कमालीच्या यशस्वी व्यक्तिमत्वाच्या मुलांनी त्यांच्या बाबांचं नाव ठेवलं, वाढवलं असं क्वचितच दिसतं. पण विक्रम चंद्रकांत गोखलेंचं नाव या छोट्याश्या यादीत अग्रक्रमी होतं.
पण विक्रम गोखले, तुम्ही बोलले आणि तुम्ही चुकले. खरंच, तुम्ही बोलले आणि तुम्ही चुकले.
स्वतःच बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना ‘दूषित’ म्हटले आणि गोखले, तुम्ही चुकले.
त्यांच्याच कामावर बोट ठेवले, त्यांच्या पोटाचा उल्लेख केले, आणि गोखले, तुम्ही चुकले.
पत्रकार, राजकारणी आणि तमाम तथाकथित स्युडो लोकांवर अर्वाच्च भाष्य केले, आणि गोखले, तुम्ही चुकले.
भारताचा रंग सांगून गोखले, तुम्ही चुकले.
कितीतरी वर्ष एक धर्म आपल्या देशाला काबीज करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून गोखले, तुम्ही चुकले.
तुमचा धर्मांध कंगोरा तुम्ही उचकटून गोखले, तुम्ही चुकले.
राजकारणाचा अभ्यास आहे असे तुम्ही म्हटले, ‘आजच’ कुठलाही देश भारताकडे वक्रदृष्टी करण्याची हिंमत करीत नाही असे दावे तुम्ही केले आणि अरुणाचल प्रदेशमध्ये कोणी ठाण मांडले आहे हे तुम्ही विसरले; तेव्हाच उमगले; गोखले, तुम्ही चुकले.
गोखले, तुमचा स्वर मुजोर आहे हो.
गोखले, तुम्ही आत्मप्रौढीत गर्क आहात हो.
वाईट वाटले.
तुमच्यासाठी नाही. अप्रतिम कलाकार बहुश्रुत असतो, प्रगल्भ असतो यावरच्या माझ्या विश्वासाला तुम्ही तडा दिलात म्हणून माझे मलाच वाईट वाटले.
गोखले, पत्रकार परिषदेत तुम्ही जसं बोललात तसं कोण बोलतं हे तुमच्या ठावकी आहे का? सांगतो. अतिशय प्रतिभावान अन कलासक्त पण योग्य संधी न मिळालेला कलाकार त्याच्यासमोरच्या नवख्या कलाकाराला स्वतःची महती पटवण्यासाठी जे बकतो तसेच तुम्ही बकले! आणि गोखले, तुम्ही चुकले.
तुम्ही तर यशस्वी आहात की! की ‘होता’ असं म्हणायचं?
असं सारं मी का म्हणतोय? कारण, तुम्हीच म्हणालात; मनात काही ठेवू नये. अनेक थोरा-मोठ्यांना तुम्ही तुमचं मत छातीठोकपणे ऐकवलंय, आणि त्याची आवश्यकता आहे. म्हणूनच…
‘आय, मी अॅण्ड मायसेल्फ’ याचं उत्तम उदाहरण तुम्ही पेश केले, आणि हो, बराच वेळ झाला- म्हणायचंच राहून गेलं; गोखले, तुम्ही चुकले.
उत्कृष्ट नट बुद्धिमान माणूस असतोच असं नाही हे तुम्ही सिद्ध केले. गोखले, तुम्ही चुकले.
तुम्ही उद्धटपणे बोलले. तुमच्या बोलण्यात दर्पोक्ती दिसली. बोलताना तुम्ही बेशरम दिसले.
हम क्यूँ शर्माये शरम से,
कि शरम शरम से शर्माती है।
हम तो ऐसे बेशरम है
कि शरम हमसे शर्माती है।
दुसर्यांकडे बोट दाखवून बोललं की बाकीची बोटं स्वतःकडेच निर्देशित होतात हे तुम्ही विसरले, आणि हो; गोखले, तुम्ही चुकले.
आपलं मत सिद्ध करण्यासाठी तुम्ही इंग्रजी भाषेचा वापर करता. चांगलंय. इथे एक इंग्रजी डायलॉग आठवतोय. माझाच- ‘अॅक्टर इज ही, हू इज नॅचरल ऑन स्टेज, अॅक्टिंग ओन्ली व्हाईल लिव्हिंग!’ आयुष्य जगताना तुम्ही एकदम फेल झाले! छ्या! विक्रम गोखले, तुम्ही खोकले, तुम्ही चुकले, आणि मनातून उतरले!!