विषय तसा नवा नाही, पण मीडियाला थोडा मोकळा वेळ मिळाला आणि आता काय दाखवायचं असा प्रश्न पडला, तर ते डोळे झाकून खड्ड्यांचे फोटो दाखवत असतात. अनेकदा खड्डे तेच असतात, फक्त हा जळगावचा, हा मुंबईचा, हा पुण्याचा, हा इचलकरंजीचा. गावे फक्त बदलत राहतात.
ऑफसेट प्रेस येण्यापूर्वी छोट्यामोठ्या दैनिकांचा मजकूर छपाईचे खिळे जुळवून तयार होई. फोटो वा चित्रांसाठी लाकडी ब्लॉक्स वापरले जात. छोट्या ट्रेडल मशीनवर छपाई चाले. फोटोंचे ब्लॉक वापरून वापरून अस्पष्ट होऊन जात व छपाईत तेथे काळा चौकोन तयार होई. बर्याचदा नेत्यांचे फोटो ब्लॉक्स सापडले नाही की काम अडे… अशावेळी प्रिंटरला मुख्य संपादक डोळे झाकून सल्ला देत, ‘अस्पष्ट झालेला एखादा ब्लॉक घे आणि त्याखाली त्या नेत्याचे नाव लिहून टाक.. बस!’ याच धर्तीवर रस्त्यावरील खड्ड्यांचे, महापुरांचे शॉट्स गावाचे नाव बदलून वापरले जात असावेत. कारण खड्ड्यांना ना रूप, ना रंग..
पावसाळा लागला की एकीकडे शेतीची कामे सुरू होतात आणि शहरातून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे नाटक कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित मनपा अधिकारी प्रामाणिकपणाने वठवतात… एक वेळ शेतकर्यांच्या शेतात पीक येणार नाही, पण या मंडळींचे कमाईचे खड्डे तुडुंब भरून जातातच. एके वर्षी मी यावर बॉक्स कार्टून काढले होते. खाडे नावाच्या मनपा अधिकार्याच्या नव्या बंगल्याची वास्तुशांती होती. हारतुरे लावले होते. प्रतिष्ठित मंडळी येणार होती. बंगल्याच्या गेटवर नेमप्लेट ‘खाडे पॅलेस’… या नावाऐवजी पेंटरने ‘खड्डे पॅलेस’ लिहिले होते. खाडे साहेबांशिवाय इतर सर्वांनी ते वाचले व मनसोक्त हसले. आणखी एक चित्र होते, एक गरोदर बाई दिवस भरले तरी बाळंत होईना; शेवटी कंटाळून तिच्या नवर्याला डॉक्टरीणबाई म्हणाल्या, ‘हिला रिक्षात बसवून चांगली तासभर रस्त्यावरून चक्कर मारून आणा.’
अन्य एका चित्रात एका बाईचा नवरा दोन दिवस झाले तरी सापडेना म्हणून ती पोलिसांकडे गेली. अधिकारी शांतपणे म्हणाले, ‘गावातले रस्त्यावरचे सगळे खड्डे चेक करून बघा आणि नाही सापडले तरच इकडे या!’ एका चित्रात मी रेखाटले होते. घनदाट जंगल वाढलेले होते. एक वाटसरू दुसर्याला सांगतोय, ‘येथे पूर्वी मोठा खड्ड्या-खड्ड्यांचा महामार्ग होता… एका मंत्र्यांनी एक लाख झाडे लावायचा उपक्रम काही विचार न करता इथेच उरकला. दुर्लक्षित खड्डे किती खोल असावेत याचा एक नमुना वाचण्यासारखा आहे.. खड्ड्यात पडलेला एक माणूस बायकोला फोन करून सांगतो आहे अगं मी खड्ड्यात पडलो खरा; पण तो इतका खोल होता की थेट पाताळापर्यंत पोहोचला… मी तेथूनच बोलतो आहे. विशेष म्हणजे माझ्यासारखे अनेकजण येथे अडकून पडले आहेत… जरा पोलिसांना सांगतेस का प्लीज?… व्हॉट्सअपवर चार-पाच फोटो टाकलेत बघ…
जेलमधील कैद्यांजवळ मोबाईल असणं नवं नाही. एका कैद्याला बाहेरचा मित्र सांगतोय, ‘तू सेलच्या भिंतीला छोटंसं भुयार करून पुढे ये… तुला रस्त्यावरचे अनेक खड्डे दिसतील त्यातून बाहेर पड!’ एका चित्रात रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये अनेक माणसं अडकलेली दिसत आहेत. पोलिसाला विचारलं तर तो म्हणतो, ‘या रोडची अनेकदा कामे करणारे ते कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, नॉन करप्ट महापौरांनी त्यांना शिक्षा दिली आहे!’
चांद्रयान एवढ्यात चंद्रावर गेलं आहे. त्याने फोटो पाठवले व मेसेज टाकला आहे की हे चंद्रावरचे खड्ड्यांचे फोटो नाहीत, तुम्ही कॅमेरा मुंबईच्या दिशेने लावलेला आहे. ईडीच्या भीतीने एक मंत्री रस्त्यावरच्या खड्ड्यातच लपला आहे. बायको खड्ड्याला तोंड लावून म्हणतेय, अहो, रात्र झाली, बाहेर निघा… ईडीवाले निघून गेलेत!’ बाहेर आल्यावर तो म्हणतो, ‘खड्डा इतका प्रशस्त होता की जीव अजिबात गुदमरला नाही!’
या विषयावर खड्ड्यांपेक्षा जास्त बोचरी व्यंगचित्रे काढता येतील.. वैतागून संपादक म्हणतील, ‘गेली ही व्यंगचित्रे खड्ड्यांत… मरू देत!’
दर वर्षी अनेक महापालिकांच्या बजेटमध्ये रस्ते दुरुस्तीचे मोठ्ठे घबाड ठेवलेले असते. रस्ते दुरुस्त करायचेच नसल्याने १०० टक्के मलिदा सगळे वाटून घेतात. वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली असल्याने महापालिकेला जाब विचारायची पब्लिकला उसंत कुठेय? अलीकडे मत मागणार्या उमेदवाराकडे हाऊसिंग सोसायटीचे लोक दुरुस्तीची कामे करून द्या, मगच मत देऊ, असं ठणकावून सांगतात. याच पद्धतीने येत्या निवडणुकीत ‘आधी रस्ते मगच मत देऊ’ असे सांगायची हिम्मत जनतेने दाखवायला हवी!