शिंदे सेनेचे प्रमुख तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री व आजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित केलेल्या पक्षाच्या मंत्री, आमदार व पदाधिकार्यांच्या विशाल मेळाव्यात उपस्थित सर्वांचीच बिनपाण्याने केली, ही बातमी माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याला समजली तेव्हा त्याला वाईट वाटलं. राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आपापल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करीत असलेल्या आपल्या नेत्यांच्या वाट्याला नाहक बदनामी यावी हे पाहून त्या सभागृहात बोलताना शिंदेंचा गळा दाटून आला होता. ते सद्गदित झाले होते. त्यांच्या डोळ्यातील अधूनमधून वाहणार्या अश्रूधारा दाढीवर ओघळून लुप्त होत होत्या, असंही पोक्याच्या कानी आलं होतं. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोडो बेकार की बातों को, कहीं बीत ना जाए रैना’ या गाण्याच्या मुखड्याने भाषणाचा प्रारंभ करून ‘मैं शायर बदनामऽऽऽ’ या मुखड्याने त्यांनी भाषणाचा शेवट केला, अशाही वावड्या उठल्याचं पोक्याला समजलं, पण पोक्याचा त्यावर विश्वास बसत नव्हता. प्रत्यक्ष शिंदे साहेबांना भेटूनच त्यांचं म्हणणं जाणून घ्यावं, या हेतूने मला न विचारताच तो त्यांना भेटायला गेला आणि चार तासांनी परत येऊन त्यांची मुलाखत माझ्या हाती दिली. तीच ही मुलाखत आपल्या माहितीवजा करमणुकीसाठी…
– ये, पोक्या ये. असा दारात उभा राहू नकोस.
– नमस्कार शिंदे साहेब.
– नमस्कार. जय महाराष्ट्र, जय गुजरात. काय घेणार? डाळ रोटी मागवू? जेवणाची वेळ आहे. डाळही चांगली आहे. अजिबात आंबलेली नाही.
– नको साहेब. आभारी आहे. तुमच्या मेळाव्यातील तुमचं हृदयस्पर्शी भाषण पेपरात वाचून मलाही गदगदून आलं. सारा प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिला.
– अरे, नाटक होतं ते सगळं. अशी नाटकं करायची माझी सवय जुनीच आहे. फक्त बाळासाहेबांसमोर नाटक करायची माझी हिंमत झाली नाही. नाहीतर उद्धव काय, मोदी काय, शहा काय… त्यांच्यासमोर आतापर्यंत भरपूर नाटकं केली आणि यापुढेही करावीच लागतील. ते जाऊंदे. आमच्या मेळाव्याविषयी काय जाणून घ्यायचं होतं आता तुला?
– हेच, तुमच्या मेळाव्यातल्या अभिनयाविषयी.
– अरे, कुणाला दुखवून चालत नाही. सांभाळून घ्यावं लागतं. लाफे मारून चालत नाही. गुन्हे केले तरी यापुढे असं करू नका, हे आंजारून गोंजारून सांगावं लागतं. एकेक टगे कसे आहेत हे त्यांच्या प्रतापांवरून आता जनताही ओळखून आहे, पण त्याची त्यांना पर्वा नाही. अंगात एवढी मस्ती भरलीय त्यांच्या की मी दम देत वरच्या आवाजात बोललो तर काय करतील याचाही नेम नाही. म्हणून मला मी दुखावल्याचा अभिनय करावा लागला. पूर्वी मीसुद्धा त्यांच्यासारखाच होतो. नको तिथे दमदाटी करायचो आणि हवं ते मिळवायचो. हळूहळू अक्कलदाढ आल्यासारखं झालं आणि आपला हेतू साध्य करण्यासाठी कुठेही झुकायची सवय अंगाला लावून घेतली. म्हणून तर एवढ्या मोठ्या पदांवर बसत आलो ना मी. पण आमचे हे सवंगडी, त्यांनी पूर्वीचा स्वभाव सोडला नाही. तीच उर्मटगिरी, तोच माज आणि नको ते धंदे करण्याची तीच खाज. मी म्हणतो, अरे खा ना, पण लोकांच्या डोळ्यात येईल अशी माया गोळा करताना थोडा तरी विचार करा. संपत्ती काय, सर्वच कमावतात, तरीही प्रदर्शन करू नका ना तिचं. त्या आमच्या तानाजी सावंताचं पोरगं काय आणि संजय शिरसाटांचं काय, च्यायला, आम्हाला कधी आयुष्यात जमलं नाय ते या पोरांनी करून दाखवलं. आता पिताश्रीच पाठीशी असल्यावर जमतात सगळे व्यवहार. जनता इतकी खुळी नाही काय ती गोम समजायला. त्या आमच्या भरत गोगावलेचे व्हिडिओ व्हायरल झाले, आमचा बॉक्सर संजय गायकवाडने आमदार निवासाच्या कँटीनमध्ये त्या बिचार्या कँटीन कर्मचार्यावर बॉक्सिंगचे प्रयोग केले. हे सगळं जनतेने डोळे भरून पाहिलंय. तरी यांची चरबी कमी होत नाय. यांच्या या एकेक पराक्रमामुळे सगळे माझ्याकडे बोट दाखवतात. मी काय करणार? मी पोसतोय का यांना? आज एक मुजोर लोकांचा पक्ष आणि मी त्यांचा म्होरक्या अशा कुत्सित नजरेने पाहिलं जातंय माझ्याकडे. त्या भाजपवाल्यांना आणि फडणवीसांना आयतं कोलीतच सापडलंय. विरोधी पक्ष तर लाज शरम काढतोय माझी आणि माझ्या पक्षाची. इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झालीय माझी. कोणत्या तोंडाने आम्ही जाणार आहोत जनतेपुढे मतं मागायला?
– तुम्ही त्या मेळाव्यात असंही म्हटलंत की आपला पक्ष म्हणजे एक कुटुंब आहे. मी त्याचा कुटुंबप्रमुख आहे.
– हो म्हटलं ना! पण कुटुंबातली काही माणसं वेडंवाकडं वागायला लागली तर मी काय गप्प बसायचं? मी मुख्यमंत्री झाल्यावर आमच्या पक्षातल्या काही लोकांना मंत्रीपदं दिली. त्यातल्या काहींनी असे काही पराक्रम केले की त्यांना आताच्या मंत्रिमंडळात नाही घेतलं मी. त्यांच्या काही गैर गोष्टी माझ्या कानावर येत होत्या. तेव्हाच ठरवलं की जे लोक पदाचा गैरफायदा घेताहेत त्यांना वगळायचं. त्यामुळे माझी बदनामी होते तशीच आमच्या पक्षकुटुंबाचीही होते. त्यामुळे हे असंच चालू राहिलं तर पक्षाचं कुटुंबनियोजन करण्याचा निर्णयही घेऊ शकतो मी.
– हे तर फारच उत्तम. छोटं कुटुंब सुखी कुटुंब. नाही साहेब, तुम्ही दाखवाच अशा लोकांना तुमचा इंगा. त्याशिवाय नाही वठणीवर यायचे ते.
– अरे, माझी किती पंचाईत होते दिल्लीत. मला बोलावून काय धुलाई करतात ते भाजप नेते माझी, याची कल्पना नाही या लोकांना. अडला हरी… अशी माझी कंडिशन आहे सध्या. यांना काय समजणार! त्या मोदी आणि शहांच्या कृपेने लाभलंय आपल्याला हे वैभव, हे तरी समजून घ्या. त्यांची अवकृपा झाली तर ओरपता ते तेलही जाईल आणि तूपही जाईल. फक्त बदनामी येईल वाट्याला!