□ विधानभवनात अक्षरश: टोळीयुद्ध; लॉबीत दंगल, पडळकर-आव्हाड गटांमध्ये तुफान हाणामारी.
■ असं काही झालं की लोक महाराष्ट्राचा बिहार झाला म्हणून गळे काढतात. आता बिहारमध्ये असं काही घडलं की आमच्या राज्याचा महाराष्ट्र करू नका, असं म्हणत असतील. कालाय तस्मै नम:!
□ जनसुरक्षा विधेयकाला विरोध न केल्याने हायकमांडची वडेट्टीवार आणि सतेज पाटील यांना नोटीस.
■ बैल गेला आणि झोपा केला… अजून यांचा सरंजामी ढिलेपणा काही संपत नाही. समोर कोण आहे, याचा तरी विचार करा. काँग्रेसचा विचार इथल्या मातीत खोल रुजला आहे म्हणून तुम्ही टिकून आहात, तुमची स्वतंत्रपणे ती योग्यताही नाही.
□ देवाभाऊंचे नागपूर अर्ध्या तासाच्या पावसात बुडाले.
■ वहिनी कुठे आहेत? त्यांनी गाणं रचलं नाही का नागपूरच्या दैनेवर. किंवा विद्यमान मुख्यमंत्र्यांची हजामत करणारं एखादं जहाल ट्वीट वगैरे कुठे केलं की नाही?
□ फडणवीसांचा हेका कायम; त्रिभाषा सूत्र लागू करणार.
■ मुंबईत आता परप्रांतीय विरुद्ध मराठी अशीच लढाई उभी करायची आहे. शिवाय स्वत:ला उत्तर भारताच्या बोळ्याने दूध प्यायला तयार असणारा भावी पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करायचं आहे. सत्ता आहे तोवर हेका कायम राहणार. वाढत जाणार.
□ अर्धा पगार रोखीने, अर्धा ऑनलाईन; बेस्टच्या गोंधळाचा कर्मचार्यांना मनस्ताप.
■ दोन्ही मिळून पूर्ण पगार देत आहेत, हेच खूप आहे. आता मुंबई ज्यांच्या दावणीला बांधायची आहे त्या मालकाच्या हातात बेस्टही जाईल, तेव्हाच पूर्ण पगार मिळेल कर्मचार्यांना.
□ राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा – विधिमंडळात विरोधकांचा घणाघात.
■ राज्यात? अहो तुमच्या विधिमंडळात तुम्हीच सुरक्षित नाही. आता फक्त हातापायांनी मारामारी झाली. तुमचे कार्यकर्ते असेच पिसाटत राहिले तर टोळीयुद्ध होईल विधान भवनात. स्वत:ची तरी काळजी करा.
□ घोडबंदरमध्ये ठेकेदाराची बेदरकार छाटणी; पक्षी मेले, अंडी फुटली, घरटी कोसळली.
■ जे माणसांची कदर करत नाहीत, त्यांचे संसार उघड्यावर आणताना ज्यांचे हात कापत नाहीत, ते पक्ष्यांची काळजी करतील? अंडी फुटली याचं त्यांना वाईट वाटेल फक्त… घरी जाऊन बुर्जी करता आली असती ना?
□ खारघरमध्ये ऐन पावसाळ्यात पाण्याचा खडखडाट; सिडकोवर शेकडो महिलांचा हंडा मोर्चा.
■ विलक्षण नियोजनाने बांधलेली शहरं आहेत म्हणे ही! हेच आहे का ते नियोजन? मग कठीण आहे.
□ बिहारमध्ये मतांची चोरी रंगेहाथ पकडली; राहुल गांधी यांनी शेयर केला व्हिडिओ.
■ महाराष्ट्र पॅटर्न आहे हा. एका अर्थाने महाराष्ट्राचा बिहार बनवण्याची लाइन आहे ही. अर्थात निलाजरा निवडणूक आयोग यावरही काही स्पष्टीकरणं शोधून काढेलच.
□ सगळे आमदार माजलेत असं लोकांना वाटतं – फडणवीसांचे हतबल उद्गार.
■ जे सगळे माजलेले आहेत असं लोकांना वाटतं, त्यांच्यात एक गोष्ट कॉमन आहे. आपला बाप कुठल्या तरी विशिष्ट बंगल्यावर बसलेला आहे, याची त्यांना खात्री आहे. त्याला जेरबंद करा, सगळे जागेवर येतील.
□ गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्स बार – आमदार अनिल परब यांनी केला गौप्यस्फोट.
■ जे लोक सोनिया गांधींचा नीचपणाने बारबाला असा उल्लेख करून त्यांच्याविषयी कंड्या पिकवत होते, चवीचवीने वाचत होते, त्या प्रवृत्तीचं हे खरं रूप. गोरक्षण करायला निघालेल्यांच्याच समाजातले वीर सर्वात मोठे गायींचे कत्तलखाने जिथे चालवतात, त्या देशात वेगळं काय होणार?
□ निवडणूक आयोग ईव्हीएम मशीन्सची पडताळणी करणार.
■ हा हा हा, चोर आपण केलेल्या गुन्ह्याचा तपास करणार, कुत्रा आपण केलेली घाण स्वत: साफ करणार, विखारी नेता आग लावणारी वक्तव्यं केली म्हणून जाहीरपणे स्वत:च्या श्रीमुखात मारून घेणार, हे जितकं अविश्वसनीय आहे, तितकाच निवडणूक आयोगाचा साळसूद पवित्राही अविश्वसनीय आहे.
□ मुंबई गुजरातला आंदण देण्याचा दिल्लीचा डाव – राज ठाकरे यांचा इशारा.
■ मुंबईचे उद्योगधंदेही असेच दिल्लीच्या नावाखाली नंतर गुजरातला नेले गेले राज साहेब! आताची लढाई तर फार कठीण असणार आहे. आता नीचतेचा कळस गाठणारी पाशवी सत्ता विरोधात उभी ठाकणार आहे. महाराष्ट्राला ठाकरे बंधूंकडूनच आता आशा आहेत.
□ नोकरीची हमी देऊन सरकारने बेरोजगारांना वार्यावर सोडले – महाराष्ट्र राज्य संघटना तीव्र आंदोलन करणार.
■ मुळात यांनी दिलेल्या हमीवर विश्वास ठेवणार्यांच्या आळशीपणाची कीव करायची की विचारशून्यतेबद्दल आश्चर्य व्यक्त करायचं? कारखानदारीला यांनीच घरघर लावलेली असताना हे कुठून देणार आहेत नोकर्या?
□ राज्य सरकार म्हणजे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा – विधिमंडळ नेते जयंत पाटील यांचा विधानसभेत हल्लाबोल.
■ पाटील साहेब, असल्या सरकारच्या नृशंस कायद्याला समर्थन देताना आपण जे हसत हसत भाषण केलंत, त्यात गल्लीतही मुजराच दिसला हो अनेकांना! असले कसले कणाहीन विरोधक तुम्ही?