आपल्या दारात प्रेयसी आणि एखादी देवी एकाच वेळी हजर झाली, तर आपण कुणाचं स्वागत आधी करावं?
– सचिन पोंक्षे, रहिमतपूर
बायको घरी नसेल तर प्रेयसीचे स्वागत करा. पण देवी दारात यायला आपण देव असायला पाहिजे ना? (घरात ऑलरेडी देवी असते, बायकोसारखी. खोटं वाटत असेल तर बायको घरात असताना प्रेयसीला दारात बोलवा आणि बायकोमधल्या चंडी, दुर्गा, कालिका अशा देवींचे दर्शन घ्या).
विवाहित स्त्रियांच्या गळ्यात मंगळसूत्र असतं, कपाळावर कुंकू असतं; असलं कसलंच सौभाग्यचिन्ह नसलेल्या पुरुषांना कसं ओळखायचं?
– रेवा धडफळे, लातूर
स्वतःच्या पुढ्यात पंचपक्वानांचं ताट वाढलेले असताना जो दुसर्याच्या ताटाकडे अधाशासारखा बघतो तो विवाहित पुरुष असतो.
संतोषराव, काल रात्री मला एक स्वप्न पडलं, त्यात माझ्या खिशातून ५०० रुपयांच्या पाच नोटा पडल्या. त्यानंतर त्या तुम्ही उचलल्या. मी तुम्हाला शोधतोय सकाळपासून. परत कराल ना माझे पैसे?
– आनंद पाटील, सातारा
काय पाटील साहेब, बंद झालेल्या जुन्या नोटांसाठी एवढा आटापिटा करताय! रात्री या (स्वप्नात…), जिथे पैसे सापडले तिथेच देतो पैसे.
लग्न हा एक अपघात असेल, तर साखरपुडा काय आहे?
– मायकेल डिसुझा, कणकवली
डिसुझा बोले तो तुम्हारे में साखरपुडा याने एंगेजमेंट होता है ना?
मुलं नेहमीच मुलींची छेड काढून त्यांना त्रास देत असतात. मुलींनी मुलांना कसे छेडावे?
– प्रज्ञा पुरव, सात बंगला
मुलींनी मुलांना सेम टू सेम मुलांसारखच छेडावं… अस छेडावं की मुलांनी बाप-भाऊ काढला पाहिजे… चप्पल काढली पाहिजे… किंवा दात काढून त्या मुलीला पटवले पाहिजे… मग तिने त्याला बाबा बनवून सोडून दिले पाहिजे, नाही तर त्या मुलीशी लग्न करून स्वतःची वाट लावून घेतली पाहिजे किंवा छान संसार केला पाहिजे (आता तुम्ही ठरवा यातलं तुम्हाला काय पाहिजे).
मृत्यूनंतर यमराजाने तुम्हाला विचारलं की आयुष्यात सगळ्यात चांगलं काम तुम्ही काय केलं आहे ते सांगा, तर काय सांगाल?
– प्रेरणा दातार, फणसवाडी
प्रेरणा ताई… यमराजांना जे सांगायचं ते तुमच्या समोरच सांगेन.. डोन्ट वरी!
सरकारने नाटकमंत्रीपद निर्माण केलं आणि त्या पदावर तुम्हाला नेमलं तर त्या पदावरून तुम्ही पहिलं काम काय कराल?
– रेवणनाथ सांगळे, सातपूर
माझ्या घरातल्या सगळ्या खोक्यांचा हिशोब जगजाहीर करेन.
बायकोच्या गळ्यात दगड बांधून तिला पाण्यात फेकावंसं वाटतंय, पण ती माझ्यावर प्रेम करते. मी काय करू?
– दत्तात्रय म्हेतर, जयसिंगपूर
तुम्हाला जे बायकोबद्दल वाटतंय ते बायकोला सांगा. पुढचं सगळं तीच करेल. तुम्हाला काही करावं लागणार नाही.
घाणेरड्या, नालायक राजकारण्यांनी महाराष्ट्राची केलेली दशा पाहून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या, हुतात्मा झालेल्या मराठी माणसांच्या आत्म्यांना काय वाटत असेल?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव
त्यांना वाटत असेल, बरं झालं. मोरारजींना गोळ्यांची भाषा कळत होती. खोक्याची भाषा कळत नव्हती.
कांद्याचा वास घालविण्यासाठी त्याला कोणत्या तेलात तळावे?
– अशोक परशुराम परब, सावरकर नगर, ठाणे
तुम्ही कांद्याच्या वासाजवळ गेला नाहीत तर कांद्याचा वास तुमच्या जवळ येणार नाही (साधं जनरल नॉलेज आहे. तेच वापरा. कुठलंही तेल वापरायची गरज नाही की आडून आडून प्रश्न विचारण्याची गरज नाही).
नम्रपणा हा गुण आहे की अवगुण? (सुपरस्टार रजनीकांतने उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना कंबरेतून झुकून केलेला नमस्कार पाहून सुचलेला प्रश्न.)
– सुरेश व्यवहारे, कल्याण
नमस्कार कोपरापासून केलाय की मनापासून?? तुमचा प्रश्न वाचून सुचलेला प्रश्न. (जाऊदेत व्यवहारे, त्यांचा काहीतरी व्यवहार असेल. पैसे घेऊन अभिनय करणार्या अभिनेत्यांचे कुठे काय सिरीयसली घेता?)
‘माणूसपण भारी देवा’ हे लोकांना केदार शिंदे यांनी सिनेमा काढल्यानंतरच कळेल की कसे? तुमचे काय मत?
– राकेश बोबडे, चंद्रपूर
त्यासाठी चित्रपट बनवण्याआधी लोकांमध्ये माणुसकी उरली आहे का, याची रेकी करावी लागेल.
सगळ्या जगाला संस्कृती शिकवण्याचा ठेका घेतल्याचा आव आणणारी माणसं सोशल मीडियावर शिवराळ भाषेत एखाद्याची आई-बहीण काढताना कशी काय दिसतात?
– विवेक पडवळ, रेणापूर
त्यांना संस्कृत भाषेत आई-बहीण काढता येत नसेल. त्यांची संस्कृत भाषा, त्यांच्या संस्कृती आणि संस्कारांबरोबरच नष्ट झाली असेल.