□ वाट्टेल ते करा, आम्ही धारावी सोडणार नाही – स्थानिकांचा निर्धार.
■ रजनीकांतच्या ‘काला’ सिनेमातला लढा प्रत्यक्षात उभारावा लागणार आता!
□ सातार्यात राजांचे बंड; फडणवीस, मुख्यमंत्री व्हा!
■ बाहुला कोणताही असो, मागून चाव्या तेच फिरवतायत की!
□ भारतातील ८८ टक्के लोक नोकरीच्या शोधात.
■ एकवेळ शोधून परमेश्वरही सापडेल, पण मुळातच उपलब्ध नसलेली नोकरी मिळणार कशी?… आता व्हॉट्सअपवर बनावट व्हिडिओ आणि मेसेज फॉरवर्ड करणं हाच बिनपगारी रोजगार.
□ १४ ते १८ वयोगटातील ४५ टक्के विद्यार्थ्यांची इंग्रजी वाचनाची बोंब.
■ व्हॉट्सअप विद्यापीठाचे पदवीधर आहेत ते. स्वत:चा मेंदू न वापरणारे मजूरच तर हवे असतात सत्तेला.
□ सत्ताधार्यांकडून पिकवणार्यांपेक्षा खाणार्यांचाच जास्त विचार – शरद पवार.
■ पिकवणारेही मतदानाची वेळ आल्यावर नसत्या देखाव्यांना भुलत असतील आणि अस्मितेच्या बनावाला भुलत असतील, तर सत्ताधार्यांना दोष कसा द्यायचा पवार साहेब?
□ मला भाजपची ऑफर – सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट.
■ एकेक जागा महत्त्वाची, ती जिंकण्यासाठी सैतानाशी हातमिळवणी करायलाही तयार आहेत हे सत्तालोभी… तुम्ही तर निव्वळ काँग्रेसी आहात सुशील कुमारजी!
□ सूरज चव्हाण यांचा खिचडी वितरणाशी काहीही संबंध नाही – ईडीची कबुली.
■ लाज पण वाटत नाही. एखाद्या राज्यात यांच्या अधिकार्यांना तुरूंगात डांबलं जाईल, इतक्या खालच्या थराला गेल्या आहेत यांच्या कारवाया.
□ जनतेच्या पैशांची मिंधे सरकारकडून वारेमाप उधळपट्टी.
■ कुछ नयी बात करो… बेकायदा सरकार आहे… परत कधीही सत्तेत येण्याची शक्यता नाही… मग, १४ पिढ्यांची सोय करून ठेवावी लागेल ना!
□ गद्दारांना शिवसैनिकच धडा शिकवतील – रामटेकमध्ये शिवसेना महिला आघाडीचा घणाघात.
■ ताई, आधी निवडणुका तर जाहीर होऊदेत. हरणार आहेत म्हणूनच निवडणुका लावत नाहीयेत ना.
□ मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मृत्यूला ब्रेक; एका वर्षात बळींची संख्या ५० टक्क्यांनी घटली.
■ हे गुपित सरकारला सांगू नका, टोलची रक्कम आणखी वाढवून हार्टफेलने काही लोक मरतील अशी व्यवस्था होईल लगोलग.
□ बनावट स्वाक्षर्या करून ठेकेदाराने ठाणे पालिकेतील लाखोंचे डिपॉझिट उडवले.
■ त्याच्यावर बनावट स्वाक्षर्या करण्याची वेळ आली, हेच वाईट; तिथे राज्य त्यांचंच तर आहे!
□ वाढवण बंदराच्या बैठकीत भाजपने घुसवले बोगस मच्छीमार.
■ तेही परप्रांतीय… दिल्लीची लाचारी अशीही पत्करली आहेच, आता महाराष्ट्रातल्या विकासकामांचे निर्णयही स्थानिक बनून तेच घेणार!
□ मिरा-भाईंदर महापालिकेत मिंधे सरकारचा ५०० कोटींचा ‘कचरा घोटाळा’.
■ यांचे मालक हेच खरे कुशल कचरा वेचक!
□ अधू बुद्धीच्या म्हस्केंची घमेंड ठाणेकरच उतरवतील – जिल्हाप्रमुख केदार दिघे यांचा हल्लाबोल.
■ त्यासाठी निवडणुका न घेता अधिकार्यांमार्फत राज्य करण्याचा पॅटर्न मोडीत काढला पाहिजे.
□ नालासोपारा शहराचा विकास खुंटला; महापालिका प्रशासनाचे लक्ष फक्त वसई, विरारकडे.
■ आधीच बकालीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या शहराची आणखी वाताहत होत जाणार!
□ मोदींना खोटे बोलण्याचा अधिकार नाही – राहुल गांधी यांनी डागली तोफ.
■ त्यांना खरं बोलायला सांगताय? किती कठीण आहे ते राहुलजी!
□ मिंध्यांनी मुंबईचे ८ हजार ९३६ कोटी रूपये थकवले.
■ आणि लुबाडले किती?
□ राजन साळवी यांच्या घरावर एसीबीची धाड.
■ जब गीदड की मौत आती है, तो वो शहर की तरफ भागने लगता है…
□ काँग्रेस पक्ष सोडून ज्यांना जायचे आहे त्यांनी लवकर जावे – महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांचा इशारा.
■ उमेदवार्या जाहीर करा, आउटगोइंग सुरू होईलच…
□ विमा कर्मचार्यांच्या मागण्या अजूनही प्रलंबितच.
■ इतरांना कशाकशाची हमी देणार्यांना त्यांच्याच मागण्या पूर्ण होण्याची हमी नाही!
□ रेसकोर्सवर अंडरग्राऊंड कार पार्किंग काँट्रॅक्टर मित्रासाठी बनवणार का? – आदित्य ठाकरे यांचा थेट सवाल.
■ यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, सौ बार शुक्रिया अरे सौ बार शुक्रिया… अशा उचंबळून आलेल्या भावना आहेत त्या आदित्यजी! भावनाओं को समझो!
□ उरणच्या प्रकल्पग्रस्तांना गुंडाळणार्या सरकारला हायकोर्टाचा झटका; शेतकर्यांना मिळणार प्रतिगुंठा एक कोटी.
■ असाच भाग्योदय सगळ्या प्रकल्पग्रस्तांच्या नशिबी येवो.
□ मिंधे गटाचा सरपंच भाजपने पळवला.
■ अख्खा गटच महाशक्तीच्या मालकीचा आहे, सरपंचाचं काय कौतुक?