गुजरातेतून गुप्तचर यंत्रणेनं ‘ऑपरेशन – आवा दे, आवा दे’ अशा कोडनं पाठवलेला संदेश लीक झाला होता. माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना त्याचा सुगावा लागताच आयर्लंडला भारतीय संघासमवेत न गेलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला त्यांनी ‘इमर्जंसी मीटिंग अॅट अलिबाग’ असा टेक्स्ट पाठवला. अलिबागला या तिघांचेही फार्महाऊस असल्यामुळे समुद्रकिनारी भेटण्याची जागा शास्त्रीजींच्या बंगल्यावर मुकर्रर करण्यात आली. या गुप्त भेटीचा हा लेखाजोखा…
– – –
रात्री आठची वेळ. आकाशातला चंद्र तेजानं तळपत होता, तर चांदण्यांची लुकलुक त्या अंधारावर प्रकाशाचा साज चढवत होती. जोरदार पावसानं रोटेशन फॉर्म्युल्याप्रमाणे विश्रांती घेतल्यामुळे समुद्रकिनार्यावरील शास्त्रीजींच्या गेस्ट हाऊसच्या बाहेरच रंगणार्या मैफिलीसाठी सारं रीतीरीवाजाप्रमाणे मांडून ठेवलं होतं. ठरल्या वेळेप्रमाणे रोहित आणि विराटचं आगमन झालं. शास्त्रीजींनी आलिंगन देत त्यांचं मुक्तकंठानं स्वागत केलं. ‘रातभर जाम से जाम टकरायेगा…’ हे गाणं वायफाय स्पीकरवर मंद आवाजात शास्त्रीजींच्या नोकरानं प्ले केलं, ते वातावरणात वैâफ आणण्यासाठी… शास्त्रीजींनी स्वत:चा पेग भरला. दोघांनी मात्र आचारसंहितेमुळे कोल्ड ड्रिंक्सच घेणार असल्याचं स्पष्ट केलं. विराटला डिवचावं, या हेतूनं रोहित उत्तरला, ‘मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बॅलन्स है, इंडिया और मुंबई इंडियन्स की कॅप्टनशिप है. तुम्हारे पास क्या है?’
अचानक आलेल्या बाऊन्सरमुळे विराट भेदरला. त्याचे डोळे मोठाले झाले. पण शास्त्रीजी सरसावले आणि उत्तरले, ‘अबे तेरे पास ओडीआय वर्ल्डकप खेलने के लिए परफेक्ट ११ लोगों की टीम है क्या?’
शास्त्रीजींचा प्रश्न खूपच गंभीर होता. रोहितची बोलतीच बंद झाली आणि तो हिरमुसला. विराटनं त्याच्या खांद्यावर हात ठेवून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शास्त्रीजींनी ग्लास उचलला आणि सर्वांना चिअर्स म्हणत मदिरा-आरंभाचा पॉवरप्ले स्टार्ट केला.
दूरवर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. समुद्राची आणखी एक लाट रेतीला स्पर्शून गेली. रोहितच्या जखमेवरच स्पर्श झाल्यानं तो भावनिक झाला आणि मनातलं सारं मोकळं करायचं, असं ठरवून म्हणाला, ‘हे द्रविड सर अजूनही प्रयोगच करतायत. कंटाळा आलाय मला. नेमके कोणते खेळाडू खेळणार वर्ल्डकप हेच कळेनासं झालंय. कारण काही वेळा तर मीसुद्धा संघात नसतो.’
‘मी तुझं दु:ख समजू शकतो,’ विराटनं पुन्हा सहानुभूती दाखवत रोहितच्या खांद्यावर हात ठेवला. विराटनं एखाद्या हुशार विद्यार्थ्याप्रमाणे शास्त्रीजींना प्रश्न विचारला, ‘त्या थॉमस एडिसननं बल्ब पेटवण्यासाठी ९९९ अपयशी प्रयोग केले. तेव्हा कुठे त्याला हजाराव्या प्रयत्नात यश मिळालं. द्रविड सरांचंही तेच चाललं असावं का?’
शास्त्रीजींनी समोरील काही शेंगदाणे तोंडात टाकण्यासाठी उचलले. काही वर्षांपूर्वी प्रशिक्षक असताना याच शास्त्रीजींनी तुटपुंज्या मानधनाच्या मुद्यावरून ‘बीसीसीआय’ला जाब विचारला होता की, ‘तुम्ही भारतीय क्रिकेटपटूंपुढे शेंगदाणे फेकता!’ त्यानंतरच भारतीय क्रिकेटपटूंची पगारवाढ झाली होती. तेव्हा शास्त्रीजी रोहित-विराटसमवेत पदाधिकार्यांना भेटले होते. तो ‘फ्लॅशबॅक’ आठवून विराटच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
शास्त्रीजींनी धीरोदात्तपणे उत्तर दिलं, ‘चिकू, ये साला कॉम्बिनेशन पे कॉम्बिनेशन, कॉम्बिनेशन पे कॉम्बिनेशन बना रहा है, तुम्हारा द्रविड सर. असे प्रयोग करत राहिला तर बल्ब आयुष्यात कधी जळणार नाही!’
ह्या वास्तववादी उत्तरानं रोहितच्या उदासीनतेत आणखी भर पडली. बारमधील बार-बार वाजवलं जाणारं ‘अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का…’ हे गाणं आता लागलं होतं. ‘एक वर्ष झालं कॅप्टन्सीला, अजून म्हणावं तसं यश नाही. टेस्ट चॅम्पियनशीपसुद्धा हुकली,’ रोहित म्हणाला. शास्त्रीजींनी ग्लास खाली ठेवत अॅनॅलिसिसिस सुरू केलं. ‘तुम्ही दोघं चांगले दोस्त. पण फोडा आणि राज्य करा, अशी नीती वापरत रोहितकडे कॅप्टन्सी दिली गेली. तुमच्या दोघांमध्ये मतभेद झालेत, असं मीडियात पसरवण्यात आलं. मी हे गेले अनेक वर्ष पाहतोय आणि ते सहनही केलंय.’
शास्त्रीजींना किक लागलीय, आता ते वाहत जाऊ नयेत, म्हणून विराटनं विषयांतर केलं, ‘वर्ल्डकपबाबत बोलायचं, तर चौथा कोण, हेच उत्तर अद्याप सापडलेलं नाही.’
शास्त्रीजी पटकन म्हणाले, ‘मला खेळवा. मी परफेक्ट आहे, त्या स्पॉटसाठी.’
विराटने त्वरेनं उत्तर दिलं, ‘सरजी, तुमची नुकतीच एकसष्ठी झालीय. आप बुढ्ढे हो गये है.’
यावर शास्त्रीजींनी आक्रमकतेनं फटकेबाजी करताना टोलावलं, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘गदर-२’, ‘ओ माय गॉड’ आणि ‘जेलर’ हे चित्रपट हिट चाललेत. का माहिती आहे?’
रोहितनं कुतूहलानं ‘का?’ अशी पृच्छा केली.
शास्त्रीजी एखाद्या तत्त्ववेत्त्याप्रमाणे सांगू लागले, ‘याला म्हणतात ‘ओल्ड वाइन रूल’. दारू जितकी जुनी, तितकी चांगली. अक्षयचं वय ५५, सनीचं ६५ आणि रजनीकांतचं ७२. एक्सपिरियन्स मॅटर करतोच की…’
रोहितनं प्रतिप्रश्न केला, ‘अच्छा, तुम्हाला म्हणायचंय की सचिन, युवराज किंवा धोनी यापैकी एखाद्याला पुन्हा खेळवायचं?’
खिशातून सिगारेट काढत रजनीकांतच्या स्टाईलनं ती पेटवत शास्त्रीजींनी पुन्हा आपला हेका कायम ठेवला, ‘फिर मुझमें क्या कमी है!’ आता मात्र हशा पिकला.
हजरजबाबी रोहित आयफोनवरील यादी वाचू लागला. ‘श्रेयस, तिलक, सूर्यकुमार, सॅमसन, इशान आणि केएल राहुल असे काही पर्याय आम्ही आजमावलेत.’
रोहितचं वाक्य तोडत शास्त्री म्हणाले, ‘पाहिलेत तुमचे ‘द्रविडप्रयोग’. श्रेयस अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. सूर्या वनडेत अजून तळपलेला नाही, त्याचा फॉर्म म्हणजे अमावस्याच आहे. राहुलनं पुनरागमन सिद्ध केलेलं नाही. सॅमसनचे सूर आता लागत नाहीत. इशान, तिलक यांच्याबाबत वनडेत खात्री देता येत नाही. म्हणजे एकंदर बोंबच आहे.’
‘बुमरा प्रदीर्घ काळानंतर आयर्लंडविरुद्ध मालिकेत परतलाय, हेच दिलासादायी म्हणायला हवं,’ रोहित म्हणाला. विराटनंही त्याची री ओढली. आता दोघांचंही लक्ष पुन्हा शास्त्रीजींकडे गेलं. शास्त्रीजींनी आणखी एक पेग भरला. चिकन लॉलीपॉपचा एक चावा घेत पुन्हा मदिराप्राशन सुरू झालं. ‘या द्रविड सरांचं काय करायचं? वर्ल्डकप जिंकायचाय की नाही? नेशन्स वाँट टू नो’ हा प्रश्न रोहितनं उपस्थित केला. आता डेथ ओव्हर्स सुरू झाल्यात, याची खात्री पटल्यानं विराटनंही संयम बाजूला ठेवत विचारणा केली, ‘शास्त्रीजी हे काय प्रयोग चाललेत? वेस्ट इंडिजमध्ये मला वनडेमध्ये संघात असूनही मैदानावरच उतरू दिले नाही. विश्रांतीच द्यायची होती, तर संघात तरी का घेतलं?’
आता शास्त्रींनी दोघांना शांत करीत महत्त्वाच्या विषयाला हात घातला, ‘मित्रांनो, मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती द्यायला बोलावलंय. त्यातून तुमची समस्या मिटणार की वाढणार, ते तुम्हीच ठरवा. (दोघेही एकमेकांकडे पाहू लागले) सध्या चालू असलेल्या आयर्लंड दौर्यावर प्रशिक्षक द्रविड नाहीत. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणसुद्धा नाहीत. मग मार्गदर्शक आहेत शितांशू कोटक.’ आपल्याला याविषयी अधिक माहिती असल्याचं दाखवत विराट म्हणाला, ‘हे गुजरात कनेक्शन!’ रोहितनंही मानेनं अनुकूलता दर्शवली.
शास्त्रीजींनी सवाल केला, ‘मी तुम्हाला हे सांगायला ही गुप्त बैठक बोलावली नाहीए. ऐका तर मग. एक गुप्त योजना आखली जातेय. हे कनेक्शन गुजरातचंच आहे. कारण आपले सचिव जय शाह हे तिथलेच. ‘ऑपरेशन- आवा दे, आवा दे’.
पुन्हा दोघांनी एकमेकांकडे पाहिलं ते, हे काय बुवा? या अविर्भावात.
शास्त्रीजींनी अखेरच्या षटकातील उत्कंठा वाढवावी, तसाच आपला विषय ताणला होता. त्यामुळे ‘आता सांगा ना नेमकं काय ते?’ असा आर्जव रोहितनं केला.
‘२०११च्या विश्वविजेतेपदानंतर आपण कोणत्याच जागतिक स्पर्धेत यश मिळवलं नाही. किंबहुना चौथा कोण, फसलेली फलंदाजीची फळी, गोलंदाजीचा समन्वय, दुखापती हेच प्रश्न गेले एक तप कायम आहेत. त्यावर जालीम इलाज म्हणून हा नवप्रयोग होणार आहे. यात द्रविडची हकालपट्टी निश्चित. मग लिहित बस म्हणावं ‘माझे संघरचनेचे प्रयोग’ हे पुस्तक.’ हे ऐकताच दोघांचेही चेहरे फुलले.
‘मिशन वर्ल्ड कप हा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा विषय आहे. त्यात आपण यजमान. तो जिंकण्यासाठी भारतीय संघासोबत ‘एआय’ कार्यरत असेल,’ शास्त्रीजी म्हणाले. या आद्याक्षराची जुळवाजुळव करून नेमका कोण क्रिकेटपटू यासाठी दोघांनीही बोटं नाचवली. पण काहीच हाताशी लागेना.
‘मित्रांनो, हा कुणी मानवी क्रिकेटपटू नसून, चक्क ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रशिक्षक भारतीय संघासोबत असेल,’ हे सांगून शास्त्रीजींनी अखेरचा पेग रिचवला. रोहित आणि विराट चक्रावून एकमेकांकडे पाहू लागले. शास्त्रीजींनी सवाल केला, ‘काय झालं?’ यावर ‘दबंग’मधील डायलॉगच्या शैलीत रोहित म्हणाला, ‘द्रविड से डर नहीं लगता सर, लेकिन ‘एआय’से लगता है!’
(हे कथानक काल्पनिक असून, वास्तवात अशी पात्रे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)