उपमुख्यमंत्री अजितदादा पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असं माझा लाडका परमप्रिय मानलेला मित्र पोक्या याला छातीठोकपणे सांगणारे राजकीय क्षेत्रातले सुमारे साडेपंचवीसजण गेल्या आठ दिवसांत त्याला भेटले. पोक्या स्वत:ला राजकीय तज्ज्ञ समजत असला तरी महाराष्ट्रातल्या जनतेप्रमाणे तोही संभ्रमात आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात नेमकं कोण कुणाचे पाय खेचत आहे आणि कोण कुणाला हात देऊन खड्ड्यातून बाहेर काढत आहे हे समजण्याच्या पलिकडचं आहे, असं पोक्या म्हणतो. त्याच्या मते सगळे मंत्री, आमदार चेहर्यावर मुखवटा धारण करून वावरत आहेत त्यामुळे कुणाच्या मनात नक्की काय चाललंय याचा थांगपत्ता लागत नाही. एकीकडे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री एकमेकांच्या गळ्यात गळा घालण्याचे जे नाटक करत आहेत, त्याने जनतेची करमणूक होत असली तरी हा विनोदाचा डोस इतका पॉवरफुल आहे की त्यामुळे जनतेच्या पोटात आता मळमळू लागलं आहे. मुख्यमंत्रीपदाची आस लागलेले अजितदादा किती हवालदिल झाले आहेत, ते १५ दिवसांतील लक्षणीय विनोदी अभिनयावरून कळत असलं, तरी ठोस आश्वासनाशिवाय ते असे करणार नाहीत, असं मला वाटतं. त्यामुळे तू थेट अजितदादांना प्रत्यक्ष भेटून काय ते विचार, असं मी पोक्याला सांगितल्यावर पोक्या ताबडतोब त्यांची मुलाखत घेऊन माझ्याकडे आला. तीच ही मुलाखत…
– दादा नमस्कार. थोडं तुमच्याच भाषेत विचारलं तर चालेल का?
– विचारा की. बिनधास्त विचारा. मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही. तूही घाबरू नकोस. माझी तोंडाची टकळी वाटेल तशी चालते म्हणून मी तुलाही वाटेल तसं बोलेन असं समजू नको. पत्रकारांचा मी आदरच करतो. म्हणून तर त्यांच्या भल्याच्या अनेक योजना आम्ही नव्याने आखल्या आहेत. पत्रकार हाताशी असल्यावर कसलीच भीती नाही. विचार तू. काय हवं ते विचार.
– दादा, अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊन गुडघ्याला बाशिंग बांधून तुम्ही मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडण्यासाठी आतूर नव्हे तर वेडे झाला आहात असं बोललं जातंय, ते खरं आहे का?
– माझ्या वागण्याचा कोणी वाटेल तो अर्थ काढत असेल तर त्याला मी दोष देणार नाही. कारण हा दादा कोणतीही कृती करतो, तेव्हा त्यामागे काहीतरी अर्थ दडलेला असतो. समजणार्यांना तो समजतो. आज मी काकांशी वाईटपणा घेऊन इथपर्यंत आलो तो काय माझं डोकं फिरलं होतं म्हणून नव्हे. यापुढेही मी जर मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलो तर तो माझ्या हिमतीवर जाईन, कुणाच्या मेहरबानीने नव्हे.
– म्हणजे तुम्ही मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठीच इतके घायकुतीला येऊन काकांचा पक्ष घेऊन भाजपच्या वळचणीला आलात हे खरं ना?
– बरोब्बर. उपमुख्यमंत्रीपदाची हॅटट्रिक केलीय मी. त्याच अनुभवाच्या जोरावर मी मुख्यमंत्रीपदावर दावा केला तर काय चुकलं?
– पण त्या शिंद्यांचं काय! तुम्ही आलात आणि त्यांच्या आसनाला सुरुंग लावलात. फडणवीसांच्याही पुन्हा सीएम होण्याच्या आकांक्षेला वाटाण्याच्या अक्षता लावल्यात.
– हे बघा, शिंदे यांच्याबद्दल माझ्या मनात कसलीही कटुतेची भावना नाही. अहो एवढी मोठी गद्दारी करून चाळीस आमदारांसह पक्ष फोडणं हे घरफोडी करण्याइतकं सोपं काम नाही. खरं म्हणजे चाळीस दिवस जरी त्यांना हे पद मिळालं असतं तरी त्यांनी त्यात समाधान मानायला हवं होतं. आता वर्ष होऊन गेलं. मीसुद्धा काकांच्या मूळ पक्षाशी गद्दारी करून जायंट आमदारांना आणि प्रफुल्ल पटेलांसारख्या खासदाराला घेऊन भाजप सरकारात आलो. शिंदे स्वत:बरोबर लेचेपेचे आमदार घेऊन आले. माझ्यापेक्षा माझ्या गद्दारीची गरज भाजपला अधिक होती. आणि मी तुला सांगतो, मोदी-शहांच्या पहिल्याच भेटीत मी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती. शेवटी सौदा म्हणजे सौदा. आधी अर्थमंत्रीपद आणि नंतर मुख्यमंत्रीपद असा टप्प्याटप्प्याचा व्यवहार पक्का ठरला.
– मग, शिंदेंचं काय?
– मागे दोनवेळा त्यांनी स्वत:चं स्थान घट्ट करण्यासाठी ‘दिल्लीत मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात सर्व वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केली होती. तेव्हापासून ते दिल्लीश्वरांच्या मर्जीतून साफ उतरले आहेत. तेव्हाच त्यांनी मला ऑफर दिली हेच सत्य आहे. आता टप्प्याटप्प्याने काही नाटकं करून मी अंतिम रेषा गाठणार आहे. शिंदे यांना गद्दारीची बक्षिसी म्हणून ते पद जितक्या सहजपणे मिळालं, तितक्याच सहजपणे ते सोडणं भाग आहे. कोणत्याही दरबारात आपली लायकी समजून उभं राहावं लागतं. नाहीतर अपमानित होऊन राजकारण संन्यास घ्यावा लागतो.
– पण सीएम झाल्यावर तर त्यांनी एक दिवसही विश्रांती न घेता वर्षभर किती धावपळ केली. वर्षभरात राज्यात इतके अपघात झाले, पण प्रत्येक दुर्घटनास्थळाला तातडीने भेट देऊन त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच-पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. अगदी नुकत्याच झालेल्या ठाण्याच्या त्या इस्पितळातील मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी ते आजारी असतानाही आपल्या गावाहून ठाण्याला आले. पुन्हा दिल्लीच्या वार्या. मानलं पाहिजे.
– पण उपयोग काय त्याचा! ‘त्या’ जाहिरातींमुळे भाजपच्या मनातून साफ उतरले ना ते. मग मोदींची सहकुटुंब भेट घेऊन भाजपच्या मनात पेटलेली सुडाची आग कशी शांत होणार! भाजप डंख मारल्याशिवाय शांत बसणारच नाही, हे मी तुला लिहून देतो.
– पण मोदींची दिल्लीत सहकुटुंब भेट घेतल्यानंतर त्यांना मोठा दिलासा मिळाला, असं म्हणतात.
– निरोप समारंभ होता तो. हे भाजपवाले गोड बोलून कसा आणि कधी गळा कापतील हे सांगता येत नाही. अरे, स्वत:च्या पक्षातल्या कोणत्याही नेत्याची गय करत नाहीत ते. या शिंद्यांची काय करणार?
– मग उद्या तुमचीही अशीच गच्छन्ती करतील असं नाही वाटत?
– मी आणि शिंदे यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. मी अशी कोणतीही आगळीक करणार नाही, जिच्यामुळे भाजपवर मला पदावरून नारळ देण्याची वेळ येईल.
– तरीही येत्या निवडणुकीत भाजपा डुबली तर तिच्याबरोबर तुमचा पक्षही गटांगळ्या खाणार. मग तुमचं भवितव्य काय?
– तेव्हा जे काय होईल ते होईल. पण सध्या तरी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवल्याशिवाय हा दादा स्वस्थ बसणार नाही. तुम्हाला म्हणून सांगतो, काकांचेही आशीर्वाद आहेत माझ्यापाठी!