स्वातंत्र्यदिन असो की प्रजासत्ताक दिन- कोणताही राष्ट्रीय सण साजरा करताना सुज्ञजनांना बाळासाहेबांच्या कुंचल्यातून साकारलेल्या या अप्रतिम मुखपृष्ठचित्राची आठवण आल्याखेरीज राहात नाही… हे चित्र १९८१ सालातलं… तेव्हा सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये मान्यवरांचे संदेश प्रसिद्ध व्हायचे… तेव्हा वर्तमानपत्रं आणि दूरदर्शन यांच्यापलीकडे काही नव्हतं… सुदैवाने. सगळ्या संदेशांची भाषा रूक्ष, मजकूर साचेबद्ध. निव्वळ सरकारी कारभार. खूप मोठमोठे शब्द, पण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काहीच फरक नाही. नुसता शब्दांचा कचरा साफ करणारी ही सामान्य माणसं पाहून काळीज तुटतं… पण, तेव्हा निदान तो कचरा आहे इतकी तरी समज होती… आता तर चकचकीत जाहिरातबाजीच्या, जुमलेबाजीच्या, फसव्या गॅरंटीच्या आकर्षक वेष्टनात बांधून माल खपवला जातो आहे. त्याला अस्मिता चेतवून लोकांना भ्रमित करण्याच्या कौशल्याचीही जोड आहेच… आता हा कचरा आहे, हेही समजून न घेता सोशल मीडियावरून आणि भाट चॅनेल्सवरून तो डोक्यात भरून घेणारे लोक तयार झाले आहेत… या व्यंगचित्रातल्या सामान्य माणसांना निदान कचरा झाडून गोळा करून कचराकुंडीत टाकायचा असतो, हे तरी माहिती आहे… तेच अधिक उत्क्रांत होते म्हणायचे!