(गावचं भव्य मंदिर. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी चालू दिसतेय. पताका, झेंडे, आमंत्रण पत्रिका नि बाजूला हुकूमचंद यांचे बॅनर पडलेले. एक एक ढिगाजवळ पाच-सहा पोरं बसून पुढलं नियोजन करतायत. तितक्यात पूजेचं साहित्य घेऊन हुकूमचंदांचे डावे हात मंमित, मंदिर समितीचे व्यवस्थापक मेषपंत, हुकूमचंदांच्या पॅनलचे प्रमुख जयपत, मंदिर मागणीसाठी चोरून दगडफेक करून प्रसिद्ध झालेले विशा आणि बज्या तिथं येतात. विशा आणि बज्या साहित्य गर्भगृहात घेऊन जातात. बाहेर थांबून मंमित, मेषपंत, जयपत तयारीचा आढावा घेतात.)
मंमित : तर फुले उधळण्यासाठी आपल्याला काही नियोजन करावं लागेल…! काही कुणाकडे आयडिया?
जयपत : त्याला काय? नाहीतरी इथं जेसीबीचं फॅड चालूच आहे ना? चारपाच जेसीबी लावून टाकू. काय?
मेषपंत : (शंकेनं डोकं खाजवत) पण मूर्ती तर आधीच मागवलीय की? मग पुष्यवृष्टीचं प्रयोजन काय? आणि कुणासाठी?
मंमित : (मेषपंताकडे रोखून बघत) म्हणजे सुरूवात बे-एके-बे ने करावी लागंल तर? (बाहेर येत असलेल्या विशा अन बज्याकडे बघत) विशा, यांना सांग फुलं कोणावर उधळायची आहे ती!
विशा : (मोठ्याने हसत) काही पण विचारता का पंत तुम्ही? लग्नात जाऊन नवरदेव कोण इचारण्यासारखं झालं हे!! आवो, हे सगळं हुकूमचंदांसाठी!!
मेषपंत : (अजूनही डोकं खाजवत) पण प्रतिष्ठापना देवाची आहे ना? मग हे हुकूमचंदांसाठी का?
बज्या : (विश्याला टाळ्या देत हसत) हे असं झालं, लग्नाचा खर्च नवरीच्या घरचा तर नवरदेव का मिरवतात? असलं विचारणं झालं!!! आता अख्ख्या गावानं मिळून ठरवलंय ना? उद्घाटन हुकूमचंदांच्या हातून करायचं ते? (शंकाग्रस्त मेषपंत गप्प बसतात.)
मंमित : (मूळ विषयावर येत) तर काय करायचं ठरवताय? फक्त जेसीबी वगैरे नको!
जयपत : त्याला काय? एखादं हेलिकॉप्टर बोलवूयात! वरून पुष्यवृष्टी झाली म्हणजे दिसायला ही छान दिसेल…
मेषपंत : (पडलेले प्रश्न उचलत) पण त्याचा खर्च करणार कोण?
मंमित : अर्थात तुम्ही! तुम्हाला मंदिर समितीवर का बसवलंय आम्ही?
मेषपंत : (चाचरत) पण तो पैसा देव आणि मंदिरावर खर्च करायला हवा, नैतिकता…
जयपत : (चिडत) म्हणजे आता तुम्ही आम्हाला नैतिकता शिकवणार तर? हे विसरला की आम्हीच मंदिराला ग्रामपंचायत निधी दिला ते? आणि आता समारंभासाठीच हे पैसे वापरले जाणार आहेत. त्यात एवढं शंका घेण्यासारखं काय आहे?
मेषपंत : (प्रकरण तापतंय नि वेगळ्या वळणावर जातंय, असं बघून हात झटकत) बघा तुम्हाला करायचं ते करा. फक्त हुकूमचंदांच्या कानावर घाला हे सर्व!
मंमित : (पुढल्या विषयाकडे जात) आणि हे आरतीचे ताट घेऊन सवाष्ण बाया बोलवाव्या लागतील त्याचं कोण बघतंय?
मेषपंत : अहो त्याची गरज काय म्हणतो मी? आता सार्या पूजा-आरतीसह संपूर्ण विधी हुकूमचंदांच्या हस्ते करायचा ठरवलाय तर महिलांची गरज कश्याला? (सगळे हसत डोक्याला हात मारतात.)
जयपत : (समजावणीच्या सुरात) अहो मेषपंत, पुष्पवृष्टीनं हुकूमचंदांचं स्वागत केल्यावर मंदिर प्रवेशावेळी त्यांना पंचारतीच्या ताटाने ओवाळलं जाईल. त्यानंतर ते आत येतील. असं नियोजन आहे! (मेषपंत चपापतात.)
विशा : (मंमितकडे बघत) गावातल्या भजनी मंडळाच्या बाया बोलावण्याची जबाबदारी माझी. सोबत ढोल पण आणतो! चाललं ना? (मंमित फक्त हसतो.)
जयपत : (काही आठवल्यागत) तुम्ही सांगितलेलं, दहा फोटोग्राफर, पंधरा व्हिडिओग्राफर कार्यक्रमाला बोलवा म्हणून त्याचं…
मंमित : (जयपतचं बोलणं मधेच तोडत) ते मिळाले नाहीत, त्यांनी दुसरीकडे तारखा दिल्यात असं काहीही मी ऐकून घेणार नाही. एकतर तुम्ही एकही काम नीट करत नाहीत. त्यात असा हलगर्जीपणा कार्यक्रमाच्या तोंडावर केला तर हुकूमचंद मला उजव्या हाताचा डावा करत कुठं वापरतील सांगता यायचं नाही.
जयपत : (काकुळतीला येत) अहो, दोन फोटोग्राफर अन पाच व्हिडिओग्राफर कमी मिळालेत, पण चार ड्रोन कॅमेरे मागवलेत मी शहरातून!!
मंमित : (चेहर्यावर फुललेला केवडा मिरवत) व्वा! कधी नाही ते छान काम केलंत तुम्ही!!
मेषपंत : (मध्येच) पण त्याचा खर्च…? (सगळ्यांच्या नजरा स्वत:कडे वळल्यात हे बघून जीभ चावत) नाही! मंदिर समिती करेल!!! हेच सांगायचं होतं. फक्त एक शंका होती विचारू?
मंमित : (रोखलेली नजर जराही न हलवता) विचारा!
मेषपंत : नाही आता हे फोटो, व्हिडीओ काढणार म्हणतात. हे एकदम सगळे आत जाणार की…?
विश्या : (हसत) हे काय विचारणं झालं का? येगयेगळ्या अँगलनी फोटो, व्हिडीओ यायला नको? आपण तर गावच्या केबलवाल्याला हाच कारेक्रम लाईव्ह दाखव म्हणून दम दिलेला. त्यासाठी चांगलं शूट व्हायला एवढे कॅमेरे पाहिजेच ना?
मेषपंत : पण ह्या दाटीवाटीमुळे एकतर हुकूमचंदांची वा देवाची कुणाची एकाचीच छबी टिपता येईल. मग…?
बज्या : (हसत) आवो मेषपंत! नाहीतरी आपल्याला हुकूमचंदांचेच फोटो, व्हिडिओ काढायचेत. देव जाणारे कुठं? एकदा घडून बसवला म्हणजे तो इथंच राहणार. तेव्हा त्याचे लागतील तेवढे फोटो-व्हिडीओ मागून काढून घेताच येतील की!!
मेषपंत : (मान हलवत) हो कळालं!! (मागे सरकतो. मागून काहीजण यज्ञासाठीचं साहित्य आत घेऊन जातात. माघारी जाताना मंमितकडे बघून झुकून नमस्कार करतात.)
मंमित : (नि:श्वास टाकत) चला, हे सामान सुद्धा आलं तर? (विश्या आणि बज्याकडे बघत) आता राहिलं उद्याच्या अभिषेकासाठी दूध वगैरेची सोय करावी लागेल त्याचं…! (विश्या आणि बज्याकडे बघत) तुम्ही टेम्पोतून अवैध नेल्या जाणार्या गायी पकडून पांजरपोळात सोडत असता ना? का मागे तुम्हीच गायींसाठी पांजरपोळ सुरू केला होता…? तिथून तुम्ही दूध आणू शकता ना?
एक कामगार : (झेंडे लावत असताना अचानक गाय शब्द कानी पडताच ताडकन उठत) इकल्या त्या गायी! ह्या दोघांनी! यांनी सुरू केलेल्या गोठ्यात चांगल्या गायी ठेवल्या तर चारापाण्याची आबाळ होऊन चार दिवसांत तसाही जीव जाईल त्यांचा!
विश्या : (दातओठ चावत) तू बसतोस का? (मंमितकडे बघत) नाही, आता एकही गाय गोठ्यात नाहीय. मागंच काही गाई गरजू गरीब शेतकर्यांना मोफत दिल्यात, हा काही सांगतोय.
एक कामगार : (हसू दाबत) चुकलं, चुकलं! फक्त त्या गरीब शेतकर्याचं आडनाव खाटीक असेल बहुतेक! (विश्या त्याच्याकडं खाऊ का गिळू नजरेनं बघत मुठ्या आवळतो. त्या कामगाराच्या हसण्यात बाकीचेही कामगार सामील होतात.)
मंमित : (काही ऐकलंच नाही ह्या आविर्भावात) तर दूध कोण आणू शकेल? अभिषेकासाठी?
जयपत : माझ्याकडे दूधवाला येतो. सांगा किती दूध लागेल तुम्हाला? मी अर्धा-छटाक घेऊन ठेवीन हवं तर!… (त्याबरोबर हास्यकल्लोळ उठतो.)
मंमित : दूध तसंही कमीच लागणारे! पण एवढ्याने काय होईल? जयपत?
मेषपंत : अभिषेकासाठी दहा-बारा लिटर दूध लागेल जयपत. आपले हुकूमचंद एवढे धिप्पाड आहे तेव्हा त्याच्या शरीरयष्टीचा विचार करता त्या मापाने दूध घ्यावंच लागेल की!
मंमित : (दोघांची चूक कळताच) अहो पंत! त्या दुधाने हुकूमचंदांना अंघोळ नाही घालायची आपल्याला.
मेषपंत : मग काय करायचं म्हणता?
मंमित : आपल्याला देवाला अभिषेक घालायचा आहे हो!
मेषपंत : इतका वेळ फक्त हुकूमचंद, हुकूमचंदच चालू होतं. आता तुम्हाला अवचित देव आठवला तर गोंधळ होणारच की माझा!
(एकाएक तिथं काही गाड्या येतात, त्यातून हुकूमचंद उतरतात. कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेत असलेल्या मंमितकडे झपझप चालत येतात. त्यांना बघून सर्वजण लवून नमस्कार करतात.)
हुकूमचंद : (चारी दिशांना नजर फेकत) मग झाली तयारी?
मंमित : हां झालीच म्हणायची की! हे इकडून उचललं, ते तिकडं टाकलं का झालं!
विश्या : (दात विचकत) आमची तर झाली! तुमची…? (मागून गेणू येतो. चहूकडे बघत हुकूमचंदांच्या टोळक्याजवळ येतो.)
हुकूमचंद : माझी कसली तयारी?
बज्या : (डबल दात विचकत डोळे मिचकावत खुणेने गेणू आल्याचं दाखवत) हेच काहीजण प्रतिष्ठापनेऐवजी भलतेच प्रश्न विचारणार आहेत म्हणतात…!
हुकूमचंद : विचारू दे की! पह्यले आपल्या गावात लई प्रश्न होते, अगदी चुल्याला सरपण नव्हतं. लोकांना घरं नव्हते, पोरांना पुस्तकं नव्हते. पोरींची भररस्त्यात छेड काढली जायची. गावचे पुढारी बक्कळ पैशे खायचे. गावात कोपर्याकोपर्यावर कचर्याचे ढीग होते. गावचा नेता कधी गावात दिसायचा नाही, बोलायचा नाही!
गेणू : (मध्येच) आता बदललं काय? तुम्ही चार चुल्हे दिलेत तर अख्ख्या गावचं सरपण महाग केलं. लोकांना घरं देईल म्हणला तर शेजारच्या गावानं आपल्या हद्दीत घरं बांधली. पोरांना पुस्तकं नव्हती तर तुमचा शोध आधी अभ्यासात रस निर्माण करावा लागंल, म्हणून बापाचे धडे शिकवायला लावले. अन् पोरींची छेड काढणार्यांना तर खास कार्यकर्ता बनवून बरोबर फिरवता. पह्यले पुढारी बक्कळ पैशे खायचे म्हणता तर त्यांना आता खांद्यावर घेतलंय, आणि पैशे-जमिनी खायला मित्राला मोकळं सोडलंय. कोपर्याकोपर्यावर आधी नुसते कचर्याचे ढीग रहायचे, आता त्याच्यावर ‘गोमाता’ बसलेली रहाते. जाणार्या येणार्याला जिवाचा घोर. गावचा नेता गावात नाही,
ऑफिसात दिसायचा. रिकाम्या चकाट्या पिटण्यापेक्षा कामाचं मोजकं बोलायचा. आणि किमान हरेक प्रश्नांची उत्तरं द्यायचा. तुम्ही तर आधीपेक्षा दसपट प्रश्न वाढवलेत त्याचं काय?
हुकूमचंद : हेच मी बघितलं, अठरा-अठरा तास काम करूनबी प्रश्न कमी होईनात. मग मी त्यावर जालीम उपाय शोधला…
गेणू : काय आहे तो उपाय?
हुकूमचंद : हेच श्रद्धा! नुसत्या श्रद्धेनं भूक, दारिद्र्य, अज्ञान, अन्याय, अत्याचार असले प्रश्न कुठच्या कुठं पळालेत. आता कोणी बोलतं काय त्याच्याबद्दल?
गेणू : पण ह्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर लोकं विचारतीलच की?
हुकूमचंद : कोण म्हणालं? यानंतर आम्ही आणखी चार ठिकाणचा वाद उकरू! कसंय ना गेणूजी, कुठलीही नशा एक सेवनानंतर उतरेल असं समोरच्याला वाटतं. पण नशेच्या आहारी गेलेला जीव कासावीस होऊन नशा मिळवण्याची धडपड दुप्पट ताकदीने करतो. ही त्याची गरज बनते! श्रद्धेची नशा तर त्याहून जालीम! आणि ती नशा सध्या आम्ही पुरवतोय! कोण विचारील आम्हाला वास्तवाचे प्रश्न? त्यासाठी कुणी भानावर तर राहायला हवं?