे.
: मग एक करा ना. माझं एक अनाकलनीय कोडं सोडवा, उपकार होतील.
शी : प्रयत्न करतो, सांगा.
: आमच्या भारतात क्षणोक्षणी अवाढव्य पगार-भत्ते व नको नको त्या सोयी-सवलतींचा मलिदा चाखूनही लाचखोरीच्या मार्गाने लोकाभिमुख होणारे जे काही नेते, उच्चाधिकारी व विविध प्रकारचे कर्मचारी आहेत त्यावर आपल्या अनुभवातून एखादा तोडगा सुचतो का पाहा! तशी भष्टाचारमुक्त शासन प्रणाली, पॅकेज देऊ शकाल का?
शी : बेडेकर, फार गैरसोयीचा प्रश्न केलात! तशी यंत्रणा आम्ही कालत्रयी पुरवू शकणार नाही. त्यापेक्षा आम्ही चीनमधील प्रसिद्ध भिंतीहून प्रचंड मोठी भिंत बांधण्याच्या प्रोजेक्टवर काम करतो आहोत. ज्या भिंतीमुळे चंद्र, मंगळही आमच्या चीनच्या सरहद्दीत येतील. त्याशिवाय सौर ऊर्जेचे सर्वाधिकार मिळविण्यास्तव सूर्याशी बोलणी सुरू आहेत; पण तुम्ही म्हणता तशी निरभ्र, लाच-लुचपत विरहित व्यवस्था भारतात आणणं फारच कर्मकठीण!
: `आपण आपल्याला वाखाणी अन् जग करी गार्हाणी’ अशी एक म्हण मराठीत आहे, तद्वतच आपलं वागणं अतिरेकीपणाचं नाही का?
शी : अतिरेकीपणा म्हणजे काय? हा शब्द अद्याप पाहण्यात आला नाही! कोणता शब्दकोश रेफर करू?
: जाऊ द्या. आमचं ते आमचंच, पण तुमचं तेही आमचंच ही आपली आततायी भूमिका आपल्याला प्रामाणिकपणाची वाटते, ती का?
शी : तसं नव्हे, भारतासह बरीच राष्ट्र आमचं तेही त्यांचं मानून आमच्याशी जाणूनबुजून भांडण उकरून काढतात असं माझं ठाम मत आहे! कारण मराठी-हिन्दी शब्दकोशांत प्राचीन हा शब्द चीनमुळेच आला!
: याचा सरळ सरळ अर्थ चीनखेरीज या पृथ्वीतलावर कुणीच जगू नये असाच घ्यायचा ना?
शी : तंतोतंत तसंच नाही; परंतु मी म्हणतो आमच्यासारखे निष्पाप, निष्कलंक, निर्लोभी प्राणी गुण्या-गोिंवदाने इहलोकात नांदत असताना, इतरांनी या जगात राहण्याचं औचित्यच काय? विनाकारण वादंग उद्भवतात ना?
: असंच आहे, तर आमचे मोदी चीनच्या भेटीस आले त्याप्रसंगी त्यांना नौकानयनास का घेऊन गेलात? जलसमाधी देऊ शकला असता की!
शी : नाही नाही, ते भूतदयेला अनुसरून झालं नसतं! याउलट आम्ही मोदींच्या मनोरंजनास्तव पाकिस्तानमधून मुली आयात करून आमच्याकडे गरबे खेळणार होतो.
: आपल्या डेंग झावपिंग यांचं नेहरू-गांधी कुटुंबावर भलतंच प्रेम होतं, ते का बरं?
शी : तुम्ही म्हणता ते बहुधा खरं असावं, कारण भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री राजीवजी डेंगना भेटले; पण १९९३ साली नरिंसहा राव प्रधान मंत्री असताना, डेंग यांनी त्यांना भेटण्यास साफ नकार दिला; पण डेंग यांच्या अंत्ययात्रेत तुमच्या दै. लोकसत्ताचे माधव गडकरी हजर होते बरं का!
: सुसंस्कृत भारतापेक्षा आपला ओढा नतद्रष्ट पाकिस्तानकडे जास्त, असं का? त्यामुळे आमचे माननीय पी.एम. अटलजी वैतागून चीनमधून मायदेशी परतले होते म्हणे!
शी : तुमच्या त्या आरोपातही बरंच तथ्य आहे. कारण त्याचवेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख भारताविरुद्ध लढा देण्यास्तव आमच्याकडे शस्त्रास्त्रे मिळविण्यास आले होते ना! म्हणून `पीपल्स डेली’ने अटलजींऐवजी त्यांचा फोटो असं फ्रंटवर छापला होता. अटलजींची बातमी आम्ही केवळ औपचारिकता म्हणून छापली. असं म्हणतात की; प्रेमात, युद्धात आणि व्यवसायात सर्व काही माफ असतं. आणि आमचे संपादक, त्यांना जे काही जाणवतं ते कधीच लिहू शकत नाहीत. आमच्याकडे आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा असते!
: ती पूर्व दिशा अलीकडच्या काळात आमच्याकडेही वापरात आली आहे. इतकंच नव्हे; तर संपादक खुंटीवर टांगण्यासाठी संपादकीय विभागात खुंट्यादेखील ठोकवून घेण्यात आल्या आहेत.
शी : व्वा… ही तर फार नामी सुरुवात म्हणायची!
: शी जिन िंपगजी, आपल्या राष्ट्राची शिक्षाप्रद प्रणाली कशाप्रकारे अमलात आणता?
शी : फारच भविष्यवेधी सवाल केलात! आमच्या राष्ट्रातील वृत्तपत्रांची आमूलाग्र सूत्रं राष्ट्रप्रमुखाच्याच हाती केंद्रित असतात. त्यामुळे समजा एखाद्या नागरिकाने `पीपल्स डेली’ला एखादं चार ओळीचं तक्रारवजा पत्र लिहिलंच; तर ते डेलीत न छापता ताबडतोब आमच्या गुप्तचर विभागात येतं व त्याआधारे त्या विवक्षित नागरिकावर राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवून आम्ही त्याला फार नाही, फक्त १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावतो आणि ती यथासांगपणे भोगल्यावर, आम्ही झाल्या गफलतीबद्दल त्याची जाहीर क्षमा मागून त्याला पुन्हा सन्मानाने जगण्याचे अधिकार देतो, अशी आहे आमची राष्ट्रीय शिक्षाप्रद प्रणाली!
: आपल्या या जगावेगळ्या शिक्षाप्रद प्रणालीची जितकी प्रशंसा करावी तेवढी कमीच ठरेल… असो… एका नाजूक मुद्दा उपस्थित करू का? चीनमध्ये लोकशाही कधी येणार?
शी : कधी येणार म्हणता! कशी येते तेच बघतो!!
: आपली अतिविस्तारवादी भूमिका आणखी कुठल्या थराला जाणार आहे, शी जिन पिंगजी?
शी : आमच्या या भूमिकेचे धडे आम्हाला तुमच्या लोकमान्यांकडूनच मिळालेत. तेच म्हणत ना की, `जितकं मिळेल तेवढं पदरात पाडून घ्या आणि पुढील मागणीस्तव उठाव करा!’ म्हणूनच आम्ही नेहमी वाटाघाटीसाठी तत्पर असतो आणि त्याचवेळी युद्धाच्या तयारीतही!
: वुहानमार्गे जगभर कोविद-१९ पसरविण्यात आपला हेतू निश्चितपणे काय होता?
शी : निर्विवादपणे विश्वकल्याणाचाच! कारण आम्ही चीनमधील वाढीव वृद्धांना `स्वेच्छेने मरा’ असं आव्हान करू शकत नव्हतो. शिवाय अखिल जगाला डोईजड झालेली जनसंख्या आमच्या कल्पकतेमुळे काहीअंशी कमी झाली. पर्यावरण व ओझोन यांचं संरक्षणही झालं.
: त्याखेरीज आणखी काय, काय साधलंत?
शी : आमच्या त्या खेळीमुळे अनेक राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या, तिथे अराजकता माजली, अशात आमचा अश्वमेध निर्वेधपणे मार्गी लागला.
: आपल्या राष्ट्रात खाद्यपदार्थांची चांगलीच चंगळ असते… कारण तुम्ही अनेक प्राणी व जीवजंतू खाता… बदकं कापून त्याच्या पक्वानाची कल्पना कुठली?
शी : अहो, सुंदर अन् छकुली बदकं तर आमच्या चीनमध्ये अनंत काळापासून पाण्यात विहरतात; परंतु कधी डोक्यात आलं नव्हतं की त्यांना कापून एखादं रूचकर पक्वान्न होऊ शकतं! आणि एक दिवस अचानक आकाशवाणी पुणेवरून ग.दि.मा.-आशाताईंचं “एऽऽका तळ्याऽऽत होती बदके पिले सुरेऽऽख” गीत ऐकलं आणि `बदकाचे पक्वान्न’ ही कल्पना सुचली. आमच्याकडे ते फारच लोकप्रिय, खाणारे बघता बघता त्याचा फन्ना उडवतात.
: आमचे बोलघेवडे, बुद्धिमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, त्यांच्याविषयी चीनमधील जनसामान्यांची काय प्रतिक्रिया?
शी : अत्यंत कनवाळू, संत माणूस.
: ते कसं काय बुवा?
शी : ते आमच्या उभयतातलं गुपित आहे; पण त्यांचं विलोभनीय औदार्य उघड करण्यास्तव मला काही उलगडे करावेच लागतील. मात्र लगेच धांदरटासारखे त्यांना सारं सांगायला जाऊ नका.
: मुळीच तोंड उघडणार नाही; काळजी नको.
शी : सगळ्या जगाकडून चीनवर `वुहानचे मारेकरी’ हा आरोप होत असताना आणि बुहान लॅबमधून उत्पन्न झालेल्या `कोरोना’ भस्मासुराच्या हैदोसाने जग हादरले आहे हे लक्षात घेऊनही मोदींनी चीन-भारतातील सलोखा मोठ्या शिताफीने जपला याचं मला फार अप्रूप वाटतं!
: याला पुरावा काय?
शी : अहो, याला पुरावा कशाला हवा? तुमच्या त्या सध्याच्या `भागवत संप्रदायाचे’ ज्येष्ठ प्रवक्ते एस. गुरुमूर्तींनीच एका व्हीडिओ माध्यमातून मोदींवर प्रखर टीका केली आहे. ते म्हणतात,
“आपण १९७६-७७ या कालखंडात चलन साठ्यात वरचढ होतो. तेव्हा देणं तर कुणाचंच नव्हतं! अशा परिस्थितीत दरवर्षी थेट ३० अब्ज डॉलर्सची व्यापारी तूट मानली; तर ती पुढील ९ वर्षांत सरासरी २७० अब्ज एवढी होते. तीच आज वाढून ५८७ अब्ज डॉलर्सच्या घरात पोचली असून, हा खर्च भारताच्या ५ वर्षांच्या संरक्षण अंदाजपत्रकाइतका; तर चीनच्या ३ वर्षांच्या संरक्षण खर्चाएवढा भरतो आणि हे सर्व कशामुळे, तर आम्ही आजमितीसही चीनचे मिंधे बनलेले आहोत म्हणून! आजसुद्धा आम्ही म्हणजे भारत चीनकडून भरमसाट खरेदी करतोच आहे. परिणामी एक ना एक दिवस चीन भारताच्या गळ्याला नख लावू शकेल.” आणि हे सारं कळत असूनही मोदी आमचं भलं करताहेत याला औदार्यच म्हणायचं ना?
: त्याविषयी आपली कृतार्थता यथायोग्यच आहे! तर आता सांगा, भारतात पाठविण्यास्तव आपली कुठली नावीन्यपूर्ण प्रॉडक्टस् तयार आहेत?
शी : थोडक्यात सांगतो – दुर्वांची जुडी, बिल्व दलं, तुळशी-पत्र, केशरी गंध, मंत्रवलेले जानवी जोडं, बाटलीबंद गंगाजळ, गोमूत्र, पंच गव्य, सत्यनारायण पूजेची पोथी, पंचामृत, साजुक तुपातला (शुगर फ्री) शिरा, साबुदाण्याची खिचडी, गुरुजी इत्यादि बरंच काही…
: बरं, आपण मुलाखतीसाठी भरपूर वेळ दिलात म्हणून मी आपला फार आभारी आहे; पण अखेरचा एक प्रश्न विचारतो व तो आपल्यालाही आवडेल.
शी : विचारा, अवश्य विचारा, मलापण उत्सुकता आहे.
: डॉ. द्वारकानाथ एस. कोटणीस यांनी दुसर्या महायुद्धात चीनमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं १९४१ च्या नोव्हेंबर महिन्यात तिथल्याच कुओचिंगलान यांच्याशी लग्नाची गांठ बांधली व १९४२ साली उत्तर चीनच्या कोकुंग भागातच देह ठेवला. त्यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं?
शी : ओ हो हो! खरोखरच देव माणूस! जिवंत राहिले असते; तर पुढे मागे ते चीनचे राष्ट्रपती होऊ शकले असते! त्यांनी त्या कठीण काळात आमच्याकडे केलेल्या समर्पित कार्याबद्दल चीन त्यांचा कायम ऋणी आहे व पुढेही राहील. म्हणूनच आम्ही चीनमध्ये त्यांचं स्मारक बांधलं. मला वाटतं तुमच्या व्ही. शांतारामांनी त्यांच्या एकूणच कार्य-कर्तृत्वावर `झनक झनक पायल बाजे’ हा चित्रपट काढला होता ना? तो पाहण्याचं भाग्य मला लाभलं नाही!
: आपल्या या कथनात बरीच गफलत आहे शी महोदय! व्ही. शांतारामांनी डॉक्टरसाहेबांवर `डॉ. कोटणीस की अमर कहानी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला व त्यातच त्यांचं व्यक्तिमत्त्व त्यांनीच उभं केलं. `झनक झनक’ हा त्यानंतरचा वेगळ्याच विषयावरील चित्रपट.
शी : त्याचं काय आहे, ते गेले म्हणजे डॉ. कोटणीस, तेव्हा मी वरून खाली येण्याच्या वाटेवरही नव्हतो ना? त्यामुळे संदर्भाची थोडी गफलत झाली.
: काही हरकत नाही, होतात अशा चुका! तरीही एक नवा प्रश्न उद्भवतोच! आपण इतक्यात डॉ. कोटणीसांना देवमाणूस म्हणून गौरविलेत आणि दुसरीकडे चीन भारताला नेहमीच पाण्यात पाहात असतो, ते का?
शी : चुकताय तुम्ही बेडेकर, आम्ही तुम्हाला पाण्यात पाहात नाही, उलट तुमच्या स्वामी रामकृष्ण परमहंसांनीच आम्हाला पाण्यात पाहिलं!
: पटत नाही.
शी : अहो, तुम्हाला तो स्वामी रामकृष्ण परमहंसांचा किस्सा माहीत नाही का? ते एकदा गंगेच्या तटावर बसले असताना त्यांना एक विंचू पाण्यातून वाहून जाताना दिसला. तेव्हा त्यांनी पुढे होऊन त्याला बाहेर काढलं… विंचवाने स्वामींना डंख मारला व पुन्हा पाण्यात पडला, पुन्हा त्यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढलं, त्याने डंख मारला. असं अनेकदा झाल्यावर कुणीतरी रामकृष्णांना म्हटलं की; `तुम्ही त्याला वारंवार वाचवताहात अन् तो तर तुम्हाला पुन्हा पुन्हा डंख मारतोय.’ त्यावर स्वामी रामकृष्ण उद्गारले, `तो त्याचा धर्म पाळतो आहे, मी माझा!’
आता तुम्हीच त्रैराशिक मांडा; अशा विंचवांचे पदार्थ खाणारे आम्ही किती पटीनं जास्त कृतघ्न असू? बाय द वे, मला लगेच एक अर्जंट मिटींग आहे… तिच्यात आमचे मित्र राष्ट्र पाकिस्तानला भारताविरुद्ध मदतीचा हात देण्याच्या सद्हेतूने आम्ही यंदाच्या दिवाळीत भारतात दम्याची साथ पसरविणारे फटाके आणि डोळ्यांना अंधत्व आणणार्या रोषणाईयुक्त दीप-मालिका या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत… म्हणून तुमची रजा घेतो. पुन्हा भेटू या… अर्थात तुम्ही जिवंत राहिलात तर! जय चंगेज! जय माओ!