२०१६ सालापासून सुरू झालेली ‘द क्राऊन’ ही वेबमालिका सहा मोसम पार करून २०२३ मध्ये संपली. संपली म्हणजे ती नेटफ्लिक्सवर पाहायला मिळते पण निर्मात्यानं मालिका संपवलीय. ब्रिटीश राजवाड्याभोवती फिरणारी ही मालिका अर्थातच निर्माता पुन्हा कधीही सुरू करू शकतो. राजघराणं संपणार नसल्यानं मालिकेला कायमचा वाव आहे.
मालिकेत काम केलेली अभिनेते मंडळी, चित्रीकरण झालेली स्थळं, राजवाडे इत्यादींचा पसारा येवढा मोठा होता की फार खर्च होणं अपेक्षितच होतं. इंग्लंडमधला बकिंगहॅम राजवाडा, विंडसर किल्ला; स्कॉटलंडमधला बालमोरल राजवाडा या स्थळांचे सेट उभे करणं ही फारच खर्चिक बाब. दर मिनिटाला २.७७ लाख; दर एपिसोडला १.५ कोटी डॉलर इतका खर्च झालाय. एकूण साठ भागांची मालिका आहे; बसा करत गुणाकार.
मालिकेतलं मुख्य पात्र आहे राणी दुसरी एलिझाबेथ. १९२६ साली जन्मलेली एलिझाबेथ वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी १९५२ साली वडील, राजे सहावे जॉर्ज यांचा मृत्यू झाल्यानंतर राणी झाली. २०२२ साली ९६ वर्षं जगल्यानंतर एलिझाबेथचा मृत्यू झाला.
राणी जन्मली तेव्हा ब्रिटीश साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता असं म्हणत. तिचा मृत्यू झाला तेव्हा साम्राज्य इतिहासजमा झालं होतं आणि सूर्य युकेवरच उगवत होता आणि मावळत होता. स्कॉटलंड आणि वेल्स हे देश अजून ब्रिटीश साम्राज्याचा भाग आहेत. पण दोघेही साम्राज्याच्या बाहेर पडण्याच्या खटपटीत आहेत. हे सारं राणीनं पाहिलं.
राणी देश-साम्राज्याची प्रमुख होती, सरकारांची प्रमुख नव्हती. सरकारं विधिमंडळं चालवत असत, सरकारच्या प्रमुखपदी पंतप्रधान असे. निवडणुका स्वतंत्रपणे पार पडत, राणीनं कधीही मतदान केलं नाही. तिला बहुदा मतदानाचा अधिकारच नव्हता. पण बहुमतवाल्या पक्षाच्या प्रमुखाला राणी बोलावत असे आणि सरकार करायला सांगत असे. नव्या संसदेचं उद्घाटनही राणी करत असे.
बकिंगहॅम, विंडसर, बालमोरल हे मोठे किल्ले-राजवाडे-इस्टेटी राणीच्या मालकीच्या होत्या. म्हणजे व्यक्तिगत नव्हे, तिच्यानंतर ज्याच्या डोक्यावर राजमुकुट असेल त्याच्याकडं ही सारी संपत्ती जाणार. राजमुकुट घराण्यातच असणार, विंडसर घराण्यात. राणीकडं वडिलांकडून मुकुट आला. आता तो मुकुट राणीचा मुलगा तिसरा चार्ल्सकडं गेलाय. त्याच्या नंतर तो मुकुट राजपुत्र विल्यम्सकडं आणि नंतर त्याच्या मुलाकडं जाईल. म्हणजे सारी इस्टेट एकाच घराण्यात राहाणार. आजच्या हिशोबात गुंतवलेल्या रकमा व इतर सर्व प्रकारची प्रॉपर्टी मोजली तर राणीकडं २१ अब्ज डॉलर आहेत, होते.
राज्याचं आणि अँज्लिकन चर्चचं प्रमुखपद राणीकडं होतं. दोन्ही ठिकाणी जे जे घडत असतं त्याकडं राणीचं लक्ष असे. पण कोणतीही जबाबदारी राणीकडं नसे, राणीचं स्थान मानाचं आणि सल्ला देण्यापुरतंच असे. कोणत्याही गोष्टीबाबत राणी कोणतीही जाहीर भूमिका घेत नसे, नसते. राणीबद्दल, राजघराण्याबद्दल विधिमंडळात कोणतीही चर्चा करण्याची प्रथा नाही.
थोडक्यात असं की राणी आणि देश या दोन स्वतंत्र गोष्टी असतात. देश ही एक फिजिकल गोष्ट असते, राणी हे एक प्रतीक असतं.
असं असलं तरीही राणी हा एक माणूस असतो. या माणसाला एक मन असतं, कुटुंब असतं, मानसिक आणि शारीरीक भुका असतात, इच्छा असतात, अनेक माणसांमधे राणी गुंतलेली असते. परंतु, हे सारं अगदी खाजगी ठेवण्याची प्रथा अगदी कालपरवापर्यंत होती. राजवाड्यात, राणीच्या आसपास काहीही घडो, त्याची नोंद इतिहासात होत नाही.
राजवाड्यात एक लॉर्ड चेंबरलेन असे. वर्तमानपत्र, नाटक, सिनेमा, कादंबरी, पुस्तक, कशातही राणीबद्दल काय येतंय याची चौकशी हा लॉर्ड करत असे. त्याची परवानगी असेल तेवढेच उल्लेख साहित्य, नाटक, सिनेमात येऊ शकत असत. शेक्सपियर नाटकं लिहायला लागला तेव्हाही ही पद्धत होती. ही सेन्सॉरशिप समाजाला मान्य होती, ती एक प्रथाच होती. त्यामुळं राणी आणि तिचं कुटुंब, राणी आणि तिचा समाज यातील तणाव, दुरावा, प्रेम, भांडणं इत्यादी कशाबद्दलही लोकांना काही कळत नसे.
राणीचा काका, आठवा एडवर्ड हा राजा एका घटस्फोटित स्त्रीच्या प्रेमात होता, त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. अशा लग्नाला चर्चची परवानगी नव्हती. लग्न केलं तर राजमुकुट सोडावा लागणार होता. फार धुसफूस चालली होती. राजमुकुट की प्रेम असा हिंदी सिनेमात पडावा असा प्रश्न निर्माण झाला होता. राजघराण्यात मारामार्या चालल्या होत्या. राणीच्या पित्याला (नंतर तो राजा सहावा जॉर्ज झाला) राजा व्हायचं नव्हतं. काकानं गादी सोडल्यावर नाईलाजानं राणीच्या वडिलांना राजा व्हावं लागलं. तो तणाव सहन न झाल्यानं राणीच्या वडिलांची तब्येत बिघडत गेली.
या सगळ्या गोष्टी पब्लिकला कधीच कळल्या नव्हत्या.
१९६८मध्ये ‘भल्या पहाटे’ नावाचं एक नाटक अॅलन बेनेट या नाटककारानं लिहिलं. त्यात राणी व्हिक्टोरियांचं भडक जीवन चितारलं होतं. नाटककारानं हे नाटक तपासणी आणि मान्यतेसाठी चेंबरलेनकडं पाठवलं नाही, कारण ते नाटक क्लबांमध्ये खाजगीरीत्या केलं जात होतं. व्हिक्टोरिया समलिंगी होती, राजवाड्यातले तिचे उद्योग भयानक होते. ते सारं या नाटकांमुळं जनतेला कळलं.
राजवाडा आणि राणी पहिल्या प्रथम उघड्यावर आली.
१९८८मध्ये एडवर्ड बाँडनं लिहिलेल्या नाटकावर नॅशनल थिएटरच्या दोन संचालकांनी आक्षेप घेतला. नॅशनल
थिएटरच्या कला दिग्दर्शकानं अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा लावून धरला. या नाटकाचं टीव्ही रूपांतर झालं. लोकांना नाटक आणि रूपांतर आवडलं. बीबीसीनं टीव्ही रूपांतर दाखवलं. थिएटरची सेन्सॉरशिप मोडीत काढली गेली.
झालं. लेखक मोकळे झाले, हवं तर सोकावले म्हणा.
१९९५मध्ये मार्टिन बशीर या पत्रकारानं बीबीसीसाठी प्रिन्सेस डायनाची मुलाखत घेतली. मुलाखतीत डायना म्हणाली, ‘आमच्या लग्नात तिघं जणं होती, काहीशी गर्दीच होती’. तिसरी व्यक्ती म्हणजे प्रिन्स चार्ल्सची मैत्रिण कमिला पार्कर. डायना आणि चार्ल्स यांच्यातल्या तणावांची जाहीर चर्चा बीबीसीनं उकरली. जगभर बोंब उठली. बीबीसीवर प्रचंड दबाव आला. शेवटी बीबीसीनं डायनाची क्षमा मागितली, तिला नुकसान भरपाई दिली. पण या खटाटोपात चार्ल्सचं वागणं, राणीचं वागणं इत्यादी गोष्टी चव्हाट्यावर आल्या.
आता राणी खाजगी उरली नव्हती.
‘द क्राऊन’ या मालिकेचे लेखक आणि निर्माते पीटर मॉर्गन यांनी २००६ साली ‘द क्वीन’ हा सिनेमा लिहिला. परवा दिवंगत झालेल्या राणी एलिझाबेथ आणि माजी पंतप्रधान दिवंगत टोनी ब्लेअर यांच्याभोवती हा चित्रपट होता. त्यावेळी ब्लेअर आणि राणी, दोघंही जिवंत होते.
मॉर्गन यांचा ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात, राजवाड्याच्या वर्तुळात वावर होता. लिहिण्यासाठी त्यांना संबंधित माणसांना भेटावं लागत असे. त्यांनी राजवाडा खूप जवळून पाहिला होता. सार्वजनिक जीवनातली अगदी वरच्या थरातली माणसं कशी असतात, ती आपसात कशी वागतात याचा अनुभव मॉर्गननी घेतला, अभ्यास केला. या विषयावर त्यांनी खोल संशोधन केलं.
मोठी माणसं खाजगीत काय बोलू शकतात याची कल्पना मॉर्गननी केली. घटना सत्य पण त्यात मोठी माणसं काय बोलली हे कल्पित. मॉर्गननी प्रेसिडेंट निक्सन आणि त्यांची मुलाखत घेणारा पत्रकार फॉक्स यांच्यात काय बोलणं झालं असेल याची कल्पना करून निक्सन फॉक्स हे नाटक लिहिलं, त्याची पटकथा लिहिली. राणी एलिझाबेथ आणि टोनी ब्लेअर भेटत तर असत, पण काय बोलत ते कधीच नोंदलं जात नव्हतं. ब्लेअर यांचा प्रेस सेक्रेटरी कंबेल याच्याशी चर्चा करून मॉर्गननी संभाषणाचा अंदाज घेतला, त्यावरून त्यांनी ‘द क्वीन’ हा चित्रपट लिहिला.
खूप संशोधन करून, विचार करून मॉर्गन यांनी द क्राऊन मालिका लिहिली. मॉर्गन यांच्या कौशल्याची वाहवा झालेली असल्यानं त्यांच्या या मालिकेत पैसे घालायला नेटफ्लिक्स तयार झालं.
‘द क्राऊन’मध्ये दुसरी एलिझाबेथ, नवरा प्रिन्स फिलिप, मुलगा चार्ल्स, सून डायना, इतर मुलं, राणीच्या बहिणी अशा मोठ्या कबिल्याची गोष्ट मॉर्गननी लिहिलीय. डोडी हा डायनाचा दोस्त होता एवढंच जाहीर आहे. मॉर्गन यांनी डोडीबरोबरच्या भेटी, डोडीच्या वडिलांचं म्हणणं इत्यादी नाट्यमय गोष्टी ‘द क्राऊन’मध्ये लिहिल्या आहेत.
एक चरसी, दारूप्रेमी, झांगड माणूस राणीच्या दालनात शिरला होता. तो माणूस राणीला काय म्हणाला, राणी त्याला काय म्हणाली, हे कोणाला कसं माहित असणार. मॉर्गन कल्पना करू शकले. तो झांगड माणूस घरांच्या भिंती रंगवणारा असतो. तो राणीला सांगतो की तुम्ही एवढ्या श्रीमंत आणि तुमच्या घराच्या भिंतीची अवस्था पहा. तुमच्या माणसांना मला भेटायला सांगा, मी तुमच्या भिंती रंगवून देईन. राणीला देशात काय चाललंय ते कसं कळत नाही, तिला कारभार करता येत नाहीये इत्यादी गोष्टीही तो माणूस राणीला सांगतो.
‘द क्राऊन’वर टीका झाली. क्राऊनमध्ये दाखवलेल्या अनेक गोष्टी चुकीच्या आहेत, इतिहासात त्यांना आधार नाही असं लोकं म्हणाले. कोणी म्हणालं की ‘द क्राऊन’ म्हणजे खोटारड्या गोष्टींची एक करंडी आहे.
मॉर्गन यांची भूमिका स्पष्ट आहे. ‘द क्राऊन’ हे साहित्याचं (फिक्शन) नाट्यरूपांतर आहे असं मॉर्गन म्हणतात. फिक्शन म्हणजे कल्पित, त्याची सत्याच्या कसोटीवर तपासणी करू नये. फिक्शनमध्ये लेखकाला शक्य वाटलेल्या शक्यता मांडलेल्या असतात. कधी कधी फिक्शन ही पँâटसी असते, म्हणजे जगाला अशक्य वाटतात अशाही गोष्टी लेखक सत्यासारख्या मांडत असतो.
नाट्यमयता हा नाटक, चित्रपट, यांचा गाभा असतो, कणा असतो. तो जमला की नाटक, चित्रपट लोकप्रिय होतात. म्हणूनच ‘द क्राऊन’ करोडो लोकांनी पाहिलीय, भविष्यातही पाहातील.