महाराष्ट्राचेच नव्हे तर सार्या देशाचे लक्ष १६ आमदार अपात्रतेच्या सुनावणीकडे लागले होते. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी त्याचा निकाल दिला. हा निकाल दिला, पण न्याय दिला नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या चौकटीचा कोणताही आधार न घेता विधानसभा अध्यक्षांनी हा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवलेले शिंदेंचे गटनेतेपद आणि गोगावलेंचे पक्षप्रतोदपद वैध ठरवले. दिल्लीतील महाशक्ती पाठीशी असल्याकारणाने आम्ही सर्वोच्च न्यायालयालाही जुमानत नाही, हेच त्यांनी यांनी दाखवून दिले.
सर्वोच्च न्यायालयाने ११ मे २०२३ रोजी सांगितले होते की एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले यांना विधानसभा अध्यक्षांनी व्हिप म्हणून मान्यता देणे बेकायदा होते. पक्षाध्यक्षांच्या मान्यतेचा व्हिप कोण हे तपासायला हवे होते. दुसरे असे की, विधिमंडळ पक्ष नव्हे तर राजकीय पक्ष विधिमंडळातील व्हिप निश्चित करीत असतो. विधिमंडळामध्ये मतदानाचा किंवा तटस्थ राहण्याचा पक्षादेश हा विधिमंडळ पक्षाच्या नव्हे, तर राजकीय पक्षाच्या निर्णयानुसार ठरत असते. हे ध्यानात घ्यायला हवे. परंतु याकडे सोयीनुसार दुर्लक्ष करून दिल्लीश्वरांनी लिहिलेली स्क्रिप्ट नार्वेकरांनी वाचून दाखवली. ते म्हणाले, पक्षाची घटना, नेतृत्व आणि विधिमंडळातील बहुमत याचा अभ्यास करून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मी खरी शिवसेना म्हणून मान्यता देतो. निवडणूक आयोगानेही असाच निकाल दिला होता.
या निकालावर शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली. काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले, हा लोकशाहीचा खून आहे. तर हा निकाल न्यायालयीन नसून हा राजकीय निकाल आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. शिवसेनेची घटना अवैध, पण आमदार वैध असा उफराटा न्याय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या चौकटीत निर्णय घेतला गेला नाही. हा लोकशाहीवर घाला आहे. ‘आमदार अपात्रतेसंदर्भात दहाव्या शेड्यूलचा बराचसा चुकीचा अर्थ लावण्यात आला. पक्षांतर कसे करावे, याचे एक ‘गाईड’ या ठिकाणी महाराष्ट्रात तयार करण्यात आले,’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी दिली.
शिंदेंची शिवसेना ही खरी शिवसेना असा निर्णय नार्वेकरांनी दिल्यावर पक्षप्रमुख कडाडले. ‘तसे होऊच शकत नाही, कारण शिंदे आणि शिवसेना यांचे नाते तुटलेले आहे. ही मॅचफिक्सिंग होती.’ या मॅचफिक्सिंगविरोधात राज्यभर उद्रेक पहावयास मिळाला. शिवसैनिकच नव्हे, तर सामान्य मराठी माणसाने रस्त्यावर उतरून जाहीर निषेध नोंदवला. ‘हा निकाल म्हणजे न्याय नाही. या अन्यायाविरुद्ध मराठी माणूस पेटलेला आहे. या अन्यायाविरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा ठाकला आहे,’ अशा शब्दांत उद्धव यांनी सुनावले. या निकालाचा आधार घेऊन उद्धव यांची शिवसेना संपली अशी हकाटी पेटत शिंदेगट गल्ली-गल्लीत फिरत आहे. उद्धव यांनी जनता व पत्रकारांसमोर जनता न्यायालय भरवून या निकालाची चिरफाड केली.
शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निकाल ऐकल्यावर काहींना अण्णाभाऊ साठे यांचीही कविता आठवली.
‘ही न्यायव्यवस्था काहींची रखेल झाली
ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली
मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे
कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली’
न्यायाची चाड असणार्या मराठी माणसाच्या व निष्ठावंत शिवसैनिकांच्या व्हॉटसअपवर काही मेसेज फिरत होते. तर नाट्य-सिने अभिनेता, ज्याने नुकतेच हाती शिवबंधन बांधले, त्या किरण माने यांनी पंजाबी कवी अवतार सिंह यांनी लिहिलेल्या कवितेच्या ओळी लिहून या लढाईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचे आवाहन केले.
कत्ल हुए जज्बात की कसम खाकर
बुझी हुई नजरों की कसम खाकर
हम लडेंगे सभी हम लडेंगे…
जब बंदूक न हुई तब तलवार होगी
जब तलवार न हुई… लडने की ‘लगन’ तो होगी।
हम लडेंगे साथी, हम जीतेंगे,
उस मंजिल तक हम पहुँचेंगे ।’
या निकालाने शिवसेना दबली जाईल? उद्धवजी खचून जातील? कदापि शक्य नाही. शिवसेना हा मराठी माणसाच्या न्याय, आशा-आकांक्षांचा आवाज आहे. ही शिंदेच्या पैशावर चालणारी शिंदेसेना नव्हे. ते शिंदे-फडणवीस सरकारचे मस्टर रोलवरील भाडोत्री नाहीत. मराठी भावनेच्या उद्रेकाने सणाणलेल्या मनोवृत्तीचे हे सैनिक आहेत. त्यांना सत्तेचा माज आलाय. सत्तेचा कैफ चढलाय. म्हणूनच तर ते उद्धव ठाकरे संपले, शिवसेना संपली असे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आहेत.
गेल्या ५७ वर्षात घरभेद्यांच्या षडयंत्राने, गद्दारीने शिवसेना गडबडली नाही. उलट ती तीनदा महाराष्ट्रात सत्ताधारी झाली हा इतिहास आहे. एका अग्निदिव्यातून शिवसेना जात आहे. शिवसेना या अग्निदिव्यातून पावनच होणार आहे. याआधी शिवसैनिकांनी अनेक विजयही पाहिलेत आणि पराजयही. पराजय पचवून पुन्हा विजयाच्या शिखरावर पोहोचली आहे. ५७ वर्षांच्या इतिहासात अनेक भरत्या-ओहोट्या पाहिल्यात. त्यामुळे तो कसल्याही लाटेला घाबरत नाही. कसलेल्या सैनिकाप्रमाणे तो तोंड देतो. स्वत:ची निष्ठा त्या लाटेत वाहू देत नाही.
एकनाथ शिंदे, नारायण राणे, गणेश नाईक, छगन भुजबळ आदी मंडळी नावलौकिकास आली, सत्तेच्या सिंहासनावर बसली, ती शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच! शिवसेनेच्या कृपेमुळे त्यांच्या कर्तबगारीने नव्हे, याची तरी चाड त्यांनी बाळगावी.
शत्रुपक्षात फितवणारी मंडळी नेहमी दबा धरून बसलेली असतात. इतर पक्षाचे चांगले त्यांना पाहवत नाही. फितूर निर्माण करणे, फूट पाडणे हाच एकमेव त्यांचा कार्यक्रम असतो. हे मुळातच विघ्नसंतोषी लोक असतात. आज राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाची नेतेमंडळी हेच दुष्कृत्य करताना दिसत आहे. विरोधी पक्षांना एक एक करून संपवले जात आहे. राज्या-राज्यातील प्रादेशिक पक्ष संपवण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे. लोकशाही संपवून टाकू पाहत आहेत. कारण देशात लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर विरोधी पक्ष जिवंत असणे महत्त्वाचे असते, असे संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. पण सध्या सत्तेची धुंदी चढलेल्या व राक्षसी सत्तेच्या हव्यासापायी संविधान डावलून लोकशाहीचा गळा घोटला जात आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २००३ साली उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्षपदी नेमले. त्यांनी उद्धवजींचे नेतृत्व लादले नाही. उद्धवजींना कार्याध्यक्षपदी नेमताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, तुम्हाला मान्य असेल तरच सांगा, मी घराणेशाही लादणार नाही. एवढे सुस्पष्टपणे बाळासाहेबांनी सांगितले होते. तरी उद्धवजींवर घराणेशाहीचा आरोप केला जातो. नार्वेकर यांनी लावलेल्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली की, आम्ही एकाधिकारशाही, घराणेशाही मोडीत काढली. एकीकडे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आम्ही चालवत आहोत असा टेंभा मिरवायचा आणि दुसरीकडे बाळासाहेबांनीच नेमलेल्या उद्धवजींवर घाणेरडे आरोप करायचे, हा दुटप्पीपणाच नव्हे, तर कृतघ्नपणाचा कळस आहे.
बाळासाहेबांची बायपास सर्जरी, ढासळलेली प्रकृती, क्षीण झालेली ऊर्जा आणि वाढलेले वय हे लक्षात घेऊन त्यांनी उद्धवजींची कार्याध्यक्षपदी निवड केली. हेच सर्वांच्या पोटात सलायला लागले. तेव्हा सारे स्पर्धक आपले सवतेसुभे उभारण्यात गुंतले. २००५ साली राज ठाकरे, नंतर नारायण राणे आणि जून २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला ओरबाडले. शिवसेनेत फूट पाडली. आपले सवतेसुभे उभारले. दिल्लीश्वरांपुढे गुडघे टेकवून लाचारी पत्करून महाराष्ट्राची सत्ता मिळवली. त्यासाठी उद्धव यांच्यावर नाना आरोप केले, करत आहेत. एकाधिकारशाही, घराणेशाहीच्या आरोपाबरोबरच अडीच वर्षे घरात बसून काय केलं उद्धवजींनी? अडीच वर्षांत फक्त अडीच दिवस मंत्रालयाच्या पायर्या चढणारा महाराष्ट्रातील पहिला मुख्यमंत्री अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे-फडणवीस करत आहेत. अडीच वर्षाच्या कार्यकाळात जवळजवळ दीड-दोन वर्ष कोविड महामारीचा मुकाबला करण्यात गेले. कोविडकाळात मुख्यमंत्री व राज्याचा कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात केलेल्या कार्याची प्रशंसा पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालय आणि जागतिक आरोग्य संघटनांनी केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करून कोविडकाळातील कथित भ्रष्टाचाराची, प्रकरणांची चर्चा घडवून, नस्ते आरोप करून उद्धव यांना बदनाम करण्याचे व खच्चीकरण करण्याचे षडयंत्र दिल्लीतील महाशक्तीच्या इशार्यावरून केले जात आहे. पण उद्धवजी हे कच्च्या गुरूचे चेले नाहीत. बाळासाहेब वाघ होते. तसेच उद्धवजीही वाघच आहेत. ते निष्ठावंत शिवसैनिकांच्या आणि मराठी माणसाच्या एकजुटीच्या ताकदीवर विरोधकांशी मुकाबला करीत आहेत.
दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेच्या हातातली सत्ता गेली, मुख्यमंत्रीपदही गेले. नंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि चिन्हही हिरावून घेतले. नार्वेकर यांनी शिंदे गटाचे अपात्र आमदार पात्र ठरवत शिंदेचीच शिवसेना असा निकाल दिला. हा निकाल आहे. न्याय नाही. न्याय जनतेच्या दरबारात मिळणार आहे.
१९ जून १९६६ रोजी शिवसेनेचा जन्म झाला. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणार्या संघटनेला वासंतिक पालवी फुटली. कालांतराने त्याचे झाड झाले. फांद्या गळून पडल्या, पुन्हा उगवल्या. सुकलेली पाने झडली, मातीत मिसळली. गेल्या ५७ वर्षांत अनेक झंझावात आले. वादळे आली. पण हा शिवसेनेचा वटवृक्ष उन्मळून पडला नाही. प्रबोधनकार ते आदित्य अशा ठाकरे कुटुंबाच्या चार पिढ्यांच्या असीम त्यागातून महाराष्ट्राभिमानी व देशाभिमानी विचारातून शिवसेना पक्ष वटवृक्षाप्रमाणे उभा राहिला आहे. त्यामुळे कुणा गारद्याने तो फोडण्याचा प्रयत्न केला, संपवण्याचा प्रयत्न केला तरी संपणार नाही. शिवसेनेचा वटवृक्ष हा न वठणारा वटवृक्ष आहे. हे सारे हलाहल पचवून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना खडी आहे. या अग्निदिव्यातून शिवसेना पावनच होणार आहे.