नेत्याची भाषा जेव्हा अतिभावुक, अतिआध्यात्मिक, नको इतकी सुसंस्कृत, अतिनम्र आणि अधिक क्षमायाचकी होऊ लागते तेव्हा ओळखावे की हा इसम घोळावुक घोळात्मिक घोळास्कृत आणि घोळाशील होत आहे. नीट ध्यान देऊन ऐकावे.
‘तपस्या, तपस्या भंग, शुद्ध अंतःकरण, पवित्र भावना, प्रकाशासारखे सत्य, क्षमायाचना’ यासारख्या सोवळ्या शब्दांची पेरणी तो जेव्हा करू लागतो तेव्हा ओळखावे की या शब्दांच्या मागे जो प्रमुख मुद्दा आहे तो निव्वळ शुद्ध पवित्र व्यावहारिक निवडणुकीय असतो.
त्याच्याही मागे शोषण, नफा, फायदा, खर्च, परतावा, सेन्सेक्स, जीडीपी यांचे गणित हेच सत्य प्रकाशासारखे स्पष्ट असते. ते झाकून पाकून ‘मी किती भावुक संवेदनशील आणि कविहृदयाचा आहे’ हे फेक त्या प्रकाश सत्याच्या उजेडात आणायचे असते.
खरे तर व्यवहार निखळ व्यवहाराच्या भाषेत बोलावा, लिहावा, सादर करावा. त्याला हरकत कोणाचीच नाही. तो अगदी अशिक्षित शेतकऱ्यांनाही चांगला कळतो. ते कुटुंब वत्सल, भावुक, प्रेमळ आणि न्यायाग्रही असले तरी आर्थिक व्यवहार त्यांना व्यवस्थित कळतो.
बाजारभाव ठीकच! तिथे भावनांचे काय काम? बाजारात भावुकता, त्याग, शुद्ध अंतःकरण, तपस्या, तपश्चर्या, क्षमा, याचना यांचे काय स्थान?
पण घोळात घ्यायला जे जे उपलब्ध आहे, आपल्याला जे जे येतेय ते सगळे एकत्र तोंडात घोळवायला लागते. साधारणपणे सामान्य दुकानदार, व्यापारी, एजंट लोक एखाद्याला ‘पटवायचे’ असेल तर जसे करतात अगदी तसे! अर्थात नेत्याचा देखील निव्वळ बाजारच! पण खूप प्रचंड मोठा!
ओळखा.
– मोहन देस