अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मी अर्ज करावा अशी काही पत्रकार मित्रांची आणि नाट्य क्षेत्रातील जाणकार कलावंतांची इच्छा २०११ सालापासून होती. पण मी कटाक्षाने टाळत होतो. कारण ज्येष्ठतेचा अपमान करून मला कुठल्याही स्पर्धेत उतरायचं नव्हतं. पण २०१६ साली माझी पंचाहत्तरी होती. `सामना’चे पत्रकार संजय डहाळे, बोरिवली ना नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कबरे, स्तंभलेखक आणि ना नाट्यसमीक्षक अरुण घाडीगावकर, तारखा स्पेशालिस्ट गोट्या सावंत आणि ‘यू टर्न’ फेम निर्माते गोविंद चव्हाण यांनी प्रदीप कबरेंच्या घरच्या गणपतीसमोर इच्छुकतेच्या अर्जावर माझी सही घेतली, तेव्हा फक्त गोट्या सावंत तेथे हजर नव्हता. नियामक मंडळासमोर उमेदवारांची नावं आली तेव्हा अध्यक्षपदासाठी गंगाराम गवाणकरच कसे योग्य आहेत, ही बाजू प्रसाद कांबळींनी लावून धरली होती. ही बातमी मला तेथे नियामक मंडळाचा सदस्य या नात्याने हजर असलेल्या गोट्यासावंतानी नंतर सांगितली. ९६वे नाट्य संमेलन ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये पार पडले. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे त्यावेळी स्वागताध्यक्ष होते. त्यांच्या साक्षीने माजी नाट्य संमेलनाध्यक्ष फैय्याज यांनी ती ऐतिहसिक पवित्र पगडी माझ्या मस्तकी ठेवली, तेव्हा मला १९५६ साली मुंबई विमानतळावर सहा आणे रोजावर बालमजूर म्हणून डोकीवरून `मालाचे घमेलो’ घेऊन जाणारा गंगाराम दिसायला लागला. एक बालमजूर ते अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा अध्यक्ष हा प्रवास केवळ थक्क करणारा होता आणि हे अध्यक्षपद न मागता मला मिळालं होतं. त्याच्या पाठीमागे `वस्त्रहरण’ या नाटकाला आणि मला लाभलेला साहित्यसम्राट पु. ल. देशपांडेंचा आशीर्वाद आणि लक्षावधी रसिकांच्या सदिच्छांचं पाठबळ होतं.
९६व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड होताच संमेलन कुठे घ्यावं यावरून चर्चा सुरू झाली. शेवटी ठाणेकरांनी बाजी मारली. १९६२ ते १९६७ ही पाच वर्षे मी ठाण्यातील दिवा गावात राहत होतो. `कशासाठी प्रेमासाठी?’ आणि ‘वेडी माणसे’ ही दोन नाटकं `दिवा’ नाव असूनही दिवा नसलेल्या गावात घासलेटच्या उजेडात बसून मी लिहिलेली होती. म्हणजे नाट्यलेखनाची सुरवात ज्या इलाख्यात झाली होती, त्याच इलाख्यातील ठाणे इथे माझी नाट्य संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
मी दिवे गावी राहायला आलो (१९६२साली) तेव्हा ठाण्याच्या नगर वाचनालयाचा मी सदस्य होतो. वाचनाची तहान-भूक ठाण्यातच भागायची. दिवे गावात ग्रामपंचायत होती. पण पाण्याची आणि विजेची पंचाईत होती. त्यावेळी दिवा हे नाव घेताच लोक घाबरायचे. पण मी राहायला गेलो, तेव्हा त्या गावाने मला लगेच सामावून घेतलं. कारण तेथील आगरी समाज कलाप्रेमी होता. खुद्द पोलीस पाटील (उत्तम पाटील) आडनावाने सुद्धा पाटीलच होते आणि सरपंच बी. के. भगत हे दोघेही नाटकवेडे होते. त्यांच्यात मी लगेच विरघळून गेलो. सरपंच बी. के. भगत हे आगरी समाजाचे पहिले आमदार. ठाण्यातील गोवर्धन हॉटेलचे मालक गोवर्धन भगत हे दिवा गावचेच. ते नंतर झेड.पी. सदस्य झाले. हे माझे जवळचे मित्र होते. बी. के. भगत हे काँग्रेसचे सरपंच होते.
त्यानंतर १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली. धारदार लेखणी, अमोघ वाणी आणि मर्मभेदी कुंचला या तीन शस्त्रांच्या बळावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठी तरूणांना एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित केलं. साहित्यसम्राट आचार्य अत्रेंप्रमाणे बाळासाहेबांच्या भाषणाला तरुणांचे लोंढेंच्या लोंढे जमायला लागले. दिवा गावचा सरपंच काँग्रेसचा असूनही मी माझ्या राहत्या भाड्याच्या घरावर भगवा झेंडा फडकवला आणि मी साईन बोर्ड पेंटर असल्यामुळे सणसणीत ‘शिवसेना शाखा’ असा फलकही लावला. एकच शाखा, दोन शिवसैनिक!
दिवा गावात त्यावेळी दोन कारणांसाठी वाचलो. एक म्हणजे नाटक आणि ज्यांच्याकडे मी खाणावळीला होतो, ते पेशाने डॉक्टर होते. माझ्या नाईट हायस्कूलचा जिवलग मित्र जनार्दन चौलकर, याचे ते मेहुणे डॉ. रघुनाथ गोरे. दिवा गावातील रहिवाशांना डॉ. गोरे यांच्याविषयी प्रचंड आदर होता. मी त्यांचा मेहुणा अशी माझी ओळख होती. त्यांचा मेहुणा चौलकर हासुद्धा हाडाचा शिवसैनिक. शिवसेनेची शाखा स्थापन करायची ही त्याचीच आयडिया. त्याला कारणही तसंच घडलं.
बाळासाहेबांच्या निखारे फुलवणार्या भाषेने आम्ही तरूण पेटून उठलो होतो. त्यात पठ्ठे बापूरावांचा पोवाडा माझ्या वाचनात आला होता.
`चला जाऊ कोल्हापुरी –
पंचगंगा नदी तिरी
कोल्हापूरी राजधानी मराठ्यांची।।’
हाच धागा पकडून एक पोवाडा माझ्याकडून लिहून झाला-
`चला जाऊ मुंबापुरी
चोहीकडे भरलं पानी
मुंबापुरी राजधानी मराठ्यांची!
मराठ्यांची राजधानी।
राज्य हिथं कोन करी-
उपर्यांची वाडली लई गर्दी…।। दाजीऽऽऽ
सदवानी अडवानी
बोलन्यात गोडवानी
बंगले बांधून मुंबईत बसल्याती।
मराठ्याला काम न्हाई
राहायला जागा न्हाई
म्हनुनशानी गोदीमंदी बोजे वहाती।। दाजीऽऽऽ
आरं शिवबाचा राज्य व्हता
तवा हिथं फेटा व्हता
फेट्यामंदी अक्कल व्हती मावळ्यांची ।
फेटा गेला, टोपी आली
टोपीमागून दाढी आली
दाढीमागून लुंगी आली केरळाची।
आरं, शिवबाची समशेर
कुटं गेली तिची धार?
मावळे काय गडावर झोपल्याती?
आर-न्हाई।। दाजीऽऽऽ
आता शिवबाळ जागा झाला
तेचं संग म्होर चला
हाराळी फोडूनशानी शिवसेनेची।। दाजीऽऽऽ
हा पोवाडा जनार्दन चौलकरला वाचून दाखवला. तो स्तिमित झाला. म्हणाला, गंगाराम ही शिवसेनेची तळपती तलवार आहे. मी आजच `मार्मिक’ला पाठवून देतो. आणि काय सांगू बाप हो, `मार्मिक’ने त्या वेळेला (१९६७) दसरा विशेषांकात पोवाड्याला विशेष जागा देऊन केशरी रंगात छापला. स्वातंत्र्य मिळाल्याच्या स्टाईलने चौलकर तो अंक फडकवीत माझ्याकडे आला- दिवा गावात आणि माझ्या ऑफिसात हलकल्लोळ माजला. दिवा गावात एका दिवसात मी `हिरो’ ठरलो, तर सेंट्रल टेलिग्राम ऑफिसमध्ये खलनायक ठरलो. त्याचं कारण माझा बॉस केरळचा श्रीनिवासन होता. एकुलता एक लँडलाईन फोन त्याच्या टेबलावर होता. त्या फोनवर मला अभिनंदनाचे दिवसभर सारखे फोन यायला लागले. त्याला कळत नव्हतं. माझ्या हाताखालच्या कारकुनाला माझ्यापेक्षा जास्त कॉल कसे? तशात ऑफिस स्टाफने एक पुष्पगुच्छ देऊन माझा लंचटाईममध्ये सत्कारही केला. ही सर्व तरूण मराठी माणसं शिवसेनेच्या विचाराने प्रेरित झालेली होती आणि माझ्या पोवाडाच्या रूपाने त्यांच्या हातात कोलीतच मिळालं.
पण माझा हा आनंद सायंकाळी चार वाजेपर्यंतच टिकला. चार वाजता माझ्या हातात इमिजिएट ट्रान्स्फरचा मेमो देण्यात आला. मी राहत होतो दिवा गावात (सेंट्रल रेल्वे), ऑफिस सीटीओ (सेंट्रल रेल्वे), पण माझी बदली करण्यात आली सांताक्रूझला (वेस्टर्न रेल्वे), ती सुद्धा `वुईथ इमिजीएट इफेक्ट’ (त्वरित) नॉर्थ बाय नॉर्थ वेस्ट. (हे एका गाजलेल्या इंग्रजी सस्पेन्स चित्रपटाचं नाव होतं).
गाजलो आणि गांजलोही. पण क्षणभरच. कारण सांताक्रूझचं ऑफिस म्हणजे साक्षात स्वर्ग. रेडिओ स्टेशन, तशात ऑफिसात माणसं फक्त तीन-मी, माझा बॉस आणि एक शिपाई. त्यानेही तो पोवाडा वाचल्यामुळे मला त्याच्या घरातून मालवणी पद्धतीचं जेवण यायचं.
श्रीनिवासन साहेबांचा स्टेनो पिल्ले नावाचा गृहस्थ होता. त्याला मराठी चांगलं येत होतं. त्याने साहेबांना `उपरा’ आणि `दाढीमागून लुंगी आली केरळची’ या ओळींचा अर्थ तिखट मीठ लावून लुंगीला झोंबेल अशा रीतीने समजावून सांगितला. तशात बाळासाहेबांनी दिलेली स्लोगन `उठाव लुंगी। बजाव पुंगी’ मुंबईच्या कोनाकोपर्यात घुमत होती. त्या पुंगीची श्रीनिवासन साहेबांनी तापलेली सळई केली आणि (मेमोच्या रूपाने) माझ्या कानात घातली. पण माझं काहीच नुकसान झालं नाही. उलट लेखनासाठी मला निवांत जागा मिळाली.
लेखन हा देवी सरस्वतीने दिलेला प्रसाद आहे. तो कधीच नासत नाही. आयुष्यभर तुमच्या भल्यासाठीच त्याची साथ-संगत मिळत राहते.
पुस्तकाचं नाव : गांजले ते गाजले
लेखकाचं नाव : गंगाराम गवाणकर
पृष्ठे : २१४
किंमत : रु. ४००
प्रकाशक : डिंपल प्रकाशन